Wednesday, November 18, 2026

DIO NEWS AMRAVATI 18.11.2026

                                      अत्याचार पीडित कुटुंबातील वारसाला शासकीय नोकरी

*जिल्हाधिकारी यांच्या हस्ते नियुक्ती आदेश प्रदान

 

अमरावती, दि. 18 (जिमाका) : अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत अत्याचाराच्या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील पात्र वारसाला शासकीय सेवेत नियुक्ती देण्याच्या तरतूद आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते विष्णू महेश हिवराळे यांना नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आला.

 

बडनेरा पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्हा क्रमांक 493/2022 मधील मृतक विशाल महेश हिवराळे यांच्या पात्र वारसदार विष्णू महेश हिवराळे यांना सामाजिक न्याय विभागांतर्गत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, तिवसा येथे गट-ड संवर्गातील सफाईगार पदावर नियुक्ती देण्यात आली आहे.

 

जिल्ह्यात यापूर्वी अशाप्रकारे 20 पात्र वारसांना शासकीय सेवेत नियुक्ती देण्यात आली आहे. अत्याचार पीडित कुटुंबांना आर्थिक व सामाजिक आधार मिळवून देण्यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत ही कारवाई करण्यात येते.

000000

दिवाळीत मनमानी भाडे आकारणाऱ्या २६७ खासगी बसेसवर कारवाई

 

अमरावती, दि. 18 (जिमाका) : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर खासगी प्रवासी बसचालकांकडून होणाऱ्या अवास्तव भाडेवाढीला चाप लावण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे विशेष मोहीम राबविण्यात आली. दि. २७ ऑक्टोबर ते १६ नोव्हेंबर या कालावधीत राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत २६७ दोषी बसेसवर कायदेशीर कारवाई करण्यात आली.

 

या मोहिमेत पथकाने तब्बल १ हजार २३५ बसेसची तपासणी केली. यात जादा भाडे आकारणाऱ्या ७२ बस, प्रवासी बसमधून मालवाहतूक करणाऱ्या ८१ बस, इतर गुन्हे व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ११४ बसेसवर कारवाई करण्यात आली. तसेच १६ लाख ८२ हजार २७० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

 

सणासुदीच्या काळात खासगी प्रवासी बसेसना एसटी बसच्या भाडेदरापेक्षा ५० टक्के जास्त दराने भाडे आकारणी करण्याची मुभा आहे. मात्र, त्याहून अधिक दराने भाडे आकारल्यास प्रवाशांनी संबंधित प्रशासनाकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बस ऑपरेटरने मनमानी भाडे आकारल्यास प्रवाशांनी rto.२७-mh@mah.gov.in किंवा mh२७@mahatranscom.in या ईमेल आयडीवर तक्रार नोंदवावी. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून यापुढेही अशा प्रकारची कारवाई सुरूच राहणार असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी कळविले आहे.

00000

 


आदिवासी उमेदवारांसाठी निःशुल्क स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षण

*२७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. 18 (जिमाका) : अचलपूर येथील आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्राच्या वतीने २०२६-२७ या वर्षाच्या तिसऱ्या सत्रासाठी विनामूल्य स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी इच्छुक आणि पात्र अनुसूचित जमातीच्या उमेदवारांनी दि. २७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करावे लागणार आहे.

 

शासनामार्फत आयोजित विविध पदांच्या स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेल्या विषयांचे मार्गदर्शन या केंद्रामार्फत पूर्णपणे मोफत दिले जाते. साडेतीन महिने कालावधीचे हे प्रशिक्षण दि. १ डिसेंबर २०२६ ते दि. १५ मार्च २०२७ या कालावधीत चालणार आहे.

 

प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांना दरमहा १ हजार रुपये विद्यावेतन दिले जाईल, तसेच मोफत अभ्यासिकेची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. साडेतीन महिन्यांचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना अभ्यासासाठी पुस्तकांचा संच विनामूल्य पुरविण्यात येणार आहे.

