Tuesday, August 10, 2021

कपडे, वस्तू नुकसानीबाबत भरपाई; शासनाकडून जिल्ह्यांना निधी वितरीत - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 


अतिवृष्टीबाधितांना मदतीसाठी शासनाचा निर्णय

कपडे, वस्तू नुकसानीबाबत भरपाई; शासनाकडून जिल्ह्यांना निधी वितरीत

- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 10 : अतिवृष्टीनंतर शेतीनुकसानीची पंचनाम्याची प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झाली आहे. घरातील कपडे, वस्तू नुकसानीबाबतही शासनाकडून मदत जाहीर करण्यात आली असून, त्याचा निधी वितरीत करण्याचा शासन निर्णयही निर्गमित करण्यात आला आहे. महाविकास आघाडी शासन आपद्ग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली.

            जिल्ह्यातील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पालकमंत्र्यांनी गावोगावी जाऊन पाहणी केली व पंचनामे सविस्तर व गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार घरांची पडझड व नुकसानीचे पंचनामे गतीने पूर्ण करण्यात आले. शेतीनुकसानीच्या पंचनाम्याची प्रक्रियाही जवळजवळ पूर्ण झाली आहे. या अनुषंगाने शासनाकडून मदत मिळण्यासाठी पालकमंत्र्यांकडून सातत्याने पाठपुरावा होत आहे. शेतकरी बांधवांची व्यथा जाणून त्यांना अधिकाधिक मदत मिळवून देण्यासाठी पंचनामे सविस्तर व परिपूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे. विमाधारक शेतकऱ्यांना तत्काळ लाभ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र संपर्क यंत्रणा उभारण्यात आली आहे. पूर नियंत्रणासाठी कायमस्वरूपी योजना हाती घेण्यात येत आहेत.

            घरात पाणी शिरून झालेल्या नुकसानीबाबत शासनातर्फे मदत जाहीर करण्यात आली आहे. गत महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने बाधित कुटुंबांना कपडे, तसेच भांडी, घरगुती वस्तू यांच्या नुकसानीसाठी मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कपड्यांच्या नुकसानीसाठी प्रतिकुटुंब पाच हजार रूपये, घरगुती भांडी, वस्तूंच्या नुकसानीसाठी प्रतिकुटुंब पाच हजार रूपये मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सर्व बाबींसाठी 46 कोटी 58 लक्ष 33 हजार रूपये रक्कम जिल्ह्यांना वितरीत करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

पंचनामे करण्यात आल्यावर लाभार्थी निश्चित करून त्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम थेट हस्तांतरित करावी. मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यावर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा, असे आदेश देण्यात आले आहेत.

            शेतीनुकसानीचे पंचनाम्याची प्रक्रियाही पूर्ण करण्यात येऊन मदतीच्या प्रस्तावाचा पाठपुरावा शासनस्तरावर करण्यात येईल. एकही आपद्ग्रस्त शेतकरी वंचित राहू नये, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यंत्रणेला दिले आहेत.

 

 

कोरोना प्रतिबंधक नियम पाळून स्वातंत्र्यदिन होणार साजरा

 



स्वातंत्र्यदिन पूर्वतयारीचा ‘आरडीसीं’कडून आढावा

कोरोना प्रतिबंधक नियम पाळून स्वातंत्र्यदिन होणार साजरा

सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून जबाबदारी पार पाडावी

-         निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे

            अमरावती, दि. 10 : भारतीय स्वातंत्र्याच्या ७४ व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात रविवार, 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजून 5 मिनीटे यावेळी आयोजिण्यात आला आहे. मुख्य ध्वजारोहण समारंभासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून जबाबदारी पार पाडावी, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी आज येथे दिले.

स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृह क्र. 1 येथे बैठक निवासी उपजिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. महसूल, पोलीस, महापालिका,  सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, माहिती कार्यालय आदी विविध कार्यालयांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

 श्री. व्यवहारे म्हणाले की, मुख्य ध्वजारोहण सोहळ्यात पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करुन समारंभ होणार आहे. मुख्य शासकीय कार्यक्रमाच्या अनुषंगाने कार्यक्रमस्थळी स्वच्छता करणे, रंगरंगोटी, कुंड्या ठेवणे, पताका लावणे, गणमान्य व्यक्ती व अधिकाऱ्यांना उभे राहण्यासाठी चौकट रंगविणे आदी कामे नियोजनबध्द पद्धतीने पूर्ण करण्यात यावीत. ध्वजवंदन समितीने ध्वज स्तंभ, राष्ट्रध्वज, ध्वजाला मानवंदना, पोलीस पथकांची,  बँड पथकाची नियुक्ती आदी कामे स्वातंत्र्यदिनाच्या आधीच पूर्ण करुन घ्यावी, अशा सूचना श्री. व्यवहारे यांनी बैठकीत दिल्या.

