Wednesday, February 19, 2020

छत्रपती शिवाजी महाराज यांनापालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडून अभिवादन


अमरावती, दि. 19- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी शिवटेकडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी आमदार सुलभाताई खोडके, किशोर बोरकर, हरीभाऊ मोहोड यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक आदी उपस्थित होते. उपस्थितांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार वाहून अभिवादन केले. 

छत्रपती शिवाजी महाराज यांनी जनसामान्यांचे स्वराज्य स्थापन करत लोककल्याणकारी राज्यव्यवस्था निर्माण केली. ते आदर्श प्रशासक होते.  त्यांचे जीवन व कार्य संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे, असे पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी सांगितले.

विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन




अमरावती, दि. 19- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.
00000

Monday, February 17, 2020

विभागीय प्रदर्शनी व विक्री ‘वैदर्भी’ चे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन








महिलांनी धैर्याने संकटांचा सामना करावा
                                                            -पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर
* उत्कृष्ठ बचतगटांना राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार
अमरावती, दि. 17 : महिलांमध्ये समाजाला पुढे नेण्याची मोठी ताकद आहे. महिलांची आर्थिक, सामाजिक उन्नती करण्यासाठी, त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी उमेद अभियान उपयुक्त आहे. महिलांनी सक्षमीकरणासाठी स्वत:चे निर्णय स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपून कणखर होणे व कुठल्याही परिस्थितीत संकटाला डगमगून न जाता धैर्याने सामना करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.
            येथील सांयन्सकोअर मैदानावर विभागीय आयुक्त व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय प्रदर्शनी व विक्री ‘ वैदर्भी ’ चे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार सुलभाताई खोडके, विभागीय आयुक्त पियूष सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, उप आयुक्त (विकास) सुहास वेदमुख, प्रकल्प संचालक विनय ठमके, सहायक आयुक्त विलास जाधव, जि. प. पदाधिकारी यांच्यासह पाचही जिल्ह्यातील स्वयं सहायता बचतगटाचा महिला यावेळी उपस्थित होत्या.
यावेळी विशेष कामगिरी केलेल्या महिला बचतगटांचा मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार व इतर पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. रोख रक्कमेचा धनादेश व प्रमाणपत्र असे पुरस्कारचे स्वरुप आहे.  तीन महिला बचतगटांना दोन लक्ष रुपये कर्जाचे धनादेश मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.
श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, उमेद अभियानाव्दारे ग्रामीण भागातील महिलांचे सर्वांगिण विकास करण्यात येते. या अभियानांतर्गत गरीब, गरजू कुटुंबांना आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी क्षमता बांधणी करुन विविध व्यवसाय व रोजगाराच्या संधी महिलांना उपलब्ध करुन दिल्या जाते. महिलांचे स्वयं सहाय्यता समूह स्थापन करुन बँकाव्दारे कर्जाच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ दिल्या जाते. महिला बचतगटाव्दारे निर्माण केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी विभागस्तरावर तसेच जिल्हास्तरावर प्रदर्शनी व विक्रीचे दालन उभारण्यात येते. ईथे आयोजित प्रदर्शनीच्या माध्यमातून महिला बचतगटांनी तयार केलेल्या उत्तम बाजारपेठ मिळणार तसेच या माध्यमातून आर्थिक सुबत्ता मिळेल.
महिलांव्दारे एकजूटीने निर्माण करण्यात आलेल्या बचतगटाचे विविध उपक्रम खरोखरच प्रशंसनीय आहे. महिला सक्षमीकरणाला पुरस्कृत करणारे राज्य शासन असल्यामुळे महिलांना सुध्दा प्रोत्साहन मिळत आहे. महिलांनी कुठल्याही संकटांना न घाबरता निर्भयपणे धैर्याने संकटांचा सामना करावा. महिलामध्ये समाजात सुधार घडवून आणण्याची ताकद आहे. महिलांनी काही न बोलता अन्याय सहन केले तर अन्यायग्रस्त समाजाची निर्मिती होते, तर संकटांना समोर जावून पूर्ण ताकदनिशी सामना केला तर सक्षम समाजाची निर्मिती होते. महिलांनी न बोलण्यामुळे अनेक विदारक घटना राज्यात घटत आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी पहिल्याचवेळी तत्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करा. तुमच्यातील आतला आवाज दाबू नका, घाबरु नका, बोलते व्हा, स्वत:साठी बोला, कुटूंबातील सदस्यांना सर्व गोष्टी शेअर करा. कोणत्याही संकटांचा धैयाने सामना करा. जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उध्दारी या उक्तीप्रमाणे जगाच्या कल्याणासाठी समाजाच्या हितासाठी प्रत्येक संकटांचा धैर्याने सामना करा. घरात किंवा बाहेर इतरत्र घडत असलेल्या वाईट गोष्टींना वेळीच आळा घालण्यासाठी पुढाकार घ्या, वेळीच त्यावर प्रतिबंधात्मक उपाय करा, असे भावनिक आवाहन श्रीमती ठाकूर यांनी यावेळी केले.