 

या प्रशिक्षणासाठी उमेदवार अनुसूचित जमाती प्रवर्गातील असावा आणि किमान दहावी उत्तीर्ण असावा. वयोमर्यादा किमान १८ ते कमाल ३० वर्षे आवश्यक आहे. उमेदवाराची जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात नोंदणी असणे बंधनकारक आहे.

 

अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र, दहावी गुणपत्रिका, पासपोर्ट आकाराचा फोटो, राष्ट्रीयीकृत बँक खात्याचा तपशील आणि जिल्हा कौशलय विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयात नोंदणी केल्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

 

अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची मुलाखत सोमवार, दि. ३० नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, लालपुलाजवळ, जयस्तंभ चौक, अचलपूर कॅम्प, परतवाडा येथे घेण्यात येणार आहे. मुलाखतीस सर्व मूळ कागदपत्रांसह स्वखर्चाने उपस्थित राहणे अनिवार्य असून, निवड यादी त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे.

 

अधिक माहितीसाठी आणि प्रवेश अर्जासाठी उमेदवारांनी अचलपूर कार्यालयाशी किंवा ०७२२३-२२१२०५, ७७०९४३२०२४, ९३५९९७६२४३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी यांनी केले आहे.

00000

पं. दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात १७२ उमेदवारांची प्राथमिक निवड

 

अमरावती, दि. १८ (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करिअर सेंटर, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने  १७ नोव्हेंबर रोजी आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात  १७२ नोकरी इच्छुक उमेदवारांची विविध पदांवर प्राथमिक निवड करण्यात आली आहे.

 

             जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अमरावती येथे १७ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या या मेळाव्याला जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या मेळाव्यात १४२ रिक्त पदांसाठी ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने एकूण २२३ उमेदवारांनी सहभाग नोंदवून प्रत्यक्ष मुलाखती दिल्या. प्रत्यक्ष मुलाखतींद्वारे १७२ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.

 

             या प्रसंगी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त प्रांजली बारस्कर, तसेच प्रमुख उद्योजक म्हणून जाधव गिअर्सचे कंपनीचे प्रतिनिधी चंद्रकांत वाघमारे, जीनस इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. चे प्रतिनिधी राजेंद्र डेहारिया, प्रिसिजन मॅपिंगचे प्रतिनिधी सचिन निचले, हेडगेवार हॉस्पिटलच्या प्रतिनिधी तृप्ती नैगुणकार, शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावतीचे प्रतिनिधी अमित काळे आणि डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती महाविद्यालय अमरावतीचे प्रतिनिधी शुभम तवलकर उपस्थित होते.

 

            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज कचरे यांनी केले, तर आकाश येवले यांनी आभार मानले.

00000

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’योजनेची ई-केवायसी  प्रक्रिया अद्याप सुरू नाही ;अफवांवर विश्वास न ठेवण्याचे प्रशासनाचे आवाहन

 

अमरावती, दि. १८ (जिमाका): ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नसून

सध्या या प्रक्रियेबाबत विविध समाज माध्यमांहून अफवा पसरवल्या जात आहेत, त्यावर लाभार्थी महिलांनी विश्वास ठेवू नये,असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय गट यांनी स्पष्ट केले आहे.

 

            राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली आहे.

 

             या योजनेची ई-केवायसी प्रक्रिया सुरू झाल्यास शासनामार्फत अधिकृत शासन निर्णयानुसार (जीआर) त्याची माहिती दिली जाईल. कोणत्याही अनधिकृत व्यक्तीच्या सांगण्यावर किंवा भुलथापांना बळी पडू नये असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. या कामासाठी कोणाकडेही पैशांची मागणी होत असल्यास कोणालाही पैसे देऊ नयेत आणि आपली आर्थिक फसवणूक टाळावी, असे कळविण्यात आले आहे.

