Sunday, July 25, 2021

उणे प्राधिकारपत्रावर रक्कम काढण्यासाठी मान्यता - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर


 

आपद्गग्रस्तांना विनाविलंब मदतीसाठी राज्य शासनाचा निर्णय

उणे प्राधिकारपत्रावर रक्कम काढण्यासाठी मान्यता

- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

 अमरावती, दि. 25 : नैसर्गिक आपत्तीत बाधित झालेल्या, मृत्यू पावलेल्या व जखमी झालेल्या नागरिकांना तातडीने मदत मिळावी यासाठी आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत रक्कम कोषागारातून उणे प्राधिकारपत्रावर काढण्यास आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे आपद्ग्रस्तांना विनाविलंब मदत मिळणार आहे, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज सांगितले.

            पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी गत आठवड्यात अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा करून नुकसानग्रस्त कुटुंबांनाही सांत्वनपर भेटी दिल्या व दौ-यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन उपाययोजनांचा आढावा घेतला नुकसानग्रस्त कुटुंबांना तत्काळ साह्य मिळवून देणे आवश्यक असते. मात्र, अचानक उद्भवणा-या नैसर्गिक आपत्तीत पंचनामे होऊन प्रस्ताव प्राप्त होऊन बाधितांना मदत वितरीत करण्यात बराच कालावधी जातो. अशावेळी तातडीने मदत करणे शक्य व्हावे प्रक्रियेत बदल करण्यासंबंधी पालकमंत्र्यांनी शासन स्तरावर पाठपुरावा केला. त्यानुसार नैसर्गिक आपत्तीत बाधित होणा-या, मृत्यू पावलेल्या व जखमी झालेल्या नागरिकांना, तसेच त्यांच्या वारसांना तातडीने मदत वाटप करणे शक्य व्हावे यासाठी जिल्हाधिका-यांना उणे प्राधिकारपत्रावर कोषागारातून रक्कम काढण्यास मान्यता देण्यात आली आहे.

            श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, नैसर्गिक आपत्ती अचानक उद्भवते. त्याचा अंदाज बांधणे कठीण असते. अशावेळी बाधितांना तातडीने मदत मिळणे गरजेचे असते. पंचनामे, प्रस्ताव आदी प्रक्रियेत काही निश्चित कालावधी द्यावाच लागतो. त्यामुळे बाधित, मृत्यू पावलेल्या व जखमी झालेल्या व्यक्ती किंवा त्यांच्या वारसांना मदत मिळण्यात विलंब होऊ नये यासाठी उणे प्राधिकारपत्रावर रक्कम काढण्यास परवानगी देणारा निर्णय शासनाने घेतला. या निर्णयामुळे बाधितांना तत्काळ मदत मिळणे शक्य होणार आहे. नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या बाधितांना आधार देणारी ही तरतूद आहे. राज्यात उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे बाधित व नुकसानग्रस्तांना यामुळे साह्य होणार आहे.

            जिल्ह्यातील बाधित, मृत्यू पावलेल्या व जखमी झालेल्या नागरिकांना या निर्णयानुसार तत्काळ मदत मिळवून देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

00000

ऊर्जा मंत्र्यांचे माजी राज्यपाल दादासाहेब गवई यांना अभिवादन

 




ऊर्जा मंत्र्यांचे माजी राज्यपाल दादासाहेब गवई यांना अभिवादन

अमरावती, दि. २५ : ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी माजी राज्यपाल रा. सू. उपाख्य दादासाहेब गवई यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज येथील निवासस्थानी भेट देऊन अभिवादन केले.

यावेळी डॉ. राजेंद्र गवई आणि त्यांचे कुटुंबिय तसेच महावितरणच्या मुख्य अभियंता सुचित्रा गुजर, अधिक्षक अभियंता दिलीप खानंदे आदी उपस्थित होते.

ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी काँग्रेसनगर येथील डॉ. राजेंद्र गवई यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांनी दादासाहेब गवई यांच्या प्रतिमेला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी गवई कुटुंबिय तसेच आप्त परिवार उपस्थित होता.

