Wednesday, October 27, 2021

दिवंगत नेते दादासाहेब गवई स्मारकासाठी निधी उपलब्ध करून द्यावा पालकमंत्र्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन

 


दिवंगत नेते दादासाहेब गवई स्मारकासाठी

निधी उपलब्ध करून द्यावा

पालकमंत्र्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन

 

            अमरावती, दि.27: दिवंगत नेते,  माजी राज्यपाल रा. सू. गवई यांच्या स्मारकाची  कामे पूर्णत्वास जाण्यासाठी आवश्यक निधी तत्काळ उपलब्ध करून द्यावा, असे निवेदन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांना दिले आहे.

या स्मारकाला तीन टप्प्यात निधी देण्याचा निर्णय यापूर्वी झाला आहे.  स्मारकाला आतापर्यंत केवळ 2 कोटी उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे स्मारकाच्या कामात खंड पडला आहे. तेव्हा या स्मारक उभारणीसाठी त्वरित निधी उपलब्ध करुन द्यावा, असे निवेदन पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकुर यांनी  उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नुकतेच दिले आहे. हा निधी मिळण्याबाबत उपमुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मकता दर्शवली आहे. त्यामुळे हे काम लवकरच गती घेईल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला. नेते राजेंद्र गवई यावेळी उपस्थित होते.

 दिवंगत दादासाहेब गवई यांचे राजकीय, सामाजिक पटलावरील कर्तृत्व हे देशपातळीवरील होते. भूमिहीनांचा सत्याग्रह,मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या चळवळीचे ते अग्रणी नेते होते.अमरावती जिल्ह्याचे लोकसभेत प्रतिनिधित्व तसेच, ते केरळ,बिहार आणि हिमाचल प्रदेशचे  राज्यपालही होते.त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाला साजेसे स्मारक व्हावे ही अमरावतीकरांची इच्छा लवकरच पूर्णत्वास येईल. त्यासाठी निधी मिळवून देण्याबाबत पाठपुरावा होत आहे व सकारात्मक कार्यवाही होत आहे. त्यानुसार लवकरच हे काम पूर्णत्वास जाईल, असा विश्वास  पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.

पूर्णाकृती पुतळा, सभागृहाचे नियोजन

            स्मारकात दादासाहेब गवई यांचा पुर्णाकृती पुतळा, जीवनपट दर्शविणारे स्मृती सभागृह, कॅफेटेरिया, दोनशे क्षमतेचे प्रेक्षागृह, आवारभिंत, प्रवेशद्वार, अंतर्गत रस्ते व सौंदर्यीकरण, वाहनतळ आदी कामे होणार आहेत. 

00000

Tuesday, October 26, 2021

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांची दानापूरला भेट गावात सलोखा निर्माण करण्याचे आवाहन








राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांची दानापूरला भेट

गावात सलोखा निर्माण करण्याचे आवाहन

अमरावती, दि. २६ : दानापूर गावात ग्रामस्थ बांधवांनी एकोपा व सलोखा निर्माण करावा, असे आवाहन राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांनी आज केले. या घटनेबाबत प्रशासनाने सर्व प्रक्रिया तत्काळ पूर्ण करून संबंधितांना न्याय मिळवून द्यावा. दोषींवर कारवाई व्हावी व गावात सलोखा निर्माण करण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करावेत, असे निर्देशही त्यांनी दिले.  

चांदूर रेल्वे तालुक्यातील दानापूर या गावी भेट देऊन श्री. पारधी यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी घटनास्थळी भेट देऊन अत्याचारपिडितांशी संवाद साधून त्यांची व्यथा जाणून घेतली. यावेळी त्यांनी ग्रामस्थ बांधवांनी सलोख्याने राहण्याचे आवाहन केले. पिडितांना नियमानुसार सर्वतोपरी मदत मिळवून देऊ, असेही ते यावेळी म्हणाले.

