Friday, October 4, 2024

DIO NEWS AMRAVATI 4.10.2024

 

नवरात्र, अंबादेवी यात्रा उत्सवात

शहरातील वाहतूक मार्गात बदल

अमरावती, दि. 04 (जिमाका) : शहरात श्री अंबादेवी संस्थान येथे नवरात्र व अंबादेवी यात्रा उत्सव साजरा होतो. या उत्सवाच्या कालावधीत दि. 12 ऑक्टोबरपर्यंत मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत.

 बंद करण्यात आलेले मार्ग

वाहतूकीसाठी दि. 12 ऑक्टोबरपर्यंत पुढील मार्ग बंद करण्यात आले आहे. यात राजकमल चौक ते अंबागेट, साबणपुरा खिडकी ते गांधी चौक, ओसवाल भवन ते गांधी चौक, डॉ. धवड यांचा दवाखाना ते गांधी चौक, मुख्य पोस्ट ऑफिस रोड ते पंचशील लाँड्री आणि गांधी चौक, भुतेश्वर चौक ते गांधी चौक, नमुना गल्लीकडून अंबादेवी देवस्थानाकडे जाणारे सर्व लहान रस्ते या कालावधीत बंद राहतील. तसेच सक्करसाथ ते भाजीबाजार जैन मंदिरापर्यंत, टांगापडाव ते साबनपुरा पोलीस चौकी ते प्रभात चौक हा रस्ता अरुंद असल्याने जड वाहनास बंद राहील. अंबागेट ते औरंगपुरामार्गे अंबादेवी मंदिराकडे जाणारा मार्ग सर्व वाहनांसाठी बंद राहील.

वाहतूकीस पर्यायी मार्ग

मालवाहू जड व हलकी, गिट्टी, बोल्डर, वाहने जुनी वस्ती बडनेरा टी पॉईंट येथून जुना बायपासमार्गे एमआयडीसी, दस्तूरनगर चौक, चपराशीपुरा चौक, बियाणी चौक येथून डावे वळण घेऊन गर्ल्स हायस्कूल चौक, इर्विन चौक, मालवीय चौक, दीपक चौक मार्गाचा अवलंब करता येईल. बस स्टँड, राजकमल, गद्रे चौकमार्गे बडनेराकडे जाणाऱ्या व येणाऱ्या एसटी बसेस वाहनांनी राजापेठ-इर्विन चौक या उड्डाणपुला वरून गर्ल्स हायस्कुल चौक, पोलीस पेट्रोल पंप, एस टी. डेपो किंवा जुनी वस्ती बडनेरा येथून उजवे वळण घेऊन जुना बायपास मार्गाने दस्तूर नगर, चपराशीपूरा चौक, बस स्टॅन्ड या पर्यायी मार्गाचा अवलंब करतील. एसटी स्टँन्ड येथून नागपुरी गेट मार्गे जाणारी एसटी बस रेल्वे स्टेशन चौक, इर्विन चौक ते चित्रा चौक मार्गे जातील. याच मार्गाने शहरात येऊन गर्ल्स हायस्कुल चौक मार्गे एसटी स्टँन्ड येथे जातील. राजापेठ चौकाकडून शहरात येणारी हलकी चारचाकी वाहनधारकांनी राजापेठ उड्डाण पुलाचा वापर करावा.

वाहनतळ पार्कींग व्यवस्था

गांधी चौक येथील पार्कींग स्थळ नवरात्र कालावधीत बंद राहील. तसेच दोन्ही मंदिरालगत दोनशे मीटर अंतरापर्यंत कोठेही वाहन ठेवता येणार नाही. वाहनतळ पार्कींगची व्यवस्था नेहरु मैदान, ओसवाल भवन मैदान, मुधोळकर पेठ मैदान, ओसवाल भवन ते गद्रे चौकाकडील रस्त्याच्या एका बाजूस तसेच हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या वळणापासून साई नगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या एका बाजूस आणि साबनपुरा चौक ते जवाहरगेटकडील रस्त्याच्या एका बाजूस करण्यात आली आहे.

वाहन चालकांनी या अधिसूचनेचे पालन करणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांच्याविरुध्द मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. हा आदेश दि. 12 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील, असे आवाहन पोलीस उपायुक्त कल्पना बारवकर यांनी केले आहे.

00000

शहरात कलम 37 (1) व (3) लागू

अमरावती, दि. 04 (जिमाका) : शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अमरावती शहर पोलीस आयुक्त  यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

सदर प्रतिबंधात्मक आदेश शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात लागू करण्यात आला असून दि. 17 ऑक्टोबर 2024च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी कळविले आहे.