00000

शासन खंबीरपणे शेतकरी बांधवांच्या खंबीरपणे पाठीशी - कृषी मंत्री दादाजी भुसे

 












अमरावती जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधित भागाची कृषी मंत्र्यांकडून पाहणी

पंचनाम्याची प्रक्रिया गतीने पार पाडण्याचे निर्देश

शासन खंबीरपणे शेतकरी बांधवांच्या खंबीरपणे पाठीशी

-   कृषी मंत्री दादाजी भुसे

 

अमरावती, दि. 24 : अतिवृष्टी व पुरामुळे शेतीचे नुकसान झाले. तथापि, शेतकरी बांधवांनी खचून जाऊ नये. राज्य शासन खंबीरपणे शेतकरी बांधवांच्या खंबीरपणे पाठीशी आहे. महसूल, कृषी, ग्रामविकास विभागाच्या समन्वयातून  राज्यातील अतिवृष्टी नुकसानाबाबत पंचनाम्याची प्रक्रिया गतीने पार पाडून शेतकरी बांधवांना मदत मिळवून दिली जाईल, अशी ग्वाही राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे दिली.

कृषी मंत्र्यांनी आज जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागातील टाकरखेडा, रामा, साऊर, खारतळेगाव, वलगाव परिसरातील नुकसानग्रस्त शेतशिवाराची पाहणी केली व शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांची व्यथा जाणून घेतली. त्यानंतर याबाबतच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दर्यापूर येथील पंचायत समिती कार्यालयात बैठक झाली. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विठ्ठलराव चव्हाण, जि. प. सभापती बाळासाहेब हिंगणीकर, जिल्हाधिकारी पवनीत कौर, मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा, जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी विजय चवाळे यांच्यासह विविध उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यावेळी उपस्थित होते.

कृषी मंत्री श्री. भुसे म्हणाले की, ज्या ज्या भागात शेतीपिकांचे नुकसान झाले, तेथील पंचनामा प्रक्रियेला गती देण्यात आली आहे. कृषी, महसूल, ग्रामविकास विभागातर्फे राज्यभर संयुक्तपणे ही प्रक्रिया होत आहे. शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न होत आहेत. जिल्हा प्रशासनाने सविस्तर पंचनामे करून प्रस्ताव सादर करावेत. पुढील काळात दुबार पेरणीचे संकट टळण्यासाठी बियाण्यांबाबत विचार व संशोधन होत आहे. पेरणीपूर्वी राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे यंदा सोयाबीन बियाण्याची कमतरता जाणवली नाही. उगवणीच्या तक्रारीही कमी झाल्या.

नुकसानग्रस्त विमाधारकांनी तत्काळ माहिती कळवावी, विविध कार्यालयांना कक्ष स्थापण्याचे आदेश

पीक विमा योजनेत सहभागी शेतकरी बांधवांनी तत्काळ माहिती कंपनीला द्यावी. संपर्कात अडथळे येत असतील तर त्या पत्राच्या प्रती कृषी कार्यालय, तहसील कार्यालय व ज्या बँकेत विम्याचा हप्ता भरला, त्यांनाही उपलब्ध करून द्याव्यात. नुकसानग्रस्तांकडून अशी प्रत प्राप्त होताच ती विमा कंपनीपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी त्या त्या कार्यालयांची असेल. त्यासाठी या कार्यालयांनी पीक विमा मदत कक्ष स्थापन करावेत, असे निर्देश कृषी मंत्र्यांनी दिले.