                                प्रशासनासोबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

दानापूर येथील भेटीनंतर अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य श्री. पारधी यांनी प्रशासनाची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन प्रशासनाकडून झालेल्या कार्यवाहीची माहिती घेतली. विभागीय आयुक्त पीयुष सिंह, जिल्हाधिकारी पवनीत कौर, विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना, जिल्हा पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ, उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, समाजकल्याण उपायुक्त सुनील वारे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते. याप्रकरणी पिडीतांना तत्काळ मदत मिळवून द्यावी व चौकशी प्रक्रिया गतीने पूर्ण करावी, असे आदेश श्री. पारधी यांनी दिले.

दानापूर गावात सामाजिक सलोखा निर्माण होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने प्रयत्न करावे. पिडीतांना न्याय मिळवून द्यावा. सामाजिक तेढ निर्माण करणा-यांवर कडक कारवाई करावी, असे निर्देशही त्यांनी दिले. या बैठकीनंतर श्री. पारधी यांनी पत्रकार बांधवांशीही संवाद साधला.

                डिसेंबरमध्ये पुन्हा आढावा घेणार

आयोगाचे सदस्य श्री. पारधी म्हणाले की, या घटनेबाबत दानापूर येथे जाऊन पिडित कुटुंब, तसेच गावकरी बांधवांशी संवाद साधला आहे. प्रशासनाने आतापर्यंत केलेल्या प्रक्रियेचा आढावा घेतला आहे. प्रशासनाकडून रस्त्याबाबत आलेल्या अर्जावर चार सुनावण्या झाल्या. त्यापैकी दोन सुनावण्यांना दोन्ही पक्ष उपस्थित होते. याविषयी लिखित जबाबाची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. 

दानापूर येथे सोयाबीन गंजी जाळल्याच्या तक्रारीनुसार याठिकाणी आपण जाऊन घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली आहे. पोलीसांकडून  दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे, तसेच त्याची चौकशी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्याबाबत समाजकल्याण विभागांतर्गत पिडितांना २ लाख रूपये अर्थसाह्य मंजूर करण्यात आले. त्याचा प्रथम हप्ता ५० हजार रूपये अदा करण्यात आला आहे.

या संपूर्ण प्रक्रियेचा आढावा आपण स्वत: डिसेंबरमध्ये घेणार आहोत, असे श्री. पारधी यांनी यावेळी सांगितले.

                        ०००    

Monday, October 25, 2021

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी सोहळा भजन संगीत प्रार्थनेद्वारे गुरूदेवभक्तांचे राष्ट्रसंतांना वंदन मंगलमय वातावरणात निनादले प्रार्थनेचे सूर

 








राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी सोहळा

भजन संगीत प्रार्थनेद्वारे गुरूदेवभक्तांचे राष्ट्रसंतांना वंदन

 

मंगलमय वातावरणात निनादले प्रार्थनेचे सूर

 

अमरावती, दि. 25 : गुरूकुंज मोझरी आश्रमाचा पावन परिसर, गुरुदेवभक्तांनी गायिलेली सुमधूर भजने, आसमंत निनादून सोडणारे प्रार्थनेचे सूर अशा मंगलमय वातावरणात मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा 53 वा पुण्यतिथी सोहळा पार पडला.

राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी यावेळी प्रार्थनेत सहभागी होऊन राष्ट्रसंतांना वंदन केले. आमदार बंटी भांगडिया, सुरेंद्र भुयार, पुष्पाताई बोंडे, आश्रमाचे सर्वाधिकारी प्रकाश वाघ, सचिव जनार्दन बोथे यांच्यासह अनेक गुरुदेवभक्त यावेळी उपस्थित होते. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर सोहळा न करता मर्यादित गुरूदेवभक्तांच्या उपस्थितीत पुरेशा दक्षतेसह प्रार्थना व वंदन कार्यक्रम झाला.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे समाधीस्थळाला वंदन केले. त्यानंतर आश्रमात आयोजित प्रार्थनेत सहभाग घेतला. राष्ट्रसंतांच्या अनेकविध रचनांसह विविध धर्मांच्या प्रार्थना यावेळी सादर करण्यात आल्या. भजन आणि प्रार्थनेच्या मंगलमय सूरांनी आसमंत निनादून गेले होते. समस्त गुरुदेवभक्त प्रार्थनेत तल्लीन होऊन गेले होते. जगावरील कोरोनासारखी अरिष्टे दूर होवोत, सर्वत्र शांतता व समृद्धी नांदो अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. परिसरातूनही अनेक गुरुदेवभक्त यावेळी उपस्थित होते.

