जिल्हा परिषदेतील स्वीप कक्षाचे उद्घाटन
*वॉल ऑफ प्राऊड वोटरची संकल्पना
अमरावती, दि. 23 (जिमाका) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी स्वीप उपक्रम राबविण्यात येत आहे. यात जिल्हा परीषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात स्वीप कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. या सभागृहात वॉल ऑफ प्राऊड वोटरची संकल्पना साकारण्यात आली आहे.
जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहूणे म्हणून स्वीप नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्रा, मनपा आयुक्त सचिन कलंत्रे, पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, पोलिस अधिक्षक विशाल आनंद, उप मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बायस उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी आणि त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी वॉल ऑफ प्राऊड वोटर ही संकल्पना अभिनव आहे. निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव असल्याने सर्व विभागांचा यात सहभाग महत्वाचा आहे. मतदानाची प्रक्रिया ही पारदर्शी पद्धतीने आणि कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय राबविल्या जाते. त्यामुळे या प्रक्रियेला विशेष महत्व आहे. मतदारांनी स्वयंस्फुर्तीने मतदानासाठी यावे यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. यामुळे मतदानाच्या टक्केवारीत वाढ होणार आहे.
लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात पिंक आर्मी, वीज देयकावरील मतदानाची आवाहन, विविध सामाजिक संघटनांना मतदार जागृती अभियानात सामावून घेण्यात आले. यामुळे जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत झाली आहे. यावेळीही मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी अभिनव उपक्रम राबविण्यासाठी सर्व विभागांनी पुढे यावे. सहयोगासाठी नागरीक चांगला प्रतिसाद देत असल्यामुळे यात त्यांचा सहभाग घ्यावा. नागरिकांपर्यंत वोटर स्लीप पोहोचविल्यास त्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
मनपा आयुक्त श्री. कलंत्रे यांनी, शहरी भागात मतदानाबाबत जागृती करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहे. कर्मचारी आणि नागरिकांचे मतदान होणे आवश्यक आहे. यासाठी महापालिकेत विशेष सुविधा केली जाईल. यावर्षी नवमतदारांची नोंदणी झाली आहे. त्यांचे मतदान होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. लोकशाहीने दिलेल्या मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावावा, असे आवाहन केले.
पोलिस आयुक्त श्री. रेड्डी यांनी मतदान जागृतीसाठी पोलिस विभागातर्फे संपूर्ण सहकार्य केल्या जाईल. तसेच सर्व पोलिसांचे मतदान होण्यासाठी यंत्रणा तयार केली जाईल. पोलिसांचा सक्रिय सहभागामुळे मतदानाची टक्केवारी निश्चितच वाढण्यास मदत होईल, असे सांगितले.
जिल्हा पोलिस अधिक्षक श्री. आनंद यांनी लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क दिला आहे. त्यामुळे प्रत्येकाने पुढे येऊन मतदान करावे. मतदानासाठी पोलिस विभागातर्फे सहकार्य करण्यात येणार असल्याचे सांगितले.
श्रीमती मोहपात्रा यांनी प्रास्ताविकातून स्वीप उपक्रमात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. यावेळी 80 टक्के मतदानाचे उद्दीष्ट ठेवले असल्याचे सांगितले. मतदारांना समर्पित असे वॉल ऑफ प्राऊउ वोटर तयार करण्यात आले आहे. यामुळे जनजागृती होण्यास मदत मिळणार असल्याचे सांगितले. सुरवातीला जनजागृती कक्षाची फीत कापून उद्घाटन करण्यात आले. ज्ञानेश्वर घाटे यांनी सूत्रसंचालन केले. संजय राठी यांनी आभार मानले.
00000
जिल्ह्यात दोन नामांकन अर्ज दाखल
अमरावती, दि. 23 : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत नामांकन अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी दोन नामांकन अर्ज दाखल करण्यात आले. मेळघाट आणि बडनेरा मतदारसंघात प्रत्येकी एक याप्रमाणे हे दोन अर्ज दाखल करण्यात आले आहे.
41 मेळघाट विधानसभा मतदारसंघात राजाराम भुऱ्याजी भिलावेकर – अपक्ष यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 37 बडनेरा विधानसभा मतदारसंघात राहुल लक्ष्मणराव मोहोड – बहुजन महा पार्टी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
000000
खर्च निरीक्षकांशी संपर्क साधण्याचे आवाहन
अमरावती, दि. 23 : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दोन खर्च निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. खर्च निरीक्षक व्येंकन्ना तेजावथ आणि श्रीमती उमा माहेश्वरी यांची जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीतील खर्चावर देखरेख राहणार आहेत. निवडणूक खर्चाबाबत तक्रारी, समस्या असल्यास खर्च निरीक्षकांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
खर्च निरीक्षक व्येंकन्ना तेजावथ यांच्याकडे 36 - धामणगाव रेल्वे, 37 - बडनेरा, 38- अमरावती, 39 – तिवसा आणि श्रीमती उमा माहेश्वरी यांच्याकडे 40 – दर्यापूर, 41 – मेळघाट, 42 – अचलपूर, 43 – मोर्शी या मतदारसंघातील खर्च निरीक्षकाची जबाबदारी सोपविली आहे.
खर्च निरीक्षक वेंकन्ना तेजावथ यांच्या कार्यालयाचा पत्ता चंद्रभागा, शासकीय विश्रामगृह, कॅम्प, अमरावती असून ई-मेल expobs३६to३९ac@gmail.com, कार्यालयाचा संपर्क क्रमांक -0721 - 2951911, मोबाईल क्रमांक – ७६६६२४३४६८ असा आहे.
