Monday, November 16, 2026

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; बोअरवेल आणि विहीर खोदकामावरील निर्बंध १५ डिसेंबरपर्यंत शिथिल


 

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; बोअरवेल आणि विहीर खोदकामावरील निर्बंध १५ डिसेंबरपर्यंत शिथिल

अमरावती, दि. १६ (जिमाका): शेतीविषयक कामे, पिकांचे संवर्धन आणि सिंचनाची निकड लक्षात घेता  जिल्ह्यात शेतीविषयक कामांसाठी नवीन बोअरवेल (विंधन विहीर) आणि विहीर खोदकाम, विहीर बळकटीकरणावरील निर्बंध १५ डिसेंबर २०२६ पर्यंत तात्पुरत्या स्वरूपात शिथिल करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आशिष येरेकर यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.

 दुष्काळ सदृश्य स्थिती पाहता संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर भूजल स्रोतांचे संरक्षण आणि पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी यापूर्वी जिल्ह्यात बोअरवेल आणि विहीर खोदकामावर निर्बंध घालण्यात आले होते. मात्र, सध्याची कृषीविषयक कामांची तातडी लक्षात घेता या निर्णयात तात्पुरती सूट देण्यात आली आहे. या आदेशानुसार, १५ डिसेंबर २०२६ पर्यंत शेतकऱ्यांना शेतीच्या कामांसाठी नवीन बोअरवेल किंवा विहीर खोदण्यासाठी प्रशासनाची विशेष परवानगी घेण्याची अट लागू राहणार नाही.

         ही सवलत केवळ शेतीविषयक कामांसाठीच लागू राहणारबाहे. या कामासोबतच शेतपरिसरात विहीर पुनर्भरण, विंधन विहीर पुनर्भरण, जलतारा आणि इतर जलसंधारणविषयक उपाययोजना करणे बंधनकारण करण्यात आले आहे. हा आदेश तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आला असून १५ डिसेंबर २०२६ नंतर बोअरवेल आणि विहीर खोदकामाबाबतचे पूर्वीचे निर्बंध पुन्हा पूर्ववत लागू होतील, असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment