Thursday, November 21, 2024

DIO NEWS AMRAVATI 21.11.2024

 

जिल्ह्यात इतिहासातील सर्वाधिक मतदानाची नोंद

*गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा 6 टक्के वाढ

*जिल्ह्यात शांततेत विनातक्रार पार पडले मतदान

*प्रशासनाची तयारी, नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

अमरावती, दि. 21 (जिमाका) : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवार, दि. 20 नोव्हेंबर रोजी उत्साहात मतदान पार पडले. या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वाधिक मतदानाची टक्केवारी नोंदविली गेली आहे. तसेच गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत सुमारे 6 टक्के मतदानाची टक्केवारी वाढली आहे. तसेच संपूर्ण आठही विधानसभा मतदारसंघात शांततेत विनातक्रार मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे.

गेल्या 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी 60 एवढी होती. यात विक्रमी 6 टक्यांयानी वाढ होत यावर्षी 66.40 टक्के मतदान झाले आहे. मतदानाच्या टक्केवारीत ही मोठी वाढ आहे. त्यासोबतच अमरावती जिल्यादाच्या इतिहासातील ही सर्वाधिक मतदानाची टक्केवारी आहे.

मतदानासाठी प्रशासनाने केलेली तयारी, जनजागृती आणि नागरिकांच्या उत्साही सहभागाने मतदानाचा टक्का सुधारला आहे. यावेळी विधानसभा निवडणुकीत कोणतीही तक्रार आलेली नाही. प्रामुख्याने मतदारयादीमध्ये निवडणुकीपूर्वी 1 लाखाहून अधिक नवीन मतदार नोंदणी केली आहे. त्यामुळे मतदारयादीत नाव नसल्याची कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही. मतदारांनी मतदान प्रक्रियेत उत्साहात सहभाग घेतल्याने जिल्ह्यातील मतदानाच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ झाली आहे. मतदानात नागरिकांनी उत्फुिलर्त सहभाग नोंदविल्याबद्दल जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी मतदारांचे आभार मानले आहे.

जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात 8 लाख 91 हजार 3 पुरूष, 7 लाख 99 हजार 847 महिला आणि तृतीयपंथी 30 अशा एकूण 16 लाख 90 हजार 880 मतदारांनी मतदानचा हक्क बजावला आहे. जिल्ह्याची एकूण मतदानाची टक्केवारी 66.40 आहे.

धामणगाव रेल्वे मतदारसंघात 69.75 टक्के मतदान झाले. यात 1 लाख 17 हजार 222 पुरुष आणि 1 लाख 4 हजार 497 महिला, असे एकूण 2 लाख 21 हजार 719 जणांनी मतदानाचा हक्क बजावला.

बडनेरा मतदारसंघात 57.67 टक्के मतदान झाले. 1 लाख 8 हजार 465 पुरुष, 1 लाख 1 हजार 329 महिला आणि 15 तृतीयपंथीय असे एकूण 2 लाख 9 हजार 809 जणांनी मतदानाचा हक्क बजावला.

अमरावती मतदारसंघात 56.51 टक्के मतदान झाले. यात 1 लाख 10 हजार 997 पुरुष, 1 लाख 599 महिला आणि 10 तृतीयपंथी असे एकूण 2 लाख 11 हजार 606 जणांनी मतदानाचा हक्क बजावला.

तिवसा मतदारसंघात 67.93 टक्के मतदान झाले. यात 1 लाख 7 हजार 458 पुरुष, 93 हजार 954 महिला असे एकूण 2 लाख 01 हजार 412 जणांनी मतदानाचा हक्क बजावला.

दर्यापूर मतदारसंघात 66.85 टक्के मतदान झाले. यात 1 लाख 10 हजार 688 पुरुष, 95 हजार 500 महिला असे एकूण 2 लाख 6 हजार 188 जणांनी मतदानाचा हक्क बजावला.

मेळघाट मतदारसंघात 73.14 टक्के मतदान झाले. यात 1 लाख 14 हजार 523 पुरुष, 1 लाख 6 हजार 386 महिला आणि तृतीयपंथी 4 असे एकूण 2 लाख 20 हजार 913 जणांनी मतदानाचा हक्क बजावला.

अचलपूर मतदारसंघात 72.07 टक्के मतदान झाले. यात 1 लाख 12 हजार 131 पुरुष, 98 हजार 482 महिला, तृतीयपंथी 1 असे एकूण 2 लाख 10 हजार 614 जणांनी मतदानाचा हक्क बजावला.

मोर्शी मतदारसंघात 71.66 टक्के मतदान झाले. यात 1 लाख 9 हजार 519 पुरुष, 99 हजार 100 महिला असे एकूण 2 लाख 8 हजार 619 जणांनी मतदानाचा हक्क बजावला.

000000

Wednesday, November 20, 2024

DIO NEWS AMRAVATI 20.11.2024

 



धर्मदाय संस्थेतील निराधार महिलांनी बजाविला मतदानाचा हक्क

अमरावती, दि. 20 (जिमाका): जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात आज सकाळी सात वाजेपासून मतदानाला शांततेत सुरुवात झाली आहे. मतदानासाठी मतदान केंद्र सज्ज आहेत. मतदान केंद्रांवर दिव्यांगांसाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत.

