Friday, July 3, 2020

पेढी पूरग्रस्त परिसराची पालकमंत्र्यांकडून पाहणी













अतिवृष्टीग्रस्त भागातील नुकसानाचे तत्काळ पंचनामे करा

                                            -   पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

नदी खोलीकरणाबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश

 

 

अमरावती, दि. 3 : गत आठवड्यात अतिवृष्टीने पेढी नदीला पूर येऊन पेढीकाठच्या गावांचे, शेतांचे नुकसान झाले आहे. मोर्शी  तालुक्यातील पातूर, अडगाव, काटसूर परिसरातील, तसेच अमरावती तालुक्यातील सावंगा व अंतोरा  परिसरातील शेतांचे, तर काही ठिकाणी घरांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीच्या या नुकसानीबाबत दोन दिवसात परिपूर्ण सर्वेक्षण करून पंचनामे करावेत, असे स्पष्ट निर्देश राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री व जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज मोर्शी- अमरावती तालुक्यातील दौऱ्यादरम्यान दिले.

        नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी काटेकोर सर्वेक्षण करण्याचे निर्देश देतानाच शेतकरी बांधवांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाहीही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली. दि. 30 व 1 तारखेला अतिवृष्टीमुळे पेढी नदीला पूर येऊन पेढीकाठच्या नुकसान झालेल्या भागाची पाहणी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी आज केली. यावेळी त्यांनी पातूर, अडगाव, काटसूर, सावंगा, अंतोरा येथे भेट देऊन शेती, रस्ते, पुलांची पाहणी केली, तसेच गावातील शेतकरी बांधवांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांचे निराकरण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. मोर्शीचे उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, तहसीलदार सिध्दार्थ मोरे, अमरावतीचे उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत, तहसीलदार संतोष काकडे, उपविभागीय कृषी अधिकारी राहूल सातपुते, अविनाश पांडे  यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, अतिवृष्टीमुळे पेढी नदीला आलेल्या पुरामुळे काटसुर, पातुर, अडगाव, सावंगा, अंतोरा परिसरातील गावांचे व शेतीचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतात नदीचे पाणी घुसून पिके वाहून गेल्याचे दिसून येते. सोयाबीन, तूर, कपाशी यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.  त्यामुळे या नुकसानीचे काटेकोर सर्वेक्षण करण्यात यावे. प्रत्येक शेतकरी बांधवांशी, स्थानिक नागरिकांशी चर्चा करून परिपूर्ण पाहणी करावी व पंचनामे तात्काळ सादर करावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

            पालकमंत्री श्रीमती ठाकूर पुढे म्हणाल्या की, अतिवृष्टीने नदीचे पाणी वाढून शेतीत घुसल्याने नुकसान झाले. नदीत मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे. येथील गाळ काढण्याचे काम यापूर्वीच होणे आवश्यक होते. प्रशासनाने यापूर्वीच ही कामे न राबवल्याबद्दल पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली व पुढील काळात होणा-या पावसामुळे असे नुकसान टाळण्यासाठी तत्काळ उपाययोजना अंमलात आणाव्यात, असेही निर्देश त्यांनी दिले.

अमरावती तालुक्यातील सावंगा व अंतोरा या गावांना भेट देऊन तेथील नुकसानाची पाहणीही पालकमंत्र्यांनी केली. पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, अंतोरा गावात नाल्याचे पाणी घुसून नुकसान झाले. त्याचे सविस्तर सर्वेक्षण करून पंचनामे करावे. नाला खोलीकरणाच्या कामाचे नियोजन करून अहवाल सादर करावा. त्याचप्रमाणे, पांदणरस्त्याचेही काम पूर्ण करावे.  नदी खोलीकरणाची कामे सर्वच परिसरात राबवावीत. अनेक ठिकाणी पेढीचे पात्र अरूंद झाले. हे पात्र मोकळे करणे, गाळ काढणे, बांध मोठे करणे ही कामे पूर्ण करावीत. त्यासाठी आवश्यक प्रस्ताव तत्काळ द्यावा.

