Friday, September 25, 2026

DIO NEWS AMRAVATI 25.09.2026


                                             विमुक्त जाती, भटक्या जमातींसाठी दाखले, योजना शिबिर

 

*महसूल, बहुजन कल्याण विभागाचा उपक्रम

 

अमरावती, दि. 25 (जिमाका) : इतर मागास बहुजन कल्याण विभाग आणि महसूल विभागातर्फे तालुक्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातींमधील नागरिकांसाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. ही विशेष मोहिम दि. 27 ते 29 सप्टेंबर दरम्यान घेण्यात येणार आहे.

 

विमुक्त जाती व भटक्या जमातींमधील घटकांना रहिवासाचे निश्चित ठिकाण नसल्याने त्यांना आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र, आयुष्मान भारत कार्ड, उत्पन्न दाखला, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, रहिवास प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र, तसेच विवाह, जन्म-मृत्यू नोंदणी दाखले यांची उपलब्धता शिबिरात करून देण्यात येणार आहे. तसेच शासकीय योजनांचा लाभ सुलभतेने पोहोचविण्यासाठी शिबीर घेण्यात येणार आहे.

 

या विशेष शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांना आयुष्मान भारत कार्ड, प्रधानमंत्री आवास योजना, पीएम किसान सन्मान निधी योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना आदी योजनांचा अर्ज व लाभ प्रत्यक्ष मिळवून दिले जातील. नागरिकांना सहजरीत्या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी परिसरातील सर्व 'आपले सरकार सेवा केंद्र', 'महा-ई-सेवा केंद्र' आणि 'आधार केंद्र' चालकांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 

जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांनी या तीन दिवसीय विशेष शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक सरिता बोबडे यांनी केले आहे.

00000

दिव्यांगांसाठी तालुकास्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन

 

अमरावती, दि. 25 (जिमाका) : राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशानुसार 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत 'सेवा संकल्प अभियान' राबवले जात आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये दिव्यांगांसाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 30 सप्टेंबरपासून हे शिबीरे आयोजित करण्यात येणार आहे.

 

तालुका पातळीवर आयोजित करण्यात येणाऱ्या या शिबिरांच्या माध्यमातून दिव्यांगांना थेट प्रमाणपत्र मिळवणे सोपे होणार आहे. अमरावती आणि भातकुलीसाठी बुधवार, दि. 30 सप्टेंबर रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय, गुरुवार, दि. 1 ऑक्टोबर रोजी ग्रामीण रुग्णालय, चांदूर रेल्वे, मंगळवार, दि. 6 ऑक्टोबर रोजी ग्रामीण रुग्णालय, नांदगाव खंडेश्वर, गुरुवार दि. 8 ऑक्टोबर रोजी ग्रामीण रुग्णालय, चांदूर बाजार, शुक्रवार, दि. 9 ऑक्टोबर रोजी उपजिल्हा रुग्णालय, दर्यापूर, मंगळवार, दि.  13 ऑक्टोबर रोजी ग्रामीण रुग्णालय, तिवसा, गुरुवार, दि. 15 ऑक्टोबर रोजी उपजिल्हा रुग्णालय, अचलपूर, शुक्रवार, दि. 16 ऑक्टोबर रोजी उपजिल्हा रुग्णालय, मोर्शी, शनिवार, दि. 17 ऑक्टोबर रोजी ग्रामीण रुग्णालय, अंजनगाव सुर्जी येथे सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत हे शिबीर होणार आहे.

 

दिव्यांग व्यक्तींनी यापूर्वीच दिव्यांग प्रमाणपत्र किंवा यूडीआयडी कार्ड प्राप्त केले असल्यास त्यांनी या शिबिरास उपस्थित राहू नये. तसेच कॅन्सर, हृदयरोग, क्षयरोग आणि इतर गंभीर, दुर्धर आजारांनी ग्रस्त असणाऱ्या रुग्णांनी या शिबिरासाठी उपस्थित राहू नये, तसेच दिव्यांगांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी केले आहे.

00000


पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन

 

          अमरावती, दि. 25 (जिमाका): पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी कार्यालयात आज निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

 

          यावेळी अधिक्षक निलेश खटके विधी अधिकारी नरेंद्र बोहरा यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.  

00000

शासनाची प्रतिमा मलीन करणारी बातमी खोटी, तथ्यहीन

 

*गैरसमज न पसरवण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

 

अमरावती, दि. 25 (जिमाका) : साप्ताहिक वृत्त 'शब्दसूर्य'चे गंगाराम कुंजीलाल जांबेकर यांनी धारणी येथील तहसीलदार यांचे जुने शासकीय निवासस्थान आरएसएसच्या एनजीओला भाड्याने दिल्याबाबतचे वृत्त विविध प्रसारमाध्यमांमध्ये व व्हॉट्सॲप स्टेटसवर प्रसारीत केले असल्याचे आढळून आले आहे. मात्र, ही बातमी पूर्णपणे खोटी, तथ्यहीन आणि दिशाभूल करणारी असल्याचे जिल्हा व तालुका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

 

सदर जागा महाराष्ट्र शासनाद्वारे शासकीय नियमानुसार, सर्व अटी व शर्तींच्या अधीन राहून 21 जुलै 2026 रोजी डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती सार्वजनिक वाचनालयासाठी प्रदान करण्यात आली आहे. त्यामुळे ही जागा तालुका महसूल प्रशासन किंवा तहसीलदार, धारणी यांनी कोणालाही भाडेतत्त्वावर दिलेली नाही.

 

अशा प्रकारची खोटी माहिती पसरवून शासनाची प्रतिमा मलीन करणे, नागरिकांमध्ये अप्रीती निर्माण करणे आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे हा कायद्याने गुन्हा आहे. या पार्श्वभूमीवर, कोणत्याही बातमीची सत्यता व पडताळणी केल्याशिवाय अशा दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसारित करू नयेत, असे आवाहन तालुका व जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व प्रसारमाध्यमांना करण्यात आले आहे. सत्यतेची पडताळणी न करता खोटी बातमी प्रसिद्ध केल्यास संबंधितांवर नियमानुसार कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 25.09.2026

                                              विमुक्त जाती, भटक्या जमातींसाठी दाखले, योजना शिबिर   *महसूल, बहुजन कल्याण विभागाचा उपक्रम   अम...