    ईशदया मदर टेरेसा होम मिशनरीज ऑफ चॅरिटी या धर्मदाय संस्थेतील निराधार, परित्यक्ता, दिव्यांग, मानसिक रुग्ण अशा 55 महिलांनी आज मतदान केले. त्यांनी मतदान केंद्रावरील व्हीलचेअर तसेच आदी आवश्यक सुविधांचा लाभ घेत मतदानाचा हक्क बजाविला. मतदानाचा हक्क बजाविल्यावर या महिलांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळाले. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या डॉ. स्मिता साठे यांनी या सर्व महिलांना त्यांचे इपिक कार्ड, ओळखपत्र आदी आवश्यक कागदपत्रे देऊन मतदान करण्यासाठी सहकार्य केले. ईशदया मदर टेरेसा होम मिशनरीज ऑफ चॅरिटी या धर्मदाय संस्थेच्या सिस्टर रोसिन, जोसिका तसेच त्यांच्या मदतनीस यावेळी उपस्थित होत्या.

00000

आधार तसेच स्वंयम योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

            अमरावती, दि. 20 (जिमाक): ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दीनदयाल उपाध्याय स्वंयम योजना इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती-क आणि विशेष मागास प्रर्वगातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी  अर्ज सादर केलेले आहे.  अटी व शर्तीनुसार या विद्यार्थ्यांनी वसतिगृहास अर्ज करणे आवश्यक आहे. व त्या बाबतचा पुरावा अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. परंतु काही विद्यार्थ्यांनी अर्जासोबत वसतिगृहामध्ये अर्ज सादर केल्याचा पुरावा सोबत जोडलेला नाही.

            तरी संबंधित विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, वसतिगृहात अर्ज केल्याची पोच पावती किंवा कुठलाही पुरावा दि. 27 नोव्हेंबर 2024 पर्यंत या कार्यालयास सादर करावा. अशा विद्यार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देय राहील,असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणच्या सहायक संचालक सरीता बोबडे यांनी केले आहे.

000

 

23 नोव्हेंबर रोजी आठही मतदारसंघाचे मतमोजणीचे ठिकाण जाहीर

अमरावती, दि. 20 (जिमाका): संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये शहरी व ग्रामीण भागात आज दि.20 नोव्हेंबर 2024 (बुधवार), रोजी मतदान होत असून मतमोजणी ही दि. 23 नोव्हेंबर 2024 (शनिवार) रोजी होणार आहे. त्यामुळे मतमोजणी ठिकाणी  व मतमोजणीच्या वेळी उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते यांची मोठया प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.

जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सौरभ कटियार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अन्वये जिल्ह्यामधील विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी खालील दर्शविण्यात आलेल्या मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी दि. 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत खालील बाबी करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.

             36-धामणगाव रेल्वे मतमोजणीचे ठिकाण आय. टी. आय कॉलेज, विरूळ रोगे रोड, ता. चांदुर रेल्वे, 37-बडनेरा मतमोजणीचे ठिकाण लोकशाही भवन, विद्यापीठ रोड, ता. जि. अमरावती, 38-अमरावती मतमोजणीचे ठिकाण लोकशाही भवन, विद्यापीठ रोड, ता. जि. अमरावती, 39-तिवसा मतमोजणीचे ठिकाण तहसिल कार्यालय, तिवसा नवीन इमारत तिवसा, 40-दर्यापूर मतमोजणीचे ठिकाण कृषी उत्पन्न बाजार समिती, बनोसा, ता. दर्यापूर, 41-मेळघाट मतमोजणीचे ठिकाण नवीन प्रशाकीय इमारत, मेन रोड, ता. धारणी, 42-अचलपूर मतमोजणीचे ठिकाण कल्याण मंडपम् परतवाडा, ता. अचलपूर, 43-मोर्शी मतमोजणीचे ठिकाण शासकीय धान्य गोडाऊन, नं.1 ता. मोर्शी येथे राहणार आहे.

उमेदवार किंवा उमेदवारांचे प्रतिनिधी आणि मतमोजणी अधिकारी, कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणलाही मतमोजणी स्थळांच्या शंभर मीटर परिसराच्या आत प्रवेश देण्यात येऊ नये, तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांनी उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना अधिकृत पास दाखविल्याशिवाय प्रवेश देऊ नये. मतमोजणी ठिकाणी कुठल्याही प्रकारचे झेरॉक्स, फॅक्स, ई-मेल, इतर संपर्क साधनांच्या वापरावर प्रतिबंध करण्यात येत आहे. तसेच मतमोजणी ठिकाणाच्या शंभर मीटर परिसरामध्ये मोबाईल फोन, वायरलेस सेट, ट्रान्झीस्टर, कॅलक्यूलेटर इत्यादी प्रकारच्या साधनांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यात येत आहे.

            मतमोजणी केंद्रापासून शंभर मीटरचा परिसर हा पादचारी क्षेत्र घोषित करण्यात येत असून त्यामध्ये निवडणूक कामाव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारच्या वाहनांना प्रवेश मिळणार नाही. या आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता  अन्वये शिक्षापात्र असलेला अपराध केला आहे, असे मानण्यात येईल व संबंधितावर सदर कलमानुसार कारवाई करण्यात येईल. अशा व्यक्ती, संस्था, संघटना यांचेवर गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दर्जापेक्षा कमी नाही अशा अधिकाऱ्यास प्राधिकृत करण्याता येत आहे.  हा आदेश उपरोक्त नमूद केलेल्या मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी दि. 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत लागू राहील.

00000

 

विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील  शिष्यवृत्ती तसेच शैक्षणिक शुल्क प्रतिपूती फ्रिशीप अदा करण्यासाठी अन्वेषण प्रस्ताव सादर करण्याबाबत आवाहन

अमरावती, दि. 20 (जिमाका): विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सन 2011-12 ते 2016-17 या कालावधीतील महाईस्कॉल प्रणालीवरील नोंदणीकृत प्रलंबित तसेच सन 2017-18 या वर्षातील ऑफलाईन पध्दतीने स्वीकारण्यात आलेले शिष्यवृत्ती, फ्रिशीप योजनेंतर्गत प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव या कार्यालयास सादर करण्याबाबत कळविण्यात आले आहे.

