Monday, September 28, 2026

चहाच्या टपरीपासून कोलंबिया विद्यापीठापर्यंत विकास तातड यांचा प्रेरणादायी प्रवास

               चहाच्या टपरीपासून कोलंबिया विद्यापीठापर्यंत  विकास तातड यांचा प्रेरणादायी प्रवास

 ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती’ चा लाभ

 

अमरावती,दि. २८ (जिमाका) : समाज कल्याण विभागाच्या ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती’ योजनेने घडविलेल्या विकास तातड यांचा ‘चहाच्या टपरीपासून कोलंबिया विद्यापीठापर्यंत’चा प्रवास अमरावतीतील युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे. शासकीय योजनेच्या लाभातून घडलेल्या या प्रवासासाठी ‘आशीर्वादाचा दिवा’ उपक्रमांतर्गत विकास तातड यांची भेट घेवून समाज कल्याण विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी दिवा प्रज्वलीत केला.

 

         ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘आशीर्वादाचा दिवा’ या उपक्रमांतर्गत समाज कल्याण विभागाच्या योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांच्या घरी जाऊन दिवा प्रज्वलित करणे व लाभार्थ्यांच्या भेटी घेणे हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत अमरावतीच्या केवल कॉलनी येथील रहिवासी असलेले समाज कल्याण विभागाच्या राजर्षी शाहु महाराज परदेश शिष्यवृत्तीचे लाभार्थी विकास तातड यांच्या निवासस्थानी  समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त माया केदार, सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर यांच्यासह अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सदिच्छा भेट दिली.

 

            या भेटी दरम्यान, विकास तातड यांनी आपल्या संघर्षमय शैक्षणिक प्रवासाची व सामाजिक कार्यातील वाटचालीची माहिती दिली. त्यांच्या वडिलांची छोटीशी चहाची टपरी होती. वडिलांना कामात मदत करतानाच त्यांनी शालेय शिक्षणापासून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाची जिद्द कायम ठेवत त्यांनी पुढील शिक्षणासाठी मुंबईतील टाटा सामाजिक विज्ञान संस्थान (टीआयएसएस) येथे प्रवेश घेतला. तिथे त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला.

 

दरम्यान, त्यांचा संशोधन निबंध अमेरिकेतील मँचेस्टर विद्यापीठात येथे निवडला गेला. २०१८ मध्ये त्यांनी प्रथमच अमेरिकेला जाऊन संशोधन निबंधाचे सादरीकरण केले. याच दौऱ्यात त्यांनी  कोलंबिया विद्यापीठाला भेट दिली. तेथील शैक्षणिक वातावरण आणि सामाजिक दृष्टिकोणाने प्रभावित होऊन भविष्यात याच विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्याचा निर्धार त्यांनी केला.त्यांच्या या स्वप्नाला पुढे यश मिळाले. २०२२ मध्ये  कोलंबिया विद्यापीठामधील ‘इंटरनॅशनल अँड कंप्यारेटिव्ह एज्युकेशन’ या विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी त्यांची निवड झाली.

 

              राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती २०२२-२३ च्या माध्यमातून त्यांनी अमेरिकेत उच्च शिक्षण पूर्ण केले. शिक्षणासोबतच सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी अमेरिकेतही विविध सामाजिक विषयांवर काम केले. सामाजिक न्याय, विद्यार्थ्यांचे प्रश्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार तसेच विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी त्यांनी विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत न्यू जर्सी येथील महानगरपालिकेच्या महापौरांकडून त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

 

सध्या विकास तातड हे ‘क्षमता बांधणी’ क्षेत्रात  तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. परदेशातील उच्च शिक्षणानंतरही अमरावतीशी असलेले आपले नाते त्यांनी कायम ठेवले आहे. त्यांनी सिद्धार्थ नगर येथे ‘स्लम स्कूल’ची स्थापना करून आर्थिकदृष्ट्या वंचित विद्यार्थ्यांना अल्प खर्चात गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.

 

             या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांना समाज कल्याण विभाग, अमरावतीकडून वेळोवेळी मिळालेल्या सहकार्याबद्दल त्यांनी विशेष आभार व्यक्त केले. समाज कल्याण विभागाच्या सहकार्यामुळे सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांना बळ मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी समाज कल्याण विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विकास तातड यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. समाज कल्याण विभागाच्या आयुक्त  दिपा (मुधोळ) मुंडे यांनी व्हिडीओ कॉलद्वारे विकास तातड यांच्याशी संवाद साधला व त्यांच्या संघर्षमय प्रवासाची माहिती घेतली.

 

              पुढील शैक्षणिक ध्येयाबाबत बोलताना विकास तातड यांनी  कोलंबिया विद्यापीठातून येथे पीएचडी करण्याची इच्छा व्यक्त केली. चहाच्या टपरीवरील संघर्षातून सुरू झालेला प्रवास, टिस ते अमेरिकेतील उच्च शिक्षण आणि सामाजिक कार्यापर्यंत पोहोचलेली त्यांची वाटचाल ही अमरावतीतील विद्यार्थी व तरुणांसाठी शिक्षण, जिद्द आणि सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी आदर्श ठरत आहे.