000  

सिंचनाची कामे गतिने पूर्ण करावी - विशेष कार्यकारी अधिकारी विजयकुमार गौतम

                                                          




                                 







सिंचनाची कामे गतिने पूर्ण करावी

-                   विशेष कार्यकारी अधिकारी विजयकुमार गौतम

नागरी सुविधा प्राधान्याने सोडवाव्या

 

अमरावती, दि. 25 : अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील निम्म पेढी प्रकल्पा अंतर्गत भूसंपादनाची कार्यवाही आणि संयुक्त मोजणीची प्रक्रिया नियमानुसार पूर्ण करावी. तेथील नागरिकांच्या पुनर्वसनाबाबत येणाऱ्या समस्या जिल्हा परिषद, सिंचन विभाग व महसूल विभागाने समन्वयाने व नियोजनबद्ध पद्धतीने सोडवाव्या. पुनर्वसन झालेल्या नागरिकांना आवश्यक त्या सुविधा तात्काळ उपलब्ध करुन द्याव्या असे निर्देश विशेष कार्यकारी अधिकारी (जलसंपदा) विजयकुमार गौतम यांनी संबंधीत अधिकाऱ्याना दिले. विभागातील सिंचन प्रकल्पा अंतर्गत येणाऱ्या बाबींचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात आज बैठक आयोजीत करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.

विभागीय आयुक्त पियुष सिंह, अपर जिल्हाधिकारी रामदास सिंध्दभटी, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) नरेंद्र फुलझेले, मुख्य अभियंता रश्मी देशमुख, यवतमाळचे अपर जिल्हाधिकारी प्रकाश दुबे, अमरावती पुनर्वसन विभागाचे सुभाष दळवी, यवतमाळचे पुनवर्सन विभागाचे  अशोक बिबे, अकोला सिंचन विभागाचे अमोल वसुलकर, वाशिमचे कार्यकारी अभियंता रत्नदिप तायडे, , बुलडाणा भुसंपादन विभागाचे भुषण अहिरे, अमरावतीचे मुख्य अभियंता अभय पाठक, अनिल बहादुरे यांच्यासह  संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

बुलडाणा येथील जिगाव प्रकल्पाअंतर्गत 219 कुटूबिंयांचे पुनर्वसन गतिने पूर्ण करावे. येत्या 15 नोव्हेंबर पर्यंत त्याबाबतची पाहणी पुर्ण करुन  जिगाव, टाकळी, तपाळ, बेलाड येथील भुखंड वाटपाची कामे पुर्ण करावी.  ही सर्व प्रक्रिया टप्याटप्याने व उद्दिष्टासह पूर्ण करावी. येथील नागरी सुविधांच्या कामांना तातडीने प्रशासकीय मान्यता प्राप्त होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करावी. लोणार येथील वाटप झालेले भुखंड तात्काळ भूधारकांच्या नावे करण्यात यावे असे निर्देश श्री. गौतम यांनी दिले. खडकपूर्णा व पेनटाकळी  प्रकल्पाअंतर्गत विविध भुसंपादनाचे प्रस्ताव दाखल असून त्या क्षेत्राबाबत भूसंपादनाची कार्यवाही सुरु असल्याची माहीती संबंधितांनी दिली.

