Tuesday, September 15, 2020

मोझरी येथे आदिवासी विकास विभागाचे प्रशिक्षण केंद्र आणि सायन्स पार्क - ॲड. यशोमती ठाकूर

 




पालकमंत्र्यांद्वारे झूम ॲपद्वारे चर्चा

मोझरी येथे आदिवासी विकास विभागाचे प्रशिक्षण केंद्र आणि सायन्स पार्क

- ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 15 : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या गुरुकुंज मोझरी (ता. तिवसा) येथे आदिवासी विकास विभागाचे प्रशिक्षण केंद्र आणि विज्ञान उद्यान (सायन्स पार्क) उभारण्यात येणार आहे.  या अनुषंगाने आदिवासी विकास विभाग, त्याचप्रमाणे, प्रशासनाने आवश्यक ती कार्यवाही गतीने पूर्ण करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

            गुरुकुंज मोझरी, ता. तिवसा येथील प्रशिक्षण इमारत व इतर जागा ही आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे या संस्थेला उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. आदिवासी विकास विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पंचायत राज व्यवस्थेतील लोकप्रतिनिधी, पेसा समन्वयक आणि बचत गट यांना प्रशिक्षण देण्याकरिता या प्रशिक्षण संस्थेचा उपयोग होणार आहे. या कामाला गती देण्याच्या अनुषंगाने पालकमंत्री ॲड. ठाकूर यांनी आज विभागाच्या अधिका-यांशी झूम ॲपद्वारे चर्चा केली.

            पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, आदिवासी विकास विभागाने पाच एकर जागेबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिका-यांना सादर करावा. याबाबत जिल्हाधिका-यांकडून निर्णय व कार्यवाही व्हावी. त्यासाठी नियोजन विभागाकडून सक्षम प्राधिकारी यांची मान्यता घ्यावी. संस्थेला इमारती हस्तांतरित केल्यानंतर फर्निचर व इतर आवश्यक त्या सुविधा आदिवासी विकास विभागाच्या प्रशिक्षण संस्थेकडून निर्माण करण्यात येतील, असे निर्देश त्यांनी दिले.

 

मोझरी हे ठिकाण आदिवासीबहुल क्षेत्राच्या समीप असल्याने आदिवासी क्षेत्रातील लोकप्रतिनिधी आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदींसाठी प्रशिक्षण देण्यास आदर्श ठिकाण आहे. तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामविकासाच्या संकल्पना या भागात खोलवर रुजलेल्या आहेत. त्यामुळे येथे आदिवासी विकास विभागाचे प्रशिक्षण केंद्र उभारण्याचे निश्चित केले आहे. त्याशिवाय ग्रामविकासाच्या संकल्पना राबविताना त्याला शास्त्रीय दृष्टीकोनाची जोड असावी या हेतूने येथे विज्ञान उद्यान (सायन्स पार्क) उभारण्यात येणार आहे.  

 

00000

 

महिलांकरिता विशेष बससेवा उपलब्ध करावी ॲड. यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

 


महिलांकरिता विशेष बससेवा उपलब्ध करावी

ॲड. यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

 

          मुंबई, दि. 15: मुंबईमध्ये शासकीय, निमशासकीय आदी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी मर्यादित स्वरुपात रेल्वे प्रवासाची सुविधा उपलब्ध असल्यामुळे महिलांसाठी विशेष बससेवा तसेच शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनेवरील अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या प्रवासाकरिता अतिरिक्त बससेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

            ॲड. ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे यासंदर्भात मागणी केली आहे. त्यांनी पत्रात नमूद केले आहे की, संपूर्ण राज्यात सुरु असलेल्या लॉकडाउनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. सर्व अत्यावश्यक सेवेतील शासकीय, खाजगी आस्थापनेवरील अधिकारी- कर्मचारी विशेषतः महिलांनाही कार्यालयात किंवा कर्तव्याच्या ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे. केंद्र शासनाने रेल्वेने प्रवास करण्यासाठी क्यू-आर कोडसहित पासेसची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. तथापि, बहुतांश अधिकारी व कर्मचाऱ्यांना क्यू- आर कोड पासेस उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे पर्यायाने त्यांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या बसने प्रवास करावा लागत आहे.

