Wednesday, September 30, 2026

DIO NEWS AMRAVATI 30.09.2026







                                   मध्यवर्ती कारागृहात 'अभिविक्षक मंडळा'ची त्रैमासिक बैठक संपन्न

 

*जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

 

*आधुनिक पाकगृहाचे उद्घाटन, सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण निर्देश

 

अमरावती, दि. 30 (जिमाका) : मध्यवर्ती कारागृह येथे मंगळवारी, दि. 29 सप्टेंबर जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या अध्यक्षतेखाली कारागृह अभिविक्षक मंडळाची त्रैमासिक बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील प्रमुख सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

कारागृह परिसराची प्रत्यक्ष पाहणी व समस्यांचा आढावा बैठकीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभागांच्या प्रतिनिधींसह कारागृहातील संपूर्ण परिसराची पाहणी केली. त्यांनी पाकगृह, रुग्णालय, मुलाखत कक्ष, धान्य गोदाम, उपहारगृह, सुतारकाम विभाग, ग्रंथालय, रेडिओ कक्ष, मुक्त विद्यापीठाचे अभ्यासकेंद्र, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग कक्ष, बंदी बरॅक आणि अतिसुरक्षा कक्षाला भेट देऊन माहिती घेतली व समस्या जाणून घेतल्या.

 

तसेच, डीपीडीसी अंतर्गत आधुनिकीकरण करण्यात आलेल्या नवीन पाकगृहाचे उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. आधुनिक सोयीसुविधांनी युक्त काम पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. याशिवाय व्हीसी क्युबिकल्स कक्षास भेट देऊन ऑनलाइन कोर्टपेशी, वकील व नातेवाईकांच्या मुलाखतींच्या सादरीकरणाची पाहणी करून आवश्यक सूचना दिल्या.

 

कारागृहातील विद्युत व्यवस्था विनाखंड सुरू राहण्यासाठी एक्स्प्रेस फीडर बसवून तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. तसेच वायरिंग दुरुस्तीची कामे डीपीडीसी निधीतून पूर्ण करण्याचे निर्देश दिले. सुरक्षेच्या कारणास्तव कारागृहाबाहेरील हायवेच्या बाजूने व्ह्यू-कटर बसवण्याचे काम तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. बंद्यांना वेळेवर न्यायालयात आणि वैद्यकीय उपचारासाठी नेण्यासाठी पोलीस पथकाची कमतरता भासू नये, म्हणून कारागृह व पोलीस विभागाने दरमहा समन्वय बैठक घेण्याच्या सूचना दिल्या. बंद्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी 'कार वॉशिंग सेंटर'चे काम पूर्ण करण्याचे आणि सोलर प्रशिक्षणासोबतच इतर नवीन कौशल्य विकास प्रशिक्षण सुरू करण्याचे निर्देश दिले.

ग्रंथालयाचे आधुनिकीकरण करणे, ई-बाईक, सोलर यंत्रणा आणि इतर पायाभूत सुविधा वाढवण्याबाबत संबंधित विभागांना सूचना देण्यात आली.

 

या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक निकेतन कदम, पोलीस उपायुक्त प्रांजली सोनावणे, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी नरेंद्र वानखेडे, अशासकीय सदस्य धनानंद नागदिवे, कारागृह अधीक्षक कीर्ती चिंतामणी, उपअधीक्षक प्रदीप इंगळे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी देवराव जाधव, अंतर्गत सुरक्षा अधिकारी धनसिंग कवाळे, तुरुंगाधिकारी हेमंत इंगोले, कारागृह शिक्षक ललित मुंडे, संजय घोलप उपस्थित होते.

000000

जिल्ह्यातून चारा जिल्ह्याबाहेर नेण्यास बंदी

 

*जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

 

अमरावती, दि. 30 (जिमाका) : जिल्ह्यात यावर्षी झालेल्या अल्प पावसामुळे आणि दुष्काळी परिस्थितीमुळे भविष्यात गुरांच्या चाऱ्याची टंचाई भासू नये, यासाठी जिल्ह्याच्या हद्दीबाहेर हिरवा व वाळलेला चारा, गवत आणि वैरणीची विक्री व वाहतूक करण्यास तातडीने बंदी घालण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी आशिष येरेकर यांनी जारी केले आहेत.