परंतु अद्यापही बरेच महाविद्यालय प्रस्ताव  सादर केलेले नाही. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांना सूचित करण्यात येते की, आवश्यक कागदपत्रे या कार्यालयास तात्काळ दि. 29 नोव्हेंबर 2024 रोजीपर्यंत सादर करण्यात यावे. सदर प्रकरणी विलंब झाल्यास प्रस्ताव शासनास सादर करता येणार नाही. त्यामुळे विद्यार्थी शिष्यवृतीपासून वंचित राहिल्यास याबाबत सर्वस्वी जबाबदारी प्राचार्य यांची राहील. असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहायक संचालक सरिता बोबडे यांनी केले आहे.

00000

                                             विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी

अमरावती जिल्ह्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 58.48 टक्के मतदान

           अमरावती, दि. 20 (जिमाका) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 साठी आज सकाळी 7 वाजल्यापासून जिल्ह्यात सर्वत्र उत्साहात मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी 58. 48 टक्के मतदान झाले आहे.

            जिल्ह्यातील मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी (सायंकाळी 5 वाजेपर्यंत )पुढीलप्रमाणे :

42-अचलपूर - 67.53 टक्के,

38 -अमरावती - 50.32  टक्के,

37 -बडनेरा- 53.73 टक्के,

40-दर्यापूर- 59.90 टक्के,

36-धामणगाव रेल्वे- 57. 20 टक्के,

41-मेळघाट- 64. 57 टक्के,

43- मोर्शी- 64.74 टक्के,

39-तिवसा - 53.21टक्के मतदान झाले आहे.

0000


Tuesday, November 19, 2024

DIO NEWS AMRAVATI 19.11.2024

 

दर्यापूर विधानसभा क्षेत्रात खर्चाची तिसरी तपासणी

         अमरावती, दि. 19 (जिमाका) : दर्यापूर विधानसभा मतदारसंघात नामनिर्देशित उमेदवारांच्या खर्चाची तिसरी तपासणी शनिवार, दि. 16 नोव्हेंबर रोजी नविन तहसिल इमारत दर्यापूर येथील सभागृहात पार पडली.

उमेदवारांच्या खर्चावर देखरेख ठेवण्यासाठी खर्च निरीक्षक म्हणून डॉ. उमा माहेश्वरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लेख्यांच्या तपासणीवेळी एकूण 16 उमेदवारांपैकी सर्व 16 उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सदर खर्च तपासणीचे वेळी उपस्थित सर्व 16 उमेदवार, प्रतिनिधी यांनी त्यांच्या खर्च नोंदवहीत नोंदविलेला खर्च व खर्च सनियंत्रणन पथकाव्दारे नोंदिण्यात आलेला खर्च यात असलेली तफावत उमेदवारांनी मान्य करून तिसऱ्या व अंतिम तपासणीत सदर सोळाही उमेदवारांचे खर्च लेख्याच्या ताळमेळ घेण्यात आला. सदरहू उमेदवारांना आपला खर्च दि. 18 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत करता येणार आहे. उमेदवारांच्या खर्च लेख्याचे अंतिम तपासणी माहे डिसेंबरमध्ये घेण्यात येणार आहे.

0000


अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डीन ॲड्रेस

*जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांची उपस्थित

अमरावती, दि. 19 (जिमाका): नव्याने सुरु झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन शैक्षणिक सत्र सुरु झाले आहे. महाविद्यालयातील प्रवेशीत 99 विद्यार्थ्यांसाठी सोमवार, दि. 18 नोव्हेंबर रोजी डीन ॲड्रेस कार्याक्रम घेण्यात आला.

जिल्हाधिकारी सौरभ कटियार अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहूणे म्हणून डॉ. अविनाश सावजी, डॉ.आशिष सातव उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी विद्यार्थ्यांना मागदर्शन केले. विद्यार्थ्यांनी निश्चित केलेले ध्येय अथक मेहनत व परिश्रमामुळे मिळाल्याबद्दल अभिनंदन केले.  सदर ध्येयप्राप्ती ही फक्त सुरुवात असून भविष्यात आपले ध्येय निश्चित करुन प्रगती करावी, विद्यार्थ्यांनी आपले शैक्षणिक सत्र प्राथमिकतेने पूर्ण करावे. इतर उपक्रम राबवून विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष द्यावे, तसेच इतर विषयाचे पुस्तके व ग्रंथ याचे वाचन करुन सर्व विषयातील माहिती घेण्याबाबत विद्यार्थ्यांना सांगितले. वैद्यकीय महाविद्यालयाच्या निर्मितीसाठी सर्व विभागांनी, डॉ. अनिल बत्रा, डॉ. किशोर इंगोले व कर्मचारी यांचे कौतुक केले. डॉ.अविनाश सावजी व डॉ.आशिष सातव यांनी विद्यार्थ्यांना वैद्यकीय सेवेबद्दल माहिती दिली. वैद्यकीय व्यवसायातून सामाजिक कार्य करावे असे आवाहन केले. डॉ. किशोर इंगोले यांनी विद्यार्थ्यांच्या भेटी घेत मागदर्शन केले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उप अधिष्ठाता डॉ.नितीन अंभोरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाकरीता नियुक्त कंत्राटदार श्री. देशमुख यांचा मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिलिप सौंदळे, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.अमोल नरोटे, जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. विनोद पवार, प्रशासकीय अधिकारी संजय मैदानकर, शिवम घारड, जयश्री घाडगे, पियूष सरोदे उपस्थित होते.

