जिल्हा माहिती कार्यालय निर्मित
'अमरावतीचे वनवैभव' कॉफी टेबल बुकचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते प्रकाशन
अमरावती दि. 8 (जिमाका) : जिल्ह्यातील वनराईने नटलेले वनवैभव, त्यातही मेळघाट परिसरातील निसर्ग वनसंपदा व वन्यजीव असा नैसर्गिक ठेव्याची समृद्धी दर्शविणाऱ्या 'अमरावतीचे वनवैभव' या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन पालकमंत्री चंद्रकांत (दादा ) पाटील यांच्या हस्ते करण्यात आले .
जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे कॉफी टेबल बुकच्या प्रकाशन सोहळ्यास खासदार डॉ. अनिल बोंडे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, पोलीस अधीक्षक विशाल आनंद, मनपा आयुक्त सचिन कलंत्रे, पोलीस उपायुक्त शिवाजी शिंदे, सागर पाटील, जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटुरवार, माहिती अधिकारी अपर्णा यावलकर, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजीत मस्के आदींसह विभागप्रमुख उपस्थित होते.
जिल्हा माहिती कार्यालयनिर्मित 'अमरावतीचे वनवैभव' या कॉफी टेबल बुकच्या निर्मितीसाठी माहिती अधिकारी अपर्णा यावलकर यांचा पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते सत्कार करुन अभिनंदन करण्यात आले.
श्री. पाटील म्हणाले, 'अमरावतीचे वनवैभव' या कॉफी टेबल पुस्तकात मेळघाटातील नयनरम्य निसर्ग सौंदर्य, अरण्यसंपन्न मेळघाटातील वन्यजीव, जैवविविधता यासह आदिवासी संस्कृती यांची उत्तम छायाचित्रासह माहिती देण्यात आली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील नैसर्गिक वारसा, वनसंपदा, कोरकू बांधवांची संस्कृती, चालीरीती यांची दुर्मिळ छायाचित्रे ही कॉफी टेबल बुकची वैशिष्ट्य आहेत.
अमरावतीचे वनवैभव हे कॉफी टेबल पर्यटन क्षेत्राला सहाय्यभूत तसेच संदर्भग्रथ म्हणून निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. पर्यावरणीय मूल्य जाणून जीवसृष्टीचे स्वरूप आणि वनसंपत्तीचे जतन करणे हे आपले मूलभूत कर्तव्य आहे. यामुळे यावर आधारित कॉफी टेबल बुक हे महत्त्वाचे पाऊल आहे .जिल्ह्यामध्ये येणारे पर्यटक अभ्यासक यांनाही हे पुस्तक फायदेशीर ठरणार आहे, असेही श्री. पाटील यावेळी म्हणाले.
कॉफी टेबल बुकसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
0000
विविध योजनांच्या अनुदानाची रक्कम तातडीने वितरित करावी
- खासदार बळवंत वानखेडे
अमरावती, दि. 8 : केंद्र आणि राज्य शासनातर्फे शेतकरी आणि गरजू वर्गाला मदत करण्यासाठी विविध अनुदानाच्या योजना राबविण्यात येते. या योजनांचे अनुदान विहित कालावधीत आणि विनाविलंब लाभार्थ्यांना तातडीने वितरीत करावी, असे निर्देश खासदार बळवंत वानखेडे यांनी दिले.
जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची सभा जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पार पडली. यावेळी खासदार अनिल बोंडे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे, विरेंद्र जगताप, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प अधिकारी प्रिती देशमुख आदी उपस्थित होते.
श्री. वानखेडे म्हणाले, शासनातर्फे प्रामुख्याने सिंचन विहिरी, गोठे बांधकाम, घरकुल आदी योजनांसाठी अनुदान मोठ्या प्रमाणावर देण्यात येते. शासनाकडून अनुदान उपलब्ध असताना लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम पोहोचण्यात विलंब होतो. हा विलंब टाळण्यासाठी शासकीय यंत्रणांनी तातडीने कार्यवाही करावी. ज्यामुळे लाभार्थ्यांना वेळेवर मदत मिळण्यास मदत होईल. घरकुल योजनेत अनेक अपात्र लाभार्थ्यांचा समावेश झाला आहे. त्यामुळे याबाबत तातडीने चौकशी करून अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई करावी. त्यांना पहिल्या हप्त्याचा लाभ मिळालेला असल्यास वसुलीची कार्यवाही करण्यात यावी.
