Monday, October 14, 2024

DIO NEWS AMRAVATI 14.10.2024

 





मागासवर्गीयांच्या विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करावेत

-आनंदराव अडसूळ

अमरावती, दि. 14 : अनुसूचित जाती आणि जमातीच्या नागरिकांना मुख्‍य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्या विभागांवर योजना राबविण्याची जबाबदारी आहे, त्यांनी मागासवर्गीयांच्या विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करावेत, असे आवाहन अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांनी केले.

येथील विश्रामगृहात श्री. अडसूळ यांनी समाज कल्याण आणि आदिवासी विकास विभागाचा आढावा घेतला. यावेळी प्रादेशिक उपायुक्त सुनिल वारे, उपायुक्त जया राऊत, सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर आदी उपस्थित होते.

श्री. अडसूळ यांनी ॲक्ट्रॉसिटी कायदा, रमाई आवास, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, स्वाधार योजना, विद्यावेतन, सबळीकरण योजना, कन्यादान योजना, अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत मिळणारा निधी, जाती पडताळणी आदींबाबत आढावा घेतला. मागासवर्गीयांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये अडचणी आल्यास आयोगाच्या माध्यमातून त्यावर मार्ग काढण्यात येईल. आवश्यक असलेल्या ठिकाणी पाठपुरावा करून न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. शासकीय योजनांचा लाभ गरजूंना मिळाल्यास सामाजिक स्तर उंचावण्यास मदत होणार आहे. त्यामुळे तक्रारीच्या प्रकरणी तात्काळ कार्यवाही होणे गरजेचे आहे.

शहरी भागातील मागासवर्गीयांसाठी असलेल्या घरकुल योजनांची अंमलबजावणी होण्यासाठी योग्य ते निर्देश देण्यात येतील. तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात पडताळणी सादर करण्यासाठी मुदतवाढीसाठी प्रयत्न करण्यात येतील. वसतीगृहाचा लाभ मिळाला नसल्यास त्यांना स्वाधार योजनेचा लाभ देण्यात येतो. अशा विद्यार्थ्यांना वेळेवर लाभ मिळण्यासाठी आवश्यक ते पावले उचलण्यात येतील. शासकीय यंत्रणांना अधिकार प्राप्त असतात. या अधिकाराचा उपयोग अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन श्री. अडसूळ यांनी केले.

000000

 



महिला मेळाव्यात आरोग्य विभागाकडून जनजागृती

अमरावती, दि. 14 : सायंस स्कोर मेळाव्यात आरोग्य विभागातर्फे आयोजित महिला मेळाव्यात जनजागृती करण्यात आली.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले आणि अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारिसे यांच्या मार्गदर्शनात आरोग्य विभागाचा हेल्थ स्टॉल उभारण्यात आला. यात जिल्हास्तरीय महिला सक्षमीकरण प्रक्रिया लोकाभिमुख करुन महिलांना संघटित करून प्रशिक्षित करणे, स्वावलंबी करणे, महिलांशी संबंधित योजना लोकाभिमुख करणे, महिला सशक्तीकरण योजना व महिलांच्या संबंधित राबविण्यात येत असलेल्या इतर योजना महिलापर्यंत पोहचविण्यासाठी महिला मेळावा पार पडला. जिल्ह्यामधील महिलांना या योजनांची माहिती देण्यात आली. यामुळे महिलांना विविध योजनांचा लाभ घेता यावा, त्यासाठी महिला मेळाव्यामध्ये प्रचार व प्रसिध्दी करण्यात आली. आरोग्य सेवक श्री. भिलकर, आरोग्य सेवक श्री. बागडे, अवैद्यकीय पर्यवेक्षक दिपक गडलिंग, ज्ञानेश्वर डोंगरे, श्री. मारोडकर यांनी पुढाकार घेतला.

0000

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वन्यजीव सप्ताहाचा समारोप

अमरावती, दि. 14 : मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि विविध संस्थांतर्फे 1 ते 7 ऑक्टोबर 2024 दरम्यान वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला. यानिमित्ताने आयोजित स्पर्धांचा बक्षिस वितरण कार्यक्रम वनसंरक्षक तथा मेळघाट व्याघ प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एम. आदर्श रेड्‌डी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मानद वन्यजीव रक्षक जयंत वडतकर, निशिकांत काळे, अनिल आसोले, प्रा. गजानन वाघ, सर्वेश मराठे आदी उपस्थित होते.

वन्यजीव सप्ताहात वने व वन्यजीव यावर आधारीत चित्रकला, निबंध, वकृत्व, परिसंवाद, छायाचित्र, फेस पेंटिंग, घोषवाक्य, निसर्ग प्रश्न मंजुषा स्पर्धा पार पडल्या. यात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती, विनायका गुरुकुल, होलीक्रॉस इंग्लिश हायस्कूल, कस्तुरबा इंग्लिश हायस्कूल, अमरावती, श्रीराम विद्यालय, शिवाजी बहुउद्देशीय शाळा, जिल्हा परिषद माध्यमिक कन्या शाळा, ज्ञानमाता इंग्लिश हायस्कूल, मनीबाई गुजराथी हायस्कूल, नारायणा हायस्कूल, शारदा विद्यालय, तखतमल इंग्लिश स्कूल, अभ्यासा हायस्कूल, प्रेमकिशोर सिकची हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. प्राविण्य प्राप्त विध्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.

मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि स्टँडिंग फॉर टायगर संस्था, परतवाडा, ऑर्गनायझेशन फॉर कुला, मेळघाट, युथ फॉर नेचर कंझर्वेशन, अमरावती, निसर्ग संरक्षण संस्था, निसर्ग कट्टा संस्था, अकोला, अरण्यंम संरक्षण संस्था, प्रथम कौशल्य प्रशिक्षण केंद्र, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, परतवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने क्षेत्रीय स्तरावर शालेय विद्यार्थ्यांसाठी ट्रेकिंग, वन्यजीव आधारीत माहितीपट व सादरीकरण, जंगल भ्रमंती, निसर्ग शिबीर, वन्यजीव जनजागृती दिंडी, ओळख करू फुलपाखरांची, पत्रकारिकेतून वनसंवर्धन यावर आधारित व्याख्यानमला, स्वच्छता अभियान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यातून शालेय विद्यार्थ्यांना वने व वन्यजीव संवर्धनाबाबत जागृती करण्यात आली.

उपजीविका तत्‍ज्ञ ज्ञानदीप तराळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी वन्यजीव व संशोधन मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे विभागीय वन अधिकारी एम. एन. खैरनार, वनपाल प्रदीप भड, वनरक्षक संदीप खंडारे, रेखा कोकरे, रेशमा वानखडे, दीपा बेलाह, पर्यटन व्यवस्थापक स्वप्नील बांगडे, सामाजिक समन्वयक अतुल तिखे, ग्राफीक डिझायनर आनंद विपट, रोशन गोयटे यांनी पुढाकार घेतला.

0000

राष्ट्रीय जनजाती आयोगातर्फे विविध ठिकाणी भेटी

            अमरावती, दि. 14 : राष्ट्रीय जनजातीय आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंह आर्य व आयोगाचे सदस्यांनी दि. 7 व 8 ऑक्टोबर या दोन दिवशी जिल्ह्यातील मोर्शी आणि अमरावती येथे भेटी देऊन आदिवासी समाजाच्या समस्या जाणून घेत प्रत्यक्ष भेटी दिली.

आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंह आर्य आणि सदस्य राजीव सेक्सेना, वरिष्ठ अन्वेषक अंकित सेन, गोवर्धन मुंडे, अमृतलाल प्रजापती यांनी जिल्ह्याचा दौरा केला. यात जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीला अंतरसिंह आर्य उपस्थित होते. बैठकीत सर्व शासकीय विभागांचा आढावा घेण्यात आला. यावेळी वन विभागामार्फत अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करण्याबाबत निर्देश दिले. तसेच अद्यापही पक्के रस्ते नसलेल्या गावामध्ये तातडीने रस्ते मंजूर करण्याचे निर्देश बांधकाम विभागाला देण्यात आले. सिकलसेल ॲनिमिया आजाराची तपासणी करून आवश्यक उपायोजना करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला केल्या. अनुसूचित जमातीच्या नागरिकांना गावामध्ये मुलभूत सोईसुविधा पोहचतील या अनुषंगाने आवश्यक उपायोजना करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच ॲट्रॉसिटी प्रकरणी तात्काळ आवश्यक कार्यवाही करण्याबाबत पोलिस विभागालस सूचना देण्यात आल्या.

00000

मत्स्यव्यवसाय विभागात डाटा एन्ट्री

ऑपरेटर पदाची तात्पुरत्या स्वरूपात भरती

अमरावती, दि. 14 : सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक) कार्यालयातील एका ‘डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदाची कंत्राटी पद्धतीने 11 महिन्यासाठी नेमणूक करण्यात येणार आहे. यासाठी आवेदन अर्ज मागविण्यात आले आहे.

सदर पदासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत शुक्रवार, दि. 22 ऑक्टोबर 2024 आहे. जाहिरात आणि आवेदन अर्जाचा नमुना सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां.) श्री. पुंडकर यांची इमारत, पहिला माळा, अतुल मंगल कार्यालय जवळ, रूख्मिणीनगर, अमरावती येथे सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक 9404237128 वर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय सहायक आयुक्त एम. एम. मेश्राम  यांनी केले आहे.

0000

राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

अमरावती, दि. 14 :  अमरावतीसह राज्यातील सर्व न्यायालयात दि. 30 नोव्हेंबर आणि दि. 1 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकअदालतीमध्ये दाखल आणि दाखलपूर्व अशी प्रकरणे तडजोडीने आणि सामंजस्याने निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येते. नागरिक, तसेच पक्षकारांनी राष्ट्रीय लोकअदालती समक्ष आपली प्रकरणे सामंजस्याने व तडजोडीने मिटवावीत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला कांबळे यांनी केले आहे.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या सूचनेनुसार राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय लोक अदालतीत सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. नागरिक तसेच पक्षकारांनी तडजोडप्राप्त प्रलंबित खटले राष्ट्रीय लोक अदालत समक्ष तडजोडीने व सामंजस्याने मिटविण्यासाठी संबंधित न्यायालयात अर्ज करावा. तसेच दाखलपूर्व प्रकरणांबाबत नजिकच्या जिल्हा किंवा तालुका न्यायालयाशी संपर्क साधावा लागणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव मंगला कांबळे यांनी दिली आहे.

0000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 13.11.2024

  मतदार जनजागृती रॅलीत सजविलेली बैलगाडी आकर्षण अमरावती, दि. 13 (जिमाका) : अमरावती पंचायत समितीच्या स्विप उपक्रमांत पिंक फोर्स समितीने   शि...