Friday, March 20, 2020

परदेशातून आलेल्या नागरिकांशी पथकांचा संपर्क सुरू



                     35 नागरिकांचे थ्रोट स्वॅब निगेटिव्ह
                             घाबरू नका, दक्षता घ्या
-         जिल्हा प्रशासनाचे आवाहन
अमरावती, दि. 20 :  कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी परदेशातून आलेल्या प्रवाश्यांची तपासणी, होम क्वारंटाईन आदी उपाययोजना होत आहे. पथकांकडून प्रवाश्यांशी संपर्क व पाठपुरावा होत असून, आता एसटी, रेल्वे व खासगी प्रवासी यांचीही तपासणी केली जात आहे. कालपर्यंत 35 नागरिकांचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्या सर्व नागरिकांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी  केले आहे. 
काल 11 व व तत्पूर्वी 24  थ्रोट स्वॅब असे 35 नागरिकांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. ते सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्याचप्रमाणे, आजपासून रेल्वे, एस. टी. व खासगी बसमधील प्रवाश्यांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. आवश्यक दक्षतेबाबत जनजागृतीही केली जाणार आहे. आज 10 नागरिकांचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्याबाबत अहवाल प्रलंबित आहेत.

परदेशातून आलेल्या नागरिकांशी संपर्क साधण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत.  या पथकांकडून संबंधितांची तपासणी, त्यांना होम क्वारंटाईनबाबत सूचना देण्यात येत आहेत. परदेशातून परतलेल्या सर्व नागरिकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न होत असून, त्या नागरिकांनी स्वत:हून माहिती देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.  
परदेशातून येणा-या नागरिकांची विमानतळावर तपासणी होत आहे. लक्षणे आढळलेल्या प्रवाशांना विलगीकरण कक्षात भरती केले जात आहे. जिल्ह्यातही पथकांकडून घरोघर जाऊन प्रवाश्यांची तपासणी, आवश्यक सूचना व संपर्क ही प्रक्रिया सुरुच आहे.  या पथकांकडून संबंधित सर्व नागरिकांची रोज विचारपूस करण्यात येत आहे. संबंधितांच्या कुटुंबियांना

एसटी, रेल्वे व खासगी बस प्रवाश्यांची तपासणी सुरू













                                                 
            विभागीय आयुक्त व जिल्हाधिका-यांकडून पाहणी

अमरावती, दि. 20 : कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी बाहेरून येणा-या प्रत्येक प्रवाशाची तपासणी दक्षतापूर्वक करावी. कुणातही लक्षणे आढळल्यास तत्काळ सुस्पष्ट नोंद व माहिती घेऊन जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात यावे. ही कार्यवाही काटेकोरपणे करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांनी आज येथे दिले.
प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रेल्वे, एस टी, तसेच खासगी बसमधील प्रवाशांची तपासणी जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे. नागपूर, पुणे, मुंबई, यवतमाळ येथून येणाऱ्या एसटी बसेस तसेच रेल्वे प्रवासी यांची तपासणी मोझरी व बडनेरा बस स्थानक तसेच चांदुर रेल्वे, धामणगाव रेल्वे व बडनेरा रेल्वे स्थानक येथे करण्यात येत आहे. विभागीय आयुक्त पीयुष सिंह व जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज बडनेरा बसस्थानकावर भेट देऊन तपासणी कक्षाची पाहणी केली. प्रत्येक प्रवाशाची काटेकोर तपासणी करा. प्रत्येक नोंद काळजीपूर्वक घ्या, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

अमरावती जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या, तसेच खासगी बसेस यातील प्रवाशांची व रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे.   एसटी  महामंडळ, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय व पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्या अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश असलेले पथके त्यासाठी नियुक्त करण्यात आली आहेत. 

           मुंबई, पुणे, यवतमाळ येथून बसेसची तपासणी बडनेरा बस स्थानकावर, तर रेल्वे प्रवाशांची तपासणी बडनेरा रेल्वे स्थानकावर केली जात आहे.बडने-याबरोबरच चांदुर रेल्वे स्थानक आणि धामणगाव रेल्वे स्थानकावर हे तपासणीसाठी पथके नियुक्त करण्यात आली असून संबंधित रेल्वे स्थानकांच्या स्टेशन मास्टर यांनाही निर्देश देण्यात आले आहेत. 
            यावेळी जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनीही प्रवाश्यांशी संवाद साधून विचारपूस केली. प्रतिबंधात्मक उपायांबाबत माहितीही यावेळी प्रवाश्यांना देण्यात आली. पथकांनी काटेकोरपणे तपासणी करावी. हलगर्जी होता कामा नये, असे निर्देश यावेळी देण्यात आले. विभागीय आयुक्त श्री. सिंह यांनी आज वलगाव येथे आयसोलेशन क्षेत्रासाठी उभारण्यात आलेल्या सुविधांचीही पाहणी केली.    

