Sunday, March 1, 2020

राज्य मराठी पत्रकार परिषदेचे एक दिवसीय संमेलन

















        समाजाच्या चौफेर प्रश्नांची जाण ठेवून सकारात्मक पत्रकारिता करावी
                                                                 -राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू
अमरावती, दि. 1 : पत्रकार हा सदृढ समाज घडविण्यामध्ये महत्वाची भूमिका निभावत असतो. पत्रकारांनी बातमीत वापरलेल्या एखाद्या द्विअर्थी शब्दामुळे त्याचे चांगले किंवा वाईट पडसाद समाज मनावर उमटत असतात. त्यामुळे पत्रकारांनी लेखन करतांना समाजाच्या चौफेर प्रश्नांची जाण ठेवून, परीणामांचे चिंतन करुन सकारात्मक पत्रकारिता करावी, असे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चूभाऊ कडू यांनी आज येथे सांगितले.
मध्यप्रदेशच्या बैतुल तालुक्यातील मुक्तागिरी या जैनांच्या तिर्थस्थळी राज्यस्तरीय पत्रकार परिषदेचे एक दिवसीय संमेलन आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. अमरावती जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक (ग्रामीण) हरीबालाजी एन., प्रतिदिन अखबारचे संपादक नानक आहुजा, परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलथे, जिल्हाध्यक्ष नितीन किल्लेकर, मुक्तागिरीचे संस्थाध्यक्ष अतुल कळमकर, नागपूर महाराष्ट्र टाईम्स चे निवासी संपादक श्रीपाद अपराजित यांच्यासह परिषदेचे पदाधिकारी व पत्रकार बांधव आदी यावेळी उपस्थित होते.
 श्री. कडू म्हणाले की, परतवाडा पासून दहा किलोमिटरच्या अंतरावर असलेले मुक्तागिरी हे तिर्थक्षेत्र जैनांची काशी आहे तर यापासून थोड्या अंतरावर बहिरमबुवाचे दैवत आहे. दोन्ही देवस्थान लोकांची श्रध्दास्थाने आहेत. या परिसराचा विकास तसेच याठिकाणी पोहाचण्याच्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार. त्यामुळे भाविकांना या तिर्थक्षेत्री पोहोचणे सोईचे होईल.
पत्रकार व पत्रकारिते संदर्भात बोलायचे झाले तर पत्रकारांच्या लेखणीतून राजकीय माणूस घडतो तसा बुडतो सुध्दा. सकारात्मक पत्रकारितेतून माणूस घडत असतो. बातमीचे दोन प्रकार आहेत एक विरुधार्थी तर दुसरी अनुकूलक. पत्रकारिता ही दुधारी तलवार आहे. या तलवारीच्या माध्यमातून पत्रकाराने समाजातील चौफेर प्रश्नांची मांडणी करुन ते सोडविण्यासाठी सकारात्मक लिखान करावे. त्यामुळेच वैचारिक व सदृढ समाजाची निर्मिती होऊ शकणार. जळगावातील तीन अपंग व्यक्ती पडलेल्या घरात वास्तव्य करीत असल्याची बातमी व फोटो वृत्तपत्रातून प्रसिध्द झाल्यामुळे त्या निराधार-दिव्यांग कुंटूंबाला घर मिळून त्यांचे पुनवर्सन होऊ शकले. महात्मा फुले यांच्या एका पुस्तकात पत्रकाराला कलम कसाई म्हटले आहे, ही बाब सत्य असल्याची प्रचीती विविध प्रसंगातून दिसून येते. असे न घडता, समाजहितकारी जनतेच्या कल्याणासाठीची पत्रकारिता करावी. विषयाच्या संदर्भानुसार मुळ आशय धरुनच बातमीचे लिखान करावे, अशी अपेक्षा राज्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.
