Tuesday, November 19, 2019

माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन





        अमरावती, दि. : 19-  माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.  
            यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी इतरही अधिकारी- कर्मचा-यांनी पुष्प अर्पण करुन माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांना अभिवादन केले.  

राष्ट्रीय एकात्मता दिवसानिमित्त शपथही यावेळी घेण्यात आली. देशाचे स्वातंत्र आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्यासाठी व दृढ करण्यासाठी निष्ठापूर्वक काम करण्याची   शपथ घेण्यात आली.
00000

निवडणूक खर्चाचा ताळमेळ अचूकपणे नोंदवा - निवडणूक निरीक्षक रामकृष्ण बंडी






अमरावती, दि. 19 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीतील उमेदवारांची खर्चाची तपासणी व ताळमेळ प्रक्रिया सुरु आहे. हा प्रक्रियेचा शेवटचा टप्पा असून उमेदवारांनी सादर केलेला खर्च व खर्च तपासणी चमू या दोघांच्याही खर्चाच्या आकडेवारीत तफावत आढळल्यास त्याविषयी सुस्पष्ट माहिती घेऊन नेमका अचूक खर्च नोंदवावा, असे निर्देश निवडणूक निरीक्षक रामकृष्ण बंडी यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित निवडणूक खर्च ताळमेळासंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. निवडणूक निरीक्षक जॉर्ज जोसेफ, नवनीतकुमार, जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील, खर्च तपासणी पथकाचे नोडल ऑफीसर तथा डेप्युटी कॅफो दत्तात्रय फिस्के तसेच उमेदवारांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
श्री. बंडी म्हणाले की, निवडणूक लढविलेल्या उमेदवारांना आज तारखेपर्यंत निवडणूक खर्च शॅडो रजिस्टरमध्ये नोंदवून सादर करणे बंधनकारक आहे. रजिस्टरनुसार उमेदवारांनी दाखविलेल्या खर्च आणि खर्च तपासणी पथक यांचा खर्च या दोघांमध्ये तफावत आढळून आल्यास सबंधित सहायक खर्च निरीक्षकांनी दिवसनिहाय खर्चाची तपासणी करुन ताळमेळ करावा. ताळमेळ करताना जो खर्च अधिक असेल तो ग्राह्य धरुन निवडणूक आयोगाला सादर करावा. तसेच ज्या उमेदवारांकडून खर्चाचे शॅडो रजिस्टर सादर केले जाणार नाही त्यांच्यावर निवडणूक आयोगाच्या कलमान्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
मुख्यत: वस्तुंचे दर व त्याचे प्रमाण या बाबीमध्ये फरक आढळून येत असल्यास आयोगाकडून ठरवून दिलेल्या दरपत्रकानुसार दर ग्राह्य धरुन खर्च नोंदवावा. तपासणीअंती ज्या उमेदवारांना ग्राह्य खर्चाबाबत आक्षेप असल्यास त्यांनी योग्य पुराव्यानिशी स्पष्टीकरणासह उद्या (20 नोव्हेंबर ) होणाऱ्या जिल्हा खर्च देखरेख समितीच्या बैठकीत हजर राहण्याचे सूचना द्यावी. ज्या उमेदवारांना निवडणूक खर्च मान्य असेल त्यांचे खर्चाचे रजिस्टर फॉर्म-सी व फॉर्म-बी ईत्यादी कागदपत्रासह जिल्हा खर्च देखरेख समितीला सादर करावे, असेही त्यांनी सांगितले.
  ज्या मतदारसंघात निवडणूक खर्च संदर्भात काही विवाद असल्यास उमेदवारांनी योग्य स्पष्टीकरण जिल्हा खर्च देखरेख समितीसमोर मांडावे. प्रत्येक उमेदवाराचा दिननिहाय खर्चाचा ताळमेळ करावा, तसेच खर्चात काही तफावत किंवा विसंगती आढळून आल्यास खर्चाच्या सिध्दतेसाठी विहित पुरावे समितीला सादर करावे, अशी सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. नवाल यांनी दिल्या.
बैठकीत निवडणूक निरीक्षक जार्ज जोसेफ व नवनीतकुमार यांनी सुध्दा निवडणूक खर्च नोंदणी प्रक्रिया याविषयी उमेदवारांच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन केले.
00000

