Saturday, February 28, 2026

DIO NEWS AMRAVATI 28-02-2026




                                                  

                                        मेळघाटातील सुविधा, सुरक्षेवर भर देणार

-गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

*धारणी पोलीस स्टेशनला भेट

*अभ्यासिकेत पुस्तकांचे वाटप

अमरावती, दि. 28 (जिमाका) : जिल्ह्यातील धारणी आणि चिखलदरा या दुर्गम भागांच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. या भागाच्या समस्या जाणून परिसराचा कायापालट करण्यात येणार आहे. प्रामुख्याने मेळघाटातील सुविधा, सुरक्षेवर भर देणार आहे, असे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितले.

आज डॉ. भोयर यांनी धारणी येथील पोलीस स्टेशनला भेट देऊन पोलीस ठाण्याच्या कामकाजाचा आढावा घेतला, तसेच विविध उपक्रमांची पाहणी केली. यावेळी आमदार केवलराम काळे, प्रभुदास भिलावेकर, नगराध्यक्ष सुनील चौथमल, जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद, सहाय्यक जिल्हाधिकारी तसेच प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला, उपविभागीय पोलीस अधिकारी महादेव गरुड, तहसीलदार प्रदीप शेवाळे, पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक संध्या चव्हाण, गटविकास अधिकारी विजय गायकवाड, गटशिक्षणाधिकारी वैभव लादे आदी उपस्थित होते.

डॉ. भोयर यांनी, बऱ्याच वर्षांनंतर या आदिवासी बहुल भागाचा दौरा करण्याची संधी मिळाली आहे. तसेच या भागातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती पाहण्यासाठी धारणी पोलीस स्टेशनला भेट देण्यात आल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी पोलीस प्रशासनाच्या कामकाजाचा आढावा घेतला आणि स्थानिक नागरिकांच्या समस्या तसेच त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या.

स्थानिक आमदार आणि लोकप्रतिनिधी यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांसाठी नवीन अभ्यासिका इमारत बांधण्यात आली आहे. या शैक्षणिक सुविधेबद्दल स्थानिक लोकप्रतिनिधींचे कौतुक करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त ठरणारे पुस्तके वाटप केली. दुर्गम भागातील नागरिकांना आवश्यक असणाऱ्या पायाभूत सोयी-सुविधा पुरवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येणार आहे. मेळघाटचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली योजना राबविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

यावेळी डॉ. भोयर यांनी धारणी पोलीस स्टेशन येथील पाणपोईचे लोकार्पण केले. तसेच गुन्हे तपास प्रक्रियेला गती देण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या फॉरेन्सिक वाहनाचे उद्घाटन केले.

00000000

Friday, February 27, 2026

"हिंद-दी-चादर" श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम सोहळ्याची जय्यत तयारी!




"हिंद-दी-चादर" श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम सोहळ्याची जय्यत तयारी!
एकत्र येऊया, या महान पर्वाचे साक्षीदार होऊया.
📍 स्थळ: ओवे मैदान, सेक्टर-२९, खारघर, नवी मुंबई.
🗓️ दिनांक: २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६.

Wednesday, February 25, 2026

DIO NEWS AMRAVATI 25-02-2026

 अमरावतीत रंगणार 'वैदर्भी महोत्सव - जागर स्त्री शक्तीचा'

*महिला बचत गटांच्या उत्पादनांचे भव्य प्रदर्शन

अमरावती, दि. 25 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान-उमेद अंतर्गत अमरावती येथे विभागीय मिनी सरस व जिल्हा प्रदर्शनी 'वैदर्भी महोत्सव - जागर स्त्री शक्तीचा'चे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन येत्या दि. 4 ते 8 मार्च या कालावधीत सायन्स स्कोर मैदानात होणार आहे.

यात प्रदर्शनात अमरावती विभाग व जिल्ह्यातील महिला बचतगटांच्या उत्पादनांची विक्री व प्रदर्शनासाठी एकूण 150 स्टॉल्स लावण्यात येणार आहेत. दररोज अमरावती तसेच इतर जिल्ह्यांतील सुमारे एक हजार महिला महोत्सवात उपस्थित राहतील. या प्रदर्शनादरम्यान महिला सक्षमीकरणासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा आणि प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे हा या महोत्सवाचा मुख्य हेतू आहे. या महोत्सवाला नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रिती देशमुख यांनी केले आहे.

00000

सोमवारी जिल्हा लोकशाही दिन

अमरावती, दि. 25 (जिमाका) : मार्च महिन्याचा जिल्हा लोकशाही दिन सोमवार, दि. 2 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी संबंधितांनी व्यक्तिश: उपस्थित राहावे, असे आवाहन अधीक्षक निलेश खटके यांनी केले आहे.