0000

शनिवारी मतमोजणीला शहरातील वाहतुकीत तात्पुरता बदल

*पर्यायी मार्गांचा वापराचे पोलीस विभागाचे आवाहन

       अमरावती, दि.19 (जिमाका) : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी शनिवार, दि. 23 नोव्हेंबर रोजी विद्यापीठ रस्त्यावरील लोकशाही भवनात होणार आहे. यानिमित्ताने शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले असून नागरिकांनी पर्यायी मार्ग वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 लोकशाही भवनात सकाळी 8 वाजेपासून बडनेरा व अमरावती विधानसभा क्षेत्राची  मतमोजणी सुरू होणार आहे. मतमोजणी प्रक्रीया सुरू असताना लोकशाही भवन परिसरात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होण्याची शक्यता आहे. लोकशाही भवन असलेल्या बियाणी चौक ते विद्यापीठ चौक या मार्गाचे कॉक्रीटीकरणाचे काम अपूर्ण आहे. मतमोजणी प्रक्रीया दरम्यान येणाऱ्या वाहनांमुळे या मार्गावर वाहतुकींची कोंडी, अपघातासारखी अप्रिय घटना घडुन सार्वजनिक शांतता भंग होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबी लक्षात घेता शहर वाहतुकीत बदल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त कल्पना बारवकर यांनी कळविली आहे.

बियाणी चौक ते तपोवन गेट दि. 23 नोव्हेंबर 2024 रोजी 6 वाजता ते मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बंद राहील.

नागरिकांसाठी पर्यायी मार्ग मार्डी मार्गे तसेच तपोवन गेट परिसरातील निवासी वसाहतील वाहन चालकांना अमरावती शहरात येण्यासाठी पर्यायी मार्ग-विद्यापीठ चौक, रचना सृष्टी, विक्रांत लॉन, दंत महाविद्यालय, वडाळी ओवरब्रिज चौक, अंधविद्यालय, चपराशीपूरा. बियाणी चौकाकडून मार्डी रोडकडे तसेच तपोवन परिसरातील निवासी वसाहतील वाहन चालकांनी पर्यायी मार्ग-चपराशीपूरा, अंधविद्यालय, वडाळी ओवरब्रिज चौक, दंत विद्यालय, विक्रांत लॉन, रचना सृष्टी, विद्यापीठ चौक. बियाणी चौक ते विद्यापीठ चौक मार्गावरील नागरी वस्ती चिलम छावणी, व्यंकय्यापूरा, जिजाऊ नगर, ओम कॉलनी येथील वाहन चालकांना मुख्य मार्गावर प्रवेश बंद राहणार असल्याने त्यांनी परिसरातील उपलब्ध पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

0000

अमरावती जिल्हा मिशन - 75

जिल्ह्यातील सर्व मतदारांना लोकशाहीच्या उत्सवाचे निमंत्रण

मतदानासाठी जिल्हाधिकारी यांचे आवाहन

 

अमरावती,  दि. 19 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 ची घोषणा केलेली असून उद्या, बुधवार, दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी अमरावती जिल्ह्यातील 8 मतदारसंघांत मतदान होणार आहे. यादिवशी आपण आपल्या कुटुंबीयांसह मतदात करण्यास अवश्य  यावे, असे जाहीर निमंत्रण जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी नागरिकांना दिले आहे.

आपल्या कुटुंबातील सदस्य ज्यांची अमरावती जिल्ह्याच्या 8 मतदारसंघाच्या मतदार यादीत नावे आहेत, तथापि शिक्षण व नोकरी निमित्ताने अन्य ठिकाणी राहत असतील,  तर  ते  जिथे काम करत असतील तेथे त्यांना पगारी रजेचा अधिकार आहे.  उद्या बुधवार,  दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी खास मतदानासाठी सुटी आहे.

            लोकशाहीच्या मतदानाला येतांना निवडणूक ओळखपत्र सोबत आणावे. ते नसल्यास आधार कार्ड, वाहन चालक परवाना,  फोटो असलेले बँक पासबुक,  मनरेगा जॉब कार्ड इत्यादी पैकी कोणतेही एक ओळखपत्र सोबत आणावे. मतदार ओळख चिट्ठी आपणास घरोघरी पाठविली आहे.  त्याव्यतिरीक्त मतदार ओळख चिट्ठी (Voter Slip) निवडणूक आयोगाच्या electoralsearch.ac.gov.in या संकेतस्थळावरुन काढता येईल.

            मतदान प्रक्रियेसाठी मतदान केंद्रांवर अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.  मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर आपली गैरसोय होणार नाही.  आपल्या कुटुंबात दिव्यांग बांधव अथवा ज्येष्ठ नागरीक असल्यास त्यांचेसाठी Saksham App वर देखील नोंदणी करणे शक्य आहे. त्यांचेसाठी व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध करण्यात येईल.

प्रत्येक मतदान केंद्रावर सावली,  प्राथमिक औषधोपचार, पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच स्वच्छतागृह सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे.  मतदानाचा हक्क बजावून आपला सेल्फी फोटो स्वतःच्या मोबाईल Whats App वर Status ठेवावा. मतदानाविषयी आपणांस काही अडचण असल्यास आमच्याशी 1950 वा दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. मिशन 75 अभियानांतर्गत मतदान करून लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा, असे आवाहन  जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी केले आहे .