०००००

शुक्रवारी जिल्हास्तरीय युवा संसद भाषण स्पर्धा

 

अमरावती, दि. १८ (जिमाका):युवकांमध्ये व्यसनमुक्त भारताविषयी जनजागृती करण्यासाठी ‘मेरा युवा भारत, अमरावती’ आणि ‘पी. आर. पोटे पाटील कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंट, अमरावती’ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, २० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता पी. आर. पोटे पाटील कॉलेज, अमरावती येथे 'जिल्हास्तरीय युवा संसद भाषण स्पर्धे'चे आयोजन करण्यात आल्याचे

जिल्हा युवा अधिकारी (मायभारत),अक्षय निपाणे यांनी कळविले आहे.

 

             अमली पदार्थांचे सेवन आणि व्यसनाधीनतेमुळे होणारे सामाजिक, शारीरिक व मानसिक दुष्परिणाम याबाबत तरुणांमध्ये जागरूकता निर्माण करणे, हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. तसेच युवकांची सामाजिक जबाबदारी आणि विकसित भारताच्या संकल्पनेत तरुणांची भूमिका यावरही यातून विचारमंथन केले जाणार आहे.या स्पर्धेच्या माध्यमातून युवकांना वक्तृत्व, विचारशक्ती आणि सामाजिक भान प्रदर्शित करण्याची संधी प्राप्त होणार आहे.

 

             या उपक्रमांतर्गत जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा घेण्यात येणार आहेत.राष्ट्रीय स्तरासाठी निवड झालेल्या युवकांना दिल्ली येथील संसद भवनात विचार मांडण्याची संधी मिळणार आहे.

 

            स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या युवक-युवतींना www.mybharat.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे. युवकांनी या स्पर्धेत उस्फूर्त सहभाग नोंदवून व्यसनमुक्त आणि विकसित भारताच्या संकल्पनेला बळ द्यावे, असे आवाहन करण्यात आले असून स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी 'माय भारत, अमरावती' जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधता येणार आहे.

०००००



मुख्याधिकारी पराग वानखडे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे सादर

मोर्शी नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीत झालेल्या 'ओल्या पार्टी'च्या प्रकरणी मोर्शी नगर परिषदेचे मुख्याधिकारी पराग वानखडे यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी शासनाकडे सादर केला आहे. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी दि. १४ नोव्हेंबर रोजी कारणे दाखवा नोटीस बजावून दि. १६ नोव्हेंबरपर्यंत स्पष्टीकरण मागितले होते. मात्र, मुख्याधिकाऱ्यांनी दिलेला खुलासा असमाधानकारक व वस्तुस्थितीला धरून नसल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच जिल्हा सहआयुक्त सुप्रिया टवलारे यांच्या अध्यक्षतेखाली सदस्य सचिव म्हणून अचलपूरचे मुख्याधिकारी धीरजकुमार गोहोड, तर सदस्य म्हणून कर व प्रशासकीय अधिकारी चेतन ढेवले यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.

00000

मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाला मुदतवाढ

*अंतिम मतदार यादी आता २२ डिसेंबरला प्रसिद्ध होणार

 

अमरावती, दि. 18 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येत असलेल्या 'मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम - २०२६' ला आयोगाने मुदतवाढ दिली आहे. आयोगाच्या आदेशानुसार आता अनुपस्थित, स्थलांतरित, मृत किंवा दुबार श्रेणीतील खऱ्या मतदारांना आपले गणना प्रपत्र भरून देण्यासाठी पुन्हा एक संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच अंतिम मतदार यादीचे प्रकाशन आता २२ डिसेंबर रोजी केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आशिष येरेकर यांनी दिली आहे.

 

गणना प्रपत्रे तयार करणे व मुद्रित करण्याची मुदत दि. १८ डिसेंबरपर्यंत होती. त्यानंतर गणना प्रपत्रांचे वितरण व संकलन हे दि. १८ ते ३० नोव्हेंबरपर्यंत केले जाणार आहे. ही गणना प्रपत्रे निकाली काढण्यासाठी दि. १० डिसेंबर २०२६ पर्यंत मुदत आहे.

 

सुधारीत वेळापत्रकानुसार गणना प्रपत्रबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. यात नोटीस टप्पा, दावे व हरकतींचा निपटारा दि. ३१ ऑगस्टपासून सुरू झाला असून दि. १५ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. तसेच अंतिम मतदारयादीचे प्रकाशन दि. २२ डिसेंबर रोजी केले जाणार आहे.