 

             अमरावती जिल्ह्यात इफ्को टोकिया जनरल इन्शुरन्स कंपनी पीक विम्यासाठी नियुक्त असून, पीक विमा योजनेत 1 लाख 72 हजार 655 शेतकरी सहभागी आहेत. जिल्ह्यात 3 हजार 291 नुकसानग्रस्तांनी कंपनीकडे क्लेम केले. मात्र, अद्याप कंपनीने कार्यवाही केलेली नसल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत कार्यालयाची तपासणीही केली. मात्र, निकषांप्रमाणे कार्यालयही स्थापन झालेले नाही. त्यामुळे कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यासाठी विमा कंपनीने आठवडाभराच्या आत कार्यवाही करावी. शेतकऱ्यांची व्यथा जाणून संवेदनशीलतेने कामे करा. जे कुणी विमा कंपन्यांचे समर्थन करतील किंवा पाठीशी घालतील अशा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

दौऱ्यात कृषी मंत्र्यांनी खारतळेगाव येथील पुरात वाहून गेलेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना भेट देऊन त्यांचे सांत्वन केले. नैसर्गिक आपत्तीत बाधित नागरिकांना तातडीने मदत मिळण्यासाठी उणे प्राधिकारपत्रावर कोषागारातून रक्कम काढण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे आपद्ग्रस्त कुटुंबांना तातडीने मदत मिळवून दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

            जिल्ह्यात खरीपाचे 6.98 लाख हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. त्यातील 6.74 लाख क्षेत्रावर पेरणी झाली. जून ते जुलैदरम्यान जिल्ह्यात 392.50 मिमी (111.66) पाऊस झाला. 

 

00000

शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा - कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे सुस्पष्ट निर्देश.

 




कृषी मंत्र्यांकडून विमा कंपनी कार्यालयाची तपासणी

शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा

- कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे सुस्पष्ट निर्देश.

 

अमरावती, दि. २४ : पीक विमा मिळण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज करूनही विमा कंपनीकडून त्यावर कार्यवाही न झाल्याच्या तक्रारीची तातडीने दखल घेऊन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी थेट विमा कंपनीच्या कार्यालयात जाऊन तेथील व्यवस्थेची तपासणी केली. कंपनीच्या कार्यालयात निकषानुसार यंत्रणा व व्यवस्था आढळली नाही. या कंपनीविरुद्ध तत्काळ तक्रार दाखल करण्याचे निर्देश कृषी मंत्र्यांनी यावेळी दिले.

अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी कृषी मंत्री अमरावती जिल्हा दौऱ्यावर आहेत. अमरावती जिल्ह्यातून पीक विमा योजनेत सहभागी ३ हजार २९१ नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांनी विमा कंपनीकडे अर्ज केले. तथापि, इफकोटोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीकडून याबाबत कार्यवाही होत नसल्याची तक्रार प्राप्त होताच कृषी मंत्र्यांनी थेट स्वतः कार्यालयाची तपासणी करण्याचा निर्णय घेतला व जिल्हाधिकारी, तसेच इतर अधिकाऱ्यांसह कंपनीचे कार्यालय गाठले.

कंपनीच्या कार्यालयात  कामकाजासाठी आवश्यक यंत्रणा आढळून आली नाही. एका गोदामसदृश कक्षात कंपनीचे कार्यालय असल्याचे आढळले.कार्यालय व इतर यंत्रणाही सुस्थितीत नसल्याचे दिसून आले.शेतकरी बांधवांना विमा प्राप्त होण्यासाठी योग्य कार्यवाही होत नसल्याचे दिसून आले. प्रतिनिधीकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही . या कंपनीविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करण्याचे निर्देश कृषी मंत्री श्री. भुसे यांनी दिले. याबाबत त्यांनी कृषी सचिव एकनाथ डवले यांच्याशीही भ्रमणध्वनीवरून चर्चा करून निर्देश दिले.

कंपनीविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करावा. कंपनीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई करू, असा इशाराही मंत्री महोदयांनी दिला.जिल्हाधिकारी पवनीत कौर, मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा यांच्यासह कृषी अधिकारी उपस्थित होते.

