Wednesday, June 24, 2020

सदोष बियाणे तक्रारीची तत्काळ तपासणी करण्याचे निर्देश तपासणी पथकांची संख्या वाढवावी - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर


 

          अमरावती, दि. २४ : बियाण्याची उगवण होत नसल्याच्या तक्रारी शेतकरी बांधवांकडून मोठ्या प्रमाणावर प्राप्त होत आहेत.  त्याची तत्काळ दखल घेत तक्रारीची पडताळणी तातडीने करण्यासाठी तपासणी पथकाची संख्या वाढवावी, तसेच संबंधित दोषी कंपन्यांवर कडक कारवाई  करण्याची सुस्पष्ट निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले.

जिल्ह्यातील शेतकरी बांधवांकडून पेरलेले विविध कंपन्यांचे बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी कृषी विभागाला प्राप्त होत आहेत. कोरोना संकटकाळात शेतकरी बांधव आधीच अडचणीत असताना असा प्रकार होणे हे अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे प्रत्येक तक्रारीची दखल घेऊन तत्काळ कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, तपासणी पथकांची संख्या वाढवावी. तपासणी अहवाल तत्काळ उपलब्ध करून द्यावेत. ज्या शेतकरी बांधवांनी महाबीजचे बियाणे पेरले व ते उगवून आले नाही अशा तक्रारीची तातडीने दखल घेऊन तपासणी अहवालाची वाट न पाहता बियाणे बदलून देण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना शासनाकडून महाबीजला देण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्हा कृषी कार्यालयाने तत्काळ महाबीजशी संपर्क साधून कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले. जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे व या वर्षी पाऊस वेळेवर झाल्याने शेतकऱ्यांनी पेरण्याही वेळेवर केल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या अनेक भागातून सोयाबीनचे बियाणे उगवण न झालेल्या बाबतच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्याबाबत व्यापक सर्वेक्षण करून तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करावा, असेही निर्देश त्यांनी दिले. 

       जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उगवण न झाल्याबाबतच्या तक्रारी संबंधित तालुका कृषी अधिकारी कृषी सहाय्यक अथवा तलाठी यांच्याकडे तात्काळ द्याव्यात, असे आवाहनही करण्यात आले आहे. जिल्ह्यात सोयीबीन बियाणे उगवण न झाल्याबाबत महाबीज, राष्ट्रीय विमा निगम, उत्तम सीडस्, बसंत ॲग्रो (विक्रांत) या कंपनीच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीमार्फत पाहणी सुरू आहे, अशी माहिती जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी विजय चवाळे यांनी दिली. ते म्हणाले की, जिल्ह्यात सोयाबीन पिकाचे सरासरी क्षेत्र 2.94 लाख असून, प्रत्यक्षात 1 लाख 60 हजार 304 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. एकूण क्षेत्राच्या तुलनेत हे प्रमाण 54.48 टक्के आहे. महाबीजकडून बियाणे बदलून देण्यात येत आहे, त्याचप्रमाणे सर्वेक्षणातून सर्व तक्रारींचे निराकरण होण्यासाठी तत्काळ अहवाल देण्यासाठी पाठपुरावा करत आहोत, असे श्री. चवाळे यांनी सांगितले.

         जिल्ह्यात कपाशी क्षेत्राचे सरासरी क्षेत्र 2.04 लाख हेक्टर असून, प्रत्यक्षात 1 लाख 68 हजार 149 हेक्टर क्षेत्रावर (82.42 टक्के) पेरणी झालेली आहे. पावसाचे दिवस जास्त दिसत असले तरी पाऊस समाधानकारक नाही. पाऊस कमी असल्यामुळे इतर घरचे बियाणे पेरलेल्या शेतक-यांच्या सोयाबीन पिकाची सुद्धा हलक्या जमीनीत मोड येत असल्याचे दिसून येत आहे.

        तूर पीकाचे सरासरी क्षेत्र 1. 11 लाख हेक्टर असून अद्यापपर्यंत 62 हजार 298 हेक्टर (55.93 टक्के) तूर पीकाची पेरणी झालेली आहे. मका पीकाचे 84 हजार 460 हेक्टर क्षेत्र असून, मका 6 हजार 963 हेक्टर (82.45 टक्के) क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. मूग पीकाचे सरासरी क्षेत्र 84 हजार 460 हेक्टर असून, सुमारे 82 टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. मूग पीकाचे सरासरी क्षेत्र 24 हजार 992 हेक्टर असून, आतापर्यंत 7 हजार 276  हेक्टर (29.12 टक्के) क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. उडीद पीकाचे 9 हजार 173 हेक्टर क्षेत्र असून, 2 हजार 445 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. अनेक पीके उगवणीच्या अवस्थेत असल्याने पावसाची तातडीने आवश्यकता आहे, असे श्री. चवाळे यांनी सांगितले.

