Friday, October 25, 2024

DIO NEWS AMRAVATI 25.10.2024

 

जिल्ह्यात आज 15 उमेदवारांचे नामांकन अर्ज दाखल

अमरावती, दि. 25 : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत नामांकन अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी 15 उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले. अमरावती -1 , बडनेरा – 2, अचलपूर – 1, मेळघाट – 2, मोर्शी – 1, तिवसा – 2, दर्यापूर – 3, धामणगाव रेल्वे – 3 उमेदवारांनी अर्ज दाखल केले.

36 धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघात निलम देविदासजी रंगारकर – देश जनहित पार्टी, अक्षयकुमार नारायण गुडधे – आंबेडकरवादी रिपब्लीकन पार्टी, प्रताप अरूणराव अडसड – भारतीय जनता पाटी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

37 बडनेरा विधानसभा मतदारसंघात राहुल नाना काजळे – अपक्ष, ॲड. राजू बक्षी जामनेरकर – अपक्ष यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

38 अमरावती विधानसभा मतदारसंघात अनुष्का विजय बेलोरकर – अपक्ष यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

39 तिवसा विधानसभा मतदारसंघात कमलसिंह विजयसिंह चितोडिया – अपक्ष, प्रदिप गंगाधर महाजन – अपक्ष यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

40 दर्यापूर विधानसभा मतदारसंघात ॲड. विद्यासागर गंगारामजी वानखडे – बहुजन समाज पार्टी, संजय हिरामणजी आठवले – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), शरद जानराव आठवले – अपक्ष यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

41 मेळघाट विधानसभा मतदारसंघात महेंद्र किशोर पटेल – अपक्ष, श्यामकुमार कृपाराम पटोरकर – अपक्ष यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

42 अचलपूर विधानसभा मतदारसंघात प्रविण वसंतराव तायडे – भारतीय जनता पक्ष यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

43 मोर्शी विधानसभा मतदारसंघात श्रीधर प्रभाकरराव सोलव – भारतीय जनता पक्ष यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

000000

शालेय नेटबॉल क्रीडा स्पर्धेतून चार राज्यसंघाची निवड

        अमरावती, दि. 25 (जिमाका) : अमरावती येथील राज्यस्तरीय शालेय नेटबॉल क्रीडा स्पर्धेतून 14 आणि 19 वर्षे वयोगटातील मुले आणि मुलींच्या संघाची निवड करण्यात आली. निवड करण्यात आलेले संघ राष्ट्रीय स्पर्धेत राज्याचे नेतृत्व करणार आहे.

14 वर्षे मुले राज्याच्या संघात आदित्य सावरकर, अमरावती विभाग, इंशात जांभेबर अमरावती विभाग, अर्णव गवळी छत्रपती संभाजीनगर विभाग, मयुर पाटील नाशिक विभाग, शार्दुल औताळे पुणे विभाग, राजवीर वैभव पाटील कोल्हापूर विभाग, कपिल कोल्हे नागपूर विभाग, साहिल फिरोज मुलानी कोल्हापूर विभाग, विरोचंद रमेश शिंदे छत्रपती संभाजीनगर विभाग, स्मित देवाणी मुंबई विभाग, आयुष डोळस नाशिक विभाग, सौम्या सतदेवे नागपूर विभाग, राखीव खेळाडू ओजस देवलकर, कोल्हापूर विभाग, राज कुकडे अमरावती विभाग, संस्कार गायकवाड छत्रपती संभाजी नगर विभाग, निलेश भडके छत्रपती संभाजी नगर विभाग, श्र्लोक डफळे पुणे विभाग यांची निवड करण्यात आली आहे.

            14 वर्षे मुलीच्या संघात वंशिका कातोरे नागपूर विभाग, स्नेहा पापडकर अमरावती विभाग, अंशू राजकुळे अमरावती विभाग, आर्या चव्हाण छत्रपती संभाजी नगर विभाग, कशिश साळुंखे मुंबई विभाग, रिचल अंभग पुणे विभाग, तनया विकास भारे पुणे विभाग, प्रिती यादव कोल्हापूर विभाग, अनुष्का शिंदे कोल्हापूर विभाग, स्वाती बबलू उईके नागपूर विभाग, सांची कदम लातूर विभाग, समृद्धी वारटे नाशिक विभाग, राखीव खेळाडू अश्लेषा डोंबाळे नाशिक विभाग, वैदही सोनवणे अमरावती विभाग, नेत्रा कानसारा मुंबई विभाग, श्रीजा कांबळे कोल्हापूर विभाग, नंदिनी शेबे अमरावती विभाग यांची निवड करण्यात आली.