पुढे बोलतांना राज्यमंत्री म्हणाले की, पत्रकारांना अगदी तुटपूंज्या मानधनात पत्रकारितेचे काम करावे लागते, हे सत्य असून पत्रकारांच्या समस्या व अडचणी मुख्यमंत्र्यांना निवेदनाव्दारे सादर करुन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. पत्रकारांसाठी शासकीय योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी शासन दरबारी प्रस्ताव सादर करण्यात येईल. तालुक्याच्या ठिकाणी पत्रकारांसाठी उत्कृष्ठ संकल्पनेचे पत्रकार भवन निर्मितीसाठी प्रयत्न करण्यात येईल, असेही त्यांनी संमेलनात सांगितले.
पोलीस अधिक्षक हरीबालाजी एन. म्हणाले की, प्रसारमाध्यमांना लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणतात. लोकशाहीमध्ये शासनाकडून पारदर्शक काम व्हावे, यासाठी प्रसारमाध्यमांची भूमिका फार महत्वाची आहे. समाजाला भेडसावणाऱ्या अनेक प्रश्नांना पत्रकारांच्या लेखणीतून वाचा फोडली जाते. त्यांच्या बातमीमुळेच प्रशासनाकडून दखल घेऊन वेळीच कार्यवाही केली जाते. अनुचित प्रकारांना प्रतिबंध लावला जातो. प्रसारमाध्यम हे शासनाचे कान, नाक, डोळे म्हणून काम करीत असतात. त्यामुळे पत्रकारांनी नगारिकांचे तसेच समाजाचे भान ठेवून पत्रकारिता करावी, असे त्यांनी यावेळी सांगितले.
श्री. आहूजा म्हणाले की, पत्रकारितेचा आता काळ बदलला आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून ब्रेकींग न्यूजचे पेव आले आहे. मोबाईलच्या माध्यमातून सर्वप्रथम बातमी वाचकांना मिळू लागली आहे. परंतू आजही वृत्तपत्रातूनच वाचकांना विस्तृत्‍ बातमी वाचयला आवडते. त्यामुळे मुद्रीत माध्यम असलेल्या वृत्तपत्रांचे महत्व टिकून आहे. ग्रामीण भागातील पत्रकारांना पत्रकारिता करण्यासाठी अधिकृत ओळखपत्र शासनाकडून जारी झाले तर आणखी चांगल्याप्रकारे बातमीचे विस्तृतीकरण नागरिकांना वाचायला मिळेल. पत्रकारांना देण्यात येणाऱ्या अधिस्विकृती पत्रिका वृत्तपत्रांचा कोटा वाढविण्याची मागणी त्यांनी राज्यमंत्र्यांसमोर मांडली. ज्यामुळे ग्रामीण वार्ताहाराला सुध्दा पत्रिकेचे वितरण होऊ शकेल.
यावेळी राज्यमंत्र्यांनी परमपुज्य जैन मुनी यांचे दर्शन घेऊन आर्शिवाद घेतले.
मुक्तागिरीचे संस्थाध्यक्ष अतुल कळमकर यांनी मुक्तागिरी तिर्थक्षेत्रासंबंधी उपस्थितांना माहिती दिली. परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष श्री. कुलथे यांनी परिषदेच्या कामकाजाविषयी व भूमिकेसंदर्भात प्रास्ताविकातून माहिती दिली.
संमेलनात राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू व नानक आहुजा यांना जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते  देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस अधिक्षक हरीबालाजी एन यांचाही शाल,श्रीफळ, स्मृतीचिन्ह व मुक्तागिरीचा तिर्थक्षेत्राची फ्रेम देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी लोकमतचे प्रतिनिधी अनिल कडू, उद्योजक सुनील अग्रवाल, महाराष्ट्र टाईम्सचे श्रीपाद अपराजीत, अध्ययन समाचारचे संपादक जितेंद्र रोडे, वार्ताहार इर्शाद अहमद, अश्विन शहा, विनायक येवले यांच्यासह अन्य पत्रकारांचे मान्यवरांच्या हस्ते नवदर्पण पुरस्कार देऊन सत्कार आला. संमेलनाला नांदेड, पुणे, नागपूर, खामगाव, चिखलदरा, धारणी, अचलपमर तालुक्यातील पत्रकारमंडळी उपस्थित होती.
ज्येष्ठ पत्रकार संजय जोशी यांनी सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.

