Friday, October 2, 2026

DIO NEWS AMRAVATI 02.10.2026







                 नैसर्गिक संकटात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे –

विधान परिषद उपसभापती सचिन अहिर

 

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली पाहणी व चर्चा

 

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना भेट देऊन केले सांत्वन

 

अमरावती, दि. 2 (जिमाका): नांदगाव खंडेश्वर परिसरातील गावांमध्ये अतिवृष्टी आणि दुष्काळ अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडले आहेत. शेतकऱ्यांनी हताश होऊ नये. अशा संकट प्रसंगी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे.अमरावती जिल्ह्यातील सर्वच तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले आहे तातडीने पंचनामे करण्यात येऊन शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल, अशी माहिती विधान परिषद उपसभापती सचिन अहिर यांनी आज येथे दिली.

 

             नांदगाव खंडेश्वर परिसरातील गावांमध्ये अतिवृष्टी व  दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी उपसभापती श्री. अहिर यांनी केली.तसेच,सालोड येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना त्यांनी सांत्वन पर भेट दिली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.

 

             मौजा मुंड निशंकराव येथील दीपक बोलाईत आणि मंगरूळ चव्हाळा येथील जानबाजी पारसकर यांच्या शेतात जाऊन उपसभापती श्री. अहिर यांनी सोयाबीन पिकाची पाहणी केली. अतिवृष्टीमुळे शेतातील माती व पीक वाहून गेले. जमीन खरवडली. सोयाबीनला पुरेशा शेंगा धरल्या नाहीत. उत्पादन खर्चही निघेल अशी स्थिती नाही. अशा समस्या शेतकऱ्यांनी मांडल्या. या भागात अतिवृष्टीमुळे शेतीच्या नुकसानी सोबतच राहत्या घरांची पडझड झाली यासंदर्भात उपसभापती श्री अहिर यांनी माहिती जाणून घेतली. प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती त्यांनी जाणून घेतली. शेतकरी व नागरिकांना वेळेत मदत देण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

 

            यानंतर सालोड येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना त्यांनी सांत्वन पर भेट दिली. मुरलीधर वेळूकर यांनी बॅकवॉटर पाण्यामुळे शेतीचे सततचे नुकसान होत असल्याने यावर्षी जुलै महिन्यात आत्महत्या केल्याची माहिती त्यांचे वडील बंधू प्रकाश वेळूकर यांनी दिली. या समस्येमुळे सालोड व परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याची बाब त्यांनी मांडली. हा संपूर्ण विषय समजून घेत श्री. अहिर यांनी जिल्हाधिकारी आशिष  येरेकर यांना हा विषय सोडविण्यासाठी पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि समस्याग्रस्त शेतकऱ्यांची बैठक घेण्याच्या सूचना केल्या. या विषयासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी डिसेंबर महिन्यामध्ये नागपूर येथे हिवाळी अधिवेशन कालावधीत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.  मुरलीधर वेळूकर यांच्या पत्नी वेळूकर,मुलगी समीक्षा आणि मुलगा सार्थक यांची आस्थेने चौकशी करून श्री. अहिर यांनी त्यांचे सांत्वन केले व प्रशासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांना आश्वस्त केले.

 

            येथील मनोज फरकाडे या शेतकऱ्याने यावर्षी एप्रिल महिन्यात  आत्महत्या केली, त्यांच्या कुटुंबीयांना उपसभापती श्री अहिर यांनी भेट दिली. पत्नी शुभांगी फरकाडे व रुद्रांश (४ वर्ष) आणि शिवराज (८ वर्ष) या मुलांना त्यांनी दिलासा दिला. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत या कुटुंबाला मिळाली आहे. यासोबतच लाडकी बहीण योजना, श्रावण बाळ योजना आदी योजनांचा लाभ या कुटुंबाला देण्यात यावा, अशा सूचना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.सालोड गावचे सरपंच जगदीश ढगे, उपविभागीय अधिकारी तेजश्री कोरे, गटविकास अधिकारी स्नेहल शेलार, तालुका कृषी अधिकारी विकास पाटील आणि गावकरी यावेळी उपस्थित होते.

 

         नुकसानीची पाहणी व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेट दिल्यानंतर श्री. अहिर यांनी नांदगाव खंडेश्वर येथील श्री. क्षेत्र खंडेश्वर संस्थान येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला व त्यांच्या समस्या समजून घेतल्या.

 

०००००




राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन

 

अमरावती, दि. 2 (जिमाका) : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

 

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.