00000

विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचा हिस्सा तातडीने भरण्याचे आवाहन

अमरावती, दि. 04 (जिमाका): अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत केंद्र शासनाच्या हिश्याची शिष्यवृत्तीची 60 टक्के रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा होते. मात्र काही विद्यार्थी महाविद्यालयास देय असलेल्या रक्कमेचा हिस्सा विहित मुदतीत महाविद्यालयास भरणा करीत नाही. विद्यार्थ्यांनी तातडीने महाविद्यालयाचा हिस्सा तातडीने भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सन 2018-19 या शैक्षणिक वर्षापासून महाडीबीटी प्रणालीवर विविध शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. त्यामध्ये केंद्र पुरस्कृत भारत मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेचा समावेश करण्यात आला आहे.

केंद्र शासनाने सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाने सन 2020-21 ते 2025-26 या कालावधीसाठी जारी केलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत सुधारीत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. यात 0केंद्र शासनाच्या 60 टक्के हिश्याचे वितरण पद्धती नमूद केली आहे. त्यानुसार भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती निधीचे वितरण विद्यार्थ्यांचे महाडीबीटी प्रणालीवर नोंदणीकृत केलेल्या अर्जानुसार आधार संलग्नीकृत बँक खात्यामध्ये केंद्र शासनाकडून थेट डीबीटी तत्वावर पीएफएमएस प्रणालीद्वारे वितरीत करण्यात येत आहे.

केंद्र हिस्सा विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाल्यानंतर विद्यार्थ्यांस अनुज्ञेय असलेला निर्वाह भत्ता वजा जाता उर्वरीत महाविद्यालयास देय असलेली रक्कम यात शिक्षण शुल्क व इतर शुल्क विद्यार्थ्यांनी सात दिवसाच्या आत महाविद्यालयास जमा करणे आवश्यक आहे. यासाठी संबंधीत महाविद्यालयाने त्यांच्याकडून विहित नमुन्यात हमीपत्र घेण्यात येते. परंतू केंद्र शासनाचा 60 टक्के हिस्सा विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाल्यानंतरही महाविद्यालयास देय असलेली रक्कम विद्यार्थी महाविद्यालयास भरणा करीत नसल्याबाबत जिल्ह्यातील महाविद्यालय व शिक्षण संघटना यांच्याकडून तक्रारी होत आहेत. शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेल्या केंद्र शासनाच्या 60 टक्के हिश्यापैकी महाविद्यालयास देय असलेली रक्कम महाविद्यालयाकडे दिलेल्या विहित मुदतीत जमा करणे बंधनकारक आहे.

केंद्र शासनाचा मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेचा 60 टक्के हिस्सा ज्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला आहे, अशा विद्यार्थ्यांनी सात दिवसामध्ये महाविद्यालयास देय असलेली रक्कम महाविद्यालयाकडे भरणा करून त्याची रितसर पावती महाविद्यालयाकडून प्राप्त करावी. महाविद्यालयामध्ये स्थापन करण्यात आलेल्या समान संधी केंद्रामार्फत विद्यार्थी आणि पालकांमध्ये जागृती करण्याबाबत महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना सुचना द्याव्यात. केंद्र शासनाच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीच्या 60 टक्के हिश्याबाबत महाविद्यालयाच्या सुचना फलकावर पत्रक लावण्यात यावे. पुढील शिक्षणासाठी लागणारे विद्यार्थ्यांचे मूळ दस्तावेजाची अडवणूक करू नये. परिणामी मागासवर्गीय विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिल्यास त्याची जबाबदारी प्राचार्य यांची राहील, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी कळविले आहे.

00000

पारधी समाजाच्या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 04 (जिमाका): एकात्मिक विकास प्रकल्प कार्यालय धारणीतर्फे पारधी समाजाच्या विकारासाठी योजना सन 2023-24 अंतर्गत मंजूर योजनांचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जमातीच्या फक्त पारधी समाजाच्या लाभार्थ्यांकडून योजनांचे अर्ज 23 ऑक्टोबर 2024 पर्यंत मागविण्यात आले आहे.

योजनाचे अर्ज धारणी, चिखलदरा, अंजनगाव सुर्जी आणि अचलपूर तालुक्यातील लाभार्थ्यांसाठी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी या ठिकाणी नांदगाव खंडेश्वर, भातकुली, अमरावती, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, व दर्यापूर तालुक्यातील लाभार्थ्यांसाठी अपर आयुक्त, आदिवासी विकास, अमरावती, तसेच मोर्शी, वरुड, चांदूरबाजार तिवसा तालुक्यातील लाभार्थ्यांकरीता प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी अंतर्गत उप कार्यालय, मोर्शी येथे अर्ज उपलब्ध आहे. याबाबत अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 07226-224217 तसेच कार्यालयातील विकास शाखेशी संपर्क साधावा.