            19 वर्षे मुलांच्या संघात सुजल प्रभाकर बोरकर अमरावती विभाग, शिवम बाळकृष्ण आंधळे अमरावती विभाग, दिवांशू सचिन नंदनवार नागपूर विभाग, सागर ज्ञानेश्वर किर्पण नागपूर विभाग, आशिष शिवाजी गायकवाड छत्रपती संभाजी नगर विभाग, हितेश नितीन सोनवणे नाशिक विभाग, अर्थव सुभाष माने कोल्हापूर विभाग, नंदराज संतोष मालुसरे पुणे विभाग, कुशाग्रा राजेशसिंग मुंबई विभाग, सक्षम प्रविण कुपटीकर लातूर विभाग, साहित्य राजेश जोगी नागपूर विभाग, सुरज मातादीन देवीकर अमरावती विभाग, राखीव खेळाडू अक्षय ललीत पाटे नाशिक विभाग, क्रीष्णा ईश्वर गावंडे  नाशिक विभाग, ओंकार विष्णू कदम कोल्हापूर विभाग, प्रतिक विजय सिरसाट अमरावती विभाग, आदित्य संजय करचे पुणे विभाग यांची निवड करण्यात आली.

            19 वर्षे मुलीच्या संघात जानव्ही संजय बावनकुळे नागपूर विभाग, क्रिष्णा त्र्यंबक घुले नागपूर विभाग, आश्लेषा भास्‍कर गिरी अमरावती विभाग, हनी विनोद देशमुख अमरावती विभाग, वैभवी दिपक खैरनार नाशिक विभाग, साक्षी संजय पाटील नाशिक विभाग, खुशी संदिप दळे पुणे विभाग, रिचा संजय नवसुपे छत्रपती संभाजी नगर विभाग, शिवाणी संजय पाटील  कोल्हापूर विभाग, मानसी शेखर वायकोस छत्रपती संभाजी नगर विभाग, सिद्धी विजयसिंह मोरे कोल्हापूर विभाग, मानसी सुधीर तिगोटे मुंबई विभाग, राखीव खेळाडू हेनी शैलेश लाड मुंबई विभाग, धनिष्का आनंद कावळे नागपूर विभाग, वैष्णवी संदीप वानखडे अमरावती विभाग, श्रद्धा बालाजी जगताप लातूर विभाग, अनुष्का सयाजी घाडगे पुणे विभाग यांची निवड करण्यात आली.

00000

शेतकऱ्यांनी फळपिक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन

        अमरावती, दि. 25 (जिमाका) : जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना सन 2024-25 व 2025-26 या दोन वर्षासाठी राबविण्यास राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे. जिल्ह्यात आंबिया बहार 2024 मध्ये संत्रा, मोसंबी, केळी, पपई या चार फळपिकासाठी अधिसुचित क्षेत्रामध्ये योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

            अवेळी, जास्त पाऊस, कमी, जास्त तापमान, वेगाचा वारा, गारपिट, जास्त पाऊस व आर्द्रता, दैनंदिन कमी तापमान या हवामान धोक्यांपासून य योजनेंतर्गत संरक्षण दिले जाते. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक आहे. सर्वसाधारपणे महसूल मंडळात फळ पिकाखाली 20 हेक्टर किंवा त्याहून अधिक उत्पादनक्षम क्षेत्र असलेल्या महसूल मंडळांना फळपिकासाठी अधिसुचित करण्यात येवून त्या ठिकाणी ही योजना राबविण्यात येते.

            जिल्ह्यात सदर योजना युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमीटेड, 103, पहिला माळा एमएआयडीसी, आकृती स्टार, सेंट्रल रोड, अंधेरी पूर्व, मुंबई, 400093, टोल फ्री क्र. 1800224030, 18002004030, ई-मेल contactus@universalsompo.com च्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे.

