Wednesday, July 26, 2023

जिल्हा दक्षता समितीची बैठक संपन्न

 

जिल्हा दक्षता समितीची बैठक संपन्न

    अमरावती , दि. 26: अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ अंतर्गत जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची सभा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नुकतीच संपन्न झाली. यावेळी शहरी व ग्रामीण विभागात अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यातंर्गत घडलेले गुन्हे तसेच प्रलंबित गुन्ह्यांबाबत चर्चा करण्यात आली.

      निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विवेक घोडके, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा(शहर) राहुल आठवले, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा (ग्रामीण) किरण वानखडे, सहायक आयुक्त समाज कल्याण माया केदार, पोलीस निरीक्षक प्रमोद पाचकवळे, शासकीय अभियोक्ता गजानन खिल्लारे संबंधित पदाधिकारी यावेळी उपस्थित होते .

 दक्षता समितीच्या बैठकीमध्ये माहे जून 2023 पर्यंतच्या प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा आढावा घेण्यात आला . तसेच माहे जुनमध्ये एकुण 15 प्रकरणे दाखल झाली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. न्यायालयात प्रलंबित प्रकरणे, अर्थसहाय्यासाठी प्रलंबित प्रकरणे तसेच जिल्हा दक्षता समितीवर अशासकीय सदस्य घेण्याबाबतचा आढावा  यावेळी घेण्यात आला.

    डॉ. घोडके यांनी प्रलंबित प्रकरणांचा लवकरात लवकर तपास पूर्ण करून दोषारोप न्यायालयात दाखल करण्याबाबत संबंधितांना सूचना दिली. तसेच निधी अभावी प्रलंबित प्रकरणांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करण्याबाबत निर्देश दिले.

 

000000

एपीएल कार्डधारकांनी प्रतिमहा रोख रक्कम योजनेचा लाभ घ्यावा

 

एपीएल कार्डधारकांनी प्रतिमहा रोख रक्कम योजनेचा लाभ घ्यावा

अमरावती, दि. 26 : अमरावती जिल्ह्यातील 3 हजार 862 शेतकरी एपीएल कार्डधारक असून त्यांची एकूण संख्या 16 हजार 268 आहे. या सर्व शेतकरी एपीएल कार्डधारकांना शासन निर्णय दि. 28 फेब्रुवारी 2023 नुसार अन्नधान्याऐवजी प्रतिमहा प्रतिलाभार्थी 150 रुपये इतक्या रोख रकमेच्या थेट हस्तांतरणासाठी (डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफर-डीबीटी) योजना कार्यान्वित झालेली आहे. असे असताना अमरावती शहरात सदर योजनेसाठी अल्प प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.

राज्यातील औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी)  शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना माहे जानेवारी, 2023 पासून अन्नधान्याऐवजी प्रतिमाह प्रति लाभार्थी 150 रुपये इतक्या रोख रकमेच्या थेट हस्तांतरणाची (डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफर-डीबीटी) योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. तसेच प्रतिवर्षी किमान आधारभूत किंमतीत होणाऱ्या वाढीनुसार केंद्र शासनाच्या तरतुदीनुसार प्रतिमाह प्रतिलाभार्थी सुधारित वाढीव रोख रक्कम थेट हस्तांतरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

शहरातील सर्व एपीएल कार्ड धारकांना आवाहन करण्यात येते की, या योजनेत समाविष्ट होण्यासाठी अर्ज, राशनकार्ड झेरॉक्स, सात बारा उतारा, कुटुंबातील सदस्यांच्या बँक पासबुकची झेरॉक्स व आधारकार्डसह अर्ज अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे दाखल करावा. जेणेकरुन शासन निर्णयाप्रमाणे देय रक्कम कार्डधारकांच्या खात्यात जमा करता येईल, असे आवाहन अन्नधान्य वितरण अधिकारी उमेश खोडके यांनी केले आहे.

00000

चिखलदरा ते आमझरी रस्ता पुर्ववत सुरु






 चिखलदरा ते आमझरी रस्ता पुर्ववत सुरु

अमरावती, दि. 26 :  मंगळवार, दि. 25 जुलै 2023 रोजी रात्रीच्यावेळी आलेल्या जोरदार पावसामुळे चिखलदरा तालुक्यातील चिखलदरा ते आमझरी रस्त्यावरील दरड कोसळून तात्पुरता रस्ता बंद झाला होता. सकाळी सार्वजनिक बांधकाम चिखलदरा येथील यंत्रणेमार्फत दोन जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावरील मलबा हटविण्याचे काम तातडीने करण्यात आले असून सकाळी 11.30 वाजता पासून वाहतूक सुरळीतपणे पुर्ववत सुरु झालेली आहे, अशी माहिती चिखलदरा तहसीलदार गजानन राजगडे यांनी दिली आहे.  