प्रतिबंधात्मक उपायांसाठी नागरिकांचा स्वत:हून पुढाकार




            विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांचा सावंगा विठोबा येथे भेट
अमरावती, दि. 20 : कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी जिल्ह्यातील यात्रा महोत्सव समारंभ रद्द करण्यासाठी प्रशासनाने केलेल्या आवाहनाला गावागावातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील सावंगा विठोबा येथे गुढीपाडव्यानिमित्त नियोजित यात्रा महोत्सव स्थगित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त पियुष सिंह व जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज सावंगा विठोबा येथे भेट देऊन तेथील विश्वस्तांशी चर्चा केली.

            सावंगा विठोबा येथील वामनराव रामटेके, विनायकदादा पाटील, गोविंदराव राठोड, गटविकास अधिकारी अलमास मुनीर सय्यद, सहाय्यक गटविकास अधिकारी सुधाकर उमक यांच्यासह विश्वस्त मंडळी उपस्थित होते. चारशे वर्षात प्रथमत:च यात्रा महोत्सव स्थगित करण्याची वेळ आली आहे. तथापि, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गावकरी व विश्वस्त मंडळी यांनी पुढाकार घेत प्रशासनाला सहकार्य करत यात्रा महोत्सव स्थगित केला. संसर्ग टाळण्यासाठी सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

            सावंगा विठोबा येथे यात्रेनिमित्त दुकाने लावण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. नागरिकांनाही विश्वस्त मंडळींकडून आवाहन करण्यात येत आहे. विश्वस्त मंडळी व गावक-यांकडून प्रशासनाला चांगले सहकार्य मिळत आहे. या अनुषंगाने परिसरातील सर्व गावांमध्ये वेळोवेळी जनजागृती करावी, असे निर्देश श्री. सिंह यांनी यावेळी दिले.
                                                गावागावांतून मिळतेय सहकार्य
        प्रतिबंधात्मक उपायांसाठी प्रशासनाने केलेल्या आवाहनाला गावागावांतून मोठे सहकार्य मिळत आहे. ठिकठिकाणी ग्रामपंचायतींकडून संदेशफलक व विविध माध्यमातून आवाहन करण्यात येत आहे. गर्दी टाळण्यासाठी आठवडी बाजार स्थगित करण्यात आले आहेत. नागरिक स्वत:हून प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करण्यावर भर देत आहेत. विवाह समारंभही कौटुंबिक स्तरावर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत करण्यास नागरिकांचे मोठे सहकार्य लाभत असल्याचे गट विकास अधिकारी श्रीमती सय्यद यांनी सांगितले.

Wednesday, March 18, 2020

रास्त भाव दुकानांमध्ये बायोमेट्रिक पडताळणी नाही


                गर्दी टाळण्यासाठी टोकन देऊन नियोजित वेळेत वाटप करावे
                        -जिल्हाधिकारी शैलेश नवाल
अमरावती, दि. 18 : कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी रास्त भाव दुकानांमध्ये बायोमेट्रिक पडताळणी न करता धान्य वाटप करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना ई- पॉस उपकरणांवर अंगठा, बोट लावण्याची गरज राहणार नाही व विषाणूचा संसर्ग टाळता येईल. त्यादृष्टीने अन्न व पुरवठा विभागाने जारी केलेल्या सूचनांचे पालन सर्व रास्त भाव दुकानदारांनी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत.  
शिधा वस्तूंचे वितरण करताना लाभार्थ्यांची बायोमेट्रिक पडताळणी न करता रास्त भाव दुकानदारांनी स्वत:चे आधार अधिप्रमाणित करून वाटप करता येणार आहे.  त्याचप्रमाणे, रास्त भाव दुकानांवर गर्दी होणार नाही, यासाठी लाभार्थ्यांना टोकन देऊन नियोजित वेळी दुकानावर येण्याच्या सूचना द्याव्यात. धान्य घेण्यास आलेले लाभार्थी उचित अंतर ठेवून रांगेत उभे राहतील, याचीही दक्षता घ्यावी. ही दक्षता घेत असताना कोणताही लाभार्थी अन्नधान्य मिळण्यापासून वंचित राहणार नाही, याचीही काळजी घ्यावी. धान्यवाटप करताना धान्याचा अपहार, अनियमितता होता कामा नये. वाटप केलेल्या धान्याची जबाबदारी दुकानदाराची असेल. ही सुविधा 31 मार्चपर्यंतच लागू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
कल्याणकारी संस्थांची संख्या मर्यादित असल्याने या संस्थांना गोदामातून देण्यात येणारे धान्य वाटप करताना सॅनिटायझर किंवा साबणाने हात स्वच्छ धुवूनच ई-पॉस उपकरणे हाताळावीत, अशीही सूचना करण्यात आली आहे.
                                                000

