जिल्हाधिकारी कार्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा
अमरावती, दि. 15 : भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या
जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला.
जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या
प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल
भटकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सूरज मडावी, जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे आदी
उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी, डॉ. कलाम यांनी अत्यंत
प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत उच्च शिक्षण घेत देशाच्या सर्वोच्च पद भुषविले.
तसेच देशाच्या मिसाईल कार्यक्रमाची अंमलबजावणी केल्यामुळे त्यांना मिसाईल मॅन
म्हणून संबोधले जात असल्याचे सांगितले. त्यांच्या स्मरणार्थ वाचन प्रेरणा दिवस
राबविला जातो. तसेच वाचनामुळे माणसाचे व्यक्तिमत्व घडत असल्याने प्रत्येकाने
वाचनाची सवय जोपासावी. यामुळे आत्मविश्वास वाढण्यास मदत होत असल्याचे सांगितले.
000000
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत
आचारसंहितेचे पालन करावे
-जिल्हाधिकारी सौरभ कटियार
अमरावती, दि. 15 : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा करण्यात
आली आहे. त्यानुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीदरम्यान सर्वांनी
आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणुकीच्या अनुषंगाने विभागप्रमुखांची
बैठक घेण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, महापालिका
आयुक्त सचिन कलंत्रे, पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल
आनंद, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, निवडणूक उपजिल्हाधिकारी शिवाजी शिंदे आदी उपस्थित
होते.
श्री. कटियार यांनी, निवडणुकीच्या अनुषंगाने तातडीने करावयाच्या
कार्यवाहीमध्ये सार्वजनिक ठिकाणी असलेले राजकीय पक्षांचे झेंडे, फोटो तातडीने
काढण्यात यावेत. तसेच राजकीय पक्षांनी स्वत:हून त्यांचे प्रचार साहित्य काढण्याचे
आवाहन केले. निवडणूक कालावधी हा महत्वाचा कालावधी असल्याने सर्व विभागप्रमुखांनी
दक्ष राहून कारवाई करावी. कायदा आणि सुव्यवस्था राखणे आणि निवडणूक विषयक कामकाज
करण्यासाठी तातडीने मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे.
शहरी भागात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप अंतर्गत
कार्यक्रम घेण्यात यावेत. लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानात 3 टक्के वाढ झाली आहे. ही
चांगली बाब आहे. येत्या निवडणुकीत 70 टक्के मतदान होण्यासाठी सर्व यंत्रणांनी
प्रयत्न करावेत. यासाठी जनजागृतीचे कार्यक्रम राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा.
मतदारांना सध्यास्थितीमध्ये मतदान नोंदणी करता येणे शक्य आहे.
मतदारांनी मतदान यादीमध्ये आपले नाव नसल्यास तातडीने नोंदणी करावी. यामुळे
मतदानाच्या हक्कापासून कुणीही वंचित राहणार नाही. मतदारांच्या सोयीसाठी मतदान
केंद्रावर विविध सुविधा देण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर गर्दी होऊ नये यासाठी
यावेळी अधिक मतदान केंद्र राहणार आहे. तसेच 85 वर्षावरील आणि दिव्यांग मतदारांना
घरून मतदान करण्याची सुविधा देण्यात येणार आहे. मतदारांना त्यांचे मतदान केंद्र
माहिती व्हावे, यासाठी बीएलओमार्फत चिठ्ठी वाटप करण्यात येणार आहे. यावर निगराणी
करण्यासाठी विशेष सुविधा निर्माण करण्यात आली आहे.
उमेदवारांना निवडणुकीसाठी 40 लाख खर्चाची मर्यादा राहणार आहे. तसेच
विविध परवानगीसाठी एक खिडकी सुविधा उपलबध राहणार आहे. सभांसाठी मैदान राखीव
ठेवण्यात येणार आहे. पूर्ण तपासणीअंती मैदानाचे आरक्षण करण्यात येणार आहे.
कुणालाही अगाऊ आरक्षण करून ठेवता येणार नाही. यासाठी सात दिवसाआधी अर्ज करावा
लागणार आहे. रोख रक्कम वाहतूक करताना पुरावा बाळगावा, तसेच रोख रक्कम जवळ ठेवणे
टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी केले.
00000
No comments:
Post a Comment