            महिला स्वयं सहाय्यता समूहाव्दारे उत्पादीत वस्तुंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी जिल्हा स्तरावर मॉल उपलब्ध करण्याचे आमदार सुलभाताई खोडके यांनी निर्देशित केले. याप्रसंगी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल असेही त्यांनी आश्वासीत केले.
श्री. सिंह म्हणाले की, उमेद अभियान अंतर्गत महिला बचत गटाव्दारे निर्मित उत्पादनांना विभागस्तराव तसेच जिल्हास्तरावर बाजारपेठ उपलब्ध करुन दिली जाते. अभियानच्या माध्यमातून विभागात सुमारे 33 हजार महिला बचतगटांची निर्मिती करण्यात आली असून त्यापैकी 7 हजार 957 समूहांना 14 कोटी 42 लक्ष खेळते भांडवल वितरीत करण्यात आले आहे. विभागातील विविध महिला बचतगटांना बँकाव्दारे सुमारे 144 कोटी रुपयांचे कर्ज वितरीत करण्यात आले आहे. त्यांच्याव्दारे कर्ज परतफेडीचे 98 टक्के प्रमाण आहे, तर एनपीए प्रमाण अतिशय नगण्य आहे. या बचतगटाच्या माध्यमातून ग्रामीण भागात आर्थिक सुबत्ता आली आहे. त्यांच्याव्दारे विविध लोकहितकारी उपक्रम सुध्दा राबविण्यात येतात. सात दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनीमध्ये नागरिकांचा उर्त्स्फूत प्रतिसाद मिळणार असून महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांची खरेदी होणार आहे.
श्री. येडगे म्हणाले की, विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हा परिषद प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने विभागातील पाचही जिल्ह्यांचे बचतगटांचे सात दिवस प्रदर्शनीचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले आहे. विविध बचतगटांचे जवळपास 187 स्टॉल्स या प्रदशर्नीत उभारण्यात आले आहे. त्यापैकी 30 स्टॉल्स खाद्यान पदार्थचे आहे. बचतगटाव्दारे तयार करण्यात आलेल्या वस्तुंचे प्रदर्शन याठिकाणी भरविण्यात आले आहे. बचतगटांच्या सर्वांगिण विकासासाठी शासनाव्दारे दशसुत्री कार्यक्रम राबविण्यात येत आहे. ग्रामीण कला संस्कृतीच दर्शन यावेळच्या प्रदर्शनीची थीम आहे. यासोबतच स्वच्छ भारत अभियान, प्लॉस्टीक मुक्त भारत संकल्पना राबविण्यासाठी दोन स्टॉल्सच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जाणीवजागृती करण्यात येणार आहे. मुंबईच्या महालक्ष्मी सरस च्या धर्तीवर येथील वैदर्भी प्रदर्शनी यशस्वी व दिमाखदार ठरणार आहे. जिल्ह्यात 32 हजार 957 महिला स्वयं सहायता बचतगट कार्यरत असून त्यांच्याव्दारे निर्मित उत्पादनांना बाजारपेठ मध्ये चांगली मागणी आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पुरस्कार्थी महिला बचतगट :
अमरावती जिल्हा
प्रथम पुरस्कार - यशोधरा महिला स्वयं सहायता समूह, चांदूर बाजार-  10 हजार रुपये रोख व प्रमाणपत्र
व्दितीय पुरस्कार- गणेश महिला स्वयं सहाय्यता समूह, मोर्शी- 7 हजार रुपये रोख व प्रमाणपत्र
तृतीय पुरस्कार- संजीवनी महिला स्वयं सहाय्यता समूह, मोर्शी- 5 हजार रुपये रोख व प्रमाणपत्र
यवतमाळ जिल्हा-
प्रथम पुरस्कार - जगदंबा महिला स्वयं सहायता समूह, पांढरकवडा -10 हजार रुपये रोख व प्रमाणपत्र
व्दितीय पुरस्कार- भीमज्योती महिला स्वयं सहाय्यता समूह, बाभूळगाव - 7 हजार रुपये रोख व प्रमाणपत्र
तृतीय पुरस्कार- जयलक्ष्मी महिला स्वयं सहाय्यता समूह, कळंब -- 5 हजार रुपये रोख व प्रमाणपत्र
अकोला जिल्हा
प्रथम पुरस्कार – संत गजानन महिला स्वयं सहायता समूह, अकोट-  10 हजार रुपये रोख व प्रमाणपत्र
व्दितीय पुरस्कार- नवोदय महिला स्वयं सहाय्यता समूह, अकोला- 7 हजार रुपये रोख व प्रमाणपत्र
तृतीय पुरस्कार- एकता महिला स्वयं सहाय्यता समूह, मुर्तीजापूर - 5 हजार रुपये रोख व प्रमाणपत्र
बुलडाणा जिल्हा
प्रथम पुरस्कार – आदर्श महिला स्वयं सहायता समूह, जळगावं जामोद-  10 हजार रुपये रोख व प्रमाणपत्र
व्दितीय पुरस्कार- भारतीय महिला स्वयं सहाय्यता समूह, सिंदखेड राजा- 7 हजार रुपये रोख व प्रमाणपत्र
तृतीय पुरस्कार- एकता महिला स्वयं सहाय्यता समूह, जळगाव जा.- 5 हजार रुपये रोख व प्रमाणपत्र