Saturday, November 16, 2019

जिल्हा प्रशासनातर्फे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपक्रमाचा शुभारंभ स्पर्धा परीक्षा तयारीसाठी विद्यार्थ्यांना संपूर्ण सहकार्य - जिल्हाधिकारी शैलेश नवाल










अमरावती, दि. 16:  स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्यासाठी सकारात्मक विचार, परिश्रम, शिस्त व चिकाटी यांची आवश्यकता असते. स्पर्धा परीक्षांत जिल्ह्याचा टक्का वाढावा यासाठी प्रशासनातर्फे नियमित मार्गदर्शनासह सर्व सहकार्य करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे सांगितले.  
केंद्र व राज्य लोकसेवा आयोगासह विविध स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी जिल्हा प्रशासनाने करिअर मार्गदर्शन उपक्रम हाती घेतला आहे. त्याचा शुभारंभ आज येथील नियोजनभवनात झाला, त्यावेळी ते बोलत होते. सहायक जिल्हाधिकारी आयएएस अधिकारी वर्षा मीना यांचे विशेष व्याख्‌यान यावेळी झाले. स्पर्धेचे नोडल अधिकारी तथा जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सूरज मडावी, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, विभागीय ग्रंथपाल राजेश पाटील, उपक्रमाचे समन्वयक अंशुल चवरे, नेहा पाटील आदी उपस्थित होते.  
श्री. नवाल म्हणाले की, उपक्रमात जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना महिन्याच्या तिस-या शनिवारी तज्ज्ञांकडून विशेष मार्गदर्शन, संवाद व शंकानिरसन करण्यात येईल. आवश्यकता वाटल्यास कार्यक्रम महिन्यातूनही दोनवेळा घेता येईल. विद्यार्थ्यांकडून होणारे प्रयत्न अचूक व योग्य दिशेने व्हावेत, यासाठी मार्गदर्शन करणे हा या उपक्रमाचा हेतू आहे. याच उपक्रमात गावोगाव अभ्यासिका निर्माण करण्याचाही प्रयत्न आहे.  कुठल्याही परीक्षेची तयारी वाया जात नसते. त्यामुळे कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात उभे राहायला मदत होते.
सहायक जिल्हाधिकारी श्रीमती मीना म्हणाल्या की,  स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम समजावून घेऊन  एकसंध नोटस् निर्माण करणे व त्या नोटस् मध्ये महत्वाच्या पुस्तकातील माहितीची भर घालणे आवश्यक असते. या नोटस् ची वारंवार उजळणी करावी. भाराभार साहित्य वाचू नये. एनसीईआरटीची पुस्तके वाचावीत. त्याची मांडणी चांगली असते.  प्रत्येक परीक्षेचे काही टप्पे असतात. मात्र, विद्यार्थ्याने ही सगळी प्रक्रिया एकसंधपणे पाहून त्यानुसार तयारी ठेवली पाहिजे. पुढील परीक्षांचेही अभ्यास व नियोजन त्याने केलेले असावे. यावेळी श्री. मीना यांनी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांचे शंकानिरसन केले.
श्री. चवरे, श्रीमती पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
00000

अतिक्रमण नियमानुकूलची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी - जिल्हाधिकारी शैलेश नवाल