 

                                    000

Tuesday, June 23, 2020

पन्नास लोकांच्या उपस्थितीत विवाह समारंभास मान्यता जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडून आदेश जारी

पन्नास लोकांच्या उपस्थितीत विवाह समारंभास मान्यता

जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडून आदेश जारी

 

अमरावती, दि. 23 : जिल्ह्यात 50 लोकांच्या उपस्थितीत विवाह समारंभ पार पाडण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसा आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जारी केला.कोरोना संकटात लागू लॉकडाऊनमध्ये मिशन बिगीन अगेन मोहिमेद्वारे शिथीलकरण आणण्यात आले आहे. त्यानुसार 50 नागरिकांच्या उपस्थितीत लग्न पार पाडता येईल. जिल्ह्यातील खुले लॉन, विनावातानुकूलित मंगल कार्यालये, सभागृहे, घर व घरानजिकच्या परिसरात लग्नसमारंभ सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत करता येईल. मात्र, मिरवणूक काढता येणार नाही. प्रतिबंधित क्षेत्रातील व्यक्तीला समारंभाला उपस्थित राहता येणार नाही. त्याचप्रमाणे, प्रतिबंधित क्षेत्रापासून 200 मीटर अंतरापर्यंत असलेल्या मंगल कार्यालये, सभागृह बंद राहतील.  

लग्न करणा-या पक्षाने समारंभाची परवानगी अमरावती महापालिका क्षेत्रात पालिका आयुक्तांकडून, नगर परिषदेच्या क्षेत्रात मुख्याधिका-यांकडून, तर ग्रामीण क्षेत्रात तहसीलदारांकडून मिळवावी. त्यासाठी त्यांना अर्जासह उपस्थितांची यादी देणे बंधनकारक आहे. दक्षता नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यावर कारवाई करण्याचे जबाबदारी या परवानगी प्राधिका-यांना देण्यात आली आहे.

हॉल किंवा सभागृह किंवा विवाहाच्या स्थळाचे, तसेच समारंभात हाताळण्यात येणा-या सर्व वस्तूंचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे. हॉलच्या कार्यालयातील काऊंटरचे दर तीन तासांनी निर्जंतुकीकरण करावे. समारंभात किमान एक मीटर सोशल डिस्टन्सिंग कटाक्षाने पाळावे. हॉलच्या कर्मचा-यांनीही मास्क, हातमोजे, सॅनिटायझरचा नियमित वापर करावा. गरज भासल्यास किंवा लक्षणे आढळल्यास कर्मचा-यांची तत्काळ तपासणी करावी. कोरोना प्रतिबंध दक्षतेबाबत सूचनांचा फलक दर्शनी भागात लावावा. नियमांचे पालन होत नसेल तर अशा व्यक्तींना प्रवेश देऊ नये, असे सुस्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी दिले आहेत.

समारंभात गर्दी होऊन कोविड-19 चा प्रादुर्भाव होणार नाही यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी देखरेख करण्याचे आदेश आहेत.

                          

हॉलचालकांवरही जबाबदारी

 

समारंभात प्रवेशाच्या ठिकाणी थर्मल स्कॅनिंग, मास्क, तसेच सॅनिटायझरची व्यवस्था करण्याची जबाबदारी संबंधित मंगल कार्यालय, सभागृह, लॉन, मॅरेज हॉलच्या संचालकाची असेल. आवारात पान, तंबाखू, गुटखा खाऊन थुंकण्यास प्रतिबंध करावा. सभागृहात गर्दी होणार नाही, याचीही काळजी त्यांनी घ्यावी. गर्दी  वाढत असल्याचे लक्षात येताच हॉलचालकाने तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्याला सूचित करावे व हॉल तत्काळ बंद करावा. असे न केल्यास व गर्दी वाढल्याचे आढळल्यास संबंधित हॉल, सभागृह सील करण्याची फौजदारी कार्यवाही परवानगी देणा-या प्राधिका-यांनी करावी, असेही जिल्हाधिका-यांचे आदेश आहेत.