Thursday, February 27, 2020

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विभागीय ग्रंथालयात दुर्मिळ ग्रंथप्रदर्शन








अमरावती, दि. 27 : विभागीय ग्रंथालय, जिल्हा ग्रंथालय व जिल्हा माहिती कार्यालयातर्फे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त येथील विभागीय ग्रंथालयात दुर्मिळ ग्रंथांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. त्याला विद्यार्थी, अभ्यासक, विविध क्षेत्रांतील मान्यवर व नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट दिली.  
ग्रंथप्रदर्शनाचा शुभारंभ निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांच्या हस्ते झाला. विभागीय माहिती उपसंचालक राधाकृष्ण मुळी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सूरज मडावी, सहायक संचालक राजेश पाटील, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार आदी उपस्थित होते. प्रारंभी कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला डॉ. व्यवहारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
ग्रंथप्रदर्शनात 1960 व तत्पूर्वीच्या अनेक साहित्यकृतींचा समावेश करण्यात आला. कवी कुसुमाग्रज यांच्या कवितासंग्रहांसह इतर वाङमयप्रकारातील साहित्यकृती मांडण्यात आल्या होत्या. अनेक प्रसिद्ध पुस्तकांच्या सुरुवातीच्या आवृत्ती प्रदर्शनात रसिकांना पाहता आल्या. ज्ञानेश्वरीच्या हिंदी अनुवादाची प्रत, लीळाचरित्रावरील ग्रंथ, विश्वकोशाचे खंड, विविध कोश यांचाही प्रदर्शनात समावेश होता.  
दुर्मिळ पुस्तके हा संस्कृतीचा ठेवा आहे. त्यांचे जतन योग्य पद्धतीने व्हावे, आवश्यक त्या पुस्तकांचे डिजीटायझेशन आदी करता येते किंवा कसे, या दृष्टीने प्रयत्न व्हावेत, अशी सूचना डॉ. व्यवहारे यांनी यावेळी केली. कार्यक्रमाला ग्रंथप्रेमी, विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती.
                                  000 

Tuesday, February 25, 2020

जनगणनेबाबत अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण





जनगणनेसाठी येणाऱ्या प्रगणकांना
नागरिकांनी व्यवस्थित माहिती द्यावी
                                                                                                                                                  -डॉ. नितीन व्यवहारे