 

जिल्ह्यातील ३६-धामणगाव रेल्वे, ३७-बडनेरा, ३८-अमरावती, ३९-तिवसा, ४०-दर्यापूर, ४१-मेळघाट, ४२-अचलपूर आणि ४३-मोर्शी या आठही विधानसभा मतदारसंघांतील ज्या खऱ्या मतदारांची नावे काही कारणास्तव अनुपस्थित, स्थलांतरित, मृत किंवा दुबार वर्गवारीत गेली आहेत किंवा ज्यांचे गणनापत्रक भरले गेले नाहीत, अशा सर्व पात्र नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन प्रपत्र भरून द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांनी केले आहे.

00000

बालहक्क सप्ताह, बालविवाह निर्मूलन अभियानाला सुरवात

*विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन

 

अमरावती, दि. 18 (जिमाका) : संयुक्त राष्ट्र महासभेने २७ नोव्हेंबर हा दिवस ‘बालविवाह व सक्तीचे विवाह निर्मूलन आंतरराष्ट्रीय दिन’ म्हणून घोषित केला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दि.१८ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत बालहक्क सप्ताह व बालविवाह निर्मूलन अभियानांतर्गत जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

समाजात बालविवाहमुक्त वातावरण तयार करणे आणि ‘बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, २००६’ ची प्रभावी अंमलबजावणी या अभियानातून केली जाणार आहे. यात शाळा व महाविद्यालयांमध्ये जनजागृती रॅली, सामूहिक प्रतिज्ञा, निबंध, वक्तृत्व, चित्रकला व घोषवाक्य स्पर्धांचे आयोजन केले जाईल. तसेच शाळाबाह्य व शिक्षणापासून वंचित मुलींची माहिती संकलित केली जाईल. ग्रामीण व शहरी भागात ‘किशोरी सभा’ आयोजित करून किशोरवयीन आरोग्य, पोषण आणि बालविवाहाचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याविषयी समुपदेशन केले जाईल. ग्रामपंचायतींमध्ये दवंडी पिटवून जनजागृती केली जाईल व ग्रामसभेमध्ये ‘बालविवाहमुक्त गाव’ करण्याबाबतचा ठराव मंजूर केला जाईल.

 

अंगणवाडी केंद्र व गावस्तरावर किशोरी सभा, तसेच ग्राम बाल संरक्षण समितीच्या विशेष बैठकांचे आयोजन केले जाईल. महिला बचत गटांच्या माध्यमातून गावोगावी बालविवाह निर्मूलनाबाबत बैठका घेऊन कायदेशीर तरतुदींची माहिती दिली जाईल व महिलांची प्रतिज्ञा घेतली जाईल. बालविवाहाची माहिती मिळताच तात्काळ कायदेशीर प्रतिबंधात्मक कारवाई करणे, बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि पोक्सो कायद्याबाबत जनजागृती करणे, तसेच ‘चाइल्ड हेल्पलाईन १०९८’ चा प्रचार करण्यावर भर दिला जाणार आहे.

 

या कालावधीत दि. १९ ते २१ नोव्हेंबर दरम्यान पोलीस ठाणे स्तरावर बैठका, शाळा-आरोग्य सत्रे, गावात दवंडी व ग्रामपंचायत बैठका घेतल्या जाणार आहे. दि. २३ ते २६ नोव्हेंबर दरम्यान किशोरी सभा, ग्राम बाल संरक्षण समिती बैठक, शाळांमध्ये रॅली व कायदेविषयक जनजागृती केली जाईल. २७ नोव्हेंबर रोजी बालविवाह निर्मूलन आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त विशेष कार्यक्रम, सामूहिक प्रतिज्ञा आणि समुदाय सहभागातून जनजागृती केली जाईल. दि. ३० नोव्हेंबर रोजी अभियानाचा समारोप केला जाणार आहे.

 

सर्व यंत्रणांनी प्रभावी नियोजन करून अभियान राबवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले आहे.

00000


No comments:

Post a Comment