यात पारधी समाजाच्या लाभार्थ्यांच्या शेतात बोअरवेल करणे या योजनेसाठी शासन निर्णयानुसार प्राप्त झालेल्या अर्जाच्या ज्येष्ठतेनुसार संगणीकृत यादी तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर कागदपत्रे तपासणी होऊन पात्र, अपात्र अर्जदाराच्या याद्या तयार करण्यात येणार आहे. लाभार्थी निवड करताना प्रथम दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी, अपंग, वीरपत्नी, परितकत्या, निराधार महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे, असे प्रकल्प अधिकारी यांनी कळविले आहे.

000

 

साठी महामंडळाची शुक्रवारी सोडत

अमरावती, दि. 04 (जिमाका): साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या योजनांसाठी शुक्रवार, दि. 11 ऑक्टोबर रोजी सोडत करण्यात येणार आहे.

महामंडळामार्फत मातंग समाज आणि तत्सम बारा पोट जातीतील लाभार्थ्यांना एनएसएफडीसी योजनेंतर्गत सुविधा कर्ज योजना आणि महिला समृध्दी योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांची ईश्वर चिड्डी सोडत पध्दतीने निवड करण्यात येणार आहे. सदर ईश्वर चिड्डी सोडत कार्यक्रम दुपारी 12 वाजता सामाजिक संकुल न्याय सभागृह, कॅम्प, अमरावती येथे काढण्यात येणार आहे. यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक जे. एम. गाभणे यांनी केले आहे.

0000

आस्थापनांनी ई-आर 1 सादर करण्याचे आवाहन

अमरावती, दि.04 (जिमाका) : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय यांच्याकडून पुरविण्यात येणाऱ्या रोजगार विषयक सर्व सेवा ऑनलाइन करण्यात आल्या आहेत. या सुविधांचा उपयोग करून सार्वजनिक आणि खासगी आस्थापनांनी ई-आर 1 सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या ऑनलाइन सुविधांसाठी  mahaswayam.gov.in संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. तसेच उद्योजक आस्थापना यांनी सेवायोजन कार्यालय रिक्त पदे अधिसूचित करण्याची सक्ती करणार कायदा 1959 व नियमावनी 1960 कलम 5(1) व कलम 5(2) अन्वये त्रैमासिक ई-आर 1 ऑनलाइन सादर करणे बंधनकारक आहे.

सप्टेंबर-2024 अखेर संपणाऱ्या त्रैमासिक करिता ई-आर 1 या प्रपत्राची माहितीवरील संकेतस्थळावर सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी उद्योजक, आस्थापनांनी त्यांचे युजर आयडी व पासवर्डच्या माध्यमातून लॉगिन करून ऑनलाइन सादर करावे लागणार आहे. त्याबाबतचे प्रमाणपत्र संकेतस्थळावरून प्राप्त करावे लागणार आहे. ऑनलाइन ई-आर 1 सादर करताना अडचणी आल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती या कार्यालयाशी अथवा दूरध्वनी क्रमांक 0721-2566066 यावर संपर्क साधावा. ई-आर 1 सादर करण्याची अंतिम मुदत ऑक्टोबर 2024 आहे. ई-आर 1 ऑनलाइन सादर केला नसल्यास कसुरदार आस्थापनांवर कार्यवाही करण्यात येणार आहे, असे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी कळविले आहे.

00000




नांदगांव खंडेश्वर निवासी शाळेत स्वच्छता अभियान

            अमरावती, दि. 04 (जिमाका) : नेहरू युवा केंद्राच्या वतीने नांदगाव खंडेश्वर येथील निवासी शाळेत स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

जिल्हा समन्वयक स्नेहल बासुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान घेण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून भूपेंद्र जेवडे, राहुल हजारे, सुनंदा बोरीवार उपस्थित होत्या. स्वच्छतेचे पालन करणे, स्वच्छता करून परिसर स्वच्छ करणे, दररोज आपला परिसर स्वच्छ ठेवणे आणि निरोगी आरोग्याबद्दल भूपेंद्र जेवडे यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याकरिता अभ्यासाची चिकाटी असणे आवश्यक असल्याचे राहुल हजारे यांनी सांगितले. भूपेंद्र जेवडे यांनी स्वच्छतेची शपथ दिली. सारांश नंदेश्वर, रोहित इंगोले, रितिक चव्हाण, श्रेयस गिरी, पृथ्वीराज चव्हाण, अनूप धुर्वे, दीपक वानखेडे यांनी कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला.