            बसने प्रवास करण्याकरिता दररोज तास- दोन तास बसची प्रतीक्षा तसेच बस उपलब्ध झाल्यानंतरही त्यांना दोन-तीन तास प्रवास बसने करावा लागत आहे. विशेषतः महानगरमध्ये बसने येण्याजाण्यास खूप अडचणी येत आहे. तसेच बससेवेला होत असलेली गर्दी पाहता त्यांची संख्या वाढविण्याची गरज आहे. त्यामुळे महिलांसाठी विशेष बससेवा तसेच शासकीय व खाजगी आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी अतिरिक्त बस सेवा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, असे ॲड. ठाकूर यांनी म्हटले आहे.

00000

 








महाविद्यालयीन परीक्षा नियोजनाबाबत उच्च शिक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

शासन, प्रशासन, विद्यापीठाच्या समन्वयाने परीक्षा प्रक्रिया सुरळीत पार पाडणार

                     -  उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

 

अमरावती, दि. 15 : महाविद्यालयीन परीक्षा ऑनलाईन पद्धतीने सुरळीत पार पाडण्यासाठी विद्यापीठांकडून परिपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. ऑनलाईन परीक्षेबाबत साधनांची अडचण असणा-या विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित व निर्धोक वातावरणात ऑफलाईन परीक्षेचे नियोजन प्रशासनाच्या सहकार्याने करण्यात येत आहे. शासन, प्रशासन व विद्यापीठ यांच्या समन्वयाने परीक्षा प्रक्रिया सुरळीत पार पाडली जाईल, अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली.

 

            उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. सामंत यांच्या अध्यक्षतेखाली संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची आढावा बैठक विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात झाली, त्यावेळी ते बोलत होते. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर, माजी आमदार वीरेंद्र जगताप, कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर आदी यावेळी उपस्थित होते.

 

            महाविद्यालयीन परीक्षा प्रक्रियेच्या अनुषंगाने आपण सर्व विद्यापीठातील नियोजनाचा आढावा घेत असल्याचे सांगून श्री. सामंत म्हणाले की,  कोरोना महासंकटात सर्वच क्षेत्रांत अनेक अडचणी उभ्या राहिल्या असताना शासनाकडून विविध निर्णयांच्या अंमलबजावणीतून त्यावर मात करण्याचा प्रयत्न होत आहे. याच अनुषंगाने परीक्षा प्रक्रियेत येणा-या अडचणी, पूर्वतयारी व आवश्यक सहकार्य यासाठी विद्यापीठनिहाय आढावा बैठक घेतली जात आहे. या अनुषंगाने विद्यापीठासमोरील प्रलंबित प्रश्न सोडविण्याचाही प्रयत्न होत आहे. विद्यापीठांचे शासन स्तरावर जे जे प्रलंबित प्रश्न आहेत, ते सर्वांच्या उपस्थितीत अशा आढाव्याद्वारे एकाच दिवसात सोडविण्यासाठी स्वतंत्र बैठकीचेही नियोजन करण्यात येईल. सर्व प्रलंबित प्रश्न शासन, प्रशासन व विद्यापीठाच्या समन्वयातून सोडविण्यात येतील, असेही ते म्हणाले.

 

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाकडून सुमारे 70 हजार विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार आहे. त्यात 15 ते 25 सप्टेंबर दरम्यान प्रात्यक्षिक व 1 ते 26 ऑक्टोबरदरम्यान अंतिम परीक्षा होणार असून, मॉकटेस्टचाही अंतर्भाव असेल. परीक्षांचे निकाल लवकरात लवकर जाहीर व्हावेत, यासाठीही नियोजन करण्यात आले आहे. परीक्षा प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यात 90 ते 92 टक्के विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देणार असून, उर्वरित विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन परीक्षा घेतली जाईल. त्यासाठी स्वच्छता, सोशल डिस्टन्स आदी आवश्यक बाबींची काळजी घेतली जाईल. जिल्हा प्रशासनाने या प्रक्रियेसाठी संपूर्णत: सहकार्य करावे, असे निर्देश उच्च शिक्षण मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी जिल्हा प्रशासनाला दिले.

 

पालकमंत्री श्रीमती ठाकूर यावेळी म्हणाल्या की, कोरोना संकटकाळात प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी विद्यापीठाचे खूप सहकार्य मिळत आहे. विशेषत: विद्यापीठात लॅब स्थापित होऊन कोरोनाचे अहवाल वेळेत मिळायला सुरुवात झाली व प्रतिबंधात्मक उपाययोजनांना गती मिळाली. परीक्षा प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून संपूर्ण सहकार्य केले जाईल.

