Wednesday, September 30, 2026

‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ उपक्रमातून वैद्यकीय तज्ज्ञ साधणार तरुणाईशी थेट संवाद


नवरात्रीत होणार ‘जागर आरोग्याचा’

• ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ उपक्रमातून वैद्यकीय तज्ज्ञ साधणार तरुणाईशी थेट संवाद


मुंबई, दि. ३०:  नवरात्रोत्सवात राज्यातील महाविद्यालयीन तरुणाईच्या आरोग्याचा जागर केला जाणार आहे. वाढता स्क्रीन टाइम, अपुरी झोप, चुकीच्या आहाराच्या सवयी, व्यायामाचा अभाव आणि मानसिक ताण यामुळे तरुणांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. या पार्श्वभूमीवर आजार टाळण्यासाठी तरुण वयापासूनच आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जागृती व्हावी, यासाठी राज्यात प्रथमच ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ हा नऊ दिवसांचा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमातून राज्यातील विद्यापीठे आणि वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापक व वैद्यकीय तज्ज्ञ राज्यभरातील विद्यार्थ्यांशी थेट आरोग्यविषयक संवाद साधणार आहेत.


विद्यार्थ्यांशी थेट संवाद

राज्यातील वैद्यकीय, कृषी, अभियांत्रिकी, विज्ञान, वाणिज्य, कला आणि इतर विद्याशाखांतील विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होतील. प्रत्येक जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापक, विभागप्रमुख आणि वैद्यकीय तज्ज्ञ विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. तरुण वयात आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्यास त्याचे परिणाम पुढील आयुष्यात जाणवू शकतात. त्यामुळे आजार झाल्यानंतर उपचार घेण्याबरोबरच आजार टाळण्यासाठी योग्य आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, मानसिक आरोग्याची काळजी, व्यसनांपासून दूर राहणे आणि वेळेवर आरोग्य तपासणी यांचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले जाणार आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आरोग्याबाबत जागृत राहण्याबरोबरच ही माहिती कुटुंब, मित्र आणि समाजापर्यंत पोहोचवावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.


संवादाचे विषय :

-  बदलती जीवनशैली आणि तरुणांचे आरोग्य

-  संतुलित आहार आणि बदललेल्या आहाराच्या सवयी

-  व्यायाम आणि शारीरिक तंदुरुस्ती

-  मानसिक आरोग्य

-  मोबाईल, सोशल मीडिया आणि वाढता स्क्रीन टाइम

-  व्यसनांपासून दूर राहणे

-  निरोगी जीवनशैली आणि आरोग्यदायी समाजनिर्मिती


‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ हा उपक्रम राज्यातील तरुणाईशी थेट संवाद साधणारा हा पहिलाच उपक्रम आहे. सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत तरुणांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांवर त्यांच्याशी थेट संवाद साधणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांना या संवादातून आरोग्याशी संबंधित प्रश्न मोकळेपणाने मांडता येणार आहेत. तज्ज्ञांकडून मिळणारी माहिती आरोग्यदायी जीवनशैली करिता विद्यार्थ्यांना उपयोगी ठरणार असल्याचे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी म्हटले आहे.

००००००

 

No comments:

Post a Comment

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती आणि १२ उपाययोजनांद्वारे दिलासा. आव्हानाच्या काळात शासन आपल्या सोबत! #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare

  राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती आणि १२ उपाययोजनांद्वारे दिलासा. आव्हानाच्या काळात शासन आपल्या सोबत! #दुष्काळ #शेतक...