Thursday, October 10, 2024

DIO NEWS AMRAVATI 10.10.2024

 


प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाभियान (कुसुम) योजना

सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

 

अमरावती, दि. 10: प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाभियान (कुसुम) योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप योजना राबविण्यात येत आहे. राज्यात दुसऱ्या टप्प्यात 90 ते 95  हजार पारेषण विरहित सौर कृषी  पंपाच्या आस्थापनेचे उद्दिष्ट या योजनेत दिले आहे . या सौर कषी पंप योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होणार  आहे. शेतकऱ्यांच्या कृषीधारक क्षमतेनुसार अश्वशक्ती सौर पंप उपलब्ध करुन दिले जाणार आहे. यामध्ये सर्वसाधारण वर्गवारीच्या लाभार्थ्यांचे कृषी पंप किंमतीच्या 10 टक्के तर अनुसूचित जाती अथवा जमातीच्या लाभार्थ्यांना 5 टक्के  हिस्सा राहणार आहे.

                           सौर कृषी पंप योजना लाभार्थी निवडीचे निकष

विहीर, बोरवेल, बारमाही वाहणारी नदी तसेच शाश्वत पाण्याच्या स्रोत उपलब्ध असणारे शेतकरी तसेच  पारंपारिक वीज कनेक्शन उपलब्ध नसणारे शेतकरी यांना या योजनेचा फायदा होणार आहे.  अटल सौर कृषी पंप योजना टप्पा  1 व 2 किंवा मुख्यमंत्री सौर कृषी योजनेतंर्गत अर्ज केलेले तथापि मंजूर न झालेले अर्जदार  शेतकरीही या योजनेचा लाभ घेवू शकतात.

शेतजमीन धारकाजवळ किती एकर जमीन आहे, त्यानुसार सौर कृषी पंप देण्यात येणार आहे. प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाभियान (कुसुम) योजना राज्य शासनाच्या महाऊर्जा या विभागामार्फत राबविण्यात येत  आहे. या योजनेच्या सविस्तर माहितीसाठी व ऑनलाईन

नोंदणीसाठी  http://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/ Kusum-Yojana-Componenet-B    www.mahaurja.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच अधिक माहितीसाठी महाऊर्जा विभागीय कार्यालय, अमरावती, दुरध्वनी क्र. 0721-2661610, ई-मेल

आयडी  domedaamravati@mahaurja.com वर संपर्क साधावा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यात यावा, असे आवाहन विभागीय महाव्यवस्थापक प्रफुल्ल तायडे यांनी केले आहे.

0000

स्टॅन्ड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजासाठी

मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

अमरावती, दि.10(जिमाका) :  भारतरत्न डॉ. बाबासाहेव आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त केंद्र शासनाने स्टॅन्ड अप इंडिया ही योजना जाहीर केली आहे. या योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांसाठी मार्जिन मनी योजना सुरू करण्यात आलेली आहे. या  योजनेंतर्गत नवउद्योजकांची मार्जिन मनी भरण्याची क्षमता नसल्यास या उद्योजक लाभार्थ्यांना एकूण उद्योग प्रकल्पाच्या 25 टक्के स्वहिस्सा मधील जास्तीत -जास्त 15 टक्के मार्जिन मनी शासनातर्फे उपलब्ध करुन देण्यात येईल. या योजनेतंर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीसाठीच्या सवलती घेण्यास प्रात्र असलेला अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील नवउद्योजकांना 10 टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित  15 टक्के रक्कम शासनामार्फत देण्यात येते.

   या योजनेच्या मार्गदर्शक सूचना  शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

    या योजनेसाठी  इच्छुक लाभार्थ्यांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण, अमरावती यांच्याकडे शासन निर्णयातील नमुद करण्यात आलेल्या सर्व अटी व शर्तीची पूर्तता करुन प्रस्ताव सादर करावा,असे आवाहन समाजकल्याण सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.