00000

कृषी पुरस्कारासाठी ऑनलाईन सुविधा

*शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 25 (जिमाका) : शेती व पूरक क्षेत्रात अतुलनीय व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, महिला, व्यक्ती तसेच संस्थांचा कृषी विभागामार्फत दरवर्षी सन्मान करण्यात येतो. यावर्षीपासून या पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी तातडीने अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्य शासनातर्फे डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, उद्यानपंडित पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), युवा शेतकरी पुरस्कार तसेच कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठीचा पद्मची डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार देण्यात येतात.

यापूर्वी कृषी पुरस्कार प्रस्तावासाठी ऑफलाईन पद्धती होती. यात इच्छुक शेतकऱ्यांना अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर पुरस्कार प्रस्तावांची प्रक्रिया सुलभ, पारदर्शक व प्रभावी करण्यासाठी कृषी विभागातर्फे पुरस्कार प्रस्ताव ऑनलाईन स्वीकारण्यात येणार आहे. यासाठी कृषी विभागाच्या krishi.maharashtra.gov.in संकेतस्थळावर कृषी पुरस्कार टॅब उपलब्ध करून देण्यात आला आहे. पुरस्कारासाठी एकदा अपलोड केलेली कागदपत्रे पुन्हा देण्याची आवश्यकता राहणार नाही. तसेच अर्जाच्या टप्प्याची माहिती शेतकऱ्यांना सहज मिळणार आहे. कृषी आयुक्त यांनी सन २०२५ पासूनचे विविध कृषी पुरस्कार अर्ज ऑनलाईन प्रणालीद्वारे सादर करण्याच्या सूचना केल्या आहे.

पुरस्काराबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा, जिल्ह्यातील इच्छुक शेतकरी, व्यक्ती, संस्था, गट यांनी कृषी पुरस्कार सन २०२५ करीता संकेतस्थळावरील कृषी पुरस्कार टॅबद्वारे तात्काळ अर्ज सादर करावेत. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी आवाहन केले आहे.

000000


सामाजिक न्यायच्या राज्यस्तरीय स्पर्धेत

अमरावती विभागाला सर्वसाधारण विजेतेपद

अमरावती, दि. 25 (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या छत्रपती संभाजीनगर येथील राज्यस्तरीय क्रीडा व कला स्पर्धेत अमरावती विभागाने सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले.

अमरावती विभागाच्या टेबल टेनिस महिलामध्ये प्रथम क्रमांक स्नेहल काळवाघे, बॅडमिंटन पुरुष दुहेरी मध्ये निरज चारोळे, प्रथम डुलगज, गोळा फेक महिलामध्ये प्रथम रुपाली अपराजित, गोळा फेक पुरुषमध्ये प्रथम ज्ञानेश्वर साळवे, कबड्डी पुरुष गटात अमरावती विभाग प्रथम, व्हॉलीबॉल महिला गटात अमरावती विभाग प्रथम, रस्सीखेच महिला गटात अमरावती विभाग प्रथम, क्रिकेट पुरुष व महिला गटात प्रथम क्रमांक, समूह नृत्य अमरावती विभाग प्रथम, भूमिका अभिनयात शिवचरित्र्य सादरीकरणामध्ये अमरावती विभाग प्रथम ठरला आहे. तसेच प्रादेशिक उपायुक्त माया केदार यांनी अभिनयामध्ये साकारलेली राजमाता जिजाऊची भूमिका अत्यंत प्रभावी ठरली.

शिखा गरकल-केदार हिने बालशिवाजी, पवन साबळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली. अमरावती विभागाच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सामाजिक न्याय विभागाचे सचिव हर्षदिप कांबळे, आयुक्त दिपा मुधोळ-मुंडे यांनी स्वागत केले आहे.

000000

वसतिगृह प्रवेशासाठी आधार, स्वयंम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

*इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 10 मार्च अंतिम मुदत

            अमरावती, दि.25 (जिमाका) : शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आणि पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ घेण्यासाठी दि. 10 मार्चपूर्वी अर्ज करावे लागणार आहे.

            बारावीनंतरच्या बिगर व्यावसायिक व व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रथम वर्षाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सदर योजनांचा लाभ घेण्यासाठी शासकीय वसतिगृहामध्ये अर्ज करणे अनिवार्य आहे. अर्ज hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहे.

मुलांनी इतर मागास बहुजन कल्याण मुलांचे शासकीय वसतिगृह, अग्रवाल टॉवर, जाफरीन प्लॉट, आदर्श होटेलजवळ, कॉटन मार्केट रोड, अमरावती. तसेच मुलींनी इतर मागास बहुजन कल्याण मुलींचे शासकीय वसतिगृह, ब्लॉक ए, राम लक्ष्मण संकुल, तिसरा मजला, रामपूरी कॅम्पजवळ, विलासनगर चौक, अमरावती या वसतिगृहामध्ये सादर करावेत.