            जिल्ह्यात समाविष्ट फळपिके व पिकनिहाय प्रती हेक्टर विमा संरक्षित रक्कम आणि शेतकऱ्याने भरावयाचा विमा हप्ता पुढीलप्रमाणे आहे. संत्रा पिकामध्ये प्रति हेक्टर विमा संरक्षित 1 लाख तर गारपीट 33 हजार आहे. शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता प्रती हेक्टर 5 हजार ते 8 हजार 500 तर गारपीट 1650 ते 2805 रूपये आहे. मोसंबी पिकासाठी नियमित हवामान धोकेमध्ये 1 लाख, तर गारपीट 33 हजार, शेतकऱ्यांनी भरावयाचे विमा हप्ता 5 हजार, तर गारपिटी साठी 1650 प्रति हेक्टर आहे. केळी 1 लाख 70 हजार तर गारपीट 57 हजार, शेतकऱ्यांनी भरावयाचे विमा हप्ता 8 हजार 500, तर प्रति हेक्टर 2850 रूपये आहे. पपई पिकासाठी 40 हजार, तर गारपीट 13 हजार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाचे विमा हप्ता 2 हजार तर गारपिटीसाठी प्रति हेक्टर 650 आहे.

            योजनेत भाग घेण्यासाठी संत्रा पिकासाठी अंतिम दि. 30 नोव्हेंबर, मोसंबीसाठी दि. 31 ऑक्टोबर, केळीसाठी दि. 31 ऑक्टोबर, पपईसाठी दि. 31 ऑक्टोबर आहे.

सदर योजना अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील अधिसूचित फळपिकांसाठी आहे. योजना कर्जदार, तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. योजनेत खातेदाराचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी भाग घेण्यास पात्र आहेत. मात्र भाडेपट्टीने शेती करणारा नोंदणीकृत भाडेकरार पिक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे. केंद्र शासनाने त्यांचे विमा हप्ता अनुदान 30 टक्के दरापर्यंत मर्यादित केले आहे. त्यामुळे 30 टक्के वरील विमा हप्ता राज्य शासन व शेतकरी यांनी स्विकारणे क्रमप्राप्त आहे. योजनेंतर्गत 30 ते 35 टक्के पर्यंतचे अतिरिक्त 5 टक्के विमा हप्ता दायित्व राज्य शासनाने स्विकारले असून 35 टक्के वरील विमा हप्ता राज्य शासन व शेतकरी यांनी प्रत्येकी 50 टक्के याप्रमाणे भरावयाचे आहे. योजनेत प्रति शेतकरी सहभागासाठी कोकण वगळता उर्वरित विभागासाठी कमीत कमी उत्पादनक्षम क्षेत्र 20 गुंठेची मर्यादा आहे. तसेच जास्तीत जास्त क्षेत्र मर्यादा ही सर्व फळपिके व दोन्ही हंगाम, मिळुन प्रति शेतकरी 4 हेक्टर मर्यादेपर्यंत राहणार आहे. अधिसूचित फळपिकांपैकी एका फळपिकासाठी एका वर्षात क्षेत्रावर मृग अथवा आंबिया बहरापैकी कोणत्याही एकाच हंगामासाठी विमा संरक्षणासाठी अर्ज करता येणार आहे. फळपिक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यानी ई-पिक पाहणी करणे बंधनकारक आहे.

            विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आणि विमा नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांचे बँक खाते आधार आधारीत पेमेंटसाठी लिंक असावे. केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षण लागू राहणार आहे. यासाठी संत्रा आणि मोसंबीसाठी फळपिकांचे वय 3 वर्षे आवश्यक आहे. याबाबत अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील दि. 12 जुन 2024 रोजीचा शासन निर्णय पहावा. तसेच संबंधित विमा कंपनी, तालुका कृषि अधिकारी कार्यालयासाठी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.