वाशिम जिल्हातील 11 बॅरेजेस येथील भुसंपदानची प्रक्रिया पूर्ण झाली असून महावितरणाने 5 हजार विज जोडण्या तात्काळ पूर्ण कराव्या. अकोला येथील कवठा बॅरेज प्रकल्पाचे काम पूर्ण झाले परंतु तेथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गामुळे सिंचनाच्या प्रक्रियेला अडथळा निर्माण होत असल्याची माहिती संबंधितानी दिली. यासाठीचा प्रस्ताव तयार करुन त्या बाबत पाठपुरावा करावा व  राष्ट्रीय महामार्गात येणाऱ्या या रस्त्याचे    गुणांकन करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी असे निर्देश श्री. गौतम यांनी दिले.

                                                       000000 

Sunday, October 24, 2021

विदर्भात रस्त्यांचे भक्कम जाळे; महत्वाची शहरे नागपूरशी मेट्रोने जोडणार - केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी

















१९४५ कोटी निधीतून २५५ किमी महामार्ग

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण

श्रीक्षेत्र बहिरम येथे १ किलोमीटर दुतर्फा सेवा रस्त्यासाठी ३५ कोटी, मोझरी येथे वळण रस्त्यासाठी ११५ कोटी

विदर्भात रस्त्यांचे भक्कम जाळे; महत्वाची शहरे नागपूरशी मेट्रोने जोडणार

- केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी

 

अमरावती, दि. २४ :  श्रीक्षेत्र बहिरम येथे १ किलोमीटर दुतर्फा सेवा रस्त्यासाठी ३५ कोटी, मोझरी येथे वळण रस्त्यासाठी ११५ कोटी निधीबरोबरच मोर्शी, वरूड, चांदूर बाजार येथील बायपास मार्गासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची महत्वपूर्ण घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केली. मेळघाटातील नियोजित रस्तेविकासाचे काम पूर्ण होण्यासाठी व वनविभागाच्या परवानगी आदी प्रलंबित प्रकिया पूर्ण होण्यासाठी आपण स्वतः पाठपुरावा करू, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

१९४५ कोटी निधीतून जिल्ह्यातून जाणाऱ्या २५५ किमी महामार्ग प्रकल्पाचे लोकार्पण व भूमीपूजन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर, खासदार रामदास तडस, खासदार नवनीत राणा, माजी राज्यमंत्री तथा आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार डॉ. रणजीत पाटील, आमदार सुलभाताई खोडके, आमदार रवी राणा, आमदार बळवंतराव वानखडे, आमदार दादाराव केचे, आमदार किरण सरनाईक, आमदार प्रताप अडसड, आमदार रामदास आंबटकर, महापौर चेतन गावंडे आदी उपस्थित होते.

४६४ कोटी निधीतून काटोल- वरुड राष्ट्रीय महामार्ग ४०.४७ किमी काँक्रिट रस्ता दुपदरीकरण,२६४ कोटी निधीतून तळेगाव- गोणापूर रा. म. ४३.४० किमी काँक्रिट रस्ता दुपदरीकरण, ३८६ कोटीतून नांदगावपेठ मोर्शी ४३ किमी काँक्रिट रस्ता दुपदरीकरण, ४७२ कोटीतून मोर्शी वरुड पांढुरणा ५२.३९ किमी काँक्रिट रस्ता दुपदरीकरण, २६६ कोटी निधीतून अंजनगाव परतवाडा बैतुल ४१.३६ किमी काँक्रिट रस्ता दुपदरीकरण आदी कामांचे लोकार्पण यावेळी केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांच्या हस्ते झाले.