             12 वी नंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांतीन विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. गुणवत्तेनुसार पहिली निवड यादी 11 मार्च 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. या यादीतील पात्र विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची अंतिम मुदत 12 मार्च ते 20 मार्च 2026 पर्यंत राहील.

अधिक माहितीसाठी सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण अमरावती, सामाजिक न्याय भवन, पोलीस आयुक्तालयाचे मागे, चांदुर रेल्वे रोड, अमरावती, तसेच ई-मेल dobbwoamravati@gmail.com यावर संपर्क साधावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणच्या सहायक संचालक सरीता बोबडे यांनी केले आहे.

0000000

  

इतर मागास विकास विभागाच्या पुरस्कारांसाठी मुदतवाढ

*इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 25 (जिमाका) : इतर मागास विकास विभागांतर्गत कार्यरत इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाच्या पुरस्कारांसाठी पात्र व इच्छुक व्यक्ती, तसेच संबंधित समाजाच्या उत्थानासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहे. यासाठी दि. 3 मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

संचालनालयातर्फे महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कार, नटराज पुरस्कार, विश्वकर्मा पुरस्कार, क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कार देण्यात येतात. यासाठी अर्जदार व्यक्ती, संस्था राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्जदाराने संबंधित समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिकक आदी क्षेत्रातील उत्थानासाठी सलग व उल्लेखनीय स्वरूपाचे कार्य केलेले असावे. अर्ज विहित नमुन्यात सादर करणे बंधनकारक असून अनुषंगिक सर्व आवश्यक कागदपत्रे, कार्यांचा सविस्तर अहवाल, शिफारस पत्रे व प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. अपूर्ण चुकीची माहिती असलेले अथवा मुदतीनंतर प्राप्त होणारे प्रस्ताव कोणत्याही परिस्थितीत विचारात घेतले जाणार नाहीत. पुरस्काराबाबत अंतिम निर्णय शासनस्तरावर घेण्यात येणार आहे.

संबंधित पुरस्कारासाठीचे प्रस्ताव इतर मागास बहुजन कल्याण सहायक संचालक येथे सादर करावेत. अर्जाचा नमुना, अटी व शर्ती, तसेच अधिक माहितीसाठी इतर मागास बहुजन कल्याण सहायक संचालक जिल्हा कार्यालयात उपलब्ध आहे. पात्र व इच्छुक व्यक्ती व संस्थांनी विहित मुदतीत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक सरिता बोबडे यांनी केले आहे.

000000

Tuesday, February 24, 2026

DIO NEWS AMRAVATI 24-02-2026

 शहरात प्रतिबंधात्मक कलम 37  (1) व (3) लागू

अमरावती, दि. 24 (जिमाका) : शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अमरावती शहर पोलीस आयुक्त यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37  (1) व (3) नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

प्रतिबंधात्मक आदेश पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात लागू करण्यात आला आहे. सदर आदेश दि. 26 फेब्रुवारी ते दि. 12 मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी कळविले आहे.

000000

अनुसूचित जातीसाठी मोफत तांत्रिक उद्योजकता प्रशिक्षण

*'बार्टी' आणि 'एमसीईडी'चा संयुक्त उपक्रम

अमरावती, दि. 24 (जिमाका) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या वतीने अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक-युवतींसाठी मोफत अनिवासी तांत्रिक उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सुशिक्षित बेरोजगारांना स्वतःचा रोजगार सुरू करता यावा, या उद्देशाने हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी 27 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावे लागणार आहे.

या उपक्रमांतर्गत किमान दहावी पास उमेदवारांसाठी 1 महिना कालावधीचा डिजिटल फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटिंग आणि पदवीधर उमेदवारांसाठी 2 महिने कालावधीचा अप्लाईड आर्टीफिशिअल इंटेलिजेंस विथ एम्फासिक ऑन रोबोटीक्स आणि आयओटी हे दोन कोर्सेस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यात अभियांत्रिकी, एसीए, बीसीए आणि बीएससी पदवीधर यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

प्रशिक्षणात उद्योजकीय कौशल्याचे प्रशिक्षणात देण्यात येणार आहे. यात उद्योग उभारणी, शासकीय कर्ज योजना आणि अनुदानाची माहिती, प्रकल्प अहवाल तयार करणे, विक्री कला आणि उद्योग व्यवस्थापन, तज्ज्ञ मार्गदर्शकांद्वारे प्रत्यक्ष भेटी आणि मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासाठी वय 18 ते 45 वर्षे, उमेदवार अनुसूचित जाती प्रवर्गातील असावा, राज्याचा गेल्या 15 वर्षांपासूनचा रहिवासी असावा लागणार आहे. उमेदवारांची निवड प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

