Tuesday, September 22, 2026

DIO NEWS AMRAVATI 22.09.2026



सायन्सकोर मैदान येथील रुख्मिणी गणेशोत्सव मंडळात ‘आरोग्य शिबिर' आणि ‘लोकसंवाद कार्यक्रम

 

अमरावती, दि. 22 (जिमाका) : मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष आणि जिल्हा माहिती कार्यालयाने येथील रुख्मिणी नगरातील सायन्सकोर मैदानावरील रुख्मिणी गणेशोत्सव मंडळात सोमवार 21 सप्टेंबर रोजी ‘आरोग्य शिबिर आणि लोकसंवाद उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

 

             राज्य शासनाने गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा दिला असून गणेशोत्सवा दरम्यान विविध गणेश मंडळांमध्ये मुख्यमंत्री सहायता निधी कक्षातर्फे ‘श्री गणेशा आरोग्याचा उपक्रम तसेच जिल्हा माहिती कार्यालयांच्यावतीने जनतेपर्यंत विविध शासकीय योजनांची माहिती पोचविण्यासाठी ‘लोकसंवाद उपक्रम राबविण्यात येत आहे.उभय कार्यालयांच्यावतीने आयोजित या उपक्रमात रुख्मिणी गणेशोत्सव मंडळामध्ये श्री गणरायाचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या नि:शुल्क रक्तदाब ,मधुमेह (डायबेटिस),नेत्र आणि दंत तपासणी करण्यात आल्या. यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि डॉ. राजेंद्र गोळे आयुर्वेदिक महाविद्याल व रुग्णालयाच्या वैद्यकीय चमुने शिबिरास भेट देणाऱ्या नागरिकांच्या वैद्यकीय तपासण्या केल्या.

 

              मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष अमरावती जिल्हा प्रमुख श्याम गावंडे यांनी उपस्थित नागरिकांना श्री गणेशा आरोग्याचा उपक्रमांतर्गत जिल्हाभर राबविण्यात येत असलेल्या आरोग्य शिबिरांबद्दल तसेच आरोग्य तपासणीत आजाराचे लक्षणे आढल्यास मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाशी संलग्नीत रुग्णालयामध्ये देण्यात येणाऱ्या नि:शुल्क उपचाराबाबत माहिती दिली.  जिल्हा माहिती कार्यालयाचे माहिती अधिकारी रितेश भुयार यांनी मृद व जलसंधारण विभाग, कौशल्य,रोजगार व नाविन्यता विभाग तसेच कृषी विभागाच्या योजनांबाबत आणि ‘लोकसंवाद उपक्रमाबाबत उपस्थित नागरिकांना माहिती  दिली.

 

                मंगळवार, 22 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता कठोरा रोड स्थित पोदार शाळेशेजारील जय अंबा गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महिला व बालविकास विभाग आणि  ग्रंथालय संचालनालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमांची माहिती या कार्यक्रमात देण्यात येणार असून या विभागांशी संबंधित नागरिकांच्या प्रश्नांचे उत्तरेही देण्यात येणार आहेत.                                          

०००००



व्यसनविरोधी लघुपट 'नॉट नॉर्मल'च्या ट्रेलरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते अनावरण

 

ग्रामीण पोलिसांचा 'ऑपरेशन कवच' उपक्रम

 

अमरावती, दि. 22 (जिमाका): अमरावती ग्रामीण पोलिसांच्या व्यसनमुक्तीकरिता राबविण्यात येत असलेल्या 'ऑपरेशन कवच' अंतर्गत निर्मित 'नॉट नॉर्मल' या व्यसनविरोधी लघुपटाच्या ट्रेलरचे महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते सोमवारी 21 सप्टेंबर रोजी नियोजन भवन येथे अनावरण करण्यात आले.

 

                पालकमंत्री श्री. बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे पार पडलेल्या विविध आढावा बैठकांनंतर लघुपटाचे अनावरण करण्यात आले. आमदार सर्वश्री प्रताप अडसड,उमेश यावलकर, प्रवीण तायडे, रवि राणा,केवलराम काळे यांच्यासह विभागीय आयुक्त नयना गुंडे,जिल्हाधिकारी आशिष येरेकर,मुख्यकार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, मनपा आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले, पोलीस अधीक्षक निकेतन कदम यावेळी उपस्थित होते.

 

                पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह मंत्री अमीत शाह यांच्या दूरदृष्टीतून राबविण्यात येत असलेल्या 'नशामुक्त भारत' अभियानाला बळ देण्यासाठी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'नशामुक्त महाराष्ट्र' या संकल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी अमरावती ग्रामीण पोलिसांच्या वतीने जिल्ह्यात ‘ऑपरेशन कवच च्या माध्यमातून एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. याअंतर्गत पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या पुढाकार व मार्गदर्शनाखाली स्थानिक कलाकारांना घेवून ‘नॉट नॉर्मल या लघुपटाची निर्मिती झाली आहे. स्थानिक कंटेंट क्रिएटर्स आणि इन्फ्लुएन्सर्स यांनी एकत्र येत सामाजिक बांधिलकी म्हणून या व्यसनविरोधी मोहिमेत सहभाग घेतला आहे.