खर्च निरीक्षक डॉ. उमा माहेश्वरी यांच्या कार्यालयाचा पत्ता शहानूर, शासकीय विश्रामगृह, कॅम्प, अमरावती असून ई-मेल expobs४०to४३ac@gmail.com, कार्यालयाचा संपर्क क्रमांक - 0721-2951910, मोबाईल क्रमांक 7666791114 असा आहे.
0000
राज्यस्तरीय शालेय नेटबॉल क्रीडा स्पर्धा सन 2024-25
खेळाडूंनी खेळाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास साधावा
- जिल्हाधिकारी सौरभ कटियार
अमरावती, दि. 23 (जिमाका): राज्यस्तरीय शालेय नेटबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, अमरावती विभाग, अमरावती तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद तसेच महाराष्ट्र ॲम्यिच्युअर नेटबॉल असोसिएशन यांच्या सहकार्याने विभागीय क्रीडा संकुल येथे सुरु असून 24 ऑक्टोबर 2024 पर्यंत चालणार आहे.
या स्पर्धेचा उद्घाटन जिल्हा क्रीडा परिषद अध्यक्ष तथा, जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे, क्रीडा व युवक सेवा उपसंचालक विजय संतान, सहसचिव श्याम देशमुख, महाराष्ट्र ॲम्यिच्युअर नेटबॉल असोसिएशन उदय ठाकरे, जिल्हा नेटबॉल असोशिएशन अध्यक्ष डॉ. सुगन बंड, अमरावती जिल्हा नेटबॉल असोसिएशन उपाध्यक्ष सुनिल कडू, अमरावती जिल्हा नेटबॉल असोसिएशन सचिव आदी यावेळी उपस्थित होते.
खेळाडूंनी अथक परिश्रम घेऊन राष्ट्रीय स्तरावर राज्याला नेटबॉल क्रीडा स्पर्धेमध्ये प्राविण्य मिळवून द्यावे. तसेच खेळाडूंनी खेळाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास साधावा. समाजात जनजागृती करण्यासाठी धर्म, वंश, जात, भाषेच्या पुढे जाऊन जनसामान्याला मतदानासाठी प्रोत्साहित व प्रेरित करावे. देशाच्या व राज्याच्या लोकशाहीचे परंपरेचे जतन करण्याचे कार्य युवा वर्ग व खेळाडूंनी करावे, असा संदेश जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी दिला.
स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी जिल्ह्यातील राष्ट्रीय खेळाडूंनी क्रीडा ज्योत जिल्हाधिकारी श्री. कटियार व उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ज्योतीचे प्रज्वलन केले. याप्रसंगी खेळाडूंनी शपथ सोहळा सोबतच राष्ट्रीय मतदार जनजागृती करण्यासाठी मतदारांसाठीची प्रतिज्ञा सर्व खेळाडू, अतिथी, प्रशिक्षक, पालक, क्रीडा प्रेमी यांनी घेतली.
राज्यस्तरीय शालेय नेटबॉल क्रीडा स्पर्धेचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरणानुसार खेळाडूला 5 टक्के आरक्षणांतर्गत अमरावती शहरातील नेटबॉलचे राष्ट्रीय , खेळाडू ज्याची निवड पोलीस दलात झाली अशा अनुज तांमटे, सागर कुरळकर, सुमेरसिंग भिसेन यांचा यशोचित गौरव करण्यात आला. तसेच सत्र 2024-25 या वर्षातील नुकत्याच नांदेड येथे संपन्न झालेत्या राज्यस्तरीय शालेय धनुविद्या स्पर्धेत अमरावती येथील जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रातील धनुविद्या खेळाडूंनी जिल्ह्याचा लौकिक मिळवून दिला. तसेच नाडीचाड, गुजरात येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय धनुविद्या स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या संघात रिकर्व्ह गटात 17 वर्ष वयोगट मध्ये कुमकुम मोहोड, 14 वर्ष वयोगटात सार्थक डांगे, वेदांत वानखडे तसेच इंडियन प्रकारात 14 वर्ष वयोगटातील अथर्व भोपटे, रोहन देवाडेकर, तनिष्क आखरे या खेळाडूंची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार व शुभेच्छा जिल्हाधिकारी व उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला.
या उद्घाटन सोहळ्यास राज्यातील 8 विभागातून आलेल्या 14 व 19 वर्ष वयोगटातील मुले व मुली खेळाडू संघ व्यवस्थापक, क्रीडा मार्गदर्शक व राज्य व जिल्हा संघटनेचे पदाधिकारी, क्रीडा रसिक प्रेक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. संतान यांनी केले.
00000
विशेष लोक अदालत
30 नोव्हेंबर आणि दि. 1 डिसेंबर रोजी
अमरावती, दि. 23 : अमरावतीसह राज्यातील सर्व न्यायालयात दि. 30 नोव्हेंबर आणि दि. 1 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकअदालतीमध्ये दाखल आणि दाखलपूर्व अशी प्रकरणे तडजोडीने आणि सामंजस्याने निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येते. नागरिक, तसेच पक्षकारांनी राष्ट्रीय लोकअदालती समक्ष आपली प्रकरणे सामंजस्याने व तडजोडीने मिटवावीत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर वें. यार्लगड्डा यांनी केले आहे.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या सूचनेनुसार विशेष लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष लोक अदालतीत सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. नागरिक तसेच पक्षकारांनी तडजोड प्राप्त प्रलंबित खटले राष्ट्रीय लोक अदालत समक्ष तडजोडीने व सामंजस्याने मिटविण्यासाठी संबंधित न्यायालयात अर्ज करावा. तसेच दाखलपूर्व प्रकरणांबाबत नजिकच्या जिल्हा किंवा तालुका न्यायालयाशी संपर्क साधावा लागणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव मंगला कांबळे यांनी दिली आहे.
0000
No comments:
Post a Comment