000000

Monday, November 18, 2024

DIO NEWS AMRAVATI 18.11.2024

 





निवडणूक यंत्रणांनी मतदान प्रक्रियेवर अधिक लक्ष द्यावे

-जिल्हाधिकारी सौरभ कटियार

अमरावती, दि. 18 (जिमाका) : मतदानापूर्वीचे 72 तास आधी करावयाची कार्यवाही सुरू झाली आहे. प्रत्यक्ष निवडणुकीसाठी अल्प कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे निवडणुकीशी संबंधित सर्व यंत्रणांनी मतदान प्रक्रियेवर अधिक लक्ष द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीला पोलिस उपायुक्त नविनचंद्र रेड्डी, जिल्हा पोलिस अधिक्षक विशाल आनंद, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी, आज सायंकाळी सहा वाजल्यापासून जाहिर प्रचार थांबणार आहे. त्यामुळे सर्व ठिकाणी लागलेले होर्डींग काढण्याची कार्यवाही करण्यात यावी. तसेच यानंतर जाहिर प्रचार थांबत असला तरी इतरप्रकारे प्रचार सुरू राहणार आहे. त्यामुळे फिरते आणि स्थिर पथकांनी अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क, आयकर, ड्राय डे आदी उपाययोजना करण्यात आल्या आहे. त्यामुळे निवडणूक शांततापूर्ण वातावरणात होण्यासाठी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

पोलिस आयुक्त श्री. रेड्डी यांनी, दुकाने, हॉटेल वेळेवर बंद होण्यासाठी निर्देश देण्यात आले आहे. आज सायंकाळपासून आदेशाचे अंमलबजावणीस सुरूवात होईल. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरूद्ध गुन्हे नोंदविण्यात येणार आहे. प्रामुख्याने मतदान केंद्राच्या 200 मीटरच्या परिसरात खासगी मालमत्तेवरीलही प्रचार साहित्य काढावे लागणार आहे. त्यामुळे याची विशेष दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात आली आहे. प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यात शांततापूर्ण वातावरणात मतदान होण्यासाठी योग्य प्रयत्न करण्यात येत आहे. निवडणूक निरीक्षक श्री. पुनिया यांनी स्थिर आणि फिरते पथकांनी जबाबदारीने कार्यवाही करावी. प्रामुख्याने लक्ष द्यावयाच्या भागात विशेष काळजी घ्यावी. निवडणूक निरीक्षक बिधानचंद्र चौधरी यांनी मतदानापूर्वी गस्त वाढविणे गरजेचे आहे. प्रामुख्याने झोपडपट्टी भागात विशेष लक्ष देण्यात यावी, असे निर्देश दिले.

00000

अचलपूर विधानसभा क्षेत्रात खर्चाची तिसरी तपासणी

            अमरावती, दि. 18 (जिमाका) : 42-अचलपूर विधानसभा मतदारसंघात नामनिर्देशित उमेदवारांच्या खर्चाची तिसरी तपासणी  शनिवार, दि. 16 नोव्हेंबर रोजी पार पडली.

उमेदवारांच्या खर्चावर देखरेख ठेवण्यासाठी खर्च निरीक्षक म्हणून उमा माहेश्वरी  यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लेख्यांच्या तिसऱ्या तपासणीवेळी एकूण 22 उमेदवारांपैकी 1 उमेदवार अनुपस्थित होते. अनुपस्थित उमेदवारांना 48 तासाचे आत निवडणूक खर्चाचे लेखे नवीन प्रशासकीय भवन, उपविभागीय अधिकारी कार्यालय, परिसर, अचलपूर येथे सादर करण्याबाबत नोटीस देण्यात आली. ज्या उमेदवारांनी विहीत मुदतीत खर्च सादर केला नसल्यास नियमानुसार तक्रार दाखल करण्यात येणार आहे. तसेच देण्यात आलेल्या सर्व परवानग्या तात्काळ रद्द करण्यात येणार आहे.

             तिसऱ्या तपासणीअंती उमेदवारनिहाय खर्च हा तात्पुरत्या स्वरुपाचा असून निकालानंतर आयोजित लेखा ताळमेळ बैठकीमध्ये ताळमेळ घेऊन सदर खर्चास अंतिम स्वरुप देण्यात येणार आहे. तपासणीवेळी उमेदवार तसेच उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

00000

Sunday, November 17, 2024

1 of 1,699 DIO NEWS AMRAVATI 17.11.2024

 अमरावती विधानसभा मतदारसंघाची लोकशाही भवनात मतमोजणी

अमरावती, दि. 17 (जिमाका): आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीतमध्ये  अमरावती विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी लोकशाही भवनात होणार आहे.

            निवडणूक आयोगाने अमरावती येथील लोकशाही भवन, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ रोड, येथे शनिवार, दि. 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजेपासून मतमोजणी करण्यास मान्यता दिली आहे. याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन अमरावती विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी अनिल भटकर यांनी केले आहे.

00000

 

मतदान केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

 अमरावती, दि. 17 (जिमाका): विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीतील मतदान केंद्राच्या 200 मीटरच्या परिसरात प्रतिबंध घालण्यात आले आहे. यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023चे कलम 163 नुसार जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आदेश दिले आहे.

मतदान केंद्र परिसरातील मंडप, दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपक, फेरीवाले, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, निवडणुकीच्या कामकाजाव्यतिरिक्त खासगी वाहने, चिन्हाचे प्रदर्शन, निवडणूक कामाव्यतिरिक्त इतर व्यक्तींना प्रवेश प्रतिबंधित करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024ची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व मुक्त, न्याय वातावरणात पार पाडण्याच्या उपायोजना करण्यात येत आहे. या परिसरात जमाव गोळा करणे, ध्वनीक्षेपक वापरणे, मतदारांवर प्रभाव पडेल अशी कृती करणे आदीकरीता प्रतिबंध करण्यात येत आहे. मतदार केंद्र परिसरात मतदारांचा जमाव करणे, दुकाने चालू ठेवणे, मतदारचिठ्ठ्या देताना त्यावर कोणतेही चिन्ह नसावे. ध्वज लावण्यावर प्रतिबंध राहणार आहे.