००००००

जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये दुष्काळी 'ट्रिगर-१' लागू

 

जिल्हाधिकाऱ्यांकडून कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश

 

अमरावती, दि. 28 (जिमाका) : खरीप हंगाम २०२६ मध्ये जून महिन्यापासून पावसाने दिलेल्या ओढ आणि इतर घटकांमुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य शासनाच्या २५ सप्टेंबर २०२६ च्या निर्णयानुसार जिल्ह्यातील सर्व १४ तालुक्यांमध्ये दुष्काळाची ट्रिगर-1 लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना तालुक्याचा दुष्काळ कृती आराखडा तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

 

त्यानुसार सर्व संबंधित तालुक्यांमध्ये पिकांच्या नुकसानीचे पंचनामे, छायाचित्रे आणि जीपीएस स्थान निश्चितीसह पीक परिस्थितीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत दि. १ ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरावर कृती आराखड्याचा आढावा घेतला जाणार आहे.

 

 

जिल्हाधिकाऱ्यांनी विविध १२ मुद्यांवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. यात पिकांच्या नुकसानीचा आढावा घेण्याची जबाबदारी तालुका कृषी अधिकारी, शेतकरी कर्ज मुक्ती योजना, नवीन ॲग्रीस्टॅक नोंदणी, ई-केवायसी आणि कर्ज वसुलीस स्थगिती, पुनर्गठनाची जबाबदारी सहायक निबंधक, सहकारी संस्था, केबी जीरामजी अंतर्गत जलसंधारणाची कामे गतीने पूर्ण करण्याची जबाबदारी गटविकास अधिकारी आणि उपअभियंता, जलसंधारण यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

 

शेतकऱ्यांना दररोज किमान १२ तास वीज पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी उपकार्यकारी अभियंता, वीज वितरण कंपनी, डिजीटल क्रॉप, शेतकरी कर्ज वाटप व कर्जमुक्तीच्या लाभार्थ्यांचे नियोजनासाठी तहसीलदार, पिण्याच्या पाण्याचे नियोजन व आवश्यक तेथे टँकर्सचा पुरवठ्यासाठी उपअभियंता, मजिप्रा आणि उपअभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा जिप, उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजनासाठी उपअभियंता, जलसंधारण, गाळपेर जमिनीवर जनावरांच्या चाऱ्याची लागवडीसाठी उपअभियंता, जलसंपदा व जलसंधारण, चाऱ्यासाठी नवीन जागा उपलब्ध करून देण्यासाठी तालुका पशुसंवर्धन अधिकारी आणि तहसीलदार, मुख्यमंत्री बळीराजा शेतपांदण रस्ते व मातोश्री पांदण रस्त्यांची कामे सुरू करण्यासाठी उपविभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद आणि गटविकास अधिकारी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यासाठी सहसंचालक उच्च शिक्षण, शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक, तर शेतीवर आश्रित शेतकरी व मजुरांना अन्नधान्याची टंचाई भासू न देण्याची जबाबदारी तहसीलदार व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. 

 

अमरावती, भातकुली, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, तिवसा, धारणी, चिखलदरा, वरुड, मोर्शी, चांदूर बाजार आणि दर्यापूर तालुक्याच्या यंत्रणांना जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी सर्व संबंधित विभागांना परस्पर समन्वयाने काम करून उपाययोजनांच्या अंमलबजावणीत कोणतीही दिरंगाई होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत.

00000

दुबार  लाभार्थी व निष्क्रिय शिधापत्रिकांवर कारवाई

 

विहित कालावधीत ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. 28 (जिमाका) : केंद्र शासनाच्या सार्वजनिक वितरण प्रणाली (नियंत्रण) सुधारणा आदेश, २०२५ मधील तरतुदीनुसार लाभार्थी शिधापत्रिकांचे नियमित अद्ययावतीकरण करण्यात येत आहे. त्यानुसार जिल्ह्यातील निष्क्रिय शिधापत्रिका तसेच  दुबार (डुप्लिकेट) लाभार्थ्यांवर आवश्यक कार्यवाही करण्यात येणार असून जिल्ह्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांनी आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे ई-केवायसी विहित कालावधीत पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी प्रज्ज्वल पाथरे यांनी केले आहे.