 

     ऑनलाईन सुविधा नसलेल्या विद्यार्थ्यांची माहिती त्यांच्या महाविद्यालयाकडून 22 तारखेपर्यंत संकलित करून 25 तारखेपर्यंत विद्यापीठाला कळविण्यात येणार आहे. त्यानंतर विद्यापीठाकडून ऑफलाईन परीक्षाही घेतली जाईल, असे विद्यापीठाचे परीक्षा विभागप्रमुख श्री. देशमुख यांनी यावेळी सांगितले. बैठकीनंतर मंत्री श्री. सामंत यांनी पत्रकार बांधवांशीही संवाद साधला.

 

00000

 

कोरोना विरुध्दच्या लढाईत ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिम महत्वाची - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 





कोरोना विरुध्दच्या लढाईत ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिम महत्वाची

-         पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

मास्क न लावणाऱ्यांना तीनशे रुपये दंड

कोरोना संक्रमण रोखण्यासाठी जिल्ह्यात व्यापक प्रमाणात जनजागृती करा

 

अमरावती, दि. 15 : कोरोनाविरुद्धच्या लढाईत स्वसंरक्षण हाच एक सोपा उपाय आहे. नागरिकांना स्वसंरक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” मोहिमेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. तसेच कोरोना विरुद्ध लढतांना घ्यावयाची काळजी याबाबत जिल्ह्यात दर्शनी बोर्ड, फ्लेक्स व हेल्थ लाईनच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात जनजागृती करावी, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत कोरोना आजारा संदर्भात सुरु असलेल्या उपाययोजनांचा आढावा त्यांनी घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या . विभागीय आयुक्त पियूष सिंह, विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मिना, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलीस आयुक्त आरती सिंग, पोलीस अधिक्षक हरीबालाजी एन. , मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिपक रणमले, मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, पीडीएमसीचे अधिष्ठाता डॉ. सोमवंशी आदी यावेळी उपस्थित होते.

            पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, राज्यात सर्वत्र आजपासून (15 सप्टेंबर) ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेतून प्रत्येक नागरिकांची कोरोना आजाराबाबत चौकशी, ताप व प्राणवायू पातळी तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यात दोन हजारावर आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्ह्यातील आठ लाख कुटुंबांची या आरोग्य पथकाकडून प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करण्यात येणार आहे. मोहिमेची पूर्वतयारी प्रशासनाकडून करण्यात आली आहे. कोरोनाच्या नियंत्रणासाठी प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांची साथ मिळणेही तेवढेच आवश्यक आहे. या पथकांव्दारे कोरोना विरुद्ध लढतांना घ्यायची काळजी याबाबतचे लोकशिक्षण व जनजागृती करण्यात येणार आहे. नागरिकांनीही घरी येणाऱ्या आरोग्य पथकांना कुठलीही माहिती न लपविता परिपूर्ण माहिती द्यावी व कोरोना नियंत्रणासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

            त्या पुढे म्हणाल्या की, कोरोनाच्या संकट काळात रुग्णांना उपचारासाठी आवश्यक तेव्हा ऑक्सिजनचा पुरवठा अखंडितपणे सुरू राहावा व कुठलीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा, विभागीय आणि राज्यस्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. द्रवरुप ऑक्सीजनचा तुटवडा भासू नये म्हणून नागपूर आणि भिलाई येथून दर दिवशी एक टँकर याप्रमाणे पुरवठा उपलब्ध होणार आहे. तश्याप्रकारचे जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे.

            शहर पाठोपाठ ग्रामीण भागात सुध्दा कोरोना संक्रमितांची संख्या वाढलेली आहे. ग्रामीण भागात संक्रमितांचा आकडा वाढू नये, यासाठी पंचायत समिती, नगरपालिका यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थांनी कोरोना विषाणूपासून बचावाच्या उपाययोजना संदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. गावात दर्शनी भागात डिस्प्ले बोर्डवर सूचना संदेश आदी लावण्यात यावेत. तालुका स्तरीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या क्षेत्रातील लोकांमध्ये कोरोना महामारी विषयी जनजागृती करावी.