Tuesday, March 17, 2020

जिल्हाधिकारी कार्यालयात पर्यटन व्यावसायिक, ट्रॅव्हल्स मालकांची बैठक



                                    प्रवाश्यांना निर्जंतुकीकरणाची सुविधा उपलब्ध करुन द्यावी
-डॉ. नितीन व्यवहारे
अमरावती, दि. 17 :  कोरोना विषाणूच्या देशातील प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर टुर्स-ट्रॅव्हल्सच्या मालकांनी प्रवासी बसमध्ये प्रवास करणाऱ्यांना निर्जंतुकीकरणाची सुविधा उपलब्ध करुन द्यावी, तसेच  बाहेरून येणाऱ्या प्रवाशांबाबत प्रशासनाला वेळीच माहिती द्यावी. दक्षतेसंबंधी शासनाने जारी केलेल्या प्रत्येक बाबींचे पालन व्हावे, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी आज येथे दिले.
जिल्ह्यातील ट्रॅव्हल्स बसचे मालक, पर्यटन व्यावसायिकांची  बैठक निवासी उप जिल्हाधिकारी यांच्या दालनात आज झाली, त्यावेळी ते बोलत होते. तहसीलदार संतोष काकडे, टुर्स अँड ट्रॅव्हल्स संघटनेचे मिराजभाई, भूषण कोल्हे, दिनेश अग्रवाल, महेश कोल्हे, सचिन निचळे, संजय हेमनानी, उमेश उमप, केदार मून, चेतन हरणे, प्रकाश मांगरूळकर, श्याम अग्रवाल, हरमेश सुराणा, नंदू शिरभाते आदी यावेळी उपस्थित होते.
श्री. व्यवहारे म्हणाले की, बाहेरून येणा-या प्रत्येक व्यक्तीची माहिती  प्रशासनाला द्यावी. त्यांची तपासणी आवश्यक आहे. संशयित आढळल्यास त्यांना देखरेखीत ठेवण्यासाठी वलगाव येथे आयसोलेटेड क्षेत्र तयार करण्यात आले आहे. तिथे आवश्यक सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सुरक्षिततेसाठी खबरदारी घेणे आवश्यक असून, त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. ट्रॅव्हल्समध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांसाठी बसमध्ये निर्जंतुकीकरणाची सर्व सुविधा उपलब्ध करुन त्याचा उपयोग करण्यासाठी सांगावे. ट्रॅव्हल्सच्या बुकींग पाईंटवर तसेच शहरातील ट्रॅव्हल्सच्या सुटण्याच्या ठिकाणी पॉवर हाऊस येथे दर्शनी भागात कोरोना आजारा संबंधीचे, घ्यावयाच्या काळजीचे, जनजागृतीचे बॅनर लावण्यात यावे. ट्रॅव्हल्स बसमधील पडदे व बेडशीट, ब्लॅकेंटस् आदी वस्तु स्वच्छ तसेच निर्जंतुक करुन वापरण्यास द्यावे.
जगभरात कोरोनाबाबत निर्माण झालेली स्थिती पाहता पर्यटन व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. प्रवाशांकडून बुकिंग रद्द होत आहेत. मात्र, अशावेळी काही देशांतील पर्यटन व प्रवासासाठीच्या बुकिंग खर्च परतावा मिळू शकत नाही. त्यामुळे याबाबत प्रशासनाकडून पाठपुरावा व्हावा, असे निवेदन संघटनेतर्फे जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. याबाबत सकारात्मक पाठपुरावा करण्यात येईल. असेही त्यांनी सांगितले.. आपत्ती व्यवस्थापनासाठी संघटनेकडून प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे यावेळी संघटनेच्या वतीने सदस्यांनी सांगितले.
00000