 

 तरुणाईला ड्रग्ज आणि विविध व्यसनांच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी आणि 'नशेचा नकार जीवनाचा स्वीकार!' हा संदेश घराघरांत पोहोचवण्यासाठी या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

      

             या लघुपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रेम माणिक यांनी केले असून, छायाचित्रणाची धुरा शुभम जगदाळे यांनी सांभाळली आहे. यात मुख्य भूमिकेत ईश्वर सुतार, शितल भिलावेकर आणि आरिश शाह या स्थानिक कलाकारांनी दमदार अभिनय केला आहे.

हा लघुपट समाजातील वाढत्या व्यसनाधीनतेवर प्रकाश टाकणारा असून, 'नशामुक्त महाराष्ट्र' घडवण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरेल असा विश्वास लोकार्पण सोहळ्यात व्यक्त करण्यात आला. या लघुपटाचा पूर्ण ट्रेलर आता https://youtu.be/q4ex7vdWYIs?si=HfusAUKQLYzY5y5i  यूट्यूबवर  उपलब्ध करून देण्यात आला आहे.

०००००

 व्यावसायिक व  बिगर  व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शासकीय वसतिगृह प्रवेशास 30 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

 

अमरावती, दि. 22 (जिमाका) : इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळवण्यासाठी 30 ऑक्टोबर 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्यास मुदत वाढ देण्यात आली आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या अमरावती कार्यालयाने शैक्षणिक वर्ष 2026-27 साठीचे सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. 12 वी नंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org  या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अनिवार्य आहे.

 

            इतर मागास  बहुजन कल्याण विभागांतर्गत जिल्ह्यात कार्यरत मुला-मुलींच्या वसतिगृह योजनेनुसार प्रवेशित विद्यार्थ्यांना  मोफत सोई –सुविधा पुरविण्यात येतात. जिल्ह्यातील 12 वी नंतर व्यावसायिक व बिगरव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षासाठी https://hmas.mahait.org संकेत स्थळावर  येत्या 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार आहे. हा अर्ज  आवश्यक कागदपत्रांसह कालमर्यादेत मुलांनी  इतर मागास  बहुजन कल्याण मुलांचे शासकीय वसतिगृह, ब्लॉक एच, राम लक्ष्मण संकुल, दुसरा माळा, रामपुरी कँप अमरावती  येथे  तर मुलींनी  बहुजन कल्याण मुलींचे  शासकीय वसतिगृह, ब्लॉक ए, राम लक्ष्मण संकुल, तिसरा माळा, रामपुरी कँप अमरावती या वसतीगृहांमध्ये सादर करावा असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण अमरावतीच्या सहायक संचालक सरिता बोबडे यांनी केले आहे.

 

         ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले  आधार व पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेअंतर्गत इच्छुक विद्यार्थ्यांनी hmas.mahait.org या संकेतस्थळावर अर्ज  भरून आवश्यक त्या कागदपत्रांसह वरील दिलेल्या दिनांकापर्यंत सादर करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी  सहायक संचालक,इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, सामाजिक न्याय भवन, (पोलीस आयुक्तालयाच्या मागे) येथे तसेच adobbwoamravati@gmail.com वर ईमेल करता येणार आहे.

                                                               ००००००

 

दुर्गम भाग  व विजाभज प्रवर्गातील नागरीकांना योजनेच्या लाभासाठी शिबिरांचे आयोजन करा - राष्ट्रीय मागासवर्ग आयोग सदस्य किरण महल्ले

आढावा बैठकीत दिल्या सूचना

 

अमरावती,दि. 22 (जिमाका) : अमरावती विभागातील चिखलदरा ,मेळघाट,दिग्रस आणि दारव्हा आदी दुर्गम भागातील नागरिक तसेच विमुक्त जाती व भटक्या जमाती ( विजाभज) प्रवर्गातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करता यावी याकरिता तालुका व जिल्हा स्तरावर शिबिरांचे आयोजन करण्यात यावे, अशा सूचना राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या सदस्य किरण महल्ले यांनी यंत्रणांना दिल्या.

 

इतर मागास बहुजन कल्याण अमरावती प्रादेशिक कार्यालयाच्यावतीने 16 सप्टेंबर रोजी येथील समाजकल्याण विभाग सभागृहात श्रीमती  महल्ले यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याबैठकती त्यांनी या सूचना केल्या. इतर मागास बहुजन कल्याण अमरावती प्रादेशिक विभागाचे उपसंचालक विजय वाकुलकर,आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त ज्योती कडू,महिला व बालविकास विभागाचे उपायुक्त विशालसिंग चव्हाण यांच्यासह इतर मागास बहुजन कल्याण प्रादेशिक विभाग अमरावतींर्गत कार्यरत कार्यालयांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.