 

00000

अटल मूजल योजनेतंर्गत दुर्गापूर येथे भूजल मित्र अभ्यास दौरा संपन्न

अमरावती, दिृ 10 : अटल भूजल योजने अंतर्गत वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, अमरावती  यांच्या  मार्गदर्शनात  जिल्हास्तरीय  अभ्यास  दौरा  शेतकरी सरपंच, महिला व भूजन मित्रासाठी कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूर बडनेरा येथे नुकताच संपन्न झाला.

शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिकासह माहितीची आदानप्रदान व्हावी  व  कृषीक्षेत्रात कमी खर्चात जास्त उत्पन्न  होण्यामाठी  व  पाणी  बचतीच्या  विविध  उपाययोजनेची  माहिती  होण्यासाठी  अटल भूजल  योजनेंतर्गत  वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा राजेश सावळे  यांच्या मार्गदर्शनात सन 2024-25 या वर्षासाठी अभ्यासदौरा आयोजित करण्यात आला. यावेळी  वरुड, मोर्शी व चांदुर बाजार तालुक्यातील अटल भूजल योजनेत समाविष्ट 93 ग्रामपंचायत मधील कृतीशील भूजल मित्र, कृतीशील शेतकरी व महिलांनी अभ्यास दौऱ्यात सहभाग घेतला,

कृषी विज्ञान केंद्र दुर्गापुर बडनेरा, येथे केंद्रातंर्गत सुरु असलेल्या विविध प्रकल्पाला भेटी देण्यात आल्या. यावेळी बीज  प्रक्रिया  प्रकल्प, दूध डेअरी विभाग, कॉटन प्लांट, तुषार व ठिबक सिंचन पद्धत, मृद व जल संधारणाची कामे पाहणी, सेंद्रिय शेती, कंपोष्टखते युनिट, शेततळे, मुरघास यूनिट, मशरूम कल्टीवेशन, हायडेन सिटी प्लांट सिस्टीम, सरी ओरम्बा पद्धत यासह  सुरु असलेल्या विविध प्रकल्पाला  भेटी  देण्यात आल्या. भेटी दरम्यान  तेथील  तज्ज्ञ  मंडळीने प्रत्येक प्रकल्पाची विस्तृत माहिती दिली.

कृषी  विज्ञान  केंद्रातील  तज्ज्ञांनी यावेळी  विविध विषयावर मार्गदर्शन केले.  यामध्ये डॉ. जायले यांनी  शेतातील  खर्च  कमी  करणे  गरजेचे  आहे.  त्यासाठी  शेतकऱ्यांनी  नैसर्गिक शेती, जैविक शेती विषमुक्त शेतीचा वापर करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

डॉ. आनंद वरघट यानी विशेष कापूस प्रकल्प तर डॉ. महल्ले यांनी  भाजीपाला  लागवड  याबाबत  माहिती  दिली. जमिनीचा पोत  सुधारण्यासाठी शेणखताची गरज आणि बुरशीनाशके, जीवाणू संत्रा झाडावरील डिंक रोग, किडी, मित्रकिटक व विज्ञान केंद्राचे उत्पन्न, विविध रोपे, बियाणे याबाबत माहिती दिली.

 

   यावेळी जिल्हा प्रकल्प  व्यवस्थापन कक्ष माहिती शिक्षण संवाद तज्ज्ञ प्रमोद झगेकर, जलसंधारण तज्ज्ञ सचिन चव्हाण, कृषी तज्ज्ञ दिनेश खडसे , समन्वयक शरद गोरे, विषय तज्ज्ञ आशिष गाडबैल, कमलेश अजमिरे, भूपेश बावनकुडे  तसेच विषयतज्ज्ञ , समूह संघटक, गावातील कृतिशील भूजल मित्र, महिला व शेतकरी उपस्थित होते.

0000

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 13.11.2024

  मतदार जनजागृती रॅलीत सजविलेली बैलगाडी आकर्षण अमरावती, दि. 13 (जिमाका) : अमरावती पंचायत समितीच्या स्विप उपक्रमांत पिंक फोर्स समितीने   शि...