प्रधानमंत्री आवास योजना


अमरावती, दि. 16 : नगर पालिका अंतर्गत येणारे नझूल पट्टयाचे वाटप व अतिक्रमण नियमानुकूल संदर्भातील तांत्रिक अडचणी तातडीने दूर करुन प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ गरजूंना द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले.
            जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत प्रलंबित कामांचा  आढावा जिल्हयाधिकाऱ्यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते.  
            श्री नवाल म्हणाले की, अतिक्रमण नियमानुकुल करण्यासंदर्भात नगर पालिकांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. यासाठी नगर पालिका प्रशासनाने व भूमी अभिलेख विभागाने  सर्वप्रथम नझुल शिटप्रमाणे संयुक्त पाहणी करावी. त्यानंतर नझुल पटृटे वाटप करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी तसेच अतिक्रमण नियमानुकुल करण्याची कार्यवाहीसुध्दा पूर्ण करावी.
            प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत प्रस्तावित घरकुलासाठी नवीन सविस्तर प्रकल्प नियोजन अहवाल तयार करुन राज्य शासनाच्या मंजूरीकरिता जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात यावा. या कामासाठी निधी तत्काळ उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
नगरपालिका क्षेत्रात जलपुनर्भरण योजना व स्वच्छ भारत मिशन प्रभावीपणे राबविण्यात यावे. या योजने अंतर्गत नगरपालिकेची इमारतीत मॉडेल स्वरुपात जलपुनर्भरण (रेन वॉटर हारवेस्टींग) यंत्रणा कार्यन्वित करावी. तसेच शहरातील सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालये व रहीवासी घरांना सुध्दा रेन वॉटर हारवेस्टींग यंत्रणा बसविण्याचे बंधनकारक करण्यात यावे. जेणेकरुन त्या त्या शहरात जलपुनर्भरण सुरळीत होऊन भूजल पातळीत वाढ होणार. नगरपालिकेने पाण्याचे महत्व नागरिकांना पटवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात जाणीव जागृती करावी. असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
00000

Friday, November 15, 2019

बिरसा मुंडा यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन



 अमरावती, दि. : 15- भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त  आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.  
            यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी इतरही अधिकारी- कर्मचा-यांनी पुष्प अर्पण करुन भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन केले.  

जिल्हा रुग्णालयांत आवश्यक सुधारणांसाठी प्रस्ताव द्यावेत - जिल्हाधिकारी शैलेश नवाल

जिल्हाधिका-यांनी केली इर्विनची पाहणी




            अमरावती, दि.  15 – जिल्हा रूग्णालयात आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीने  सर्व आवश्यक सुधारणांबाबत प्रस्ताव सादर करावा. रूग्णालयाच्या सुधारणेसाठी वेळेत निधी मिळवून दिला जाईल, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी आज इर्विन रूग्णालयाला भेट देऊन तेथील सोयी- सुविधांची पाहणी केली. यावेळी श्री. नवाल यांनी विविध वॉर्डात भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली, तसेच राष्ट्रीय पोषण पुनर्वसन केंद्रालाही भेट दिली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रानमळे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे यांच्यासह  महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी- कर्मचारी यावेळी उपस्थित होते.   
श्री. नवाल म्हणाले की, रुग्णालयात स्वच्छतेच्या दृष्टीने अद्ययावत यंत्रणा असणे आवश्यक आहे. सफाईची अद्ययावत  यंत्रे, वॉर्डात आवश्यक त्या सर्व सुविधा यासाठी प्रस्ताव सादर करावा. यावेळी श्री. नवाल यांनी राष्ट्रीय पोषण पुनर्वसन केंद्राला भेट देऊन अधिकारी- कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. मेळघाटातील केंद्रात आवश्यक सुविधांसाठी प्रस्ताव देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीची बैठकही यावेळी झाली. एड्सविषयी जनजागृतीसाठी गावोगाव रेड रिबन क्लब स्थापण्यात आले आहेत. जिल्ह्यात  १०० गावांत क्लब स्थापण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे, महाविद्यालयीन स्तरावर ८४ क्लब स्थापण्यात आले आहेत. या क्लबचा सदस्यांचा जागृतीविषयक कार्यात सहभाग वाढवावा, असे निर्देश श्री. नवाल यांनी यावेळी दिले. रुग्णांना सामाजिक लाभाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असेही निर्देश त्यांनी दिले. दि. १ डिसेंबर रोजी एड्सविषयक जनजागृतीच्या अनुषंगाने करावयाच्या पूर्वतयारीबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.
   आरोग्य विभागातील अनेक अधिकारी- कर्मचारी यावेळी उपस्थित होते. 

Thursday, November 14, 2019

जिल्हाधिकारी कार्यालयात पं.नेहरू यांना अभिवादन


 पं. जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन अर्थात बालदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.  
उपजिल्हाधिकारी (निवडणूक) शरद पाटील यांनी पं. नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उपजिल्हाधिकारी स्नेहल कनिचे, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा यांच्यासह अनेक अधिकारी- कर्मचा-यांनी यावेळी पं. नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले.



    

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

 अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज अधिकारी- कर्मचाऱ्यांनी मतमोजणी प्रक्रिया काळजीपूर्वक व अचूकपणे यशस्वी करावी - व...