*जनसहभागातून ….जनकल्याण…. ब्रीद वाक्य

*1 मे ते 15 जून दरम्यान जनगणना

अमरावती, दि. 25 :  संपूर्ण भारत देशात 2021 वर्षच्या जनगणनेला 1 मे पासून शुभारंभ होणार आहे. दि. 1 मे ते 15 जून दरम्यान राज्यातील प्रत्येक घरांची गणना होणार असून दि. 9 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2021 दरम्यान प्रत्यक्ष व्यक्ती गणना (शीर गणती) करुन माहितीचे सत्यापण होणार आहे. जनगणनेच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या लोकसंख्येच्या माहितीच्या आधारे देशात कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी व ध्येय धोरणे ठरविण्यासाठी सहाय्य होते, त्यामुळे नागरिकांनी जनगणना करण्यासाठी येणाऱ्या प्रगणकांना व्यवस्थित व खरी माहिती द्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी कार्यशाळेत दिली.
जनसहभागातून…जनकल्याण… हे या जनगणनेचे ब्रीद वाक्य आहे. म्हणजे तुमच्याच(नागरिकांच्या) सहभागातून तुमचेच (नागरिकांचे) कल्याण होणार. या जनगणनेत नागरिकांची माहिती जनगणना संचालनालयाच्या सीएमएमएस पोर्टलवर ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पध्दतीने नोंदविली जाणार असल्याने माहितीचे निरंतर साठवणूक होऊन डिजीटलायझेजन होणार आहे, त्यामुळे ही  जनगणना पूर्वीच्या जनगणनेपेक्षा महत्वपूर्ण ठरणार आहे.
 जनगणना संचालनालय व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय प्रबोधिनी येथे चार्ज जनगणना अधिकारी (ग्रामीण व शहरी) तसेच रेग्युलर असिस्टंट (जनगणना लिपीक) यांचे 24 व 25 फेब्रुवारी या दोन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री. व्यवहारे बोलत होते.
प्रशिक्षण सत्राला सर्व उपविभागीय अधिकारी, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा सांख्यिकी अधिकारी, महानगरपालिका उपायुक्त, सर्व तहसीलदार, नगरपालिकेचे मुख्याधिकारी सर्व संबधीत जनगनणना लिपीक, तसेच जनगणना संचालनालयाचे उपसंचालक डॉ. रघु अनुमोलू, प्रशिक्षक प्रवीण भगत, रामनाथ पथवे, संदीप कुलकर्णी, अमरावती जिल्हा समन्वयक वसंत शेंडे, आदी यावेळी उपस्थित होते.
दोन दिवसीय प्रशिक्षण सत्राचे सोमवारी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. आज रोजी प्रशिक्षणाचा दुसरा दिवस होता. या जनगणनेमध्ये घरांची यादी, व्यक्ती गणना, घरगणनेसह राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टरचे अद्यावतीकरण करण्यात येणार आहे.
या जनगणनेच्या प्रक्रियेत जिल्हाधिकारी हे प्रधान जनगणना अधिकारी म्हणून जिल्ह्यासाठी जबाबदारी पार पाडणार आहे. तर महानगरपालिका क्षेत्रासाठी मनपा आयुक्त हे प्रधान जनगणना अधिकारी असणार. निवासी उपजिल्हाधिकारी हे अतिरिक्त जनगणना अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी यांच्यावतीने संपूर्ण कामकाज पाहतील. चौदा तालुक्यातील तहसीलदार तसेच चौदा नगरपालिकांचे मुख्याधिकारी हे चार्ज जनगणना अधिकारी म्हणून कामकाज पाहतील. याव्यतिरिक्त महापालिका क्षेत्रात पाच चार्ज जनगणना अधिकारी असणार. असे एकूण 34 चार्ज जनगणना अधिकाऱ्यांची जनगणना संचालनालयाव्दारे नेमणूक करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक चार्ज जनगणना अधिकाऱ्यांसाठी दोन तांत्रिक सहायक यांची नेमणूक करण्यात आली आहे.
चार्ज जनगणना अधिकारी यांच्या प्रशिक्षणासाठी चार मास्टर ट्रेनर नियुक्त करण्यात आले असून यांच्याव्दारे 95 फिल्ड ट्रेनर यांना प्रशिक्षण दिल्या जाणार. या  95 फिल्ड ट्रेनरमार्फत 5 हजार 340 प्रगणकांना जनगणने संदर्भात तांत्रिक व महत्वपूर्ण बाबी याविषयी प्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती मास्टर ट्रेनर तथा तहसीलदार अभिजीत जगताप यांनी दिली.
00000

Saturday, February 22, 2020

जिल्हाधिकारी कार्यालयात संत गाडगे बाबा महाराज यांना अभिवादन




अमरावती, दि. 19- संत गाडगे बाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी संत गाडगे बाबा महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी विधी अधिकारी नरेंद्र बोहरा यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनी ही संत गाडगे बाबा महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.
00000

