Wednesday, October 16, 2024

DIO NEWS AMRAVATI 16.10.2024

 






निवडणुकीतील प्रत्येक टप्प्याची काळजीपूर्वक कार्यवाही करावी

- जिल्हाधिकारी सौरभ कटियार

अमरावती, दि. 16: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक एकाच टप्प्यात होणार असल्याने सर्व मतदारसंघांत एकाचवेळी कार्यवाही करावी लागणार आहे. प्रामुख्याने उमेदवारी अर्ज, मतदान आणि मतमोजणी या निवडणुकीच्या टप्प्यावर सर्व यंत्रणांनी काळजीपूर्वक कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आगामी विधानसभा निवडणुकीबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसिलदार उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. कटियार म्हणाले, गेल्या निवडणुकीमधील त्रृटी यावेळी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. या त्रृटी दूर करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अधिक लक्ष द्यावे. प्रामुख्याने एकूण मतदानाच्या आकडेवारीमध्ये विसंगती दिसून येते. त्यामुळे मतदान पथकाला सदर मतदानाची एकूण संख्या कळविताना अचूक कळविण्याबाबत सूचना देण्यात याव्यात. तसेच डाटा तयार करताना अचूक आकडेवारी देण्यासाठी जबाबदार पथक नेमण्यात यावे.  ही आकडेवारी परत तपासून पहावी.

यावेळी निवडणूक आदेशासोबत टपाली मतपत्रिका राहणार आहे. त्यामुळे आयोगाच्या निर्देशाप्रमाणे कर्तव्यावरील अधिकारी, कर्मचारी यांना टपाली मतपत्रिका उपलब्ध करून देण्यात याव्यात. दिव्यांग आणि 85 वर्षे वयाच्या नागरिकांना घरून मतदानाचा पर्याय दिला आहे. त्यामुळे सर्व नागरिकांना टपाली मतपत्रिका उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रयत्न करण्यात यावे.

नागरिकांकडून मतदारयादीत नाव नसल्याच्या तक्रारी येतात. त्यामुळे सध्यास्थितीत नाव नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात यावी. तसेच नाव नोंदणीसाठी आलेले अर्ज तातडीने निकाली काढण्यात यावे. अर्जाबाबत शंका असल्यास बीएलओमार्फत स्थळ पाहणी करून याबाबत निर्णय घेण्यात यावा. मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी मतदान चिठ्ठी पोहोचविणे महत्वाचे आहे. त्यामुळे सर्व मतदारांपर्यंत मतदार चिठ्ठी देण्यात यावी. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध सामाजिक संस्थांचा सहभाग घेण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी दिले.

00000

 

 

अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या कर्जाची सोडतीद्वारे निवड

 

अमरावती, दि. 16 : साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या सुविधा कर्ज योजनेंतर्गत लाभार्थ्यांची निवड सोडतीद्वारे करण्यात आली.

योजनेतील 5 पाच लाख रुपये आणि महिला समृद्धी योजनेंतर्गत प्रकल्प मर्यादा 1 लाख 40 हजार रुपये आहे. लाभार्थी निवड समितीने सुविधा कर्ज योजनेचे 145 कर्ज मागणी अर्ज पात्र केले असून महिला समृद्धी योजनेंतर्गत 63 कर्ज मागणी अर्ज पात्र ठरले आहेत.

लाभार्थ्यांची चिठ्ठीद्वारे निवड निवासी उपजिल्हाधिकारी तथा लाभार्थी निवड समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर घ्यारे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. बैठकीमध्ये सुविधा कर्ज योजनमध्ये 50 कर्ज प्रस्तावाचे उद्दिष्ट असून यात 145 पात्र अर्जामध्ये 92 पुरुष आणि 53 महिला आहे. त्यापैकी 30 पुरुष व 20 महिला असे एकुण 50 लाभार्थ्यांची सोडतीद्वारे निवड करण्यात आली. महिला समृद्धी कर्ज योजनेमध्ये 40 कर्ज प्रस्तावाचे उद्दिष्ट असून 63 पात्र अर्जापैकी 40 महिला लाभार्थ्यांची सोडतीद्वारे निवड करण्यात आली.

यावेळी निवड समितीचे सदस्य तथा समाजकल्याण सहाय्यक आयुक्त राजेंद्र जाधवर, जिल्हा व्यवस्थापक तथा सदस्य सचिव जगदीश गाभणे उपस्थित होते.

00000

 

राज्य प्रकल्प व्यवस्थापनाची भूजल केंद्रास भेट

 

अमरावती, दि. 16 : अटल भुजल योजनेंर्तगत माहिती शिक्षण व संवाद घटकांतर्गत भूजल माहिती प्रसारण केंद्राला राज्य व्यवस्थापन कक्षातील जलसंधारण तज्ज्ञ रमेश पेटकर यांनी भेट दिली.

अटल भूजल योजनेंतर्गत माहिती शिक्षण व संवाद घटकांतर्गत मोर्शी आणि वरुड तालुक्यातील योजनेत समाविष्ट ग्रामपंचायतीमध्ये भूजल माहिती प्रसारण केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या केंद्रास पुणे येथील राज्य प्रकल्प व्यवस्थापन कक्षाचे जलसंधारण तज्ज्ञ रमेश पेटकर यांनी जिल्ह्यातील लेहगाव, ता. मोर्शी आणि धनोडी, ता. वरुड येथील केंद्रास भेट देऊन तपासणी केली. यावेळी जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन कक्षातील माहिती शिक्षण संवाद तज्ज्ञ प्रमोद झगेकर उपस्थित होते.

रमेश पेटकर यांनी ग्रामस्थांना भूजल केंद्राचा उद्देश समजावून सांगितला. यावेळी त्यांनी भूजलाच्या शाश्वत विकासासाठी ग्रामपातळीवर सक्षम संस्थात्मक व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. याची मुलभूत माहिती असणे आवश्यक आहे. ग्रामपंचायत पातळीवर एक स्वतंत्र व्यासपीठाची आवश्यकता असून त्यास चालना देण्यासाठी भूजल माहिती प्रसारण केंद्र चांगले माध्यम आहे. अटल जल योजनेंतर्गत भूजलासंबंधीची माहिती व अहवाल सर्वसामान्यांना खुली करण्यात आली आहे, याचा उपयोग होत असल्याचे सांगितले.

प्रमोद झगेकर यांनी नैसर्गिक शेतीचा व कमी खर्चाच्या शेतीचा विचार शेतकऱ्यांनी करणे गरजेच असल्याचे मत व्यक्त केले. नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य बाजारपेठ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याबाबत मार्गदर्शन केले.

धनोडीचे सरपंच श्री. आंडे अध्यक्षस्थानी होते. कमलेश अजमिरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी शरद गोरे, भूपेश बावनकुडे, आशिष गाडबैल, अंकुश पेठ, योगेश यावले, रितेश माटे, विकास सुरोसे आदी उपस्थित होते.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 13.11.2024

  मतदार जनजागृती रॅलीत सजविलेली बैलगाडी आकर्षण अमरावती, दि. 13 (जिमाका) : अमरावती पंचायत समितीच्या स्विप उपक्रमांत पिंक फोर्स समितीने   शि...