वाशिम जिल्हा
प्रथम पुरस्कार -शामकीमाता गजानन महिला स्वयं सहायता समूह,मानोरा-  10 हजार रुपये रोख व प्रमाणपत्र
व्दितीय पुरस्कार- प्रगती महिला स्वयं सहाय्यता समूह, मानोरा- 7 हजार रुपये रोख व प्रमाणपत्र
तृतीय पुरस्कार-सुजाता महिला स्वयं सहाय्यता समूह, वाशिम - 5 हजार रुपये रोख व प्रमाणपत्र

000000

Saturday, February 15, 2020

शेतात भरणा-या शाळेला आता मिळणार छत


                          

वीटभट्टी मजूरांच्या मुलांच्या शाळेसाठी राज्यमंत्र्यांकडून 60 हजार रूपयांची मदत

                    शाळेसाठी जूनमध्ये ठोस उपाययोजना करणार

-          जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

अमरावती, दि. 15 :  शिक्षकांकडून अंजनगाव बारीजवळ वीटभट्टी मजुरांसाठी शेतात चालविल्या जाणा-या शाळेला जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी भेट दिली व ही शाळा तत्काळ स्थानिक परिसरातील पक्क्या इमारतीत हलविण्यासाठी साठ हजार रूपयांची मदत केली. याबाबत येत्या जूनमध्ये ठोस उपाययोजना करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. यामुळे शेतात भरणा-या या शाळेला हक्काचे छत मिळणार आहे.   