 

 इतर मागास बहुजन कल्याण विभाग, आदिवासी विकास विभाग आणि महिला व बाल विकास विभागाच्या विविध योजनांचा यावेळी आढावा घेण्यात आला. या विभागांच्या योजनांचा लाभ चिखलदरा ,मेळघाट,दिग्रस आणि दारव्हा आदी दुर्गम भागातील नागरिक तसेच विमुक्त जाती व भटक्या जमाती

 

 (विजाभज) प्रवर्गातील नागरिकांना प्रभावीपणे देण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता होण्याकामी विभागातील प्रत्येक जिल्हे व तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी विशेष शिबिरांचे आयोजन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. यासोबतच अन्य कारणांमुळे लाभापासून वंचित राहणाऱ्या लाभार्थ्यांपर्यत सर्व शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी प्रभावी उपाय योजना करण्याचे निर्देशही श्रीमती महल्ले यांनी यावेळी दिले.

००००००

टिमटाळा तलावावर संस्था नोंदणीसाठी

मच्छिमारांनी अर्ज करण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. 22 (जिमाका): अमरावती तालुक्यातील 500 हेक्टरखालील पाटबंधारे, जलसंधारण विभागाचा 43 हेक्टर क्षेत्र असलेला टिमटाळा तलाव, ता. नांदगाव खंडेश्वर हा तलाव मत्स्यव्यवसाय विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. या तलावावर संस्था नोंदणीसाठी मच्छिमारांनी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

सदर तलावावर मत्स्यव्यवसाय संस्था नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तलाव परिसरातील स्थानिक मच्छिमार, प्रकल्पग्रस्त नागरिक तसेच मच्छिमार महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

 

याकरिता इच्छुक असलेल्या परिसरातील स्थानिक मच्छिमार, प्रकल्पग्रस्त आणि महिलांनी सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था), अमरावती यांच्या कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधावा. तसेच जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत संस्था नोंदणीसाठी आवश्यक तो प्रस्ताव सहाय्यक निबंधक कार्यालयात सादर करावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांनी केले आहे.

00000




युवकांनी रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे

-डॉ. रणजित पाटील

*अमरावती जिल्ह्यात 29 सप्टेंबरला तालुकास्तरावर 16 रोजगार मेळावे

 

अमरावती, दि. 22 (जिमाका): कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग आणि इतर संलग्न विभागांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि. 29 सप्टेंबर रोजी 'रोजगार महाकुंभ' आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरावर या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. युवकांनी या रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन राज्यस्तरीय रोजगार मेळावा समितीचे अध्यक्ष डॉ. रणजित पाटील यांनी केले.

 

डॉ. पाटील म्हणाले, संपूर्ण राज्यात एकाच दिवशी, एकाच वेळी सुमारे 900 रोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार आहे. या महाकुंभाच्या माध्यमातून राज्यभरातील सुमारे 1 लाख युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानुषंगाने अमरावती विभागात 70 रोजगार मेळावे आयोजित केले जातील.

 

अमरावती जिल्ह्यात 16 मेळावे होणार असून प्रत्येक तालुक्यात एक आणि अमरावती शहरात 2 मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. या रोजगार मेळाव्यासाठी ऑनलाइन नोंदणी, क्यूआर कोड आणि ऑफलाइन, ऑन-स्पॉट नोंदणीची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संवैधानिक कारकिर्दीला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सेवा संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून रोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार आहे. सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी, खासदार व आमदारांच्या उपस्थितीत या मेळाव्यांचे उद्घाटन होणार आहे.

 

या मेळाव्यात 9 हजाराहून युवकांनी नोंदणी केली आहे. तसेच सध्यास्थितीत कंपन्या व उद्योजकांनी दोन हजाराहून अधिक रोजगाराच्या जागांसाठी नोंदणी करण्यात आली आहे. युवकांना त्यांच्या रहिवासाच्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यामुळे युवकांनी या रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. पाटील यांनी यावेळी केले.

 

यावेळी विभागीय रोजगार मेळाव्याचे अध्यक्ष किरण पातूरकर, कौशल्य विभागाचे उपायुक्त द. ल. ठाकरे, सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर आदी उपस्थित होते.

000000

No comments:

Post a Comment

रुख्मिणी गणेशोत्सव मंडळात ‘आरोग्य शिबिर’ आणि लोकसंवाद उपक्रमाचे आयोजन

  सायन्सकोर मैदान येथील रुख्मिणी गणेशोत्सव मंडळात ‘आरोग्य शिबिर' आणि ‘लोकसंवाद’ कार्यक्रम          अमरावती, दि. 22 (जिमाका) : मुख्...