 

नुकसानग्रस्त रस्ते, पुलाचीही पाहणी

 

            पातूर- राजुरा रस्त्याच्या कामाला गती द्यावी. हा रस्ता पूर्ण झाल्यास राजूर- काटसूर अंतर कमी होईल. विचोरी- अडगाव रस्त्यावरील पुलाची व अतिवृष्टीने नुकसान झालेल्या रस्ते व पुलाची तत्काळ दुरूस्ती करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

 

00000

 

Thursday, July 2, 2020

पालकमंत्र्यांकडून अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी



नुकसानग्रस्त भागातील रस्ते – पूल तत्काळ दुरुस्त करावेत


-          पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 2 : जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या रस्ते व पूलाची तत्काळ दुरूस्ती करून संपर्कयंत्रणा भक्कम करण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.अतिवृष्टीने जिल्ह्यातील काही गावांतील रस्ते, पुलाचे नुकसान झाले. त्याची पाहणी पालकमंत्र्यांनी आज केली. सालोरा खुर्द, नांदुरा किरकटे, आमला आदी गावांना भेट देऊन त्यांनी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या रस्ते व पुलांची पाहणी केली. संबंधित अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, पावसाळ्यात अतिवृष्टी किंवा पूर आल्याने अनेकदा रस्ते, पूल वाहून जातात. त्यामुळे अशी स्थिती लक्षात घेऊन दुरुस्तीसाठी कायमस्वरूपी सुसज्ज यंत्रणा ठेवावी. कुठल्याही गावांचा संपर्क तुटता कामा नये. त्यामुळे अतिवृष्टी झालेल्या प्रत्येक भागाचे काटेकोर सर्वेक्षण करून रस्ते व पुलाची तत्काळ दुरुस्ती करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर पुढे म्हणाल्या की, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास जिल्ह्यात भक्कम संपर्क यंत्रणा सुसज्ज असावी. मेळघाटात अनेकदा गावांचा संपर्क तुटतो. त्यामुळे तिथेही प्राधान्याने लक्ष देऊन रस्त्यांची व पुलाची कामे पूर्ण करावीत. पावसाळा लक्षात घेऊन भक्कम पायाभूत सुविधांसह आरोग्य यंत्रणाही सक्षम असणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने पुरेसा औषध साठा आदी सुविधा सुसज्ज ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

यावेळी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी अतिवृष्टी झालेल्या विविध गावांना जोडणा-या रस्त्यांची व पुलांची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक उपाययोजनांसंदर्भात प्रशासनाशी चर्चा केली व वेळेत कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

                                                00000  





प्रधानमंत्री ग्रामसडक योजना रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार व्हावीत - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर




प्रधानमंत्री ग्रामसडक योजना


रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार व्हावीत

 

-         पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 2 : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत राज्याचे 6 हजार 550 किलोमीटरचे, तर अमरावती जिल्ह्यात 176 किलोमीटर रस्तेनिर्मितीचे उद्दिष्ट आहे. रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार व्हावीत, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

रस्त्यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बैठक पालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली येथील शासकीय विश्रामगृहात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. योजना प्रकल्पाचे उपअभियंता सचिन चौधरी यांच्यासह विविध अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत उद्दिष्टानुसार रस्ते विहित वेळेत पूर्ण आवश्यक आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, दळणवळणाची सुविधा,  शाळा- महाविद्यालय, पोलीस केंद्र, चौकी आदी सुविधा असलेल्या गावांना जोडून विकास गतिमान करण्याचे व परिसरातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे. नागपूर येथील सुदूर संवेदन केंद्राद्वारे उपग्रहाच्या माध्यमातून परिसराचे अवलोकन करून रस्त्यांचे नियोजन केले जाणार आहे. ज्या गावांत प्राथमिक सुविधा उपलब्ध असतील, त्या गावांना जोडण्यात येणार आहेत जेणेकरून परिसरातील नागरिकांना दळणवळणाची सुविधा असावी, तसेच या सुविधांचा दर्जा वाढावा व त्यात सातत्य राहावे.  