 उपविभागीय मुख्यालय व तालुका मुख्यालयी अनुक्रमे प्रांत अधिकारी व तहसीलदार आणि ग्रामपंचायत मुख्यालय येथे सरपंच किंवा गाव प्रमुख हे ध्वजारोहण करतील. स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसैनिक, शहिद जवानांच्या पत्नींना व आई-वडील तसेच कोरोनायोध्दे जसे डॉक्टर्स, सफाई कामगार, आरोग्यसेवक यांच्यासह या आजारावर मात केलेल्या काही नागरिकांना निमंत्रीत करावे. कोरोना विषाणूची पार्श्वभूमी विचारात घेता स्वातंत्र्यदिनाचा संपूर्ण कार्यक्रम भौतिक अंतर संदर्भातील सर्व नियम पाळून संपन्न होईल, याची खबरदारी घेण्याचे निर्देश घेण्यात आले.

0000

 

 

 

 

 

 

 

Thursday, August 5, 2021

जिल्हाधिका-यांकडून जिल्हा नियोजनाचा आढावा







 जिल्हाधिका-यांकडून जिल्हा नियोजनाचा आढावा

 कामे पूर्ण होण्यासाठी प्रस्ताव तत्काळ सादर करा

-         जिल्हाधिकारी पवनीत कौर

अमरावती, दि. 5 : जिल्हा नियोजनानुसार नियोजित कामे विहित मुदतीत पूर्ण होण्यासाठी तत्काळ प्रस्ताव देण्याचे आदेश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे दिले.

जिल्हा वार्षिक योजनेत खर्च व नियोजित कामांचा आढावा जिल्हाधिका-यांनी नियोजनभवनातील बैठकीत घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे यांच्यासह विविध विभागप्रमुख, तसेच इतर अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हा वार्षिक योजनेत विविध विकासकामांसाठी 300 कोटी रुपयांची तरतूद आहे. कोविडकाळ लक्षात घेऊन कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी प्राधान्य देण्यात आले आहे व पहिल्या टप्प्यात त्यासाठी 10 टक्के तरतूद वितरीत करण्यात आली आहे. अशी कामे वेळेत पूर्ण व्हावीत. त्याचप्रमाणे, अपेक्षित कामांसाठी वेळेत प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.

2020-21 मधील तरतुदीनुसार प्राप्त निधी व खर्चाचा आढावा जिल्हाधिका-यांनी यावेळी घेतला. त्यात अखर्चित निधी असेल तर तो तत्काळ समर्पित करण्यात यावा. नियोजित कामांबाबत तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही पूर्ण करून घ्यावी जेणेकरून निधी प्राप्त होऊन कामांना चालना मिळेल. नियोजित कामे विहित मुदतीत पूर्ण होणे आवश्यक आहे, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी यावेळी दिले.

कृषी व संलग्न सेवा, ग्रामविकास, पाटबंधारे व पूरनियंत्रण, ऊर्जा, मृदसंधारण, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, पाटबंधारे, रस्ते, पाणीपुरवठा, इमारती, शिक्षण, आरोग्य, क्रीडाविषयक उपक्रम, औद्योगिक प्रशिक्षण, शासकीय तंत्रशाळांचे बांधकाम आदींशी संबंधित विविध विकासकामांसाठी वार्षिक नियोजनात 300 कोटी रूपयांची तरतूद आहे. कोविड उपाययोजना कामांना प्राधान्य देण्यात येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रूग्णालये, प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे बांधकाम व विस्तारीकरण, आरोग्य सुविधांत वाढ, महिला रूग्णालयाचे बांधकाम व विस्तारीकरण, यंत्रसामुग्री खरेदी आदींसाठी 27 कोटी 62 लाख रूपये अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर आहे, अशी माहिती श्रीमती भाकरे यांनी दिली. जिल्हा नियोजन समितीचे बळकटीकरण, नाविन्यपूर्ण योजना, पुनर्वनरोपण, वनीकरण, मत्स्यसंवर्धन आदी विविध बाबींचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.

000


Monday, August 2, 2021

अनाथ चिमुकल्यांना महिला व बालविकास मंत्र्यांनी मिळवून दिला आधार





अनाथ चिमुकल्यांना महिला व बालविकास मंत्र्यांनी मिळवून दिला आधार

 

अमरावती, दि. 2 : मातापित्यांचे छत्र हरविलेल्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी तरतूद करत महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी त्यांना आधार मिळवून दिला. 

            अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील माळेगाव येथील चार मुलींचे छत्र हरपले. त्यात  विधी प्रवीण राठोड या तीन वर्षाच्या, तसेच तिची बहीण परिंदी या सहा वर्षाच्या चिमुकलीचा समावेश आहे.  त्यांच्याबरोबरच नीलम वानखेडे आणि नयना वानखेडे या अनुक्रमे तेरा आणि पंधरा वर्षांच्या मुलीही अनाथ झाल्या. त्यांच्या नातेवाईकांनी महिला बालविकास मंत्री श्रीमती ठाकूर यांची भेट घेऊन माहिती दिली. त्यांची व्यथा ऐकून महिला व बालविकास मंत्री श्रीमती ठाकूर यांनी तत्काळ प्रशासकीय अधिकाऱ्यांना बोलावून या मुलींच्या शिक्षणाची आणि भविष्यासाठी तरतुदीची सोय केली.

            मात्र, विधी व परिंदी या मुली वयाने लहान असल्याने त्यांना अनाथालयात पाठवणे शक्य नव्हते. त्यामुळे श्रीमती ठाकूर यांनी त्यांना स्वतःच्या मोझरी येथील शाळेत निवासाची आणि मोफत शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. या दोन्ही मुलींना म्हातारी आजी हाच एकमेव आधार आहे. मात्र, आजी थकल्यामुळे मुलींच्या भविष्याबाबत त्यांना चिंता लागून राहिली होती. त्यांची व्यथा जाणून पालकमंत्र्यांनी या दोन्ही चिमुकल्यांना आपल्या शाळेत निवारा मिळवून देण्याचा निर्णय घेतला.

 वयाच्या सहाव्या आणि तिसऱ्या वर्षी दोघींचेही मातापित्यांचे छत्र हरवले. त्यामुळे त्यांचे भविष्य अंधारमय होते. मात्र, मोझरी येथील शाळेत निवासी आणि शिक्षणाची सोय झाली. त्यामुळे त्यांच्या संगोपन व शिक्षणाची सोय झाली, याचे समाधान असल्याची भावना चिमुकल्यांच्या आजींनी व्यक्त केली.

 

000000

स्व. पुसतकर यांचे कार्य सर्वांनी समन्वयाने पुढे न्यावे - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

               










    

              स्व. सोमेश्वर पुसतकर लोकगौरव पुरस्कार नानक रोटी ट्रस्टला प्रदान

                                    स्व. पुसतकर यांचे कार्य सर्वांनी समन्वयाने पुढे न्यावे

-          पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती, दि. 2 : स्व. सोमेश्वर पुसतकर यांनी राजकारणाबरोबरच समाजकारण व विविध क्षेत्रांत अतुलनीय कामगिरी केली. अमरावती शहर व जिल्ह्यात अनेकविध विधायक उपक्रम त्यांनी राबवले. त्यांचे कार्य कृतीतून पुढे नेण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.  

            लोक फाऊंडेशनतर्फे स्व. सोमेश्वर पुसतकर यांच्या पहिल्या स्मृतिदिनी लोकगौरव पुरस्कार नानक रोटी ट्रस्टला विविध मान्यवरांच्या उपस्थितीत श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या सभागृहात समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. माजी आमदार बी. टी. देशमुख अध्यक्षस्थानी होते. जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू, वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्यासह विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

                        सामाजिक क्षेत्रात काम करणा-यांना प्रोत्साहनासाठी फाऊंडेशनतर्फे मानचिन्ह, मानपत्रासह 1 लाख रूपयांचा पुरस्कार यंदापासून देण्यात येत आहे. त्यानुसार पहिला पुरस्कार नानक रोटी ट्रस्टचे मनोज पारसवानी व इतर सदस्यांनी यावेळी स्वीकारला.

                                स्व. पुसतकर हे जातपात, पक्ष, विचारधारा हा विचार न करता सार्वजनिक कामात झोकून देणारे सच्चे व तळमळीचे कार्यकर्ते होते. अशाच समन्वयातून त्यांचे कार्य आम्हा सर्वांना पुढे न्यायचे आहे, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

            राज्यमंत्री श्री. कडू म्हणाले की, स्व. पुसतकर हे अभ्यासू व व्यासंगी कार्यकर्ते व राजकारणापलीकडील व्यक्तिमत्व होते. कुठलेही पद न मिळवताही त्यांनी अनेक मोठी कामे यशस्वी केली. पुरस्कारप्राप्त नानकरोटी ट्रस्टने तळागाळातील गरजू व्यक्तींसाठी मोलाचे कार्य हाती घेतले आहे. गरीब व गरजू अन्न पुरविण्याची निकड लक्षात घेऊन आपणही गाडगेबाबा रोटी हा उपक्रम सुरू केला आहे.