***

Tuesday, July 25, 2023

स्वातंत्र्य दिनाचा मुख्य ध्वजारोहण सोहळा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा

 





स्वातंत्र्य दिनाचा मुख्य ध्वजारोहण सोहळा

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समन्वयाने काम करावे

- जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 

अमरावती, दि. 25 :  भारतीय स्वातंत्र्याचा 76 वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय समारंभ दि. 15 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 9.05 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय येथे होणार आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज येथे दिले. या विषयी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

पोलीस अधीक्षक (ग्रामीण) अविनाश बारगळ, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विवेक घोडके, पोलीस उपायुक्त सागर पाटील, मनपा सहायक आयुक्त भूषण पुसदकर, तहसीलदार संतोष काकडे, पोलीस निरीक्षक अर्जून ठोसरे, शिक्षण उपसंचालक एस.एस. काळुसे, क्रीडा विभागाने एस.पी. विघ्ने, महावितरण कार्यकारी अभियंता आनंद काटकर, जिल्हा परिषदेचे सहायक शिक्षक गजानन देशमुख, नायब तहसीलदार अरविंद माळवे, समन्वयक रमेश जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे तुषार काळे, शिक्षण विभागाचे बुध्दभूषण सोनोने, प्रिया देशमुख यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

श्री. कटियार म्हणाले की, अधिकाधिक लोकांना मुख्य शासकीय समारंभात सहभागी होता यावे यासाठी दि. 15 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 8.35 ते 9.35 यावेळेत इतर कार्यालय, संस्थांनी ध्वजारोहण किंवा शासकीय अथवा निमशासकीय समारंभ आयोजित करु नये.  असे समारंभ सकाळी 8.35 च्या पूर्वी किंवा सकाळी 9.35 च्या नंतर आयोजित करावे. कार्यक्रमात राष्ट्रगीतानंतर ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे राष्ट्रगीत बँड पथकाव्दारे सादर करण्यात येईल.

महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी संयुक्तपणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोरील साफसफाई आपल्या विभागामार्फत करावी. तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, लि. अमरावती यांनी कार्यक्रमस्थळी वीज पुरवठा खंडीत होणार नाही, याची दक्षता घ्यावी. कार्यक्रमाच्यावेळी ध्वजाला मानवंदना देण्यासाठी पोलीस पथक, बँड पथक तसेच ध्वजारोहणाची रंगीत तालीम घ्यावी. राष्ट्रध्वज सूर्यास्तास उतरवला जाईल, याची दक्षता समितीने घ्यावी. तसेच कार्यक्रमस्थळी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलीस विभागाने व्यवस्था करावी.

स्वातंत्र्यदिनाचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपल्यानंतर सर्व विभागीय कार्यालय, शिक्षण संस्था, महाविद्यालय, शाळा तसेच सेवाभावी संस्था, क्रीडा मंडळ यांनी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम करावा. त्यासाठी लागणारी रोपे सामाजिक वनीकरण विभाग, अमरावती यांनी पुरवावी. तसेच अतिथी व उपस्थितांची बैठक व्यवस्था, आवश्यक स्वयंसेवक, ध्वनीयंत्रणा आदी व्यवस्था काटेकोर असावी, अशा सूचना श्री. कटियार यांनी यावेळी दिल्या.

00000

Monday, July 24, 2023

शहरात कलम 37 (1) व (3) लागू

 शहरात  कलम 37 (1)  व (3) लागू

            अमरावती, दि. 24:  शहरात शांतता  व  सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस आयुक्त  (अमरावती शहर) यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

             सदर प्रतिबंधात्मक आदेश शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा, याकरिता अमरावती पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात दि. 26 जुलैपासून लागू करण्यात आला असून दि. 9 ऑगस्ट 2023 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस आयुक्त (अमरावती शहर)  नविनचंद्र रेड्डी  यांनी कळविले आहे.

0000

अमरावतीचे नवीन जिल्हाधिकारी सौरभ कटियार रुजू पारदर्शक व गतिमान प्रशासनावर भर

 




अमरावतीचे नवीन जिल्हाधिकारी सौरभ कटियार रुजू

पारदर्शक व गतिमान प्रशासनावर भर

-        सौरभ कटियार

 

अमरावती, दि. 24 :  अमरावतीचे नवे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आपल्या पदाचा कार्यभार यापूर्वीच्या जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्याकडून आज स्वीकारला. जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्ती, पुनर्वसन, कुपोषण आदी समस्या सोडविण्यासाठी योजनांना गती देतानाच पारदर्शक व गतिमान प्रशासनावर भर देऊ, असे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज येथे सांगितले.