 

       सलग सहा महिन्यांच्या कालावधीत अन्नधान्याची उचल न झालेल्या शिधापत्रिकांची प्रत्येक महिन्याच्या २१ तारखेला आढावा घेवून अशा शिधापत्रिका त्यानंतरच्या महिन्यातील १ तारखेला स्वयंचलितपणे निष्क्रिय (ऑटो डिॲक्टीव्हेट) करण्यात येणार आहे. निष्क्रिय शिधापत्रिका राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम (एनएफएसए) प्रणालीमध्ये दिसत राहतील  मात्र, संबंधित शिधापत्रिकेवरील अन्नधान्य उचलण्याची सुविधा उपलब्ध राहणार नाही. अशा शिधापत्रिकांमुळे लाभार्थी यादीतील रिक्त जागा निर्माण होणार नाही. संबंधित शिधापत्रिकाधारकांना सूचना देऊन कुटुंबातील सर्व सदस्यांचे ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात येणार आहे. या कालावधीत ई-केवायसी पूर्ण न केल्यास संबंधित शिधापत्रिका राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत कार्यक्षमतेतून वगळण्यात येणार  असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

 

            मध्यवर्ती भांडार (सेंट्रल रिपोसटरी) मध्ये उपलब्ध नोंदींच्या आधारे आधार बेस ओळखीद्वारे आढळून आलेल्या डुप्लिकेट लाभार्थ्यांना निष्क्रिय करण्यात येणार आहे. संबंधित शिधापत्रिकेच्या कुटुंबप्रमुखास एसएमएसद्वारे सूचना पाठविण्यात येईल. तसेच, ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात येईल. ई-केवायसी व शिधापत्रिका पडताळणीची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर योग्य शिधापत्रिकेवरील लाभार्थ्यांची नोंद कायम ठेवून इतर शिधापत्रिकांवरील डुप्लिकेट नोंदी कमी करण्याची कार्यवाही केली जाईल.

 

            विहित कालावधीत ई-केवायसी पूर्ण न झाल्यास संबंधित डुप्लिकेट लाभार्थ्यांची नोंद राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत कार्यक्षमतेतून वगळण्यात येईल. त्यामुळे निर्धारीत कालावधीत जिल्ह्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांनी आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे.

००००

सहा महिने अन्नधान्याची उचल नसलेल्या शिधापत्रिका निष्क्रिय होणार

 

अमरावती, दि. 28 (जिमाका) : केंद्र सरकारच्या लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण प्रणाली सुधारणा आदेश 2025 मधील तरतुदींनुसार, स्मार्ट-पीडीएस प्रणाली अंतर्गत 'सायलेंट शिधापत्रिका' आणि 'दुबार लाभार्थी' यांच्यावर विशेष कारवाई करण्यात येणार आहे. यात सहा महिने अन्नधान्याची उचल नसलेल्या शिधापत्रिका निष्क्रिय होणार आहे.

 

लाभार्थ्याने सलग सहा महिने शिधापत्रिकांवरून अन्नधान्याची उचल केलेली नाही, त्यांचा दर महिन्याच्या 21 तारखेला आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतरच्या महिन्याच्या १ तारखेला त्या शिधापत्रिका आपोआप निष्क्रिय करण्यात येतील. बंद करण्यात आलेल्या शिधापत्रिका एनएफएसए प्रणालीवर दिसत असल्या, तरी त्यावर धान्य उचलण्याची सुविधा उपलब्ध राहणार नाही. संबंधित शिधापत्रिकाधारकांनी तीन महिन्यांच्या आत कुटुंबातील सर्व सदस्यांचे ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक आहे. विहित ३ महिन्यांच्या मुदतीत ई-केवायसी झालेली नसल्यास सदर शिधापत्रिका राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतून कायमस्वरूपी वगळण्यात येणार आहे.

 

दुबार लाभार्थ्यांच्या बाबतीत 'सेंट्रल रिपॉझिटरी'मधील नोंदीनुसार 'आधार-बेस्ड मॅचिंग' करून दुबार लाभार्थी ओळखले जातील व त्यांना डिॲक्टिव्हेट केले जाईल. याबाबत कुटुंबप्रमुखाच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे सूचना दिली जाईल. दुबार लाभार्थ्यांना ई-केवायसी व पडताळणीसाठी तीन महिन्यांचा कालावधी मिळेल. पडताळणीनंतर योग्य शिधापत्रिकेवर नाव कायम ठेवून इतर ठिकाणची दुबार नोंद हटवली जाईल. तीन महिन्यात ई-केवायसी झालेली नसल्यास दुबार नाव कायमस्वरूपी योजनेतून वगळण्यात येणार आहे.

 

जिल्ह्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांनी कुटुंबातील सर्व सदस्यांचे ई-केवायसी त्वरीत पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी प्रज्वल पाथरे यांनी केले आहे.

0000000

No comments:

Post a Comment

चहाच्या टपरीपासून कोलंबिया विद्यापीठापर्यंत विकास तातड यांचा प्रेरणादायी प्रवास

               चहाच्या टपरीपासून कोलंबिया विद्यापीठापर्यंत  विकास तातड यांचा प्रेरणादायी प्रवास   ‘ राजर्षी छत्रपती शाहू महाराज परदेश शिष्यव...