रोजगार हमी योजनेतून कामे उपलब्ध करून देताना त्यांची मजुरी दर 15 दिवसात मिळेल याची दक्षता घ्यावी. केंद्र शासनाचे 100 दिवसांची मजुरी दिली गेल्यानंतर उर्वरीत मजुरीसाठी विलंब होत आहे. ही मजुरी तातडीने मिळण्यासाठी निधीची मागणी करण्यात यावी. तसेच मजुरी वितरण करणाऱ्या यंत्रणांना निधी उपलब्ध करून देऊन मजुरी देण्यात यावी. तसेच पांदण रस्त्याची कामे तातडीने करण्यात यावी. ग्रामीण भागातील रस्ते बांधकाम करताना चाचणी करण्यासाठी प्रयोगशाळा त्याच ठिकाणी असावी. प्रयोगशाळेत सर्व तपासण्या केल्यानंतरच कामे करण्यात यावी.
प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. ग्रामीण भागातील पाणी पुरवठ्याच्या योजनांमध्ये सांडपाणी जाऊ नये याची दक्षता घ्यावी. तसेच पाणी पुरवठा करणाऱ्या नळाच्या पाईपलाईन दर्जेदार असाव्यात. ज्या पाणी पुरवठा योजनांची कामे योग्य झालेली नसल्यास त्यांची तात्काळ चौकशी करण्यात यावी. वीज वितरण योग्य पद्धतीने होण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. कृषी वाहिन्यांच्या तारांची दुरूस्ती करण्यात यावी. सन्मान योजनेची हप्ता मिळाला नसलेल्या शेतकऱ्यांची माहिती घेऊन त्यांची तातडीने ई-केवायसी करावी. तसेच आरोग्य केंद्रांची कामे चांगल्या दर्जाची करावीत, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
0000000
महाकृषी ऊर्जा अभियान पी. एम. कुसुम योजना घटक-ब योजनेंतर्गत
लाभार्थी शेतकऱ्यांना अर्ज पूर्ण करण्याचे आवाहन
अमरावती, दि. 08 : महाकृषी ऊर्जा अभियान पी. एम. कुसुम योजना घटक-ब योजनेंतर्गत अमरावती जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे परीपूर्ण अर्ज 5 हजार 197 अर्ज ऑनलाईन पद्धतीने महाऊर्जाच्या कुसुम पोर्टलवर प्राप्त झालेले आहेत. या अर्जांपैकी 1 हजार 157 लाभार्थी शेतकऱ्यांनी सौर पंप योजनेचा लाभ घेतलेला आहे. तसेच एकुण 5 हजार 197 लाभार्थी शेतकऱ्यांपैकी 828 लाभार्थी शेतकऱ्यांचे अर्ज अपूर्ण आढळलेले असल्यामुळे त्यांचे अर्ज प्रलंबित यादीमध्ये आहेत.
या अनुषंगाने अशा सर्व अपूर्ण अर्ज असलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना सुचित करण्यात येते की, त्यांनी आपले अपूर्ण अर्ज पुढील तीन दिवसांत पुढील लिंक वर क्लिक करुन पूर्ण करावे https://kusum.mahaurja.com/
काही अर्ज बऱ्याच कालावधीपासून अपूर्ण अवस्थेत आहेत. सर्व लाभार्थ्यांनी उद्या दि. 9 ऑक्टोबर 2024 पर्यंत प्राधान्याने अर्ज पूर्ण करावेत. निर्धारित अवधीत अर्ज पूर्ण न झाल्यास अमरावती जिल्ह्याचे उर्वरित उद्दिष्ट इतर जिल्ह्यात वळते करण्याची शक्यता आहे.
याशिवाय लाभार्थ्यांना नवीन अर्ज करावयाचा झाल्यास नोंदणी https://kusum.mahaurja.com/
सकेंतस्थळावर अर्ज करावा, असे आवाहन विभागीय महाव्यवस्थापक यांनी केले आहे.
00000
रहाटगाव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
अमरावती, दि. 08 : विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातर्फे उपमुख्यमंत्री सामुदायिक आरोग्य मोफत तपासणी अंतर्गत रहाटगाव येथे आरोग्य तपासणी शिबिर नुकतेच आयोजित करण्यात आले होते.
आरोग्य शिबिरात कर्करोग, हृदयरोग, मेंदू, किडनी प्रत्यारोपण, प्लास्टिक सर्जरी, बालरोग रुग्णांची तपासणी करण्यात आली. यातील 98 रुग्णांपैकी 26 रुग्णांवर विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात पुढील उपचार करण्यात येणार आहे.