 

सन 2026 च्या खरीप हंगामात घोषित करण्यात आलेल्या 'ट्रिगर-१' मध्ये जिल्ह्यातील सर्व 14 तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने चारा उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पशुधनाला पुरेशा प्रमाणात चारा उपलब्ध राहावा या उद्देशाने 'महाराष्ट्र वैरण (निर्यात नियंत्रक) आदेश 2001' मधील तरतुदींचा वापर करून ही वाहतूक बंदी घालण्यात आली आहे.

 

हा आदेश 29 सप्टेंबर 2026 पासून पुढील पुढील आदेश येईपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात लागू राहील. या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश पोलीस प्रशासन, महसूल विभाग, प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आले आहेत.

000000

2 ऑक्टोबरच्या ग्रामसभेत ‘बालविवाहमुक्त गाव’चा ठराव घ्या अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सत्यम गांधी यांचे ग्रामपंचायतींना निर्देश; जनजागृतीसह प्रतिबंधात्मक कार्यवाहीवर भर

 

अमरावती, दि. 30 (जिमाका) : बालविवाह ही सामाजिकदृष्ट्या घातक प्रथा असून त्याचा बालकांच्या शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता आणि सर्वांगीण विकासावर प्रतिकूल परिणाम होतो. बालविवाह प्रतिबंध अधिनियम, 2006 नुसार बालविवाहास प्रतिबंध करण्यासाठी अमरावती जिल्ह्यात व्यापक जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. याच अनुषंगाने 2 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ग्रामसभेत ‘बालविवाहमुक्त गाव’ याबाबतचा ठराव घेण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना दिले आहेत.

 

ग्रामसभेच्या अजेंड्यामध्ये ‘बालविवाहमुक्त गाव’ हा विषय समाविष्ट करून त्यावर सविस्तर चर्चा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच बालविवाह प्रतिबंधाबाबतच्या कायदेशीर तरतुदी, बालविवाहाचे दुष्परिणाम आणि प्रतिबंधासाठी नागरिकांची भूमिका याबाबत ग्रामस्थांना माहिती देण्याचे निर्देश आहेत.

 

ग्रामसभेत “आमच्या गावामध्ये कोणत्याही बालकाचा बालविवाह होणार नाही तसेच बालविवाहास प्रोत्साहन दिले जाणार नाही” अशा आशयाचा ठराव सर्वानुमते अथवा बहुमताने मंजूर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

ग्रामस्तरीय यंत्रणांचा सक्रिय सहभाग

 

बालविवाह प्रतिबंधाच्या कार्यात गावातील पालक, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामसेवक, पोलीस पाटील, स्वयंसेवी संस्था तसेच संबंधित घटकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गावामध्ये संभाव्य बालविवाहाची माहिती मिळाल्यास ती तात्काळ संबंधित बालविवाह प्रतिबंधक अधिकारी, पोलीस विभाग, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, किंवा चाइल्ड हेल्पलाईन 1098 यांना देण्याबाबतही जनजागृती करण्यात येणार आहे.

 

ग्रामसभेतील कार्यवाहीचे दस्तऐवजीकरण

 

ग्रामसभेतील ठराव, उपस्थितीपत्रक, जनजागृती कार्यक्रमांची छायाचित्रे/व्हिडिओ तसेच बालविवाह प्रतिबंधासाठी करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल जतन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ठराव मंजूर झालेल्या गावांची यादी व संबंधित ठराव ग्रामपंचायत समिती स्तरावर संकलित करून तालुकानिहाय अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

 

बालविवाह प्रतिबंधाच्या दृष्टीने आवश्यक निकष पूर्ण करणाऱ्या गावांना ग्रामसभेतील ठरावाच्या आधारे ‘बालविवाहमुक्त गाव’ म्हणून घोषित करण्याबाबत पुढील कार्यवाही संबंधित मार्गदर्शक सूचनांनुसार करण्यात येणार आहे.

 

“बालविवाहमुक्त गाव” ही संकल्पना केवळ ग्रामसभेतील ठरावापुरती मर्यादित न ठेवता, गावात सातत्यपूर्ण जनजागृती, दक्षता आणि प्रतिबंधात्मक कार्यवाही प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

जिल्ह्यातील प्रत्येक गाव बालविवाहमुक्त करण्यासाठी ग्रामपंचायत, प्रशासन आणि नागरिकांनी समन्वयाने कार्य करण्याची गरज असून, 2 ऑक्टोबरच्या ग्रामसभेत याबाबत ठोस संकल्प करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

000000





शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे आरोग्य शिबिर संपन्न

 

*श्री गणेशा आरोग्याचा अभियानात 400 नागरिकांनी घेतला लाभ

 

अमरावती, दि. 30 (जिमाका) : गणेशोत्सवाच्या कालावधीत शहरात "श्री गणेशा आरोग्याचा अभियान 2026" यशस्वीरीत्या राबविण्यात आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अमरावती यांच्या वतीने शहरातील विविध सार्वजनिक गणेशमंडळांमध्ये या आरोग्य व तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले.