अचलपूर दूध संकलन-विक्री केंद्र



                                          
प्रकल्प निर्मितीसाठी निधीचे नियोजन करावे
                                                  - राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू
अमरावती, दि. 23 : अचलपूर येथे निर्माण होणाऱ्या दूध संकलन केंद्रासाठी प्रकल्प निर्मितीच्या अनुषंगाने निधीचे नियोजन करताना केंद्र सरकार, राज्य शासन व टाटा ट्रस्ट आदींकडून निधीची तरतूद करुन प्रकल्प पूर्णत्वास आणावा, असे निर्देश जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चूभाऊ कडू यांनी आज बैठकीत दिले.
येथील सिंचन भवन विश्रामगृहात पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय वाढ संदर्भात आढावा राज्यमंत्र्यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मोहन गोहोत्रे यांच्यासह यांच्यासह दुग्ध विकास विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
 श्री. कडू म्हणाले की, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करुन द्यायावयाचे असल्यास दूध उत्पादन वाढविणे व त्यावरील खर्च कमी होणे आवश्यक आहे. कोरडवाहू शेतीक्षेत्र व अपुरे सिंचन यामुळे चारा निर्मितीसाठी मर्यादा येते. अशा स्थितीत कमी पाण्यात अधिक चारा निर्मिती पर्याय शोधून शेतकऱ्यांच्या उपलब्धतेसाठी प्रयत्न करावे. कमी लागवडीमध्ये पशुखाद्य निर्मितीचे उत्तम नियोजन करावे. शासनाच्या ई क्लास जमीनीवर चारा निर्मितीसाठी जमीनी ताब्यात घेऊन त्यावर चारा निर्मिती करावी. गायीचा वार्षिक खर्च किती होतो. तसेच गायीपासून मिळणारे उत्पन्न व त्यासाठी येणारा खर्च याचे शास्त्रशुध्द तक्ता तयार करण्यात यावा.
दुधाळ जनावरांना पुरेसे पशुखाद्य उपलब्ध होईल यासाठी बारा महिन्याचे पशुखाद्य व औषधीचे वेळेनुसार नियोजित आराखडा तयार करावा. सर्व ऋतूंमध्ये पशुसाठी चारा उपलब्ध होईल यादृष्टीने वैरण व्यवस्था भक्कम झाली पाहिजे. पशु खाद्याचे मासिक विवरणपत्र तयार करुन त्यानुसार चारानिर्मितीचे नियोजन करावे. दुधाळ पशुंना कुठल्या महिन्यात रोग अधिक बळवतात व त्यावर प्रतिबंधात्मक उपाय कसा करावा, याची माहिती गोळा करावी. शेतकरी आत्महत्या रोखण्यामध्ये दुग्ध उत्पादनांची वाढ प्रभावी उपाय ठरु शकते, असेही श्री. कडू यावेळी सांगितले.
सुरुवातीला चांदुरबाजार व अचलपूर तालुक्यात दूध संकलन व विक्री केंद्र हा पायलट प्रोजेक्ट म्हणून प्रकल्प राबवावा. दूध संकलन व विक्री केंद्राच्या उभारणीनंतर येणाऱ्या कमतरता, अडचणी तसेच फायदे-तोटे जाणून घेतल्यावर हा प्रयोग राज्यभरात राबविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. दूध विक्री तसेच प्रक्रिया उद्योग व दूधापासून तयार होणाऱ्या पदार्थांवर नफा किती मिळतो याची आकडेवारी घ्यावी. त्यानुसार शेतकऱ्यांना केंद्रात दूध विक्रीचे फायदे व तोटे आदी संदर्भात मार्गदर्शन करावे, असेही श्री. कडू यांनी सांगितले.
                                                   000

Thursday, February 20, 2020

खनिज प्रतिष्ठान अंतर्गत येणारी प्रस्तावित विकास कामे गतीने पूर्ण करा - पालकमंत्री यशोमती ठाकूर




अमरावती, दि. 20 : जिल्हा खनिज प्रतिष्ठानकडून 43 विकास कामे करण्यासाठी 13 कोटी 30 लक्ष निधी मंजूर करण्यात आलेला आहे. मंजूर निधीतून जिल्ह्यातील प्रस्तावित विकास कामे गतीने पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले.
 विभागीय आयुक्त कार्यालयात आज जिल्हा खनिज प्रतिष्ठाण अंतर्गत प्राप्त व वितरीत निधी संदर्भात आढावा पालकमंत्र्यांनी घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंत वानखडे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.
            श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत 13 कोटी 30 लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी 43 कामाकरीता रुपये 6 कोटी 65 लक्ष निधी विकास कामे पूर्ण करण्यासाठी संबंधीत शासकीय यंत्रणांना वितरीत करण्यात आला आहे. राज्य शासन राबवित असलेल्या पायाभूत सुविधा, शिक्षण, कौशल्य विकास आदी योजनेतून निधीची उपलब्धता झाल्याने लोककल्याणकारी कामे कुठल्याही परिस्थितीत पूर्ण झाली पाहिजे. प्राप्त निधीच्या अनुषंगाने चांदूरबाजार, भातकुली, अमरावती, तिवसा, मोर्शी, वरुड, दर्यापूर तसेच अमरावती महानगरपालिकेच्या हद्दीतील विकास कामे पूर्ण करण्यात येणार आहे. मंजूर आराखडा व निधीची उपलब्धतेनुसार अपूर्ण कामे संबंधीत यंत्रणांनी गतीने पूर्ण करावी. मार्च 2020 अखेरपर्यंत सर्व कामे पूर्ण होईल यादृष्टीने प्रयत्न व्हावेत.
            त्या पुढे म्हणाल्या की, सार्वजनिक बांधकाम विभागाला विकास कामे पूर्ण करण्यासाठी निधीची आवश्यकता असल्यास तत्काळ मागणी नोंदवावी. मुरमाळ जमीन व इतर क्षेत्रात पांदण रस्त्याची कामे गतीने पूर्ण करावी. तिवसा तालुक्यातील क्रीडा संकुलाचा रस्ता बांधकाम व टाकरखेडा येथील पुल बांधकाम आदी कामे प्राधान्याने पूर्ण करावी. जी कामे विहीत कालमर्यादेत पूर्ण होऊ शकत नाही, अशा कामांचा निधी तत्काळ नियोजन विभागाला वर्ग करण्यात यावा. तसेच ज्या कामांना अधिक निधीची आवश्यकता असल्यास त्यासंदर्भात प्रस्तावानुरुप निधीची मागणी करावी.
            खनिज प्रतिष्ठान अंतर्गत प्राप्त झालेल्या निधीचा पायाभूत सुविधा निर्मितीवरच खर्च होणे अपेक्षीत आहे. लोकहितकारी विकास कामे करतांना ती कायमस्वरुपी व गुणवत्तापूर्ण होईल यासाठी प्रत्येक शासकीय यत्रणांनी जबाबदारीपूर्वक काम करावे, असे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले.
           बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, नियोजन विभाग यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
00000