 

आरोग्य सेतू बंधनकारक

 

लग्न समारंभास उपस्थित राहणा-या सर्वांनी आरोग्य सेतू ॲप वापरणे बंधनकारक राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 

                                    000


जिल्ह्यातील तरूणांसाठी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

बेरोजगार युवक-युवतींना लॉकडाऊननंतर नोकरीची सुवर्णसंधी


 

ऑनलाईन मेळाव्यांना 30 जूनपासून प्रारंभ

 

   अमरावती, दि. 23 : लॉकडाऊनमधील शिथिलीकरणानंतर सुरु झालेल्या उद्योग- व्यवसायांना मनुष्यबळ मिळवून देण्यासाठी  व जिल्ह्यात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यात कुशल मनुष्यबळ निर्माण होण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रमाला गती देण्यात येईल, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

            कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील लॉकडाऊनमुळे असंख्य परप्रांतीय कामगारांचे स्थलांतर झाले. शिथीलीकरणानंतर काही उद्योग- व्यवसाय सुरु करण्यात आले आहेत. या अनुषंगाने औद्योगिक कंपन्यांना मनुष्यबळाची कमतरता भासते. त्यामुळे कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी व रोजगारनिर्मितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे  ऑनलाईन मेळावे घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना होत असताना रोजगारनिर्मिती थांबू नये व पुरेशी दक्षता घेऊन सुरक्षितता राखली जावी, या हेतूने ऑनलाईन उपक्रमांना चालना देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिली.

मेळाव्यात व्हिडीओ कॉन्फरन्स व इतर डिजीटल माध्यमातून मुलाखती घेण्यात येतील. स्थानिक स्तरावर उद्योग-व्यवसायांची भरभराट व रोजगारनिर्मितीसाठी सर्वतोपरी प्रयत्न होत  आहेत. स्थानिक स्तरावर कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रमाला गती देण्यात येईल, असे यावेळी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.

 

                          30 जूनला होणार ऑनलाईन मेळावा

 

        केंद्रातर्फे दि. 30 जूनला ऑनलाईन पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात येत आहे. जिल्ह्यातील नामांकित आस्थापना, कंपनींतील विविध प्रकारच्या रिक्त पदांची गरज लक्षात घेऊन विविध उद्योग-व्यवसायांशी संपर्क साधून सहभाग मिळविण्यात आला आहे. या ऑनलाईन रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील विविध नामवंत उद्योजकांकडील सर्वसाधारणपणे सेल्स ऑफिसर, ट्रेनी, कॅशियर, डाटा एन्ट्री ऑपरेटर, अकुशल कामगार यासारख्या पदांसाठी भरती होणार आहे, अशी माहिती सहायक कौशल्य विकास व रोजगार आयुक्त प्रफुल्ल शेळके यांनी दिली.

मेळाव्यात 200 हून अधिक रिक्त पदे उपलब्ध होणार आहेत. एस. एस. सी., एच. एस. सी., पदवीधर उमेदवारांना सहभाग घेता येईल. टेक्नोक्रॉफ्ट, नवभारत, पालेकर बेकरी, नवभारत, चक्रधर एजन्सी, रेडिएंट हॉस्पिटल अशा स्थानिक उद्योग-व्यवसायांनाही मेळाव्यात सहभाग देण्यात आला आहे. केवळ ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणा-या उमेदवारांनाच नोकरीची संधी प्राप्त होणार आहे, असेही ते म्हणाले.

 

                          युवकांना ऑनलाईन नोंदणीचे आवाहन

 

    कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या (सेवायोजन कार्यालयाच्या) पोर्टलद्वारे युजर आयडी व पासवर्डच्या आधारे नोंदणी करता येते.  www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाद्वारे लॉगिन करून आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार उचित रिक्त पदासाठी आपला सहभाग पसंतीक्रमानुसार ऑनलाईन पद्धतीने नोंदवावा. पसंतीक्रम नोंदविताना शक्यतो आसपासच्या ठिकाणी निवड  करण्याची दक्षता घ्यावी. इच्छूक व ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणा-या उमेदवारांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार व उद्योगांच्या समन्वयातून मुलाखतीची तारीख व वेळ एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे. इच्छूक युवक व युवतींनी दि. 30 जूनपर्यंत पसंतीक्रम नोंदविण्याचे आवाहन रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने केले आहे.