सदर आदेश हे रूग्णालयीन कामे, दुधाचे टँकर, वीज कर्मचारी, पोलिस कर्मचारी, निवडणूक कर्तव्यावरील कर्मचारी, इतर अत्यावश्य सेवांना लागू राहणार नाही. तसेच बसस्थानक, रेल्वेस्थानक, रूग्णालयांकडे जाणाऱ्या वाहनांना लागू राहणार नाही. दिव्यांग आणि आजारी व्यक्तीस मतदान केंद्रावर जाणाऱ्या मतदारांना सदर आदेश लागू राहणार नाही.

0000

 बडनेरा विधानसभा क्षेत्रात तिसरी तपासणी

      अमरावती, दि. 17 (जिमाका) : बडनेरा विधानसभा मतदारसंघात नामनिर्देशित उमेदवारांच्या खर्चाची तिसरी तपासणी शुक्रवार, दि. 15 नोव्हेंबर रोजी पार पडली. उमेदवारांच्या खर्चावर देखरेख ठेवण्यासाठी खर्च निरीक्षक म्हणून वेंकन्ना तेजावथ यांची नियुक्ती केली आहे. लेख्यांच्या पहिल्या तपासणीवेळी एकूण 26 उमेदवारांपैकी सर्व उमेदवार उपस्थित होते. उमेदवारांना 48 तासांत निवडणूक खर्चाचे लेखे उपविभागीय अधिकारी कार्यालय, जुनी अमरावती तहसील कार्यालय, अमरावती येथे सादर करण्याबाबत नोटीस देण्यात आली आहे.  ज्या उमेदवारांनी विहीत मुदतीत खर्च सादर केला नसल्यास नियमानुसार तक्रार दाखल करण्यात येणार आहे. तसेच देण्यात आलेल्या सर्व परवानग्या तात्काळ रद्द करण्यात येणार आहे.

      5 उमेदवारांनी तिसऱ्या तपासणीवेळी त्यांचा दैनंदिन खर्चाचा लेखा सादर केला असता छायांकित निरीक्षण नोंदवहीसोबत ताळमेळअंती योग्य वाटत नसल्याने त्यांनी खर्चाचा काही भाग सादर केला नाही. या सर्व उमेदवारांना उपविभागीय अधिकारी यांनी नोटीस बजावली. तिसऱ्या तपासणीअंती उमेदवारनिहाय खर्च हा तात्पुरत्या स्वरुपाचा असून निकालानंतर आयोजित लेखा ताळमेळ बैठकीमध्ये ताळमेळ घेऊन सदर खर्चास अंतिम स्वरुप देण्यात येणार आहे. अंतिम बैठकीनंतर खर्चाचा ताळमेळ झाल्यानंतरच सदरचा खर्च हा भारत निवडणूक आयोगास सादर केला जाणार आहे.

00000

धामणगाव रेल्वे विधानसभा क्षेत्रात खर्चाची तिसरी तपासणी

        अमरावती, दि. 17 (जिमाका) : धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघात नामनिर्देशित उमेदवारांच्या खर्चाची तिसरी तपासणी शनिवार, दि. 16 नोव्हेंबर रोजी चांदुर रेल्वे तहसील कार्यालयात पार पडली.

उमेदवारांच्या खर्चावर देखरेख ठेवण्यासाठी खर्च निरीक्षक म्हणून वेंकन्ना तेजावथ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लेख्यांच्या पहिल्या तपासणीवेळी एकूण 24 उमेदवारांनी त्यांचा दैनंदिन खर्चाचा लेखा सादर केला आहे. परंतु तो शॅडो खर्च नोंदवहीसोबत तुलना करता योग्य वाटत नसल्याने त्यांनी खर्चाचा काही भाग सादर केला नाही. त्या उमेदवारांना उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी तेजश्री कोरे यांनी 48 तासांत निवडणूक खर्चाचे लेखे निवडणूक संनियंत्रण कक्ष, तहसिल कार्यालय, चांदूर रेल्वे येथे सादर करण्याबाबत नोटीस देण्यात आली. ज्या उमेदवारांनी विहीत मुदतीत खर्च सादर केला नसल्यास नियमानुसार तक्रार दाखल करण्यात येणार आहे. तसेच देण्यात आलेल्या सर्व परवानग्या तात्काळ रद्द करण्यात येणार आहे.

             तिसऱ्या तपासणीअंती उमेदवारनिहाय खर्च हा तात्पुरत्या स्वरुपाचा असून निकालानंतर आयोजित लेखा ताळमेळ बैठकीमध्ये ताळमेळ घेऊन सदर खर्चास अंतिम स्वरुप देण्यात येणार आहे. अंतिम बैठकीनंतर खर्चाचा ताळमेळ झाल्यानंतरच सदरचा खर्च हा भारत निवडणूक आयोगास सादर केला जाणार आहे. तपासणीवेळी खर्च निरीक्षक वेंकन्ना तेजावथ, तसेच उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

00000

Saturday, November 16, 2024

DIO NEWS AMRAVATI 16.11.2024

 






मतदान केंद्रावर सर्व सुविधा पुरवाव्यात

-जिल्हाधिकारी सौरभ कटियार

अमरावती, दि. 16 : जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघातील निवडणुकी पूर्वतयारी पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता यंत्रणांनी फक्त मतदानावर लक्ष केंद्रित करावे. मतदान केंद्रावर मतदानासाठी येणाऱ्या मतदारांना सुखद अनुभव देण्यासाठी आवश्यक सर्व सुविधा पुरवाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी सर्व कट्यार यांनी आज दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक आढावा घेण्यात आला. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांच्यासह सर्व निवडणूक निर्णय अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी, निवडणुकीसाठी ठरविण्यात आलेल्या मतदान केंद्राची पाहणी करण्यात यावी. याठिकाणी परिसर स्वच्छ ठेवणे, शेड, पाणी, स्वच्छतागृह यासह विजेची पुरेशी व्यवस्था असल्याबाबत खात्री बाळगण्यात यावी. या बाबींसाठी तातडीने सर्व मतदान केंद्राची पाहणी करण्यात यावी. मतदान केंद्रावर सर्व सुविधा पुरविण्यात याव्यात. यामुळे नागरिकांना मतदान करताना करणे सुकर होईल.