त्याचप्रमाणे, ४४.४० कोटींतून अमरावती येथील एनएच ५३ वर वाय जंक्शनवर उड्डाण पूल, ४.९४ कोटी निधीतून रा. मा. क्र. ६ ते तळेगाव ठाकूर ब्राम्हणवाडा रस्त्यावरील पिंगळाई नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम व ४.८६ कोटीतून अमरावती बडनेरा रस्ता सुधारणा, ४.९४ कोटींतून महामार्गाला जोडणाऱ्या रहिमापूर वडनेर गंगाई रस्त्यावर पूल, १९.५५ कोटींतून प्ररामा-१२ ला जोडणारा धानोरा गुरव वाढोणा रस्त्याची सुधारणा, १३.९० कोटींतून रा. मा. क्र. ६ ला जोडणाऱ्या चांदुर बाजार ते सर्जापूर रस्त्यापर्यंत सुधारणा आदी कामांचे भूमीपूजन यावेळी केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते झाले.

 

 

अकोला ते अमरावती रस्त्याचे काम येत्या दीड वर्षात पूर्ण होईल, असे सांगून केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणाले की, पुढील काळात मिनी मेट्रोद्वारे विदर्भातील शहरे जोडण्याचे नियोजन आहे. नागपूर येथून वडसा, बडनेरा, यवतमाळ,रामटेक, चंद्रपूर, वर्धा अशा शहरांना मिनी मेट्रोद्वारे जोडण्याचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. आठ डब्यांच्या या मेट्रोत अत्याधुनिक सेवा उपलब्ध असतील. त्यातील इकॉनॉमी श्रेणी डब्याचे प्रवास दर बस प्रवासाइतके माफक असतील. या प्रकल्पासाठी उद्योजकांनी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले. विदर्भात अनेक रस्त्यांच्या  कामांना चालना देण्यात आली आहे. नागपूर, काटोल, मोर्शी, अचलपूर, अकोट, शेगाव अशी अनेक उत्तम रस्त्यांनी शहरे जोडली जाणार आहेत.

ते पुढे म्हणाले की, रस्तेविकास करताना ब्रिज कम बंधारा पूर्ण करण्यात येत आहे. त्यामुळे सिंचनासाठी स्थानिक स्तरावर पाणी उपलब्ध होणार आहे. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला या कामाचा फायदा झाला आहे. विदर्भाची सर्वात मोठी समस्या सिंचनाची आहे. त्यामुळे सिंचन वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न व्हावेत.

            ते पुढे म्हणाले की, शेतकरी हा अन्नदाता आहे. तो ऊर्जादाता झाला पाहिजे. अपारंपरिक ऊर्जानिर्मितीला चालना मिळावी. इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या उपलब्ध आहेत.त्यांचा वापर वाढावा. इथेनॉलचे पंप सुरू व्हावेत. त्यामुळे इंधनाचा एक सशक्त व परवडणारा पर्याय उभा राहील. जिल्ह्यातील संत्रा निर्यातीला चालना मिळण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. येथील कापड व संत्रा निर्यातीसाठी वर्धा येथील ड्राय पोर्ट उपयुक्त ठरेल, असेही ते म्हणाले.

श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांच्यामुळे जिल्ह्यात, विदर्भात अनेक मोठ्या कामांना चालना मिळाली. मार्ग क्र. ४७ हा राष्ट्रीय महामार्ग व्हावा, तसेच जिल्ह्यातील केंद्र शासनाच्या पातळीवरील प्रलंबित बाबी पूर्ण होण्यासाठी सहकार्य व्हावे, असे निवेदन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.

 

०००

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

गरीबांना उत्तम आरोग्य सुविधा मिळण्यासाठी चॅरिटेबल ट्रस्टच्या रुग्णालयांनी पुढाकार घ्यावा - केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी

 


















'पीडीएमसी'त प्राणवायू निर्मिती प्रकल्पाचा शुभारंभ

गरीबांना उत्तम आरोग्य सुविधा मिळण्यासाठी चॅरिटेबल ट्रस्टच्या

रुग्णालयांनी पुढाकार घ्यावा

- केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी

 

अमरावती, दि. २४ : येणाऱ्या काळात आरोग्य हेच सर्वोच्च प्राधान्य मानून उत्तम उपचार सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. चॅरिटेबल ट्रस्टच्या रुग्णालयात कमी दरात उपचार उपलब्ध असतात व गरीब रुग्णांना त्याचा लाभ मिळतो. त्यामुळे अशा रुग्णालयात प्रगत व अद्ययावत उपचार यंत्रणा उपलब्ध होण्यासाठी अशा संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले.