००००







दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जलसंधारण, पाणीटंचाई निवारणाची कामे करावीत

-जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे निर्देश

*उपायोजनाबाबत नऊ तास खल

 

            अमरावती, दि. 2 (जिमाका) : या वर्षीचा मान्सूनचा कालावधी संपला असून यापुढे पावसाची शक्यता नाही. येत्या काळात पाणीटंचाईचे स्वरूप जाणवणार आहे. त्यामुळे सध्या निर्माण झालेल्या वैश्विक संकटाचा सामना करण्यासाठी जलसंधारण आणि पाणीटंचाई निवारणाच्या कामांवर सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले.

 

             जिल्हाधिकारी कार्यालयात तालुका दुष्काळ निवारण व व्यवस्थापन आराखडा कार्यशाळा आज पार पडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ शुक्ला, उपवनसंरक्षक के. अर्जुना उपस्थित होते. दुष्काळी परिस्थितीबाबत करावयाच्या उपाययोजनांची सुमारे नऊ तास विविध विभागांशी चर्चा करण्यात आली.

 

             जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी, तालुकानिहाय दुष्काळाची स्थिती जाणून घेतली. त्यासोबतच जिल्ह्यात उपलब्ध असलेला चारा आणि भविष्यात शासनाच्या प्रयत्नातून चाऱ्याचे उत्पादन वाढविण्याबाबत चर्चा केली. सद्यस्थितीत जिल्ह्यात पुरेसा चारा उपलब्ध आहे. शासनाच्या पुढाकारातून गाळपेर जमीन किंवा शासनाच्या जागा उपलब्ध करून चारा उपलब्ध करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. त्यासोबतच उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यावर कमी पाण्यात रब्बीचे पिके घेणे शक्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना गव्हापेक्षा हरभरा, मोहरी आदी कमी पाण्यावर देणाऱ्या पिकांकडे वळविण्याचे आवाहन त्यांनी केले.

 

             मान्सूनचा कालावधी संपलेला असल्यामुळे जलसंधारणाची कामे तातडीने सुरू करता येणे शक्य आहे. ही कामे आतापासूनच सुरू केल्यास येत्या मान्सूनमध्ये अपुरा पाऊस पडला तरी यातून जल पुनर्भरणाची कामे चांगल्या पद्धतीने होऊ शकणार आहे. त्यामुळे सर्व विभागांनी समन्वयाने कामे करून जलसंधारणाच्या कामाला तातडीने सुरुवात करावी.

 

अल निनो हे वैश्विक संकट आहे. मात्र या संकटाचा सामना संधी म्हणून करण्याचा दृष्टिकोन सर्व विभागांनी करावा. पिके घेण्याच्या पद्धती बदल ते जैविक शेती पद्धतीबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरूकता करावी लागणार आहे. त्यासोबतच जलसंधारणाची कामे करताना शेततळे, गाळमुक्त धरण ही कामे तातडीने सुरू करावी. शासनाच्या एकत्रित प्रयत्नामुळे दुष्काळाची झळ कमी होण्यास निश्चितच मदत होईल, असे श्री. येरेकर यांनी यावेळी सांगितले.

00000

निवृत्तीवेतनधारकांसाठी ‘महा-उपलब्धी’ ॲपची मंगळवारी विशेष कार्यशाळा

 

अमरावती, दि. 2 (जिमाका) : लेखा व कोषागारे संचालनालयाने निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी महा-उपलब्धी या मोबाईल ॲपबाबत जनजागृती व मार्गदर्शन करण्यासाठी अमरावती जिल्हा कोषागार कार्यालयात विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

ही कार्यशाळा मंगळवार, दि. 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा कोषागार कार्यालयातील जिजाऊ सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.

 

‘महा-उपलब्धी’ॲपच्या माध्यमातून निवृत्तीवेतनासंबंधी विविध सेवा जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध होणार आहेत. निवृत्तीवेतनधारकांना विविध सेवांचा लाभ घेण्यासाठी हे ॲप उपयुक्त ठरणार आहे. वित्त विभागाचे प्रधान सचिव (ले. व को.) ऑनलाइन उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

 

कोषागार कार्यालयांतर्गत येणाऱ्या सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी उपस्थित राहून कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोषागार अधिकारी (निवे.) अमोल इखे यांनी केले आहे.

00000000

No comments:

Post a Comment

सेवा संकल्प अभियान 2026 च्या यशस्वी अंमलबजावणीसाठी अधिकारी - प्रशासकांची कार्यशाळा संपन्न

  #अमरावती सेवा संकल्प अभियान 2026 च्या यशस्वी अंमलबजावणीसाठी अधिकारी - प्रशासकांची कार्यशाळा संपन्न #सेवासंकल्पअभियान