मतदानादरम्यान दि. 19 ते 21 नोव्हेंबर दरम्यान विविध अहवाल द्यावयाचे असतात. याची पूर्वतयारी आधीच करून ठेवण्यात यावी. अहवाल सादर करण्याची जबाबदारी सोपविण्यात यावी. अहवाल सादर करताना ते वेळेत सादर होतील याची काळजी घ्यावी.

नागरिकांना मतदानाची माहिती प्राप्त व्हावी, यासाठी वोटर स्लिप वाटप करण्यात येत आहे. अद्यापही काही भागात या वोटर स्लिप कमी प्रमाणात वाटप झालेल्या आहे.  याठिकाणी दोन दिवसात सर्व वोटर स्लिप वाटप होईल, याची काळजी घ्यावी.

मतमोजणीमध्ये पोस्टल बॅलेटने झालेले मतदान काळजीपूर्वक मोजावे. याकामी स्वतंत्रपणे मनुष्यबळ नेमण्यात यावे. विधानसभा निवडणुकीत विजयी उमेदवारांमध्ये कमी अंतर असल्याने सर्वांचे लक्ष पोस्टल बॅलेट वर राहणार आहे. त्यामुळे सर्व विधानसभा क्षेत्रामध्ये एकसारखी प्रक्रिया राबविण्यात यावी. मतदानाची टक्केवारी नोंदविताना ती योग्यरीत्या भरण्यात यावी. प्रामुख्याने अंतिम टक्केवारी सादर करताना काळजी घ्यावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी दिले.

00000




विशेष सामान्य निरीक्षकांकडून निवडणुकीचा आढावा

अमरावती, दि. 16 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज विशेष सामान्य निरीक्षक राम मोहन मिश्रा यांनी जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी निवडणूक विषयक तयारीची माहिती दिली.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, महापालिकेचे आयुक्त सचिन कलंत्रे, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्यासह विधानसभा निवडणुकीचे सर्व निरीक्षक उपस्थित होते.

राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी विशेष सामान्य निरीक्षक म्हणून राम मोहन मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघातील निवडणूकविषयक तयारीचा आढावा घेतला. निवडणुकीच्या अनुषंगाने झालेले मतदान यंत्राचे सरमिसळीकरण, मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांची नियुक्ती, पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती, गृह मतदान आणि कर्मचाऱ्यांच्या मतदानाबाबत माहिती घेतली. मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा पुरवण्याचे निर्देश त्यांनी दिले.

मतदान प्रक्रिया आणि मतदान यंत्र ठेवण्यात येणाऱ्या ठिकाणी आवश्यक त्या सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यात याव्यात. या ठिकाणी आवश्यकतेनुसार सीआरपीएफ, सीएपीएफ यांची नियुक्ती करण्यात यावी. क्रिटिकल मतदान केंद्रावर अतिरिक्त लक्ष ठेवण्यात यावे. तसेच सी-व्हिजील आणि इतर ठिकाणाहून येणाऱ्या तक्रारींचा वेळीच निपटारा करण्यात यावा. निवडणुकीसाठी स्थिर पथक, फिरते पथक यांच्याकडून योग्य कार्यवाही व्हावी. निवडणुकीदरम्यान कोणतीही अफवा पसरविली जाणार नाही, यासाठी सोशल मीडियावरही विशेष लक्ष द्यावे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची निर्देशही श्री. मिश्रा यांनी दिले.

बैठकीपूर्वी श्री. मिश्रा यांनी विभागीय आयुक्त डॉ. निधी पांण्डेय आणि विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांच्याशी चर्चा केली.

00000

शहरात  कलम 37 (1)  व (3) लागू

अमरावती, दि. 16 (जिमाका) : शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अमरावती शहर पोलिस आयुक्त  यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहे.

            सदर प्रतिबंधात्मक आदेश शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात लागू करण्यात आला असून तो दि. 17 नोव्हेंबर ते दि. 2 डिसेंबर 2024 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे अमरावती शहर पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी कळविले आहे.

000

 

Friday, November 15, 2024

DIO NEWS AMRAVATI 15.11.2024

मतदान, मतमोजणीला ड्राय डे

*सोमवारी सायंकाळी 6 पासून मद्यविक्रीस मनाई

अमरावती, दि. 15 : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवार, दि. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. यानिमित्ताने सोमवार, दि. 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेपासून दि. 20 नोव्हेंबरपर्यंत, तसेच मतमोजणीच्या दिवशी दि. 23 नोव्हेंबर रोजीही ड्राय डे राहणार आहे. याचे आदेश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिले आहेत.

मतदानाची वेळ संपण्यापुर्वी ४८ तास अगोदर म्हणजेच दि. १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेपासून मतदानाच्या पूर्वीचा दिवस दि. १९ आणि मतदानाचा दिवस दि. २० नोव्हेंबर रोजी मद्यविक्री बंद राहणार आहे. तसेच मतमोजणीचा दिवस दि. २३ नोव्हेंबर रोजी मद्यविक्री बंद राहणार आहे. बंदचे कार्यक्षेत्र अमरावती जिल्हा राहणार आहे. याची जिल्ह्यातील सर्व संबंधित अबकारी अनुज्ञप्तीधारकांनी नोंद घ्यावी, अनुज्ञप्तीधारकांनी आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ५४ (१) (सी) नुसार कारवाई करण्यात येणार आहे.