 

श्री. कटियार हे मूळ लखनऊ येथील आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून 2016 मध्ये आय.ए.एस. सेवेत त्यांची निवड झाली. त्यांनी कानपूर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून बी.टेक. तसेच एम.टेक केले. सोबतच आय.ए.एस. ची तयारी केली. निवड झाल्यानंतर त्यांची प्रथम नियुक्ती पालघर जिल्ह्यात डहाणू येथे एकात्मिक आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी व सहायक जिल्हाधिकारी म्हणून झाली. त्यानंतर त्यांनी अकोला येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले. अमरावती येथील जिल्हाधिकारी या पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पत्रकार बांधवांशी संवाद साधला.

 

शासकीय योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहचविणार

 

अमरावती जिल्हा विभागाचे मुख्यालय आहे. येथे काम करण्याची संधी मिळाली. शासनाने प्राधान्यक्रम दिलेल्या बाबींवर प्रशासन काम करेल. शासकीय योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहचविण्यासाठी प्रशासनासह लोकप्रतिनीधी, सामाजिक संस्था तसेच प्रसार माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे. जिल्ह्यात शासकीय योजनांची अंमलबजावणीला पूर्व जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी गती दिली. हा कार्यक्रम या पुढेही भरीवपणे राबविणार. निवडणूक काळामध्ये निवडणूक मार्गदर्शक तत्त्वानुसार काम चालेल.    जिल्ह्यातील विविध प्रश्न व समस्यांबाबत निर्णय व अंमलबजावणीसाठी लवकरच उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, विभाग प्रमुख आदींच्या बैठका घेण्यात येतील. त्याप्रमाणे, जिल्ह्यात आवश्यक त्या सर्व ठिकाणी भेटी देऊ, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

 

कुपोषण निर्मुलनासाठी विशेष मोहीम

 

          मेळघाटात कुपोषण निर्मुलनासाठी आरोग्य व पोषण योजनांच्या अंमलबजावणीला गती देण्यात येईल. त्याचप्रमाणे वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देत असतानाच तेथील स्थानिकांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, या हेतूने व्यापक जनजागृतीसाठी प्रशासन, सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने मोहीम हाती घेऊ. शासकीय योजनांच्या प्रसिद्धीसाठी प्रसार माध्यमांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.पालघरमध्ये यापूर्वी  आदिवासी क्षेत्रात काम केले आहे. त्या अनुभाचा फायदा होईल, असेही ते यावेळी म्हणाले. 

 

          स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळविण्यासाठी परिश्रमाला पर्याय नाही.  स्वयः अध्ययन, सातत्यपूर्ण प्रयत्न, मेहनत यामुळे स्पर्धा परीक्षेत यश मिळविता येते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवावे, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला .

 

00000

Thursday, July 20, 2023

शिकस्त शाळा, इमारतीच्या तक्रांरीसाठी नियंत्रण कक्ष स्थापन

 


 शिकस्त शाळा, इमारतीच्या तक्रारींसाठी नियंत्रण कक्ष स्थापन

 

     अमरावती दि. 20 : सद्यस्थितीत जिल्‍ह्यामध्‍ये हलका ते मध्‍यम स्‍वरुपाचा पाऊस सुरु आहे. पुढील काही दिवसांमध्‍ये जिल्‍ह्यामध्‍ये जोरदार अतिवृष्‍टी होण्‍याबाबत हवामान विभागाद्वारे अंदाज व्‍यक्‍त करण्‍यात आलेला आहे. जिल्‍हा परिषद अंतर्गत शिकस्‍त शाळा, धोकादायक इमारती संदर्भात जिल्‍हा व तालुकास्‍तरीय संबंधित अधिकारी यांना यापूर्वीच अशा शाळा खोल्‍या व इमारतींचे निरिक्षण व पाहणी करुन नियमानुसार निर्लेखित करण्‍याबाबत प्रशासकीय स्‍तरावरुन कार्यवाही सुरु आहे. 

 

     अशा शाळा खोल्‍या, इमारतींमधील विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी यांची इतर सुरक्षित इमारतींमध्‍ये पर्यायी व्‍यवस्‍था उपाययोजना करण्‍यात आलेली आहे. कोणत्‍याही परिस्थितीमध्‍ये धोकादायक शाळा खोल्‍या व इमारतींमध्‍ये विद्यार्थ्‍यांना ब‍सविल्‍या जात नसल्‍याची खात्री करण्‍यात आली आहे. नागरिकांची काही तक्रार, सूचना असल्‍यास याबाबत जिल्हा स्तरावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अध्‍यक्षतेखाली एक ‘नियंत्रण कक्ष’ स्थापन करण्यात आलेला आहे. यामध्ये धोकादायक शाळा, इमारत बाबत काही सूचना असल्यास किंवा मदतीची गरज असल्यास नागरिकांनी 0721-2666261 किंवा 0721-2662926 या दूरध्वनीवर संपर्क करण्‍याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.

 

00000

 

 

 

 

 

 

 

DIO NEWS AMRAVATI 26.10.2026

  दुष्काळात शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक केल्यास फायनान्स कंपन्यांवर फौजदारी कारवाई होणार- निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे       अमरावती, दि...