            श्री. देशमुख म्हणाले की, स्व. पुसतकर यांचा व्यासंग दांडगा होता. ते अत्यंत गांभीर्याने प्रश्न जाणून घेत व त्याच्या निराकरणासाठी कष्टपूर्वक प्रयत्न करीत. अनुशेषाचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी अभ्यासपूर्वक पाठपुरावा केला. उत्तम ग्रंथांचे वाचन व सज्जनांचा सहवास ही जीवनवृक्षाची दोन मधुर फळे आहेत, या संस्कृत सुभाषिताप्रमाणे स्व. पुसतकर यांनी स्वत:चे व्यक्तित्व घडवले. या सच्च्या कार्यकर्त्याच्या नावाचा पुरस्कार नानक रोटी ट्रस्टला मिळाला. ही सार्थ निवड असल्याचेही श्री. देशमुख म्हणाले.    

                        स्व. पुसतकर यांच्या कार्याची ओळख म्हणून श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या सभागृहाला यांचे नाव देण्यात येत असल्याची घोषणा श्री. वैद्य यांनी केली.  

यावेळी स्व. पुसतकर यांच्या व्यक्तित्व व कार्यावर प्रकाश टाकणारी डॉक्युमेंटरीही दाखविण्यात आली. पत्रकार अविनाश दुधे यांनी प्रास्ताविक केले. वैभव दलाल यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेते भारत गणेशपुरे यांच्यासह राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शिक्षण आदी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

                        000


Sunday, August 1, 2021

लोकशाहीरांनी कष्टकऱ्यांच्या चळवळीत चैतन्य जागविले - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

                                             लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती समारोह

लोकशाहीरांनी कष्टकऱ्यांच्या चळवळीत चैतन्य जागविले

                                             - पालकमंत्री ॲड. यशोमती  ठाकूर

 

अमरावती, दि. 1 : लोकशाहीर, थोर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनी श्रमिकांच्या मनात क्रांतीची ठिणगी पेटविली. कष्टकरी, कामगार आणि शेतकऱ्यांच्या व्यथा- वेदनांना शब्द आणि आवाज देतानाच लोकशाहीरांनी चळवळीत चैतन्य जागवले, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त माताखिडकी येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी पालकमंत्र्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

          पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, लोकशाहीर अण्णा भाऊंनी स्वातंत्र्य संग्राम आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोठे  योगदान दिले आहे. त्यांनी श्रमिकांच्या चळवळीत चैतन्य जागवले. पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून, कष्टकऱ्यांच्या व श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे, असे ठामपणे सांगत त्यांनी मनामनात क्रांतीची ठिणगी पेटविली.

            या समारोहाला आयोजक प्रभाकर वाळसे, माजी महापौर विलास इंगोले, माजी जि.प. सभापती जयंतराव देशमुख, महापालिकेचे विरोधी पक्षनेते बबलूभाऊ शेखवत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 




स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे पालकमंत्र्यांच्या हस्ते अनावरण








 स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे पालकमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

स्व. चव्हाण हे पुरोगामी महाराष्ट्राची जडणघडण करणारे थोर नेते

                              - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती, दि. 1 : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांनी केवळ राजकीयच नव्हे तर सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात ठसा उमटवला. त्यांच्या कार्याने पुरोगामी महाराष्ट्राची जडणघडण झाली व महाराष्ट्र सदोदित देशात अग्रेसर राज्य राहिले, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.

            यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या विभागीय केंद्राच्या प्रांगणात स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते आज झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.  विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. ई. वायुनंदन नाशिकहून आभासी पध्दतीने उपस्थित होते. कार्यक्रमाला कुलसचिव दिनेश भोंडे, विभागीय संचालक अंबादास मोहिते, डॉ. संजय खडतकार, डॉ. नारायण मेहरे, पी. के. मोहन, उपकुलसचिव चंद्रकांत पवार, विवेक ओक, आर्कीटेक्ट वर्षा वऱ्हाडे, गणेश खारकर, जयंतराव देशमुख, हरीभाऊ मोहोड आदी उपस्थित होते.

            पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, स्व. चव्हाण  यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तीमत्वाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यास मिळाले, ही माझ्यासाठी सौभाग्याची बाब आहे. त्यांच्या प्रेरणादायी व्यक्तीमत्वापासून आम्हा सर्वांना प्रेरणा, शिकवण मिळत असते. विद्यापीठाच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करु, अशी ग्वाहीही पालकमंत्र्यांनी दिली.

            याप्रसंगी पालकमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. वनौषधींचे उद्यान परिसरात विकसित करण्यात येत असल्याची माहिती श्री. मोहिते यांनी यावेळी दिली.

            श्री. मोहिते यांनी प्रास्ताविक केले. संजय खडसे यांनी आभार मानले. सुरज हेरे यांनी सुत्रसंचालन केले.

0000

दुष्काळाच्या आव्हानात, आपली छोटी कृती करू शकते पाण्याची मोठी बचत! #दुष्काळ #पाणीबचत

  दुष्काळाच्या आव्हानात, आपली छोटी कृती करू शकते पाण्याची मोठी बचत! #दुष्काळ #पाणीबचत