 

०००

Saturday, July 24, 2021

अतिक्रमणे नियमानुकुल करून गरजूंना घरे मिळवून द्या - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर


 


रोहयो कामकाज, नांदगाव खंडेश्वर नप विकासकामे आदींचा पालकमंत्र्यांकडून आढावा
अतिक्रमणे नियमानुकुल करून गरजूंना घरे मिळवून द्या

-         पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 24: सर्वांसाठी घरे योजनेचा लाभ प्रत्येक गरजूला मिळवून देणे आवश्यक आहे. त्यासाठी अतिक्रमणे नियमानुकूल करणे, नियोजित घरकुलांना चालना देण्याची कामे गतीने पूर्ण करावी, असे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले

 

नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत, रोहयो विकासकामे व विविध विषयांचा आढावा पालकमंत्र्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत घेतला. आमदार बळवंतराव वानखेडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हाधिकारी पवनीत कौर, सहायक जिल्हाधिकारी मंदार पत्की, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यात पंड्या, उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, उपजिल्हाधिकारी राम लंके,उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, शिक्षणाधिकारी एजाज खान, मुख्याधिकारी गीता वंजारी उपस्थित होते.

            पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, नांदगाव खंडेश्वर येथे अग्निशमन दलासाठीचे वाहनासाठी  निधी देण्यात आला आहे. मात्र, अद्याप वाहन उपलब्ध झाले नाही. प्रशासकीय कार्यवाही गतीने पूर्ण करून ते तत्काळ उपलब्ध करून घ्यावी. शहरात स्वच्छता व आरोग्याच्या दृष्टीने योग्य नियोजन करावे. भाजी व फळ बाजारासाठी योग्य इमारत निर्मिती करण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

                                                ‘मनरेगा’तून अधिकाधिक कामे राबवा

            ग्रामीण स्तरावर मत्ता निर्माण करून शाश्वत विकास साधता यावा आणि गावातच रोजगार निर्मिती व्हावी यासाठी ‘मनरेगा’तून अधिकाधिक कामे राबविण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. मनरेगाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तालुकास्तरावर तालुका प्रमुखांनी नियोजन करावे. अकुशलमध्ये मिळणारा निधी मत्ता निर्मितीसाठी उपयोगात आणण्यासाठी कार्यवाही करावी.   चिखलदरा पंचायत समितीतील जैतादेही येथे या योजनेअंतर्गत शाळेचे व अंगणवाडी परिसरातील रस्ते व इतर विकास कामे पूर्ण करण्यात आली आहेत. अशी मूलभूत आणि आवश्यक ती कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश श्रीमती ठाकूर यांनी दिले.

                                    कार्यशाळा घेण्याचे निर्देश

मनरेगाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व कृषी, गावपातळीवरील आवश्यक कामे, वने आदी कामे होण्यासाठी लोकसहभागिता वाढविणेही गरजेचे आहे. त्यासाठी सरपंच, उपसरपंच, पंचायत समिती सभापती, बचत गट यांची तालुका स्तरीय कार्यशाळा घेण्यात यावी. नोंदणीकृत बांधकाम मजुरांना योजनांचा लाभ मिळवून द्यावा, तसेच नोंदणीचे काम गतीने राबविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

000



तिसरी लाट रोखण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 







           पालकमंत्र्यांकडून कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा

तिसरी लाट रोखण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक

- पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. २४ :  कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली तरी गाफील राहून चालणार नाही. तिसरी लाट रोखण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करावेत, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले. जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या.

आमदार बळवंतराव वानखडे, जिल्हाधिकारी पवनीत कौर, मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा, पोलीस आयुक्त आरती सिंह, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, सहायक जिल्हाधिकारी मंदार पत्की, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे आदी उपस्थित होते.पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, दुसरी लाट ओसरत असताना ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत तिथे नियंत्रण मिळवणे गरजेचे असून तिसरी लाट थोपविण्यासाठी वेगाने लसीकरण होणे महत्वाचे आहे.

          अठरा वर्षे आणि पंचेचाळीस वर्षे वयोगटातील नागरिकांना लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.ग्रामीण आणि शहरी रुग्णालयात बेड,ऑक्सिजनचा पुरवठा करणारी यंत्रणा तत्पर असावी. चांदुर बाजार, दर्यापूर, धरणी, तिवसा,  नांदगाव ,अंजनगाव सुर्जी, चिखलदरा, चुरणी येथे लवकरात लवकर खाटा व उपचार सुविधा वाढविण्यात याव्यात असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. येत्या पंधरवड्यात सर्व ठिकाणी सुसज्ज यंत्रणा उभारण्याचे निर्देश त्यांनी दिले. आरोग्य सेवा पुरविण्यासाठी देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाबाबत माहितीही त्यांनी घेतली.