                श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात नागपूर येथील मैत्री संस्थेच्या सहकार्याने ५ कोटी रुपये निधीतून प्राणवायू निर्मिती प्रकल्पाचा शुभारंभ केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री श्री. गडकरी यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर, खासदार नवनीत राणा, माजी राज्यमंत्री तथा आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार सुलभाताई खोडके, आमदार बळवंतराव वानखडे, आमदार प्रताप अडसड, आमदार किरण सरनाईक, आमदार दादाराव केचे, महापौर चेतन गावंडे आदी यावेळी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणाले की, कोविडकाळात प्राणवायूचा व अनेक साधनांचा तुटवडा भासत होता.विदर्भात तर एअर टू ऑक्सिजनची यंत्रणा जवळजवळ नव्हती. गंभीर स्थिती होती. त्यामुळे विविध संस्थांच्या मदतीने शक्य तिथे उपचार सुविधा व साधने मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मैत्री संस्थेच्या माध्यमातून विविध ठिकाणी प्राणवायू प्रकल्प देण्याचे ठरवले. पीडीएमसी रुग्णालयात या प्रकल्पामुळे रोज

६८५ जंबो सिलेंडर ऑक्सिजन निर्माण होणार आहे. याद्वारे रुग्णालयाची गरज पूर्ण होऊन इतर ठिकाणी पुरवठा करणे शक्य होणार आहे. उपचार, ऑक्सिजन, पैसे या अभावी कुणाचे प्राण जाऊ नयेत, अशी प्रभावी अद्ययावत व सक्षम आरोग्य यंत्रणा सार्वजनिक सेवेतील आरोग्य संस्थांनी निर्माण करावी, असे आवाहन त्यांनी केले.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, कोरोनाकाळात लॉकडाऊन ही अपरिहार्यता होती. या निर्णयाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पाठिंबा दिला. या काळात रुग्णसेवेसाठी प्रशासनाच्या प्रयत्नांना श्री शिवाजी शिक्षण संस्था, 'पीडीएमसी'ची मोलाची साथ मिळाली. केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी मोलाची मदत केली. यापुढेही पीडीएमसी व सुपर स्पेशालिटी रुग्णालयात अत्याधुनिक यंत्रणेसाठी, तसेच कौंडण्यपूर ते पंढरपूर पालखी मार्ग व इतर रस्त्यासाठी केंद्रातर्फे सहाय्य मिळावे, अशी विनंतीही त्यांनी केली.

श्री. देशमुख म्हणाले की, श्री. गडकरी यांच्या पुढाकाराने हा प्रकल्प उभा राहत आहे. पीडीएमसी रुग्णालयाला कर्करोग उपचार यंत्रणा व एमआयआर यंत्रणेसाठी मदत मिळवून द्यावी, अशी विनंती  त्यांनी यावेळी केली. खासदार श्रीमती राणा, आमदार श्रीमती खोडके, महापौर श्री. गावंडे यांनी मनोगत व्यक्त केले.

 

000000

‘एक हात मदतीचा’ कुटुंबांना धीर देणारा ठरेल - महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

 

 













‘एक हात मदतीचा
’

कुटुंबांना धीर देणारा ठरेल

                                                          -महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

 

अमरावती, दि. 24 : कोविडच्या दुसऱ्या लाटेमध्ये घरातील प्रमुख गमाविलेल्या वंचित परिवारातील महिला व बालकांना ‘एक हात मदतीचा’ हा कार्यक्रम आर्थिक मदतीसह आपण एकटे नाहीत या भावनेमुळे धीर देणारा ठरेल, असा विश्वास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज येथे व्यक्त केला.