पालकमंत्र्यांकडून विविध विकासकामांबाबत आढावा








                    अपूर्ण कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश
                   आवश्यक कामांसाठी निधी मिळवून देऊ
-         पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर
अमरावती, दि. 20 : जिल्ह्यात विविध विकास आराखड्यातील अपूर्ण कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. आवश्यक व नव्या कामांसाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून अतिरिक्त निधी मिळवून देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंत वानखडे, विभागीय आयुक्त पियूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. 
पालकमंत्री श्रीमती ठाकूर यावेळी म्हणाल्या की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांच्या पावनस्पर्शाने पुनित झालेल्या स्थळांचा विकास विविध प्रकल्पांच्या उभारणीतून होत आहे. आराखड्यानुसार  आधी अपूर्ण कामे पूर्णत्वास न्यावीत. नव्या कामांसाठी अतिरिक्त निधी शासन स्तरावर पाठपुरावा करून मिळवून देण्यात येईल.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मोझरी विकास आराखडा एकूण 150 कोटी 83 लाख रुपयांचा आहे. सुमारे 142 कोटी निधी वितरित करण्यात आला असून, विविध विकास कामे होत आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या  वास्तव्याने पुनित वास्तूंचे जतन व संवर्धन करताना परिसरात नव्या सुविधांची निर्मिती  आराखड्यात अंतर्भूत आहे. त्यानुसार भक्तनिवास, बहुउद्देशीय सभागृह, तलाव सौंदर्यीकरण, काँक्रीट रस्ते, हायमास्ट पोल, ग्रामविकास प्रबोधिनी आदी कामांचा समावेश आहे. तिवसा क्रीडा संकुल, क्लब हाऊस, स्विमिंग पूल आदी कामांना गती द्यावी. आवश्यक कामांसाठी आमदार फंडातूनही काही निधी देण्यात येईल. 
तिवसा येथे उपजिल्हा रुग्णालयाबाबत प्रस्तावाचा पाठपुरावा करावा, असे निर्देशही त्यांनी दिले.

संत गाडगेबाबा निर्वाणभूमी वलगाव विकास आराखड्यात ३७.८६ कोटी निधीतून  विविध कामे होत आहेत. त्याचप्रमाणे, कौंडण्यपूर विकास आराखड्यात रिंगण सोहळा, काँक्रिट छत्री, नदी घाटाचे बांधकामे आदी कामे पूर्णत्वास जात असून, पर्यटक निवास, प्रसाधनगृह, उपाहारगृह आदी कामे तत्काळ पूर्ण होणे गरजेचे आहे. उपलब्ध निधीतून अपूर्ण कामे तत्काळ पूर्ण करावीत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
            बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभाग,सार्वजनिक आरोग्य विभाग, नियोजन विभाग यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

रुख्मिणी गणेशोत्सव मंडळात ‘आरोग्य शिबिर’ आणि लोकसंवाद उपक्रमाचे आयोजन

  सायन्सकोर मैदान येथील रुख्मिणी गणेशोत्सव मंडळात ‘आरोग्य शिबिर' आणि ‘लोकसंवाद’ कार्यक्रम          अमरावती, दि. 22 (जिमाका) : मुख्...