याबाबत अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक (0721) 2566066 किंवा ई-मेल amravatirojgar@gmail.com यावर संपर्क साधण्याचेही आवाहन त्यांनी केले आहे.

 

                         आस्थापनांनाही नोंदणी करण्याचे आवाहन

 

जिल्ह्यातील आस्थापनांनी त्यांच्याकडे रिक्त झालेल्या पदांची मागणी ऑनलाईन पद्धतीने वेबसाईटवर नोंदवावी. या संकेतस्थळाद्वारे रोजगार प्रोत्साहन कार्यक्रमात रिक्त पदे अधिसूचित करणे, कुशल मनुष्यबळ माहितीची उपलब्धता, रोजगार मेळाव्यात सहभाग, त्रैमासिक ई-आर-1 ऑनलाईन पद्धतीने सादर करणे यासारख्या सेवा अंतर्भूत आहेत. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्ह्यातील आस्थापनांना करण्यात आले आहे.

 

                                    00000

 

 


सव्वा चारशे वर्षांची अखंडित परंपरा यापुढेही अबाधित - महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

आई रुक्मिणीची पालखी यंदाही पंढरपूरला जाणार


अमरावती, दि. 23 :  माता रुक्मिणीचे माहेर असलेल्या कौंडण्यपूर येथील आई रुक्मिणीची पालखी यंदाही आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूरला जाणार आहे. सव्वाचारशे वर्षांची अखंडित परंपरा असलेल्या या पालखीत कोरोना संकटामुळे खंड पडणार नाही. आवश्यक ती दक्षता घेऊन पालखी पंढरपूरकडे रवाना होईल, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी येथे केले.

            आषाढी शुद्ध एकादशीनिमित्त दि. 1 जुलै रोजी आषाढी यात्रा श्री क्षेत्र पंढरपूर येथे भरणार आहे. यात्रेत प्रमुख संतांच्या पादुकांचा श्री पांडुरंगास भेटीचा सोहळा असतो. त्यानिमित्त राज्यभरातून पालख्या पंढरपूरला येत असतात. सध्याचे कोरोना महासंकट लक्षात घेऊन पालख्यांवर काहीशी मर्यादा आली, मात्र महत्वाच्या पालख्यांना योग्य ती दक्षता घेऊन पालखी आणण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार राज्यात नऊ पालख्यांना मान्यता देण्यात आली आहे.

कौंडण्यपूर येथील सव्वाचारशे वर्षांची प्राचीन परंपरा लक्षात घेऊन ही परंपरा अखंडित राहावी यासाठी शासनाची मान्यता मिळविण्यासाठी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी प्रयत्न केले.  त्यानुसार शासनाने मान्यता दिली असून, विदर्भातील ही प्राचीन पालखी परंपरा अबाधित राहणार आहे. आई रुक्मिणीची पालखी यंदाही पंढरपूरला जाणार असल्याने विदर्भातील वारकरी, भाविकांकडून आनंद व्यक्त होत आहे.

 पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कार्यकारी अधिका-यांनी तसे पत्र श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील श्री विठ्ठल रूख्माई संस्थानच्या विश्वस्तांना पाठवले आहे. आषाढी यात्रेचा कालावधी आषाढ शु. 1 (22 जून) ते आषाढ शु. 15 (5 जुलै) असा राहणार आहे. माता रुक्मिणीची पालखी घेऊन येणा-या भाविकांची नावे मंदिर समितीस कळविण्याबाबत पत्र संस्थानला देण्यात आले आहे. त्यानुसार समितीतर्फे येणा-या भाविकांना प्रवेशपत्रिका दिल्या जाणार आहेत.  

 

सांस्कृतिक संचिताची जपणूक

 

            श्री क्षेत्र कौंडण्यपूर हे श्रीकृष्णपत्नी रुक्मिणीचे माहेर आहे. येथे कार्तिकी एकादशीला मोठी यात्रा भरते. आषाढी एकादशीला येथून सुमारे 425 वर्षांपासून पालखी पंढरपूरला जाते. रुक्मिणी मातेची पालखी ही पहिली मानाची पालखी मानली जाते. सव्वाचारशे वर्षांची प्रदीर्घ परंपरा आणि विविध शतकांतील संत महात्म्यांच्या सहवासाने पुनित झालेली ही पालखी केवळ विदर्भातीलच नव्हे, तर समस्त महाराष्ट्रातील लोकांच्या श्रद्धेचा अविभाज्य भाग आहे. महाराष्ट्राचे हे सांस्कृतिक संचित आहे. त्यामुळे कोरोना संकट आले तरी ही परंपरा खंडित होऊ दिली नाही. योग्य ती दक्षता घेऊन पालखी नेण्यात येईल, असे पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी सांगितले.