पालकमंत्री श्रीमती ठाकूर पुढे म्हणाल्या की, प्रत्येक तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र विचारात घेऊन कमीतकमी 10 किमी हून अधिक रस्ता प्रत्येक तालुक्यात या योजनेतून साकारला जाणार आहे. मेळघाट व धारणीसाठी ही मर्यादा 30 किलोमीटरची आहे. त्यानुसार या योजनेतून विविध सुविधा असलेल्या गावांना जोडण्यात यावे. दुर्गम परिसरातील नागरिकांनाही त्याचा लाभ होईल. अमरावतीत बारा किलोमीटर रस्ता या योजनेत प्रस्तावित आहे.

धारणी, चिखलदरा, अंजनगाव सुर्जी व नांदगाव खंडेश्वर या तालुक्यातील कामांना सुरुवात झाली आहे. इतर तालुक्यांतही कामे गतीने पूर्ण करावीत, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले.त्याशिवाय, सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद प्रशासनाच्या अखत्यारीत येणा-या रस्त्यांच्या कामांनाही ही योजना पूरक ठरणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागात दर्जेदार रस्ते निर्माण होतील, असा विश्वासही पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.

त्याचप्रमाणे, जिल्ह्यात हायब्रीड ॲन्युईटीअंतर्गत कामे मार्गी लागण्यासाठी पाठपुरावा होत आहे. त्यात 265 किलोमीटर लांबीची कामे पूर्णत्वास गेली आहेत. कोरोना संकटकाळ, लॉकडाऊन आदींमुळे उर्वरित कामांमध्ये काहीसे अडथळे आले. मात्र, त्याही कामांना गती देण्यासाठी प्रयत्न होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्तेविकास उपक्रमाला गती मिळण्यासाठी स्वतंत्र बैठक घेऊन आवश्यक रस्ते, पूल व इमारतींची कामे प्राधान्यक्रम लक्षात घेऊन पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. पहिल्या टप्प्यात वन विभागाच्या अखत्यारीत येत नसलेल्या क्षेत्रात कामे सुरु करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे, उर्वरित कामांना वन विभागाची परवानगी व आवश्यक निधी मिळविण्यासाठी प्रयत्न होत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्याच्या रस्तेविकासात कुठेही अडथळा येता कामा नये. पावसाळा लक्षात घेता प्राधान्यक्रम लक्षात घेऊन आवश्यक कामे तत्काळ पूर्ण करणे आवश्यक आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमुळे अपघात संभवतात. तसे घडता कामा नये. त्यामुळे रस्त्यांवरील खड्डेदुरुस्ती तत्काळ करून घ्यावी. मेळघाटातील रस्तेविकासाकडे प्राधान्याने लक्ष द्यावे. मेळघाटात दुर्गम भागातील गावांचा संपर्क तुटता कामा नये, यासाठी विशेष लक्ष पुरवून गतीने कामे पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी दिले.

0000

पालकमंत्र्यांकडून पंचायत समितीत विविध विकासकामांचा आढावा


साथरोगावर नियंत्रणासाठी पेयजल स्त्रोतांची शुद्धता तपासावी

- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

       अमरावती, दि. 2 : पावसाळा लक्षात घेऊन दूषित पाण्यामुळे कुठलेही साथरोग आजार पसरू नयेत यासाठी पेयजल स्त्रोत, पाईपलाईनच्या दुरुस्तीसह सर्व स्त्रोतांची शुद्धता तपासण्यात यावी, तसेच आवश्यक त्या सर्व ठिकाणी निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया राबवावी,  असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

        पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती पंचायत समितीत विविध कामांबाबत आढावा बैठक झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. पंचायत समिती सभापती संगीता तायडे, उपसभापती रोशनीताई अडसपुरे, तहसीलदार संतोष काकडे, गटविकास अधिकारी दिलीप पतंगराव यांच्यासह अनेक जि. प. सदस्य, पं. स. सदस्य आदी उपस्थित होते.

         पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जल स्त्रोतांचे शुद्धीकरण करण्यात यावे. त्यासाठी प्रत्येक गावात सर्वेक्षण मोहिम राबवावी. नागरिकांना शुद्ध पेयजल उपलब्ध होईल यासाठी सर्वंकष प्रयत्न करावेत. अमरावती तालुक्यातील व महानगराच्या जवळ असलेल्या वलगाव, नांदगावपेठ या ठिकाणी कोरोनाबाधित व्यक्ती आढळून आल्या. अमरावती महापालिकेच्या धर्तीवर अशा विविध गावांतून निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया राबवावी.

     तालुक्यात राबविण्यात येणा-या विविध आवास योजनांचा आढावाही पालकमंत्र्यांनी घेतला. पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, अतिक्रमित पट्ट्यांच्या नियमानुकुलनाची प्रक्रिया गतीने राबवावी. प्रत्येक गरजू व्यक्तीला घर मिळण्यासाठी आवास योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. अपूर्ण व प्रलंबित घरकुलांसाठी लागणा-या निधीसंदर्भात शासनाकडे तत्काळ पाठपुरावा करावा. उपलब्ध होणा-या तरतुदीतून नियोजनबद्धरीत्या घरकुलांचा लक्ष्यांक पूर्ण होईल, यासाठी प्रयत्न व्हावेत, असे निर्देशही त्यांनी दिले.

     जनसुविधा विभागांतर्गत पाणीपुरवठा योजना, मुस्लिम कब्रस्तान, स्मशानभूमी, शाळादुरुस्ती आदी प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत, असेही निर्देश त्यांनी दिले. तालुक्यातील रिक्त पदांचा आढावाही पालकमंत्र्यांनी यावेळी घेतला. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रावर वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेविका, परिचर आदी पदे भरण्यात यावीत. रिक्त असल्यास त्याचा पाठपुरावा करावा, असे निर्देश त्यांनी दिले. शेतकरी बांधवांना कृषी विभागाकडून विविध योजना राबविण्यात येतात. त्यांची अंमलबजावणी काटेकोरपणे झाली पाहिजे. वीज मोटार पंप, बायोगॅस, विहिरी बांधकाम, सौर ऊर्जा कनेक्शन आदी विविध योजनांसाठी प्राप्त अर्जांवर वेळेत कार्यवाही होऊन शेतकरी बांधवांना त्याचा लाभ मिळवून देण्यात यावा, असे निर्देशही त्यांनी दिले.

                       बियाणे उगवणीबाबतच्या तक्रारींबाबत कंपन्यांना नोटीस द्यावी

         तालुक्यात 19 हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. त्यापैकी काही क्षेत्रावर बियाणे उगवण न झाल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. अशा तक्रारी सर्वेक्षणातून प्राप्त करून घेऊन त्याबाबत सदर कंपन्यांना नोटीस बजावण्यात यावी. कंपन्यांनी नोटीस मिळताच दोन दिवसांत शेतकरी बांधवांना नुकसानभरपाई दिली पाहिजे अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.रोजगार हमी योजनेंतर्गत तालुक्यातील रस्ता बांधकाम, वृक्षलागवड, पांदणरस्ते, शोषखड्डे, गोठा बांधकाम, स्वच्छतागृह बांधकाम आदी प्राधान्याने राबविण्यात यावीत. तालुक्याला दिलेले वृक्षलागवडीचे उद्दिष्ट नियोजनबद्धरीत्या पूर्ण करावे.