अंजनगाव बारीनजिक एका शेतात वीटभट्टी मजुरांच्या मुलांसाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांकडून शाळा भरवली जात आहे. याबाबत माध्यमांतून माहिती मिळताच राज्यमंत्री श्री. कडू यांनी स्वत: या शाळेला भेट दिली व तेथील शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शेतात भरणा-या या शाळेला तत्काळ स्थानिक परिसरात पक्की इमारत मिळावी यासाठी त्यांनी साठ हजार रूपयांची मदत केली. त्याचप्रमाणे, येत्या जूनमध्ये याबाबत ठोस उपाययोजना करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.  

मेळघाटातील दुर्गम भागातील आदिवासी कुटुंबे रोजगारासाठी आपल्या मुलांबाळासह अंजनगाव बारी येथे येऊन त्याठिकाणी असलेल्या वीटभट्ट्यांवर काम करतात. साधारणत: दिवाळी ते होळी असा हा कालावधी असतो. मात्र, यामुळे त्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहतात. त्यामुळे अंजनगाव बारी येथील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी दिलीप अडवाणी यांच्या शेतात वीटभट्टी शाळा सुरु केली. चिखलदरा तालुक्यातील 56 शाळाबाह्य मुलांना या शाळेतून शिक्षण मिळत आहे. अंगणवाडीतील 13 व पहिली ते आठवीपर्यंतच्या 43 मुलांचा यात समावेश आहे.

                            

चमक येथे राहुटी उपक्रमाचा शेकडो नागरिकांना लाभ

 

                                      राहुटी उपक्रमात सातत्य राखणार

-जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

 

अमरावती, दि. १5 : राहुटी उपक्रमाचा सर्वसामान्य नागरिकांना लाभ मिळून त्यांच्या अनेक अडचणींचा निपटारा होत आहे. या उपक्रमात यापुढेही सातत्य राखण्यात येईल, असे जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी आज चमक येथे सांगितले. 

जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या संकल्पनेतून सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी राहुटी उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने आज अचलपूर तालुक्यातील चमक येथे राहुटी उपक्रम घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

परिसरातील शेकडो नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. यावेळी शिधापत्रिका, आधारकार्ड, वयाचा दाखला यासह विविध कागदपत्रांसाठीच्या अर्जांचा, तसेच विविध विभागांशी संबंधित अडचणींचा निपटारा  करण्यात आला. राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी स्वतः नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व अधिका-यांना कार्यवाहीचे निर्देश दिले.

            उपक्रमात येणा-या प्रत्येक नागरिकाच्या अडचणी, मागणी याबाबत तत्काळ कार्यवाहीसाठी सर्व विभागांचे अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. नागरिकांना अर्ज लिहिण्यापासून आवश्यक कागदपत्रे मिळविण्यासाठी सहाय्य करण्यासाठी ठिकठिकाणी स्वयंसेवकही हजर होते. अर्ज वाटप व लेखन कक्षासह तलाठी कक्ष, वैद्यकीय अधीक्षक कक्ष, दिव्यांग कक्ष, पाणी पुरवठा विभाग, विद्युत कक्ष, सामाजिक न्याय विभाग, कामगार कल्याण, सिंचन, पशुसंवर्धन, आदिवासी विकास, महिला व बालविकास कक्ष आदी कक्षांचा समावेश होता.  

 

अर्ज निवेदनांवरील तत्काळ कार्यवाहीप्रमाणेच प्रधानमंत्री मातृवंदन योजना, पोषण अभियान, दिव्यांगासाठी योजना यासह विविध महत्वपूर्ण योजनांबाबत विविध विभागांच्या दालनातून नागरिकांना माहिती देण्यात आली व त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले. परिसरातील दिव्यांग नागरिक, महिला, वृद्ध नागरिक, ज्येष्ठ नागरिक, युवक, युवती आदी शेकडो नागरिकांनी उपक्रमाचा लाभ घेतला. 