विधानसभा सार्वत्रिक निवडणुका खुल्या, मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ च्या कलम १३५ (सी), महाराष्ट्र देशी दारु नियम १९७३ चा नियम २६ (१) (सी), महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम १४२ (१), महाराष्ट्र विदेशी मद्य नियम (रोखीने विक्री, विक्रीच्या नोंदवह्या इत्यादी) नियम १९६९ चा नियम (९-ए१) (सी) (२), तसेच विविध नियमानुसार प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करुन कोरडा दिवस जाहिर करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील सर्व देशी, विदेशी, किरकोळ व ठोक अबकारी अनुज्ञप्ती ज्यात नमुना बीआरएल, पीएलएल, सीएल-१, सीएल-२, सीएल-३, एफएल-१, एफएल-२, एफएल-३, नमुना ई. एफएल, बीआर-२, मोहा, एफएल-४ आदी यांचा समावेश आहे. अशा सर्व मद्यांसाठी कोरडा दिवस लागू राहणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व संबंधित अबकारी अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.

000000

अचलपूरात तीन उमेदवारांना नोटीस

अमरावती, दि. 15 : अचलपूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्चाची दुसरी तपासणी मंगळवार, दि. 12 नोव्हेंबर रोजी पार पडली. यात खर्च सादर केलेला नसलेल्या तीन उमेदवारांना नोटीस देण्यात आली.

उमेदवारांच्या खर्चावर देखरेख ठेवण्याकरीता खर्च निरीक्षक म्हणून उमा माहेश्वरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खर्च निरीक्षकांनी उमेदवारांच्या लेख्यांची तपासणी करण्याकरीता तीन तारखा निश्चित केल्या आहेत.

उमेदवारांच्या लेख्यांच्या तपासणी वेळी एकूण 22 उमेदवारांपैकी 3 उमेदवार अनुपस्थित होते. सदर अनुपस्थित उमेदवारांना ४८ तासांच्या आत निवडणूक खर्चाचे लेखे नवीन प्रशासकीय भवन, उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसर, अचलपूर येथे सादर करण्याबाबत नोटीस देण्यात आली आहे. विहीत मुदतीत खर्च सादर केला नसल्यास रितसर तक्रार दाखल करण्यात येणार आहे.

तपासणीअंती उमेदवारनिहाय खर्च तात्पुरत्या स्वरूपाची आहे. तिसऱ्या तपासणी दरम्यान दि. १६ नोव्हेंबर रोजी आयोजित लेखा ताळमेळ बैठकीमध्ये ताळमेळ घेऊन सदर खर्चास अंतिम स्वरुप देण्यात येणार आहे. सदर तपासणीवेळी उमेदवार तसेच उमेदवारांचे प्रतिनिधी हे उपस्थित होते.

000000

निवडणुकीतील ध्वनीक्षेपकाचा वापरावर निर्बंध

अमरावती, दि. 15 : विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी ध्वनीक्षेपकाचा उपयोग करण्यात येत आहे. मोठ्या आवाजात ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यात येत असल्यामुळे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी ध्वनीक्षेपकाच्या आवाजावर निर्बंध घातले आहेत.

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या कालावधीत उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते, हितचिंतक वाहनांवर ध्वनीक्षेपक बसवून मोठ्या आवाजात प्रचार केल्याने ध्वनी प्रदूषण होणे, सर्वसामान्य लोकांच्या जीवनातील शांतता आणि स्वास्थ्यास बाधा पोहोचविण्याची आणि रात्री उशिरापर्यंत ध्वनीक्षेपक यंत्रणा चालू ठेवण्याची शक्यता असल्यामुळे या बाबींवर निर्बंध घालण्यात आले आहे.

निवडणूकीच्या प्रचारासाठी ध्वनीक्षेपकाचे वापर करताना ध्वनीक्षेपकाच्या वापरासाठी पोलीस अधिकारी यांची परवानगी घ्यावी, सकाळी ६ वाजण्यापूर्वी ते रात्री १० वाजेनंतर फिरते वाहन आणि क्षेत्रात ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही, दिवसा प्रचाराकरीता फिरणाऱ्या वाहनांनी ध्वनीक्षेपकांचा वापर विशिष्ट ठिकाणी थांबून करावा, ध्वनीक्षेपकाचा आवाजासह फिरणाऱ्या वाहनास प्रतिबंध राहणार आहे. राजकीय पक्ष आणि उमदेवार, तसेच इतर व्यक्तींनी निश्चित ठिकाणी ध्वनीक्षेपकाचा वापरासंबंधी घेतलेल्या परवानगीची माहिती जिल्हादंडाधिकारी आणि संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी, संबंधित यंत्रणेस कळविणे बंधनकारक राहणार आहे. ध्वनीक्षेपकाच्या वापरावर निर्बंध हे निवडणूक प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत अंमलात राहणार आहे.

000000 

ग्रामीण भागात  कलम 37(1) व (3) लागू

          अमरावती, दि. 15 (जिमाका) :  जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस अधीक्षक (ग्रामीण), अमरावती  यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

 

            सदर प्रतिबंधात्मक आदेश जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा, याकरिता पोलिस आयुक्तालय परिक्षेत्र वगळून अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात लागू करण्यात आला असून दि. 16 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2024 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हादंडाधिकारी  सौरभ कटियार यांनी दिले आहे.

00000

DIO NEWS AMRAVATI 26.10.2026

  दुष्काळात शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक केल्यास फायनान्स कंपन्यांवर फौजदारी कारवाई होणार- निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे       अमरावती, दि...