 

या अभियानांतर्गत जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अनिल बत्रा यांच्या मार्गदर्शनाखाली दंत व नेत्ररोग तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले.

यात दि. 16 सप्टेंबर रोजी सावता बाल गणेश उत्सव मंडळ, सावता कॉलनी, प्रशांत नगर, दि. 21 ते 23 सप्टेंबर रोजी रुक्मिणी गणेशोत्सव मंडळ, सायन्स कोर मैदान, दि. 24 सप्टेंबर रोजी सिद्धीविनायक गणेशोत्सव मंडळ, सिद्धीविनायक नगर, कठोरा नाका याठिकाणी शिबीर घेण्यात आले.

 

या शिबिरांचा एकूण 400 हून अधिक लाभार्थ्यांनी लाभ घेतला, ज्यामध्ये 228 पुरुष, 152 महिला आणि 22 मुलांचा समावेश होता. शिबिरादरम्यान नागरिकांना आरोग्यविषयक समुपदेशन व जनजागृती करण्यात आली, तसेच गरजू रुग्णांना पुढील विशेष उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात संदर्भित करण्यात आले.

 

सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी, आंतरवासिता डॉक्टर तसेच समाजसेवा अधीक्षक आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

000000

शहरात 15 दिवस निर्बंध; नवदुर्गोत्सव-शारदोत्सव या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी काढले आदेश

 

अमरावती दि. 30 (जिमाका):  अमरावती शहर आणि परिसरात आगामी नवदुर्गोत्सव आणि शारदोत्सवच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 36 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. हे आदेश 13 ऑक्टोबर, 2026 रोजी पर्यंत  लागू राहतील.

 

            दि. 11 ऑक्टोबर, 2026 रोजी घटस्थापना असून त्यादिवशी नवदुर्गोत्सव/शारदोत्सव तसेच नवरात्री उत्सवास प्रारंभ होणार आहे. त्याचप्रमाणे पोलीस आयुक्त अमरावती कार्यक्षेत्रामध्ये दुर्गादेवी व शारदादेवींची मोठ्या प्रमाणात स्थापना करण्यात येणार असून स्थापना मिरवणुकींचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येणार आहे. तसेच अंबादेवी/ एकविरादेवी मंदीर परिसरात भव्य यात्रेचे  आयोजन करण्यात येत असून श्री अंबादेवी/ एकविरादेवी मंदीरात दर्शनाकरीता दररोज 9 दिवस भाविकांची विशेषत: महिला वर्ग यांची प्रचंड गर्दी राहते. तसेच नवरात्री दरम्यान दररोज विविध ठिकाणी रास गरबा, दांडिया नृत्याचे आयोजन सुध्दा करण्यात येणार आहे.

 

               या आदेशानुसार, अमरावती पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यांच्या अंमलदारांना व वरिष्ठ अधिकाऱ्यांना कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. रस्त्यावरून जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कसे वागावे, मिरवणुका कोणत्या मार्गाने व कोणत्या वेळी काढाव्यात, याचे अधिकार पोलिसांना राहतील. कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर गाणी गाणे, ढोल-ताशे व  इतर कर्कश वाद्ये वाजविण्यावर पोलिसांचे नियंत्रण असेल.

 

               इतर कोणत्याही व्यक्तीने या आदेशाचे उल्लंघन केल्यास, तो महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 134 प्रमाणे कायदेशीर कारवाईस पात्र राहील, असे या आदेशात सांगण्यात आले आहे.

000000


No comments:

Post a Comment

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती आणि १२ उपाययोजनांद्वारे दिलासा. आव्हानाच्या काळात शासन आपल्या सोबत! #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare

  राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती आणि १२ उपाययोजनांद्वारे दिलासा. आव्हानाच्या काळात शासन आपल्या सोबत! #दुष्काळ #शेतक...