00000

‘उर्ध्व वर्धा’तून रब्बी सिंचनासाठी पाच पाणीपाळ्या प्रस्तावित

शेतक-यांना अर्ज करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 25 (जिमाका): उर्ध्व वर्धा प्रकल्पातून रब्बी हंगामासाठी  पाणीसाठा उपलब्ध असून पाच पाणी पाळ्या देण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी लाभक्षेत्रातील शेतकरी बांधवांनी 10 नोव्हेंबरपूर्वी संबंधित शाखा कार्यालयास अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

उजवा मुख्य कालव्याच्या आरंभापासून  95.50 किमीपर्यंत व डावा मुख्य कालव्याच्या  42.40 किमीपर्यंतच्या लाभक्षेत्रातील सर्व वितरिका, जलाशयावरील अधिसूचित नदीनाल्यांवरील लाभधारकांना रब्बी हंगामासाठी  पाणी देण्यात येईल. वितरण व्यवस्थेद्वारे जिथे सुलभपणे पाणी जाऊ शकते तिथपर्यंत कालवा संचलन कार्यक्रमानुसार  ‘पुच्छ भागाकडून ते मुखाकडे’ (टेल टु हेड) या तत्त्वानुसार सिंचन होणे आवश्यक आहे.

नोव्हेंबर ते मार्च दरम्यान पाच वेळा पाणी मिळेल

कालव्याचे प्रवाही किंवा कालव्यावरील, नदी-नाल्यांवरील मंजूर उपसा सिंचन योजनांद्वारे सिंचनासाठी पाणी घ्यावयाचे असल्यास पाणी मागणी अर्ज नमुना क्र. 7 संबंधित शाखा कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत. ते भरून 10  नोव्हेंबरपर्यंत तिथेच सादर करावेत, असे आवाहन उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे. रब्बी हंगामात  नोव्हेंबर 2024 अखेरपर्यंत  या कालावधीत मागणीप्रमाणे पाच पाणी पाळ्या देण्यात येतील.

लाभधारकांनी नियम पाळणे आवश्यक

            इच्छुक लाभधारकांनी त्यांच्याकडील थकबाकीची एक तृतीयांश व चालू हंगामाची अग्रिम पाणीपट्टी भरावी. उपसा सिंचन लाभधारकांनी नळमार्गावर पाणी मोजमाप यंत्र बसवावे. पिकांचे मागणी क्षेत्र 20 आर या पटीत असावे. पाणी अर्ज मंजूर करुन घेऊनच उपसा सिंचनासाठी पाणी वापर करावा.

मंजूर क्षेत्रासाठी कालव्याचे पाणी घेण्यात येणारी शेतचारी व विहिरीवरील शेतचारी यात तीन मीटरचे अंतर असावे. लाभक्षेत्रातील कालव्यापासून 35 मी. पर्यतच्या विहिरींच्या पाण्याने सिंचित होत असलेल्या नगदी पिकांसाठी (उदा. ऊस, कापूस, केळी व फळबाग) पाटबंधारे अधिनियमानुसार प्रवाही सिंचनाच्या मूळ दराच्या 50 टक्के  दर लागू असेल.

पाणीपट्टी न भरणा-या लाभधारकास सिंचनासाठी पाणी देणे या कार्यालयावर बंधनकारक राहणार नाही. व त्यांचा पाणीपुरवठा केव्हाही बंद करण्यात येईल व थकबाकीवर शासन निर्णय नियमानुसार द.सा.द.शे. 10 टक्के दरान विलंब आकारण्यात येईल.

शेतचारा स्वच्छ ठेवा

कालव्याचे पाणी शेतात नेण्यासाठी असलेली शेतचारी स्वच्छ व व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी लाभधारकांची आहे. शेतचारी स्वच्छतेअभावी पाणी पुरवठ्यामध्ये व्यत्यय आल्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही. उडाफ्याचे क्षेत्रास पाणीपुरवठा करण्यात येणार नाही व तसेच लाभधारकांनी मंजूर क्षेत्राचे मर्यादेपर्यंत कालवा व नदी-नाल्याच्या पाण्याचा वापर करावा. मंजूरीपेक्षा जादा क्षेत्र भिजविल्यास व अनधिकृतपणे पाणी घेतल्यास नियमाप्रमाणे पंचनामा करुन दंडनीय आकारणी करण्यात येईल. मंजूर न केलेल्या क्षेत्रास पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी या कार्यालयावर राहणार नाही.

     लाभधारकाने दिवस व रात्री पाणी घेणे बंधनकारक आहे. अडचणी असल्यास कोणत्याही प्रकारची आगाऊ सूचना न देता पाणी पाळी पत्रकात बदल करण्याचे अधिकार कार्यकारी अभियंता यांना राहतील.