कौंडण्‍यपूर ही विदर्भ राज्याची राजधानी होती. प्राचीन काळात दक्षिणेचे प्रवेशद्वार म्हणून त्याला मान्यता होती. अयोध्येसारख्या प्राचीन शहरांशी त्या काळात हे ठिकाण जोडलेले होते. माता रुक्मिणीचे माहेर असल्याने आषाढी यात्रेसाठी श्री क्षेत्र पंढरपूरला अखंडितपणे पालखी जाते. ही पालखी परंपरा विदर्भातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे.  कोरोना संकटकाळात पालखीचे अबाधितपण कायम राखल्याबद्दल वारकरी, भाविकांमध्ये चैतन्य पसरले आहे.

 

      श्री क्षेत्र कौंडण्यपूरप्रमाणेच आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थान, सासवड येथील श्री संत सोपानदेव समाधी मंदिर ट्रस्ट, त्र्यंबकेश्वर येथील श्री संत निवृत्तीनाथ समाधी संस्थान, मुक्ताईनगर येथील श्री संत मुक्ताई देवस्थान, पैठण येथील श्री संत एकनाथ महाराज देवस्थान, पंढरपूर येथील श्री संत नामदेव महाराज संस्थान, सासवड येथील श्री चांगावटेश्वर देवस्थान येथून पालख्या आषाढीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूरला येणार आहेत.

 

00000

 


Monday, June 22, 2020

कोविड रुग्णालयात दाखल महिला प्रसूतीनंतर बाळासह सुखरूप घरी

 




महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी घेतली माता व बाळाची भेट

·         डॉक्टर, पारिचारिका व कर्मचा-यांचे मानले आभार

 

अमरावती, दि. 22 : येथील जिल्हा कोविड रूग्णालयात दाखल कोरोना पॉझिटिव्ह महिलेनेसोमवारी (15 जून) एका गोंडस मुलीला जन्म दिला. कोविड रुग्णालयाच्या डॉक्टर, परिचारिका, कर्मचा-यांच्या चमूने रुग्णालयात या महिलेची सुरक्षित प्रसुती केली. आई व बाळ दोघेही सुखरूप असल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी यावेळी स्वत: उपस्थित राहून महिलेला शुभेच्छा देत बाळाला आशिर्वाद दिला.

      अमरावतीतील सिध्दार्थ नगर येथील रहिवासी असलेल्या गर्भवती महिलेला (20) त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रविवारी (14 जून) रोजी कोविड रुग्णालयात ॲडमिट करण्यात आले होते. कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे शहरातील इतर खासगी रुग्णालयांनी सदर महिलेला दाखल करुन घेण्यासाठी नकार दिला होता. या महिलेला आरोग्य विभागाच्या सुपरस्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये उभारण्यात आलेल्या जिल्हा कोविड रुग्णालयात सदर महिलेला ॲडमिट करुन घेण्यात आले. डॉक्टर व चमूने अथक परिश्रम घेऊन महिलेची दुसऱ्या दिवशी सुरक्षित प्रसुती करण्यात आली. सदर महिलेने गोंडस मुलीला जन्म दिला आहे.

   बाळ व माता दोघेही सुदृढ स्थितीत असून आज रोजी त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यानिमित्त पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी आज त्यांची रुग्णालयात प्रत्यक्ष जाऊन सदर माता व बाळाची भेट घेतली. यावेळी पालकमंत्र्यांनी पुष्पगुच्छ देऊन सदर महिलेचे अभिनंदन केले, तसेच नवजात चिमुकलीलाही हातात घेऊन तिचे कौतुक केले.