प्रवेश अर्जासोबत आधार कार्ड, फोटो, जातीचा दाखला, अंतिम सत्र गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला आणि रहिवासी दाखला जोडणे अनिवार्य आहे. याबाबत अधिक माहितीसाठी गणेश बहाड, ९४०५४३५७३१ यांच्याशी 1 महिन्याच्या कोर्ससाठी, तर 2 महिन्यांच्या कोर्ससाठी स्वप्नील इसळ, ८७८८६०४२२६, राजेश सुने ९१६८६६७१५४ यांच्याशी संपर्क साधावा. इच्छुक उमेदवारांनी mced.co.in/Barti यावर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी. तसेच अधिक माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन बार्टीच्या प्रकल्प अधिकारी अनिता गवई आणि एमसीईडीचे विभागीय अधिकारी किशोर अंभोरे यांनी केले आहे.

0000000

मेळघाटातील मनरेगा मजुरांच्या खात्यात 28 कोटी जमा

अमरावती, दि. 24 (जिमाका) : होळीनिमित्त राज्यातील मनरेगा मजुरांसाठी 67 कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला. यातील 28 कोटी 39 लाख रूपयांचा निधी मेळघाटसाठी आज उपलब्ध झाला आहे. हा निधी मजुरांच्या खात्यात तातडीने जमा करण्यात आला आहे.

होळीनिमित्त आदिवासींना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांना मजुरी अदा करण्यासाठी 67 कोटींचा निधी मंजूर केला. याची देयके कोषागाराकडे सादर करण्यात आली. त्यानुसार आज मजुरीची रक्कम थेट मजुरांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली,

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अकुशल मजुरांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो. मेळघाट या आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये मजुरांना काम देताना वाढीव लेबर बजेट मान्यतेचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे विचाराधीन असल्यामुळे काही कालावधीपासून मजुरी अदा करणे प्रलंबित होते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन मजुरांची मजुरी तातडीने जमा केली आहे. मजुरीचा निधी तातडीने मिळावा, यासाठी मनरेगा आयुक्त डॉ. भरत बास्टेवाड यांनीही याबाबत पाठपुरावा केला आहे.

केंद्र शासनाने 19 फेब्रुवारी 2026 रोजी राज्याच्या 13 कोटी मनुष्यदिवसांच्या लेबर बजेटमध्ये वाढ करून सुधारीत 16 कोटी मनुष्यदिवसांच्या बजेटला मान्यता दिली आहे. त्यामुळे मार्च अखेरपर्यंत मजुरांना नियमित रोजगार उपलब्ध होऊन मजुरी वेळेत अदा केली जाणार आहे.

00000

Monday, February 23, 2026

🚩 श्री गुरु तेग बहादूर साहिबजी ३५० वा शहीदी समागम 🚩 खारघर, नवी मुंबई येथे आयोजित या भव्य सोहळ्यात विद्यार्थ्यांनी मानवी साखळीद्वारे भारताचा नकाशा साकारून मानवंदना दिली. 📅 तारीख: २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६ 📍 ठिकाण: ओवे मैदान, सेक्टर-२१, खारघर, नवी मुंबई. ⏰ वेळ: सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत.


🚩 श्री गुरु तेग बहादूर साहिबजी ३५० वा शहीदी समागम 🚩 खारघर, नवी मुंबई येथे आयोजित या भव्य सोहळ्यात विद्यार्थ्यांनी मानवी साखळीद्वारे भारताचा नकाशा साकारून मानवंदना दिली. 📅 तारीख: २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६ 📍 ठिकाण: ओवे मैदान, सेक्टर-२१, खारघर, नवी मुंबई. ⏰ वेळ: सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत. #khargharsamagam #ShahidiSamagam #navimumbai #guruteghbahadursahibji #kharghar
 

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त भव्य कार्यक्रमाचे २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी नवी मुंबईत आयोजन. 📍ओवे मैदान, खारघर, नवी मुंबई.



श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त भव्य कार्यक्रमाचे २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी नवी मुंबईत आयोजन. 📍ओवे मैदान, खारघर, नवी मुंबई. #hinddichadar


 

#हिंददीचादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमाचा भव्य कार्यक्रम 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2026 रोजी नवी मुंबईतील खारघर येथे आयोजित करण्यात आला आहे. गुरु साहिबांच्या या महान समागमात नक्की सहभागी व्हा.


#हिंददीचादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमाचा भव्य कार्यक्रम 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2026 रोजी नवी मुंबईतील खारघर येथे आयोजित करण्यात आला आहे. गुरु साहिबांच्या या महान समागमात नक्की सहभागी व्हा. ओवे मैदान, खारघर,नवी मुंबई.


 

DIO NEWS AMRAVATI 20-03-2026

  जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीवर अशासकीय सदस्यत्वासाठी अर्ज करावेत *पशूसंवर्धन विभागाचे आवाहन अमरावती, दि. 20 (जिमाका) : जिल्हा प्राण...