Thursday, October 24, 2024

DIO NEWS AMRAVATI 24.10.2024

 





खर्च निरीक्षकांच्या चेकपोस्टला भेटी

अमरावती, दि. 24 : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात नियुक्त खर्च निरीक्षकांनी चेकपोस्टला भेट दिली. यावेळी त्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहनांची कसून तपासणी करण्याचे निर्देश दिले.

खर्च निरीक्षक वेंकन्ना तेजावथ यांनी अमरावती, बडनेरा आणि तिवसा मतदारसंघातील विविध ठिकाणी भेटी दिल्या. खर्च निरीक्षक वेंकन्ना तेजावथ यांनी अमरावती, बडनेरा, तिवसा मतदारसंघातील उराड चेकपोस्ट, रवाळा चेकपोस्ट स्थिर संनियंत्रक पथकाला (चेकपोस्ट) भेट देऊन तपासणी केली. निवडणूक कालावधीत प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करण्याचे निर्देश दिले. यावेळी संपर्क अधिकारी प्रमोद पालवे, सहायक खर्च निरीक्षक चेतन देशमुख उपस्थित होते.

खर्च निरीक्षक डॉ. उमा माहेश्वरी यानी मोर्शी, दर्यापूर, अचलपूर मतदरसंघातील स्थिर सनियंत्रक पथकाला भेट देऊन तपासणी केली. यावेळी त्यांनी स्थिर पथकाला करावयाच्या कार्यवाही बद्दल निर्देश दिले. यावेळी संपर्क अधिकारी मोहिनी ढोंडे उपस्थित होते.

00000





जिल्हा परिषदेत उमेदच्या स्टॉलचे उद्घाटन

महिला बचतगटांच्या वस्तू विकत घेण्याचे आवाहन

- मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र

अमरावती, दि. 24 (जिमाका) : ग्रामीण भागातील उमेद महिला स्वयंसहायता समुहांनी दिवाळी सणानिमित्त उत्पादित फराळ, तसेच विविध वस्तूंच्या विक्री स्टॉलला भेट देवून वस्तू खरेदी करावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या परिसरात स्वयंसहायता समुहाद्वारे उत्पादित वस्तू विक्री स्टॉलचे उद्घाटन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते झाले. यावेळी महानगर पालिका आयुक्त सचिन कलंत्रे, पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील महिला स्वयंसहायता समुहातर्फे पारंपारिक पद्धतीने दिवाळी सणानिमित्त फराळाचे पदार्थ बनविण्यात आले आहे. याची माफक दरात विक्री करण्यात येत आहे. तसेच पणत्या, दिवे, आकाश कंदिल, तसेच गृहउपयोगी वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. नागरिकांनी स्वयंसहायता समूहाकडून वस्तू खरेदी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

याठिकाणी विक्रीकरिता 15 स्टॉल उपलबध आहे. तसेच गिफ्ट हॅम्परमध्ये पूजा साहित्य, गिफ्ट टोकरी साजवटीसह, फराळ गिफ्ट, हँडमेड चॉकलेट गिफ्ट, ज्यूट बॅग, दिवे पणती टोकरी, विक्रीकरीता उपलब्ध आहे. सदर विक्री प्रदर्शनी स्टॉल सर्व पंचायत समिती परिसरमध्येही दिवाळीपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध आहे.

00000

निवडणूक कर्मचाऱ्यांना टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा

कर्मचाऱ्यांनी कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 24 (जिमाका) : विधानसभा निवडणुकीत कर्तव्यावरील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा देण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक कागदपत्रे प्रशिक्षणाच्या दिवशी सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्याअनुषंगाने निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांचे प्रथम प्रशिक्षण दि. 26 ऑक्टोबर 2024 रोजी परतवाडा येथील अंबिका लॉन येथे सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आले आहे. तेव्हा सदर प्रशिक्षणाला येणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांना टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करता यावे, यासाठी नमुना-12 देण्यात येणार आहे.

सदर नमुन्यासोबत निवडणूक कर्तव्याचा आदेश, मतदान ओळखपत्र, तसेच अद्यावत मतदारयादीतील नाव असलेल्या पानाची प्रत, यादी भाग क्रमांक व अनुक्रमांक माहिती जोडणे आवश्यक आहे. त्यामुळे सदर प्रशिक्षणावेळी संबंधित कागदपत्रांची झेरॉक्स प्रत सोबत आणावी, असे निवडणूक निर्णय अधिकारी 42 -अचलपूर विधानसभा मतदार संघ कार्यालयाने कळविले आहे.

0000

उच्च न्यायालयाच्या खंडपीठात विशेष लोकअदालतीचे आयोजन

अमरावती, दि. 24 (जिमाका) : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठ, नागपूर आणि औरंगाबाद खंडपिठ, औरंगाबाद येथे दि. 30 नोव्हेंबर आणि दि. 1 डिसेंबर 2024 रोजी विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर आणि औरगाबाद विभागांतर्गत उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या तडजोडपात्र प्रकरणांचा निपटारा या दिवशी करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाने दिलेल्या निर्देशानुसार विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. यात प्रलंबित असलेले प्रकरणे तडजोडीने व सामंजस्याने निकाली काढण्याकरिता ठेवण्यात येणार आहेत. यासाठी कोणत्याही प्रकारच्या अतिरीक्त शुल्क भरावे लागणार नाही.