            जिल्ह्यात कोरोना संक्रमित रुग्णांना तत्काळ उपचार मिळावा, यासाठी शासकीय आयटीआय संस्था तसेच जिल्हा क्रिडा संकुल येथे शंभर खाटांचे सर्व सोयीयुक्त आयसोलेशन सेंटर निर्माण करण्यात येणार आहे. कोरोनाच्या या संकट काळात मास्क लावणे हे एकच शस्त्र सध्यातरी अस्तित्वात आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:ची काळजी घेत मास्क लावण्याची सवय अंगीकारावी. जे व्यक्ती मास्क लावणार नाहीत त्यांच्याकडून तीनशे रुपयेचा दंड वसूल करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांनी दिले आहेत. यानंतरही लोकांमध्ये मास्क लावल्याचे आढळून न आल्यास दंडाची रक्कम वाढविण्यात येणार आहे, असेही श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.

            जिल्हाधिकारी श्री. नवाल म्हणाले की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच संक्रमितांची संख्या कमी करण्यासाठी जिल्ह्यात 15 सप्टेंबरपासून माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. मोहिमेचा पहिला टप्पा 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबरदरम्यान आणि दुसरा टप्पा 12 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर असा राहणार आहे.  एका महिन्याच्या कालावधीत दोनवेळा हे स्वयंसेवक  प्रत्येक कुटुंबाला भेटणार आहेत. प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचणे या मोहिमेमुळे शक्य होणार आहे. हाय रिस्क रूग्णांचा, तसेच संशयितांचा शोध घेणे व त्यांना योग्य उपचार मिळवून देणे या मोहिमेमुळे शक्य होणार आहे.

नागरिकांनी आपल्या घरी तपासणी व माहिती, सूचना आदींसाठी येणा-या स्वयंसेवकांना संपूर्ण सहकार्य करावे. कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांची साथ मिळणे आवश्यक आहे. कोरोनाचे संक्रमण थांबवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे कुठलीही माहिती लपवू नये. आरोग्य पथकाला सहकार्य करावे. सर्वांनी आपापली जबाबदारी ओळखून स्वच्छता, मास्कचा वापर, सोशल डिस्टन्स या त्रिसूत्रीचा अवलंब करावा व मोहिमेसाठी योगदान द्यावे, असे आवाहन श्री. नवाल यांनी यावेळी केले.

 

00000

 

Monday, September 14, 2020

 


जिल्ह्यात
 आजपासून ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम’

कोरोना नियंत्रणासाठी नागरिकांनीही साथ द्यावी

                -जिल्हाधिकारी शैलेश नवाल

 

 * आरोग्य पथके देणार घरोघर भेट

 * ताप व ऑक्सिजन लेव्हलची करणार तपासणी

 * संशयितांचा शोध; आरोग्य शिक्षणाचीही तरतूद

 

अमरावती,दि. 14 : कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यासाठी राज्यात आजपासून (15 सप्टेंबर) ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमे अंतर्गत जिल्ह्यातील सुमारे सात लाख कुटुंबांना आरोग्य पथके प्रत्यक्ष भेट देऊन सर्दी, खोकला, ताप व आक्सिजन लेव्हल आदी तपासणी करणार आहे. नागरिकांनीही कुटुंबांचे व इतरांचे आरोग्य जपण्यासाठी या मोहिमेत स्वयंस्फुर्तीने सहभाग घेऊन आरोग्य पथकांना माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.

            कोरोना प्रतिबंधासाठी शासन व प्रशासनाकडून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम राज्यात सर्वत्र 15 सप्टेंरपासून राबविण्यात येणार आहे.

या मोहिमेअंतर्गत आरोग्य विभागाने नियुक्त केलेले स्वयंसेवक शहरातील, तसेच जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत घरोघरी जाऊन लोकांची ताप आणि ऑक्सिजन लेव्हल तपासणी करणार आहेत. या कामासाठी आशा वर्कर व स्वयंसेवी संस्थेच्या दोन हजार व्यक्तींची नेमणूक केली आहे. एका चमूमध्ये आशा वर्कर व दोन स्वयंसेवक असे तीन व्यक्तींचा समावेश असणार.