महिला आर्थिक विकास महामंडळ, रामचंद्र युवक कल्याण संस्था, मोझरी, सह्याद्री फाऊंडेशन स्वयंसेवी संस्था, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक हात मदतीचा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याअंतर्गत कोविडच्या दुसऱ्या लाटेमध्ये घरातील प्रमुख तसेच कमावती व्यक्ती गमावलेल्या वंचित परिवारातील महिला व बालकांना नवव्यवसाय तसेच उदनिर्वाहासाठी नविन सुरवात व्हावी यासाठी आर्थिक मदत म्हणून प्रत्येक कुटुंबाला तीस हजार रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकुर यांच्या प्रमुख उपस्थितीसह आमदार बळवंत वानखेडे, जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख, नगर सेवक विलास इंगोले, सह्याद्री फाऊंडेशनचे विजय क्षीरसागर, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे तसेच माजी आमदार विरेंद्र जगताप, नरेशचंद्र ठाकरे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुधाकर भारसागडे आदी यावेळी उपस्थित होते.

एक हात मदतीचा हा भावनिक असल्याचे सांगून महसूलमंत्री श्री थोरात म्हणाले की, कोविडच्या लाटेमध्ये घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे अनेक कुटुंबांचा आधार गेला. कोविडची पहिली लाट ओसरत असतांनाच अमरावती शहरातून दुसऱ्या लाटेची सुरवात झाली. अश्यावेळी आरोग्य, पोलीस, महसूल विभाग  तसेच आशा वर्कर्स व अन्य शासकीय विभाग आणि स्वयंसेवी संस्थांनी शर्तीचे प्रयत्न केले. यातून दुसऱ्या लाटेला परतून लावण्यासाठी अमरावतीकरांचे प्रयत्न यशस्वी ठरले. तरीदेखील ज्या कुटुंबातील कर्त्या व्यक्तींचे निधन झाले आहेत त्यांच्यासाठी एक हात मदतीच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून नविन सुरवात करण्यासाठी  निश्चितच मदत होईल. कोविडचे संकट कमी झाले असले तरी अजूनही टळले नाही यासाठी प्रत्येकाने कोविड मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे गरजेचे असल्याचे ते यावेळी म्हणाले.

महिला व बाल विकासामार्फत कोविडमुळे दोन्ही पालक गमावलेल्या पाल्यांचा सांभाळ करणाऱ्या नातेवाईकांना दर महिन्याला आर्थिक मदत पुरविली जाते. एक हात मदतीचा या कार्यक्रमांतर्गत अमरावती जिल्ह्यातील चौदा तालुक्यातील 192 कुटुंबांना 57 लाख 60 हजार रुपयांची मदत करण्यात येत आहे. तसेच येथील स्वयंसेवी संस्था देखील या कार्यात पुढाकार घेत असल्याचे समाधान श्री थोरात यांनी यावेळी व्यक्त केले.

स्वत:ला खंबीर बनवा, असा संदेश देत श्रीमती ठाकुर म्हणाल्या घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे कुटुंबातील महिलांची जाबाबदारी दुहेरी झाली आहे. अश्यावेळी स्त्रीयांनी खंबीर होणे गरजेचे आहे. स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न करा. स्वत:च्या आर्थिक निर्णयाच्या बाबतीत सक्षम व्हा. कुणावर विसंबून न राहता स्वत:ला सिध्द करा. अशांच्या पाठीशी प्रसासन तसेच पालकमंत्री या नात्याने मी सदैव पाठबळ देत राहील असा खंबीर विश्वास त्यांनी यावेळी दिला.

प्रातिनिधीक स्वरुपात यावेळी महिलांना धनादेशाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनिल सोसे यांनी तर संचालन प्रिती गवई यांनी केले.

                                                          0000000

DIO NEWS AMRAVATI 26.10.2026

  दुष्काळात शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक केल्यास फायनान्स कंपन्यांवर फौजदारी कारवाई होणार- निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे       अमरावती, दि...