कोरोना संकटकाळात जिल्हा कोविड रूग्णालयातील पथक अथक परिश्रम घेत कामे करत आहेत. या काळात आरोग्य यंत्रणेच्या दृष्टीने निर्माण होणा-या प्रत्येक अडचणींवर मात करण्यात येत आहे. गर्भवती भगिनीवर उपचार सुरु असताना त्यांच्या आरोग्य सुधारणेची काळजी घेत यशस्वीपणे प्रसुती करण्यात आली.  प्रसुतीसाठी जिल्हा कोविड रूग्णालयात तत्काळ प्रसुती कक्षाची व्यवस्था करण्यात आली. प्रसुती तज्ज्ञांसह पीपीई कीट व इतर साधनसामग्री सुसज्ज ठेवण्यात आली.  दाखल झाल्यानंतर दुस-याच दिवशी महिलेने बाळाला जन्म दिला. कोरोना रुग्णालयात उपचारानंतर बाळ व महिलेला आज सुखरूपपणे घरी परतता आले आहे. या घटनेबद्दल आनंद व्यक्त करत पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी स्वत: रुग्णालयाला भेट देऊन आई व बाळाचे कौतुक केले.

 

जिल्हा कोविड रुग्णालयातून 68 टक्के रुग्ण सुखरूप घरी

 

महिला व बालविकास मंत्री श्रीमती ठाकूर यांनी रुग्णालयाच्या पथकाचे अभिनंदन करत आभार मानले आहेत. त्या म्हणाल्या की, कोविड रुग्णालयातील टीम जीवाची पर्वा न करता कोविड रुग्णांची सेवा करत आहे. जिल्हा कोविड रुग्णालयातून दाखल रुग्णांपैकी 68 टक्के रुग्ण बरे होऊन सुखरूप घरी परतले आहेत. इतर रुग्णांवरही सुसज्ज यंत्रणेद्वारे उपचार होत आहेत. तीन शिफ्टमध्ये डॉक्टर, पारिचारिका, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी गत साडेतीन महिन्यांपासून अविरत परिश्रम घेत आहेत. कोरोना संकटकाळात रुग्णसेवेची जबाबदारी ही टीम समर्थपणे पार पाडत आहे. त्यामुळेच या कोरोना वॉरिअर्सचे मनोबल उंचावण्यासाठी मेडिटेशन व ध्यानधारणेसारखे उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत.

  लॉकडाऊनमध्ये शिथिलीकरण आले असले तरीही अजून आपली कोरोनाविरुद्धची लढाई संपलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी दक्षतेचे सर्व नियम पाळून कोरोना हद्दपार करण्याच्या प्रयत्नांना साथ द्यावी, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले.

           जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, डॉ. रवी भूषण,  प्रसुती तज्ज्ञ डॉ. सुषमा शेंद्रे, भूलतज्ज्ञ डॉ. अनुप बोंद्रे व चिल्ड्रेन स्पेशालिस्ट स्वप्नील पाटील आदींनी महिलेच्या सुरक्षित प्रसुतीसाठी प्रयत्न केले.  

 

00000

 

 


Sunday, June 21, 2020

दैनंदिन जीवनात योगाचा अवलंब व्हावा - पालकमंत्री यशोमती ठाकूर


 

अमरावती, दि. 20 : योग हे शारीरिक स्वास्थ्यासह मानसिक स्वास्थ्य व सामाजिक स्वास्थ्यालाही उपयुक्त आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनात प्रत्येकाने योगाचा अवलंब करावा, असे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.

योग दिनानिमित्त पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी जिल्ह्यातील समस्त जनतेला शुभेच्छा दिल्या त्या म्हणाल्या की, शरीर व मन यांच्यात संतुलन राखण्याचे कार्य योगाद्वारे होते त्यामुळे निरामय आरोग्य सह शांततामय जीवनासाठी ही योग उपयुक्त आहे. कोरोना संकटकाळात अनेक अडचणी उभ्या राहिलेल्या असताना घरगुती हिंसाचारातही वाढ दिसून आली. या काळात संयमी, खंबीर राहणे आवश्यक आहे. त्यासाठी योगाचा अवलंब प्रत्येकाने करावा, असे आवाहन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी केले. 