                                      अंगणवाड्यांना आयएसओ मानांकन

      महिला व बालविकास विभागाच्या कामांचा आढावाही त्यांनी घेतला. तालुक्यात 177 अंगणवाड्या आहेत. या अंगणवाड्यांत उत्कृष्ट कार्यपद्धती रूढ करण्याच्या दृष्टीने आयएसओ मानांकन मिळविण्यासाठी प्रयत्न व्हावेत. नादुरुस्त अंगणवाड्यांची प्राधान्याने दुरुस्ती करण्यात यावी. त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद उपलब्ध करून देण्यात येईल. आवश्यक तिथे बेबी केअर कीटचे वितरण व्हावे. ग्रामीण भागातील महिलांना शिलाई मशिन, सायकलवाटप केले जाते. या सर्व योजनांची पारदर्शकरीत्या अंमलबजावणी व्हावी. लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन कामे राबवावीत, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी दिले. गटविकास अधिकारी श्री. पतंगराव यांनी आभार मानले.

 





Wednesday, July 1, 2020

वलगाव- दर्यापूर रस्त्याचे काम विहित मुदतीत पूर्ण करा - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

         वलगाव- दर्यापूर रस्त्याचे काम विहित मुदतीत पूर्ण करावे. या रस्त्यावरील खोलापूर येथील जंक्शन पॉईंटचे रूंदीकरण करण्यात यावे, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले.
         पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी आज वलगाव- दर्यापूर रस्त्याच्या कामाची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होत्या. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल जवंजाळ, हरिभाऊ मोहोड, मुकद्दर पठाण आदी यावेळी उपस्थित होते.
        लॉकडाऊनमध्ये विकासकामांची गती काहीशी मंदावली होती. मात्र, विकासकामे नियोजनानुसार पूर्णत्वास नेण्याचा शासनाचा निर्धार आहे. जिल्ह्यात हायब्रीड ॲन्युईटीअंतर्गत 265 किलोमीटर लांबीची कामे पूर्णत्वास गेली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील जिल्ह्यातील महत्वाच्या रस्त्यांचे कामेही रखडता कामा नयेत. पावसाळा लक्षात घेता प्राधान्यक्रम लक्षात घेऊन आवश्यक कामे तत्काळ पूर्ण करणे आवश्यक आहे, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले.
        वलगाव- दर्यापूर रस्ता हायब्रीड ॲन्युइटीअंतर्गत मंजूर आहे. त्याची लांबी सुमारे 44 किलोमीटर असून, काम पूर्ण करण्याची मुदत मे 2021 पर्यंत आहे. अद्यापपर्यंत रस्त्याचे 75 टक्के काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता श्री. जवंजाळ यांनी दिली.
        या रस्त्यावरील खोलापूर जंक्शनजवळील स्थानक व परिसरात होणारी वर्दळ पाहता येथे रस्त्याचे विस्तारीकरण होणे आवश्यक आहे. या रस्त्याचे रुंदीकरण व सौंदर्यीकरण तत्काळ करावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
       या रस्त्याच्या कामाप्रमाणेच अंजनगाव- दर्यापूर- म्हैसांग, वलगाव- दर्यापूर, अमरावती- कौंडण्यपूर,परतवाडा- चिखलदरा, रिद्धपूर- तिवसा, चांदूर रेल्वे- तळेगाव, तसेच अमरावती- अचलपूर हा चौपदरी रस्ता आदी विविध कामे पूर्णत्वास जाण्याच्या दृष्टीने सतत प्रयत्न व्हावेत, असेही निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
      सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हायब्रीड ॲन्युईटीअंतर्गत सुमारे पाचशे कोटी रूपयांचा निधीतून महत्वाच्या रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. उर्वरित कामांसाठी आवश्यक निधी मिळवून देण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.