थकबाकीदार लाभधारक व थकबाकीदार पाणीवापर संस्थांना पाणी देणे बंधनकारक राहणार नाही.   वितरिका पाणी पाळीमध्ये पाणी चालू असताना लाभधारक वितरिकेचा दरवाजा  वेळी-अवेळी कमी-जास्त प्रमाणात उघडतात. त्यामुळे त्या वितरिकेवरील चालू असलेल्या पाण्याचा विसर्ग कमी जास्त होऊन ‘टेल टू हेड’ सिंचनावर विपरीत परिणाम होतो व त्यामुळे त्या वितरिकावरील पिकांना संचलनाप्रमाणे पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे प्रस्तावित पाणी पाळी कालावधीत वाढ होते.

 

रब्बी हंगाम 2024-25 संभाव्य पाणी पाळी नियोजन

कालव्यात पाणी सोडण्याचा कालावधी  दि. 15 नोव्हेंबर  ते 5 डिसेंबर 2024  (22 दिवस) तर  कालवा बंद कालावधी 6 ते 12 डिसेंबर 2024 राहील. दि. 13 डिसेंबर 2024 ते 3 जानेवारी  2025 कालव्यात  (22 दिवस) पाणी सोडण्यात येईल तर दि. 4 ते 10  जानेवारी 2025 कालवा बंद राहील. दि. 11 ते  दि. 27 जानेवारी 2025 (17 दिवस) पाणी सोडण्यात येईल तर दि. 28 जानेवारी ते दि.3 फेब्रुवारी 2025 कालवा बंद राहील.  दि. 4 ते  दि. 20 फेब्रुवारी 2025 (17 दिवस) पाणी सोडण्यात येईल तर  दि. 21 ते दि. 27 फेब्रुवारी 2025  कालवा बंद राहील. दि. 28 फेब्रुवारी  ते 15 मार्च 2025 (16 दिवस) पाणी सोडण्यात येईल.  कालव्यात एकूण 94 दिवस पाणी सोडण्यात येईल.

जर लाभधारकांनी संचलन कार्यक्रमाप्रमाणे टेल टू हेड रात्रंदिवस शेजपाळीपध्दतीने पिकांना पाणी घेतले तर संभाव्य पाणीपाळीचा कालावधी कमी होवून पाण्याचा अधिकाधिक लाभ होईल. संपूर्ण प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात शेतकऱ्यांनी कोठेही दारे स्वतः उघडून टेल टू हेड सिंचन प्रकारात अडथळा आणल्यास पाण्याचा नाश तर होतोच शिवाय पाणीपाळी कालावधी वाढतो. उर्ध्व वर्धा प्रकल्पांतर्गत असलेल्या लाभधारकांनी या बाबत योग्य ते सहकार्य करावे, असे आवाहन उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागामार्फत करण्यात आले आहे. 

000000

निवडणूक कालावधीत ओपिनियन आणि एक्झिट पोलला प्रतिबंध

        अमरावती, दि. 25 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगामार्फत महाराष्ट्र राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाने निवडणूक कालावधीत निवडणूक निकालांचे अंदाज (ओपिनियन पोल तसेच एक्झिट पोल) दर्शविण्यावर प्रतिबंध केला आहे.      

         भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 15 ऑक्टोबर 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. या अनुषंगाने निवडणूक निकालांचे अंदाज 13 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी सात वाजेपासून ते 20 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 6.30 वाजेपर्यंतच्या कालावधीत कोणत्याही प्रकारच्या एक्झिट पोलचे आयोजन करणे, कोणत्याही माध्यमांद्वारे प्रकाशन अथवा प्रसारण करण्यास प्रतिबंध लागू राहणार आहे.         

      त्याचप्रमाणे मतदान संपण्याच्या आधी 48 तासाच्या कालावधीत निवडणूक निकालांचे अंदाज (ओपिनियन पोल) अथवा अन्य मतदान सर्वेक्षणाच्या परिणामांच्या प्रकाशन अथवा प्रसारणावर प्रतिबंध असेल, असेही निवडणूक आयोगाने अधिसूचनेद्वारे स्पष्ट केले आहे.

 

0000

 

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 13.11.2024

  मतदार जनजागृती रॅलीत सजविलेली बैलगाडी आकर्षण अमरावती, दि. 13 (जिमाका) : अमरावती पंचायत समितीच्या स्विप उपक्रमांत पिंक फोर्स समितीने   शि...