00000





अटल भूजल योजनेचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण उत्साहात

अमरावती, दि. 4 (जिमाका) : अटल भूजल योजनेंतर्गत एक दिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षण शेतकरी उत्पादक कंपनीचे व्यवस्थापन व उद्योग संधी या विषयावर पार पडले. प्रशिक्षणात जिल्हाधिकारी सौरभ कटियार उपस्थित होते.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा जिल्हा जलसंधारण अधिकारी सुनिल जाधव, वरिष्ठ भूवैज्ञानिक राजेश सावळे, उपविभागीय अधिकारी प्रदीपकुमार पवार मोर्शी उपस्थित होते.

        श्री. कटियार यांनी अटल भूजल योजनेमुळे लाभ होत आहे. शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली असून स्पि्रंकलर व ड्रीपचा शेतकरी वापर करीत आहे. तसेच शेतकऱ्यांनी योजनांचा लाभ घेऊन पाण्याचा अपव्यय होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन केले. श्रीमती मोहपात्रा यांनी अटल भूजल योजनेंतर्गत सुरु असलेल्या कामामुळे भूजल पातळी वाढत आहे. यामुळे जल संकट कमी होत असल्याचे मत व्यक्त केले.

सन 2022-23 मध्ये भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेत राज्यस्तरावर जरुड ग्रामपंचायतने दुसरा आणि जिल्ह्यात प्रथम क्रमांक तसेच झटामझीरी व अंबाडा ग्रामपंचायतने जिल्हास्तरावर अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल जिल्हाधिकारी श्री. कटियार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व ग्रामगीता देऊन गौरव करण्यात आले. आर. आर. पठाण यांनी शेतकरी उत्पादक कंपनी संकल्पनेबाबत सादरीकरण केले. राहूल ठाकरे यांनी कंपनी स्थापन केल्यानंतर भांडवल व प्रशासन व्यवस्थेबाबत सादरीकरण केले. दिपक झंवर यांनी शेतकरी उत्पादक कंपनी संदर्भातील तांत्रिक माहिती दिली.

श्री. सावळे यांनी प्रास्ताविक केले. प्रमोद झगेकर यांनी सूत्रसंचालन केले. हरीश कठारे यांनी आभार मानले.

     00000

 

 

 

राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंग आर्या यांचा जिल्हा दौरा

        अमरावती, दि. 04 (जिमाका) : राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंग आर्या यांचा अमरावती जिल्हा दौरा आहे.

सोमवार, दि. 7 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 9 ते 11 वाजता नागपूर येथून मोर्शीकडे आगमन व आदिवासी विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणी बाबत आढावा. सकाळी 11.45 ते दुपारी 12.30 वाजता मोर्शी येथे आयोजित करण्यात आलेली आरोग्य शिबिर व सिकलसेल तपासणी शिबिरास भेट. दुपारी 12.30 वाजता वनरक्षा समिती, वनहक्क समिती, पेसा समिती व आदिवासी संघटनांचे प्रतिनिधी यांच्यासोबत बैठक. सायंकाळी 6.30 वाजता आदिवासी समाजाच्या राजकीय पुढारी यांचे सोबत बैठक होणार आहे.

मंगळवार, दि. 8 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता प्रधानमंत्री यांच्या एक पेड माँ के नाम या उपक्रमांतर्गत वृक्षारोपनाचा कार्यक्रम. सकाळी 11 वाजता संत गाडगेबाबा विद्यापीठ, अमरावती येथे युवा संवाद कार्यक्रम. दुपारी 12.15 वाजता जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, उपवनसंरक्षक व इतर विभागांचे प्रमुख यांचे सोबत आढावा बैठक. दुपारी 1.30 वाजता जिल्हा प्रशासनामार्फत आयोजित पत्रकार परिषदेला उपस्थित राहतील. 

0000

अनुदानित वसतिगृह हस्तांतरण व स्थलांतरण प्रस्ताव सादर करण्यास 11 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ 

अमरावती, दि. 4 (जिमाका) : समाज कल्याण आयुक्तालयामार्फत स्वयंसेवी संस्थेमार्फत चालविल्या जाणाऱ्या मुलामुलींसाठी शासनमान्यता प्राप्त तथापि, मान्यता रद्द केलेली, बंद पडलेली, स्वेच्छेने बंद केलेली अनुदानित वसतिगृह अन्य स्वयंसेवी संस्थेस हस्तांतरण व स्थलांतरणासंबंधी इच्छुक, पंजीकृत संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते.