 

                                    000

शेतक-यांचे उत्पन्न वाढण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान सर्वदूर पोहोचवावे - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

                                     

पालकमंत्र्यांकडून माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त अभिवादन

कृषी दिन आणि कृषी संजीवनी सप्ताहाचा जिल्ह्यात शुभारंभ


 


अमरावती, दि. 1 : शेती उत्पादनाबरोबरच शेतकरी बांधवांच्या उत्पन्नात भर पडावी व शेतकरी बांधव आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण व समृद्ध व्हावा, यासाठी कृषी क्षेत्राच्या विकासाचे धोरण राज्य शासनाकडून राबवले जात आहे. कृषी संजीवनी सप्ताहाच्या माध्यमातून अद्ययावत कृषी तंत्रज्ञान शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवावे, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनाजयंतीनिमित्त अभिवादन केले, तसेच कृषी दिनाच्या तसेच कृषी विभागातर्फे आयोजित कृषी संजीवनी सप्ताहाच्या शुभेच्छाही जिल्ह्यातील नागरिकांना दिल्या. कृषी विभागातर्फे कृषीदिन व कृषी संजीवनी सप्ताहाचा शुभांरभ आज जिल्ह्यात विविध ठिकाणी झाला.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राला अन्न-धान्याच्या उत्पादनात स्वयंपूर्ण केले. ते स्वत: प्रयोगशील शेतकरी आणि कृषीतज्ज्ञ होते. शेती आणि सिंचन क्षेत्राच्या आपल्या अभ्यासाचा राज्याच्या धोरणात त्यांनी प्रभावीपणे उपयोग केला. माजी मुख्यमंत्री म्हणून वसंतराव नाईक यांनी आपल्या कार्यातून महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपला अमीट ठसा उमटवला आहे. त्यांच्या कार्य व विचारांपासून प्रेरणा घेऊन राज्य शासन कृषी क्षेत्राच्या विकासाचे धोरण राबवत आहे.  

पिकाची उत्पादकता, गुणवत्ता व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ या त्रिसूत्रीचा अवलंब करत कृषी संजीवनी सप्ताह साजरा करायचा आहे. शेतीचे उत्पादन वाढण्याबरोबरच शेतक-यांचे उत्पन्नही वाढले पाहिजे. शेतकरी आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झाला पाहिजे. कृषी तंत्रज्ञानातील छोटीशी सुधारणा देखील पीक उत्पादन वाढीवर मोठा परिणाम करू शकते. त्यामुळे अद्ययावत तंत्रज्ञान शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवावे. त्यासाठी कृषी संजीवनी सप्ताहाचा उपक्रम गावोगाव प्रभावीपणे राबवावी. जिल्ह्यातील स्थानिक स्थितीचा संदर्भ लक्षात घेऊन उपक्रम सर्वदूर राबविण्याचे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले.  

 

सात जुलैपर्यंत विविध कार्यक्रम

 

         शेतकरी बांधवांच्या बांधावर निविष्ठा पुरवठ्याच्या उपक्रमानंतर आता अद्ययावत कृषी तंत्रज्ञान शेतकरी बांधवांच्या बांधापर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम कृषी संजीवनी सप्ताहाद्वारे राबवला जात आहे. प्रत्येक तालुक्यात उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिपूर्ण नियोजन करण्याचे व कृषि विद्यापीठ व कृषि विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ, तज्ज्ञ यांना सहभागी करून घेण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार कृषी विभागाकडून विविध तालुक्यांत कार्यक्रमांना आज सुरुवात झाली असून, सात जुलैपर्यंत कार्यक्रम राबविण्यात येतील, अशी माहिती जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी विजय चवाळे यांनी दिली.

श्री. चवाळे म्हणाले की, या संपूर्ण सप्ताहात कृषि विकास अधिकारी व प्रकल्प संचालक (आत्मा) यांच्यासह दररोज किमान एका गावातील तर उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांनी दररोज किमान दोन गावांतील कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. कृषीविषयक नाविन्यपूर्ण उपक्रमांना भेटी देऊन त्याची माहिती इतरांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. एम किसान पोर्टलवर शेतकऱ्यांची नोंदणी मोहिम हाती घेण्यात आली आहे. आज शुभारंभानिमित्त गोपाळपूर पिंप्री येथे कृषी अधिका-यांनी शेतकरी बांधवांसह श्रमदान केले, तसेच कमी खर्चातील तंत्रज्ञान व सहकारातून स्वावलंबन साध्य  करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आल्याची माहितीही श्री. चवाळे यांनी दिली.