मोहिमेची पूर्वतयारी प्रशासनाकडून करण्यात आली आहे. कोरोनाचे नियंत्रणासाठी प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांची साथ मिळणेही आवश्यक आहे. त्यामुळे सर्वांनी एकजुटीने कोरोनावर मात करू. या मोहिमेत नागरिकांनीही योगदान द्यावे. नागरिकांनीही स्वयंसेवकांना सहकार्य करून परिपूर्ण माहिती द्यावी व कोरोना नियंत्रणासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

लोकांना आरोग्य शिक्षण व महत्वाचे आरोग्य संदेश देणे, तसेच संशयित कोरोना रूग्णांचा शोध घेणे व त्यांना उपचारासाठी संदर्भ सेवा पुरविणे, तसेच मधुमेह, हृदयविकार, किडनीविकार, लठ्ठपणा व उपचारासाठी संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामुळे कोरोना रूग्णांच्या संपर्कात  आलेल्या संशयितांचा शोध घेऊन त्यांना वेळीच आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होणारआहे. ही मोहिम पहिल्या टप्प्यात 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबरदरम्यान आणि दुस-या टप्प्यात 12 ऑक्टोबर ते 24ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. एका महिन्याच्या कालावधीत दोनवेळा हे स्वयंसेवक प्रत्येक कुटुंबाला भेटणार आहेत.

 

प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचणे या मोहिमेमुळे शक्य होणार आहे. हाय रिस्क रूग्णांचा, तसेच संशयितांचा शोध घेणे व त्यांना योग्य उपचार मिळवून देणे या मोहिमेमुळे शक्य होणार आहे. नागरिकांनी आपल्या घरी तपासणी व माहिती, सूचना आदींसाठी येणा-या स्वयंसेवकांना संपूर्ण सहकार्य करावे. कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांची साथ मिळणे आवश्यक आहे. कोरोनाचे संक्रमण थांबवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे कुठलीही माहिती लपवू नये. आरोग्य पथकाला सहकार्य करावे. सर्वांनी आपापली जबाबदारी ओळखून स्वच्छता, मास्कचा वापर, सोशल डिस्टन्स या त्रिसूत्रीचा अवलंब करावा व मोहिमेसाठी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले.

0000

 

गरजू विद्यार्थ्यांना पालकमंत्र्यांकडून पुस्तकांचे वितरण

 





गरजू विद्यार्थ्यांना पालकमंत्र्यांकडून पुस्तकांचे वितरण

शासन गरजू व्यक्तींच्या पाठीशी खंबीरपणे उभे

- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 14 :  कोरोना महासंकटात गरजू विद्यार्थ्यांच्या पुस्तकांच्या मागणीची तातडीने दखल घेऊन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी या विद्यार्थ्यांना पुस्तके मिळवून दिली.

खारतळेगाव येथील विद्यार्थ्यांनी पुस्तकांची मागणी केली होती. या विद्यार्थ्यांनी दहावी व बारावीच्या परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवले मात्र, घरची बिकट परिस्थिती व कोरोना महासंकटामुळे निर्माण झालेल्या अडचणी यामुळे आर्थिक समस्या उभी राहिली. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी पुस्तके मिळवून देण्याची मागणी करणारे निवेदन या विद्यार्थ्यांनी दिले. पालकमंत्र्यांनी तातडीने या मागणीची दखल घेऊन या 25 विद्यार्थ्यांना पुस्तके मिळवून दिली.

अमरावतीच्या शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते या पुस्तकांचे वितरण विद्यार्थ्यांना करण्यात आले. जिल्हा परिषदेचे माजी सभापती जयंतराव देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

कोरोना संकटकाळात अनेक अडचणी येत असल्यातरी त्यावर मात करून पुढे जाण्याचा प्रयत्न होत आहे. गरीब व गरजू व्यक्तींसाठी शासनाकडून अनेक नवे निर्णय, उपक्रम राबवले जात आहेत. शासन वंचितांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी दिली.

या अडचणीच्या काळात पालकमंत्र्यांकडून पुस्तके मिळाल्यामुळे शिक्षणासाठी मोठी मदत झाली, आमच्या पालकांनाही समाधान वाटले, अशी प्रतिक्रिया यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

 

                                                00000

 

मतमोजणी UPDATE अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक विशेष (सायंकाळी ६.०० वा.)

 मतमोजणी UPDATE अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक विशेष (सायंकाळी ६.०० वा.) * पहिल्या पसंती क्रमाच्या मतगणनेची १ली फेरी पूर्ण झाली असून...