1 ऑक्टोबरला गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल
अमरावती, दि. 29 (जिमाका) : शहरातील न्यू आझाद गणेश मंडळाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर 1 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 3 ते रात्री 10 या वेळेत वाहतूक वळवण्यात आली असून प्रमुख मार्गांवर 'नो-एन्ट्री' लागू करण्यात आली आहे.पोलीस उपायुक्त प्रांजली सोनवणे यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी 28 सप्टेंबर रोजी हे आदेश जारी केले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर मोटार वाहन कायदा १९८८ आणि महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ अन्वये कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.
या आदेशानुसार गर्ल्स हायस्कूल चौकाकडून इर्विन चौकाकडे जाणारी वाहने पोलीस पेट्रोल पंपमार्गे बस स्टँडकडे, तर बाबा कॉर्नरकडून येणारी वाहतूक लेखुमल चौकाकडे वळवण्यात येणार आहे. रेल्वे स्टेशन चौकाकडून येणारी वाहतूक मिरवणूक मालवीय चौक पार करेपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे. गद्रे चौकाकडून येणारी वाहतूक उड्डाणपूल, राजापेठ किंवा गांधी चौकामार्गे, तर हमालपुराकडून येणारी वाहतूक रेल्वे स्टेशन चौक व मर्क्युरी टी पॉइंटमार्गे वळवण्यात येणार आहे. राजकमल चौकाकडून ये-जा करणारी वाहतूक सरोज चौक व चित्रा चौकामार्गे धावेल.
नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व हलक्या व जड वाहनांना हे नियम लागू राहतील. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन अमरावती शहर पोलिसांनी केले आहे.
००००००
अंजनगाव बारी येथील वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्रासाठी अकोल्याचा पर्याय
अमरावती, दि. 29 (जिमाका): प्रादेशिक परिवहन कार्यालय , अमरावती यांच्या अधिनस्त अंजनगाव बारी (बडनेरा) येथील वाहन निरीक्षण व परीक्षण केंद्र तसेच अत्याधुनिक व संगणकीकृत चाचणी पथकाचे काम सध्या अपूर्ण असल्याने वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस सर्टिफिकेट) नूतनीकरणाचे काम सद्यास्थितीत पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. सर्व वाहनधारकांनी नजीकच्या अकोला जिल्ह्यात किंवा इतर जिल्ह्यात जाऊन आपल्या वाहनांची तपासणी व नूतनीकरण करून घ्यावे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी रे दिली आहे.
ज्या वाहनधारकांनी अद्याप आपल्या वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्राचे नूतनीकरण केलेले नाही किंवा ज्यांच्या प्रमाणपत्राची मुदत येणाऱ्या काळात संपत आहे, अशा सर्व वाहनधारकांनी पूर्वपरवानगी घेऊन आणि ऑनलाईन तारीख आरक्षित करून अकोला किंवा नजीकच्या इतर जिल्ह्यात जाऊन आपल्या वाहनांची तपासणी व नूतनीकरण करून घ्यावे. नागरिकांनी होणारी गैरसोय टाळण्यासाठी या सुविधेचा लाभ घ्यावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
०००००
1 ऑक्टोबर रोजी ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस’ साजरा करावा
*जिल्हा प्रशासनाचे आवाहन
अमरावती, दि. 29 (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे 1 ऑक्टोबर रोजी संपूर्ण राज्यभरात ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस’ साजरा करण्यात येणार आहे. त्यानुसार सर्व शासकीय, निमशासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांनी यानिमित्ताने विविध उपक्रम आयोजित करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
ज्येष्ठ नागरिक दिवसानिमित्त कार्यालय व स्थानिक पातळीवर सार्वजनिक पदयात्रा, प्रभात फेऱ्या, सभा, परिसंवाद आणि आरोग्य शिबिरांचे आयोजन करावे. समाजकार्यात विशेष योगदान देणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा आणि ज्येष्ठांसाठी कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचा विशेष सत्कार व गौरव करण्यात यावा. ज्येष्ठ नागरिकांचे हक्क, त्यांच्यासाठीच्या शासकीय योजना, वैद्यकीय सोयी-सुविधा आणि मदतीसाठी असलेल्या हेल्पलाइनबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.
ज्येष्ठ नागरिकांना वृद्धापकाळात सुसह्य जीवन जगता यावे, त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुस्थितीत राहावे आणि त्यांना राज्य शासनाच्या सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरणाचा पूर्ण लाभ मिळावा, या उद्देशाने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहे.
00000
बुधवारपासून ‘खादी महोत्सवा’चे आयोजन
*नागरिकांनी भेट देण्याचे आवाहन
अमरावती, दि. 29 (जिमाका) : राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या वतीने बुधवार, दि. 30 सप्टेंबर ते शनिवार, दि. 3 ऑक्टोबर दरम्यान भव्य खादी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव बस स्थानकासमोरील सायन्सकोर मैदानावरील 'मेळघाट हाट' येथे आयोजित केला जात आहे.
आदिवासी आणि ग्रामीण भागातील महिलांनी सौर चरख्यावर स्वतः सूत कातून व शिवणकाम करून तयार केलेली दर्जेदार खादी व सौर खादी उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. या महोत्सवात सर्व खादी उत्पादने ग्राहकांना सवलतीच्या दरात मिळतील. खादी कापड, विविध प्रकारची खादी वस्त्रे आणि इतर हस्तकलेवर आधारित वस्तूंचे स्टॉल्स या ठिकाणी लावण्यात येणार आहेत.
ग्रामीण व आदिवासी भागातील महिलांच्या हाताला रोजगार मिळवून देण्यासाठी आणि स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या खादी महोत्सवाला भेट द्यावी, असे आवाहन खादी व ग्रामोद्योग मंडळाचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्रदिप चेचरे यांनी केले आहे.
00000




No comments:
Post a Comment