कोरोना संकटकाळ लक्षात घेऊन शक्य तिथे प्रत्यक्ष संवाद व अनेक ठिकाणी सोशल मीडिया या माध्यमाचा प्रभावीपणे वापर करण्यात येत आहे. त्यासाठी शेतकरी बांधवांसह गावपातळीवरून कृषी सहायक, कृषी अधिकारी यांनाही जबाबदारी देण्यात आली आहे. झूम ॲपच्या माध्यमातून दुर्गापूर कृषी विज्ञान केंद्रातील डॉ. के. पी. सिंह यांचे सोयाबीन व कापूस पीक व्यवस्थापन, कीड रोग नियंत्रण, पशुधन विकास अधिकारी डॉ. रामेश्वर अढाऊ यांचे पावसाळ्यात पशुधनाची घ्यावयाची काळजी या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. कोरोना संकटकाळामुळे स्वतंत्र कार्यक्रम न घेता विविध तालुक्यात स्थानिक अधिका-यांमार्फत शेतीच्या बांधावर जाऊन 44 प्रयोगशील शेतकरी बांधवांचा सत्कार करण्यात आला, अशी माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी कुर्बान तडवी यांनी दिली.

 

                                              00000


सामान्य नागरिकांच्या प्रश्नांच्या निराकरणासाठी डिजीटल राहुटी उपक्रम राबविणार - जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू


 

अमरावती, दि.  1 : सामान्य नागरिकांच्या प्रश्नांच्या निराकरणासाठी गावोगाव राहुटी उपक्रम यापूर्वी राबविण्यात आला आहे. कोरोना संकटकाळात लक्षात घेऊन आता डिजीटल राहुटी उपक्रम राबविणार असल्याचे जलसंपदा, शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी आज सांगितले.

            सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी राहुटीच्या माध्यमातून विविध विभागांशी निगडित समस्यांचे निराकरण केले जाते. राज्यमंत्री महोदय स्वत: उपस्थित राहून नागरिकांची निवेदने स्वीकारतात. संबंधित विभागाच्या तक्रारीचे लगेच निराकरण केले जाते. विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी विविध योजनांच्या माहितीसह स्वतंत्र कक्षात उपस्थित असतात. त्यामुळे राहुटी उपक्रमातून हजारो नागरिकांच्या प्रश्नांचे निराकरण होते.

याच अनुषंगाने आता डिजीटल राहुटीचा उपक्रम राबविण्यात येईल. त्यासाठी स्वतंत्र ॲप तयार करण्यात येत आहे. त्याद्वारे पाच-सहा गावे मिळून एका मध्यवर्ती गावातील ग्रामपंचायतीत व्हिडीओ कॉन्फरन्स हॉल तयार करण्यात येईल. तिथे नागरिकांना आपली समस्या त्या ठिकाणी उपस्थित राहून मांडता येईल. कृषी, ग्रामविकास, महसूल आदी विभागातील स्थानिक अधिकारी व कर्मचारी  उपस्थित राहून या नागरिकांना समस्या मांडण्यासाठी सहायय् करतील. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आदी अधिकारीही त्यांच्या कार्यालयातून कनेक्ट होतील. आरोग्य सुरक्षिततेसाठी योग्य ती दक्षता घेतली जाईल.

नागरिकांचे प्रश्न तत्काळ सोडविण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल, असा विश्वास राज्यमंत्री श्री. कडू यांनी व्यक्त केला.

00000

 


दुष्काळाच्या आव्हानात, आपली छोटी कृती करू शकते पाण्याची मोठी बचत! #दुष्काळ #पाणीबचत

  दुष्काळाच्या आव्हानात, आपली छोटी कृती करू शकते पाण्याची मोठी बचत! #दुष्काळ #पाणीबचत