०००

ऑक्सिजन पार्क अमरावती शहरासाठी भूषणावह - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 












ऑक्सिजन पार्कचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

रुक्ष जागेचे देखण्या उद्यानात रूपांतर; जैवविविधता संवर्धनाचा आदर्श

ऑक्सिजन पार्क अमरावती शहरासाठी भूषणावह

-  पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. २४ : युनायटेड नेशन्सने चालू दशक हे जैवविविधता संवर्धन दशक म्हणून घोषित केले आहे. शहरात डम्पिंग ग्राऊंड म्हणून वापरात असलेल्या रुक्ष जागेचे एका देखण्या उद्यानात रूपांतर हे जैवविविधता संवर्धनाचे आदर्श उदाहरण आहे. जैवविविधता जोपासणारा हा ऑक्सिजन पार्क अमरावती शहरासाठी भूषणावह ठरेल, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.

शहरातील ऑक्सिजन पार्कचे लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते आज सकाळी झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. खासदार नवनीत राणा, आमदार सुलभाताई खोडके, आमदार बळवंतराव वानखडे, आमदार किरण सरनाईक, माजी राज्यमंत्री सुनील देशमुख, जिल्हाधिकारी पवनीत कौर, मुख्य वनसंरक्षक जयोती बॅनर्जी, उपवनसंरक्षक चंद्रशेखरन बाला, सामाजिक वनसंरक्षक डी. पी. निकम, सहायक वनसंरक्षक ज्योती पवार आदी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, शहरातील पाच एकराचे वनक्षेत्र तिथे झाडे नसल्याने रुक्ष झाले होते. डम्पिंग ग्राऊंडसारखा त्याचा वापर होत होता. वनविभागाच्या माध्यमातून या रुक्ष जागेचे एका देखण्या उद्यानात रूपांतर झाले आहे. शहर सौंदर्यीकरण, प्रदूषण नियंत्रणाबरोबरच पर्यटकांसाठीही एक महत्वाचे आकर्षणस्थळ निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील विविध शहरे आणि गावांलगतच्या मोकळ्या वनजमिनींवर अशी वनोद्याने निर्माण करण्यासाठी वनविभागाने नियोजन करावे व अशा कामांना गती द्यावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

सावली व प्राणवायू देणा-या झाडांचे उपवन

ऑक्सिजन पार्कमध्ये वड, पिंपळ, निम व बिहाडा या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. ही झाडे उन्हाळ्यातही हरित राहून सावली, तसेच जास्तीत जास्त प्राणवायू देतात. ऑक्सिजन पार्कमध्ये बांबूचेही स्वतंत्र रोपवन तयार करण्यात आले असून, त्यातून जाणारी वाट व पूलाची निर्मिती करण्यात आली आहे. 

 

बालकांसाठी स्वतंत्र उद्यान

बाळगोपाळांसाठी स्वतंत्र उद्यानाची निर्मिती करण्यात आली असून, तिथे विविध खेळणीही उपलब्ध आहेत. पार्कच्या सर्व क्षेत्राचे निरीक्षण करता यावे यासाठी निरीक्षण मनोराही उभारण्यात आला आहे. कॅक्टसच्या विविध प्रजातींची लागवड करून कॅक्टस व रॉक गार्डनही उभारण्यात आले आहे.

वनजीवनाची माहिती देणारे फलक

वन्यप्राणी व पक्ष्यांची छायाचित्रे असलेले माहितीफलकही उद्यानात ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत.

00000


दुष्काळाच्या आव्हानात, आपली छोटी कृती करू शकते पाण्याची मोठी बचत! #दुष्काळ #पाणीबचत

  दुष्काळाच्या आव्हानात, आपली छोटी कृती करू शकते पाण्याची मोठी बचत! #दुष्काळ #पाणीबचत