 मान्यता रद्द, बंद पडलेल्या अनुदानित वसतिगृह हस्तांतरण व स्थलांतरणासाठी इच्छुक, पंजीकृत संस्थांकडून अर्ज सादर करण्यास दि. 11 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. इच्छुक, पंजीकृत संस्थांनी प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, अमरावती यांच्या कार्यालयामध्ये दि. 11 ऑक्टोबर 2024 पर्यंत कार्यालयीन वेळेमध्ये सुटीचे दिवस वगळून सिलबंद प्रस्ताव सादर करावे.

राज्यातील मान्यता, रद्द, बंद पडलेल्या अनुदानित वसतिगृहाची यादी व विहित नमूना व सहपत्रे शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ताजा घडामोडी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. यासाठी संस्थांनी विहित मुदत प्रस्ताव सादर करण्याबाबत समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे यांनी आवाहन केले आहे.

00000

नाफेडमार्फत मुग, उडीद, सोयाबिन खरेदीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु 

अमरावती, दि. 4 (जिमाका) : हंगाम 2024-25 मध्ये शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत खरेदी योजनेंतर्गत नाफेडमार्फत मुग, उडीद, सोयाबिन खरेदीसाठी नोंदणी प्रक्रिया दि. 1 ऑक्टोबरपासून सुरु करण्यात आलेली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या तालुक्यातील नजीकच्या नाफेड खरेदी केंद्रावर आवश्यक त्या कागदपत्रांसह नोंदणी करुन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हमीभाव योजनेचा लाभ घ्यावा. नोंदणीसाठी आधारकार्ड, आधार लिंक असलेले बँक पासबुक तसेच चालू वर्षाचा पीक पेरा असलेला सातबारा आवश्यक राहील.

मुग पिकास दर प्रति क्विंटल 8 हजार 682 रुपये हमीभाव असून खरेदी कालावधी 10 ऑक्टोबर 2024 ते 7 जानेवारी 2025 असा राहील. उडीद पिकास दर प्रति क्विंटल 7 हजार 400 रुपये हमीभाव असून खरेदी कालावधी 15 ऑक्टोबर 2024 ते 12 जानेवारी 2025 असा आहे. सोयाबिन पिकास दर प्रति क्विंटल 4 हजार 892 रुपये हमीभाव असून खरेदी कालावधी 15 ऑक्टोबर 2024 ते 12 जानेवारी 2025 असा राहील.

00000

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींचे विद्यावेतन आज होणार खात्यात जमा

अमरावती दि. 04 : महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनेमधील एक महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण’ योजना असून या योजनेची जिल्हयातील सुरुवात झाली आहे. या योजनेअंतर्गत जिल्हयातील विविध आस्थापना जसे शासकीय, निमशासकीय कार्यालये खाजगी आस्थापना, महामंडळ इ. विविध आस्थापनांमध्ये ४ हजारच्या वर प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहे.

त्याअनुषंगाने जिल्हयातील विविध आस्थापनांमधील ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ या योजनेअंतर्गत रुजू झालेले प्रशिक्षणार्थी यांना त्यांचे पहिले विद्यावेतन प्रधानमंत्री यांच्या हस्ते उद्या 5 ऑक्टोबर रोजी अदा होणार आहे. त्यासाठी वालावलकर मैदान, बोरीवडे, घेडबंदर रोड, ठाणे (प) येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपण अमरावती जिल्हयात नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे दाखविण्यात येणार आहे.

तरी ज्या आस्थापनांमध्ये या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी रुजू झाले आहेत त्या आस्थापनांनी सदर उमेदवारांची उपस्थिती cmykpy.mahaswayam.gov.in या पोर्टलवर नोंदविणे गरजेचे आहे. त्याशिवाय सदर विद्यावेतन प्रशिक्षणार्थींच्या बँक खात्यात जमा होणार नाही. तेव्हा सर्व आस्थापनांनी त्यांच्याकडील प्रशिक्षणार्थींची उपस्थिती नवीन पोर्टलवर नोंदवावी. याबाबतीत काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती सोबत संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

0000

 

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 13.11.2024

  मतदार जनजागृती रॅलीत सजविलेली बैलगाडी आकर्षण अमरावती, दि. 13 (जिमाका) : अमरावती पंचायत समितीच्या स्विप उपक्रमांत पिंक फोर्स समितीने   शि...