सर्व वकिल, नागरिक आणि पक्षकारांनी तडजोड प्राप्त प्रलंबित खटले विशेष लोकअदालती समक्ष तडजोड आणि सामंजस्याने मिटवण्याकरिता उच्च न्यायालय, नागपूर येथे प्रलंबित असलेल्या प्रकरणांमध्ये अर्ज करावा, तसेच आधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अमरावती यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर वे. यार्लगड्डा, तसेच सचिव मंगला कांबळे यांनी केले आहे.

000000





राज्यस्तरीय शालेय नेटबॉल क्रीडा स्पर्धेचा समारोप

*राज्यस्तरासाठी संघाची निवड

        अमरावती, दि. 24 (जिमाका) : राज्यस्तरीय शालेय नेटबॉल क्रीडा स्पर्धा विभागीय क्रीडा संकुलात दि. 22 ते 24 ऑक्टोबर 2024 दरम्यान पार पडल्या. स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रिती देशमुख, महापालिकेचे शिक्षणाधिकारी श्री. मेश्राम, महाराष्ट्र अम्यॅच्युअर नेटबॉल असोशिएशनचे सहसचिव श्याम देशमुख, जिल्हा नेटबॉल असोशिएशनचे अध्यक्ष उदय ठाकरे, उपाध्यक्ष डॉ. सुगन बंड, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव उपस्थित होते.  

14 वर्षे मुले वयोगटामध्ये प्रथम स्थान अमरावती विभागाने प्राप्त  केले. उपविजेते पद नाशिक, तर तृतीय स्थानावर छत्रपती संभाजीनगर विभाग यांनी संपादित केले. 14 वर्षे मुली वयोगटामधील प्रथम स्थान नागपूर विभागाने प्राप्त केले. उपविजेतेपद अमरावती, तर तृतीय स्थानावर छत्रपती संभाजीनगर विभागाने संपादित केले.

19 वर्षे मुले वयोगटामध्ये विजेता प्रथम नागपूर विभागाला प्राप्त केले. उपविजेते पद अमरावती, तर तृतीय स्थान छत्रपती संभाजीनगर विभागाने संपादित केले. 19 वर्षे मुली वयोगटामध्ये विजेता प्रथम स्थान नागपूर विभागाने प्राप्त केले. उपविजेते पद अमरावती, तर तृतीय स्थानावर छत्रपती संभाजीनगर यांनी प्राप्त केले.

राज्याचा संघ निवडीसाठी क्रीडा विभागामार्फत 14 वर्षे मुले व मुली गटातील राज्यस्तर निवड चाचणी घेण्यात आली. यात स्पर्धेतील 8 विभागातून आलेले निवड चाचणीचे खेळाडूंची निवड करून महाराष्ट्र राज्याच्या संघाची निवड करण्यात आली. निवड समिती सदस्य म्हणून श्याम देशमुख, सुशांत सुर्यवंशी, जगदीश आंचल यांनी कामकाज पाहिले.

00000

खर्च निरीक्षकाच्या पत्ता, संपर्क क्रमांकामध्ये बदल

अमरावती, दि. 24 : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नियुक्ती करण्यात आलेले खर्च निरीक्षक वेंकन्ना तेजावथ यांच्या पत्ता आणि संपर्क क्रमांकामध्ये बदल झाला आहे. याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

खर्च निरीक्षक वेंकन्ना तेजावथ यांच्याकडे 36 - धामणगाव रेल्वे, 37 - बडनेरा, 38- अमरावती, 39 – तिवसा या मतदारसंघातील खर्च निरीक्षकाची जबाबदारी आहे. खर्च निरीक्षक वेंकन्ना तेजावथ यांच्या कार्यालयाचा पत्ता आता बदलून पुर्णा, शासकीय विश्रामगृह, कॅम्प, अमरावती असून ई-मेल expobs३६to३९ac@gmail.com, कार्यालयाचा संपर्क क्रमांक - 0721 - 2991257, मोबाईल क्रमांक – ७६६६२४३४६८ असा आहे.

खर्च निरीक्षक वेंकन्ना तेजावथ यांची जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीतील खर्चावर देखरेख राहणार आहेत. निवडणूक खर्चाबाबत तक्रारी, समस्या असल्यास खर्च निरीक्षकांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

000000

जिल्ह्यात आज 6 उमेदवारांचे नामांकन अर्ज दाखल

अमरावती, दि. 24 : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत नामांकन अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी सहा उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले. धामणगाव रेल्वे, बडनेरा, तिवसा, दर्यापूर, मेळघाट आणि मोर्शी मतदारसंघात उमेदवारांनी अर्ज दाखल केले. अचलपूर आणि अमरावती मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला नाही.

36 धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघात प्रताप अरूणभाऊ अडसड – भाजपा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

37 बडनेरा विधानसभा मतदारसंघात राहुल लक्ष्मणराव मोहोड – भारतीय युवा जन एकता पार्टी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

39 तिवसा विधानसभा मतदारसंघात ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

40 दर्यापूर विधानसभा मतदारसंघात कॅप्टन अभिजित आनंद अडसूळ – शिवसेना यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

41 मेळघाट विधानसभा मतदारसंघात मोतीलाल बाटू ठाकरे– बहुजन समाज पक्ष यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

43 मोर्शी विधानसभा मतदारसंघात विपूल नामदेवराव भडांगे – अपक्ष यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

000000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 13.11.2024

  मतदार जनजागृती रॅलीत सजविलेली बैलगाडी आकर्षण अमरावती, दि. 13 (जिमाका) : अमरावती पंचायत समितीच्या स्विप उपक्रमांत पिंक फोर्स समितीने   शि...