 

00000

 


लॉकडाऊनच्या काळात धान्यपुरवठ्यासाठी शासनाचे विविध कल्याणकारी निर्णय


वितरणाची कार्यवाही विहित मुदतीत पूर्ण करा

- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे निर्देश

 

अमरावती, दि. 21 : कोरोना संकटकाळात जारी लॉकडाऊनच्या काळात गरजूंपर्यंत सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे धान्यवितरणासाठी राज्य शासनाने विविध कल्याणकारी निर्णय घेतले. जून महिन्यातही पावसाळा व इतर बाबी लक्षात घेऊन पुरवठ्याची गतीने अंमलबजावणी करत कुणीही पात्र व्यक्ती त्यापासून वंचित राहू नये याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले. 


राज्य शासनाने कोविड-19 संकटावरील उपाययोजनेसाठी एपीएल केसरी लाभार्थ्यांना मे व जूनसाठी प्रति व्यक्ती 5 किलो धान्य सवलतीच्या दराने देण्याचा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत अंत्योदय योजना या प्राधान्य लाभार्थी योजनेतील कार्डवर प्रति लाभार्थी प्रति महीना 5 किलो तांदूळ विनामूल्य देण्याची योजना आहे. 


पात्र रेशनकार्ड धारकाने नियमित स्वस्त धान्य खरेदी केल्यानंतर त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला 5 किलो अतिरिक्त तांदूळ मोफत देण्याची तरतूद आहे. त्यामुळे आता प्रत्येक पात्र रेशन कार्डधारकाला नियमित धान्य घेतल्यानंतर 8 दिवसांनी प्रति व्यक्ती  5 किलो तांदुळ  कुटुंबातील व्यक्तींच्या संख्येनुसार मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे.  हा मोफत तांदूळ एप्रिल व मे नंतर जूनमध्ये सुध्दा उपलब्ध करून दिला जात आहे. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी पुरवठा विभागाने करण्याचे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले.   

जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी  तसेच शेतकरी लाभार्थी याची असून एकूण 5 लाख 28 हजार 147 रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे 25 लाख 47 हजार 396 इतकी आहे. या लाभार्थ्यांना 1 हजार 939 स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. कोरोना संकटकाळ, तसेच पावसाळा लक्षात घेता पुरवठ्याची कार्यवाही नियमित व सुरळीत ठेवावी. मेळघाटकडे प्राधान्याने लक्ष पुरवावे. मेळघाटातील दुर्गम भागात पुरवठ्याची कार्यवाही अधिक प्रभावीपणे करावी, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले. 

स्वस्त धान्य दुकानांतून गैरव्यवहार होता कामा नयेत. त्यासाठी वेळोवेळी तपासण्या कराव्यात व आक्षेपार्ह बाब आढळल्यास तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.


लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यात अडकलेल्या साडेतीन हजारहून अधिक शिधापत्रिकाधारकांनी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे. आत्मनिर्भर भारत या योजनेचा अन्नधान्य लाभ मे नंतर आता जून महिन्यासाठीही असून त्या अंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या विनाशिधापत्रिकाधारकांना प्रती व्यक्ती 5 किलो मोफत तांदुळ दिला जात आहे. 

  

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेत प्रती रेशनकार्ड 1 किलो मोफत डाळ (तूर किंवा चना डाळ) देण्याची तरतूद आहे.  त्यानुसार जिल्ह्यात एप्रिल, मे व जून या तिन्ही महिन्यांसाठी प्रतिमहिना 178 मे. टन तूरडाळ व 267 मे. टन चणा डाळ उपलब्ध करून देण्यात आली, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे यांनी दिली. 

           पुरवठा विभागांतर्गत अंत्योदय योजनेअंतर्गत 2 रुपये किलो दराने प्रति कार्ड 15 किलो गहू , 3 रुपये किलो दराने प्रति कार्ड 20 किलो तांदूळ दिला जातो. प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना 2 रु किलो दराने प्रति व्यक्ती 3 किलो गहू आणि 3 रु किलो दराने प्रति  व्यक्ती 2 किलो तांदूळ दिला जातो. शेतकरी लाभार्थी कार्ड वर 2 रु किलो दराने प्रति व्यक्ती 3 किलो गहू आणि 3 रु किलो दराने प्रति  व्यक्ती 2 किलो तांदूळ दिला जातो, असेही त्यांनी सांगितले.

                    

           

0000

दुष्काळाच्या आव्हानात, आपली छोटी कृती करू शकते पाण्याची मोठी बचत! #दुष्काळ #पाणीबचत

  दुष्काळाच्या आव्हानात, आपली छोटी कृती करू शकते पाण्याची मोठी बचत! #दुष्काळ #पाणीबचत