                                    000

पालकमंत्र्यांकडून एमआयडीसी परिसराची पाहणी





दूषित पाण्याचा उपद्रव तत्काळ रोखा
                                         - पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचे निर्देश

अमरावती, दि. १५ : येथील एसएमएस कंपनीकडून नांदगावपेठ औद्योगिक वसाहतीच्या परिसरात दूषित पाणी सोडले जात असल्याने आजूबाजूच्या शेतीचे नुकसान होत असल्याची तक्रार होत आहे.  याबाबत तात्काळ कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी येथे दिले. 
कंपनीकडून दूषित पाणी सोडले जात असल्याच्या तक्रारीची दखल घेत पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी काल नांदगावपेठ एमआयडीसीला भेट दिली व पाहणी केली, तसेच यावेळी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना कार्यवाहीचे निर्देश दिले. 
            कंपनीकडून दूषित पाणी नांदगाव पेठ औद्योगिक वसाहत परिसरामध्ये सोडले जात असल्याने पाणी स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन  पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी होत होती तसेच या भागातील विहिरीमध्ये सुद्धा या पाण्याचा निचरा होऊन विहिरींचे पाणी दूषित होत असल्याच्या तक्रारी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांना प्राप्त झाल्या. त्याअनुषंगाने लवकरात लवकर याबाबतीत उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
औद्योगिक वसाहतीतील इतर विषयांचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. एमआयडीसीचे अनेक अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. 
00000

Friday, February 14, 2020

राहुटी उपक्रमाद्वारे नागरिकांच्या विविध अडचणींचे निराकरण - जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू









अमरावती, दि. १४ : जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या संकल्पनेतून सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी राहुटी उपक्रम राबविण्यात येत आहे. अचलपूर तालुक्यात आज आयोजित राहुटी उपक्रमाचा आज शेकडो नागरिकांनी लाभ घेतला.  जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चूभाऊ कडू यांनी स्वत: यावेळी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व प्रशासनाला तत्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले.
आज सकाळी अचलपूर तालुक्यातील कविठा बु. ग्राम पंचायतीत, त्यानंतर मेघनाथपूर बसस्टॉप येथे राहुटी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विविध शासकीय विभागांचे अधिकारी- कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
शिधापत्रिका, आधारकार्ड यासह विविध कागदपत्रांसाठीच्या अर्जांचा, तसेच विविध विभागांशी संबंधित अडचणींचा निपटारा राहुटी उपक्रमातून होत आहे. गेल्या पंधरवड्यापासून विविध गावांत हा उपक्रम सुरू असून, राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू हे स्वतः नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेत आहेत. सर्व कार्यालयांचा राहुटी उपक्रमात सहभाग असून, विविध विभागांबाबतच्या तक्रारींचे निवारण एकाच छताखाली होत आहे.
मेघनाथपूर येथे आयोजित राहुटीत वासणी प्रकल्पग्रस्तांच्या प्रमाणपत्रांच्या अनुषंगाने अर्ज भरुन घेण्यात आले.

राहुटी उपक्रमात नागरिकांना अर्ज उपलब्ध करून देणे, लेखन साहाय्य करण्यासाठी अर्ज वाटप व लेखन  कक्ष उपलब्ध करून देण्यात आला आहे. तलाठी कक्ष, वैद्यकीय अधीक्षक कक्ष, दिव्यांग कक्ष, पाणी पुरवठा विभाग, विद्युत कक्ष, सामाजिक न्याय विभाग, कामगार कल्याण, सिंचन, पशुसंवर्धन, आदिवासी विकास, महिला व बालविकास कक्ष आदी कक्षांचा उपक्रमात समावेश आहे.  या दालनांतून समस्यांच्या निराकरणासह विविध योजनांची माहितीही नागरिकांना दिली जात आहे. उपक्रमामुळे वृद्ध, ज्येष्ठ नागरिक, महिला, तरूण आदी सर्वसामान्य नागरिकांची अनेक प्रलंबित कामे मार्गी लागत आहेत.
00000

#पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर_शेतकरी_कर्जमुक्ती_योजना २०२६

  #पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर_शेतकरी_कर्जमुक्ती_योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #अहिल्यादेवीहोळकर #कर्जमुक्तीयोजना2026 #FarmerWelfare #...