शिबिरासाठी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे, विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे, नोडल अधिकारी डॉ. श्याम गावंडे यांनी पुढाकार घेतला. वैद्यकीय समन्वयक डॉ. दिव्यानी मुंदाने, डॉ. पायल गौपाल यांचे मार्गदर्शन लाभले. शिबिरामध्ये तपासणीसाठी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील तज्ज्ञ वैद्यकीय चमूमध्ये डॉ. आदित्य गुप्ता, ह्दयरोगतज्ज्ञ डॉ. सपना गुप्ता, समुपदेशक दिनेश हिवराळे, लेखापाल भूपेंद्र जेवडे, अधिपरिचारिका प्रतिभा सोळंके, ई. सी. जी. टेक्निशियन प्रसाद देशपांडे, लायन्स क्लब इंद्रपूरी प्रकाश तराळे, डॉ. रामदेव सिकची, अनिवाश होले, रूग्णसेवक आनंद जुनघरे, प्रज्ज्वल ठाकरे, रूग्णवाहिका चालक दीपक शर्मा, परिचर हर्षा काळे, अमोल कवटकर यांनी सहकार्य केले.
0000
जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात
जिल्हास्तरीय अटल भूजल योजनेचे प्रशिक्षण
अमरावती, दि. 08 : अटल भूजल योजनेंतर्गत एक दिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षण शेतकरी उत्पादक कंपनीचे व्यवस्थापन व उद्योग संधी या विषयावर आयोजित संलग्न विभागाच्या प्रशिक्षण जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच करण्यात आले.
अटल भूजल योजनेचे उद्देश लोकांना भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेतर्फे मार्गदर्शन करण्यात येत असून नागरिकांना योजनेचा लाभ होत आहे. अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली असून स्प्रिंकलर ड्रीपचा शेतकरी वापर करीत आहे. तसेच जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी या योजनेंचा लाभ घ्यावा. पाण्याचा अपव्यय होणार नाही याची सर्वांची दखल घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, अटल भूजल योजना जिल्हा जलसंधारण अधिकारी सुनिल जाधव, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा राजेश सावळे, उपविभागीय अधिकारी प्रदीपकुमार पवार आदी उपस्थित होते.
प्रशिक्षणाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. वरिष्ठ भूवैज्ञानिक राजेश सावळे यांनी अटल भूजल योजनेतंर्गत 93 ग्रामपंचायतमध्ये पर्जन्यमान यंत्र बसविण्यात आले. तसेच प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये पिझोमीटर बसविण्यात आले असून त्यावरून दरदिवशी डिजिटल वॉटर लेवल इंडिकेटरच्या माध्यमातून पाणी पातळी घेण्यात येत असल्याची माहिती दिली. तसेच प्रति ग्रामपंचायत 10 निरीक्षण विहिरीची पाणी पातळी घेतली जात असून संलग्न विभागामर्फत चांदूर बाजार मोर्शी व वरुड तालुक्यात जलसंधारणाचे कामे करण्यात आल्याचे सांगितले. यांनतर सन 2022-23 मध्ये भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेत राज्यस्तरावर जरुड ग्रामपंचायतने दुसरा व जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल तसेच झटामझिरी व अंबाडा ग्रामपंचायतने जिल्हास्तरावर अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचे हस्ते सन्मानचिन्ह व ग्रामगीता देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच ग्रामपंचायत स्तरावर उत्कृष्ट काम करणारे भूजल मित्र, जिल्हा व्यवस्थापन कक्ष येथील तज्ज्ञ व अंमलबजावणी भागीदार संस्थेतील तज्ज्ञ यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून सन्मान करण्यात आला.
मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा यांनी अटल भूजल योजना अंतर्गत सुरु असलेल्या कामामुळे भूजल पातळी वाढत असून यामुळे जल संकट कमी होत असल्याचे मत व्यक्त केले. तसेच ग्रामपंचायतला बक्षीस मिळत असून जिल्ह्याला राज्यात पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल ग्रामपंचायत जरुडचे अभिनंदन केले. सन 2023-24 मधील भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेत अमरावती जिल्ह्यातील ग्रामपंचायने राज्यस्तरावर उत्कृष्ट सादरीकरण करावे व यावर्षीही जिल्ह्यातील ग्रामपंचायतने पुरस्कार प्राप्त करावे ,अशी अपेक्षा व्यक्त केली.
शेतकरी उत्पादक कंपनी संकल्पना याविषयावर स्मार्ट प्रकल्प विभागीय कृषी कार्यालय आर. आर. पठाण यांनी सादरीकरण केले. तर शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणीचे टप्पे व आवश्यक कागदपत्रे व शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केल्यानंतर कंपनीला येणाऱ्या समस्या, तोटे व निकष यावर मार्गदर्शन केले.
0000
No comments:
Post a Comment