पालकमंत्र्यांकडून आयसोलेशन वॉर्डची पाहणी











                        ‘108 रुग्णवाहिकां’ची तत्काळ दुरुस्ती करावी
-          पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

*रुग्णालयांसाठी व्हेंटिलेटर आदी सुविधा मिळविण्याचे निर्देश

अमरावती, दि. 17 : कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजनांच्या अनुषंगाने जिल्ह्यातील ‘108 रुग्णवाहिकां’सह इतरही रूग्णवाहिकांची दुरुस्ती इमर्जन्सी फंडातून तत्काळ करून घ्यावी, त्याचप्रमाणे, रुग्णालयांसाठी व्हेंटिलेटर व इतर आवश्यक साधने उपलब्ध करून घ्यावी, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी आज इर्विन रूग्णालयातील आयसोलेशन वॉर्ड व वलगाव येथील संत गाडगेबाबा वृद्धाश्रम परिसरात उभारण्यात आलेल्या आयसोलेशन क्षेत्राची पाहणी केली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्यासह अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, 108 रुग्णवाहिका सेवेतील, तसेच ग्रामीण आरोग्य यंत्रणेतील सर्व रुग्णवाहिकांचा आढावा व माहिती घेऊन नादुरुस्त वाहनांची तत्काळ दुरुस्ती करून घ्यावी. ज्या रूग्णालयांत व्हेटिंलेटर आवश्यक आहेत, तिथे ती सुविधा तत्काळ मिळवावी. इमर्जन्सी फंडातून ही कार्यवाही पूर्ण करावी. रुग्णालयात आवश्यक सुविधा उपलब्ध करून घेण्यासह बाहेरून येणा-या प्रवाश्यांची तपासणी, देखरेख ही प्रक्रिया काटेकोरपणे करावी.
पालकमंत्र्यांनी जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डला भेट देऊन पाहणी केली. यावेळी परदेश किंवा बाहेरून आलेले काही नागरिक तपासणीसाठी आले होते. त्यांच्यात कुठलीही लक्षणे दिसत नसली तरीही त्यांनी घरात स्वतंत्रपणे राहून योग्य दक्षता घ्यावी, असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले. यावेळी पालकमंत्र्यांनी सर्वांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला. तेथील डॉक्टर व पारिचारिका यांच्याशीही त्यांनी संवाद साधला व दक्षतेबाबत सूचना दिल्या.
वलगाव येथे उभारण्यात आलेल्या आयसोलेशन क्षेत्राचीही त्यांनी पाहणी केली. या क्षेत्रात 100 व्यक्ती राहू शकतील अशा सुविधा उपलब्ध आहेत. परिचर, सहायक आदी स्टाफही तिथे उपलब्ध करुन देण्यात आला आहे. आवश्यकता भासल्यास मोझरी येथेही अशी सुविधा उभारता येईल. जिल्ह्यात 108 रुग्णवाहिका सेवेंतर्गत 29 वाहने उपलब्ध आहेत. त्यातील नादुरुस्त वाहनांची तत्काळ दुरुस्ती, परदेशातून येणा-या नागरिकांची तपासणी व ट्रॅकिंग ठेवणे व सर्वांनी सजग राहण्याचे निर्देश त्यांनी दिले.
 शासनाकडून कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी योग्य ती पावले उचलण्यात येत आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता योग्य दक्षता घ्यावी, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले. 
                                    000

Monday, March 16, 2020

पालकमंत्र्यांकडून वसतिगृहाची आकस्मिक पाहणी


                   








                  
       परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्वच्छता व पुरेशा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात
-         पालकमंत्री यशोमती ठाकूर
-          
अमरावती, दि. 16 : प्रत्येक वसतिगृहात पुरेशी स्वच्छता, आवश्यक साधने उपलब्ध असली पाहिजेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेणार नाही. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कामे करावी, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.
            पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी आज निंभोरा येथील समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहाला अचानक भेट देऊन पाहणी केली, त्यावेळी त्या बोलत होत्या. गृहप्रमुख एस़  एस़  तलवारे, तुषार नांदुरकर, गृहपाल प्रकाश जाधव यांच्यासह अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्र्यांनी वसतिगृहातील सर्व पाचही इमारतींची माहिती घेत तेथील सुविधांची पाहणी केली व वसतीगृहातील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या़. वसतिगृहात विद्यार्थ्यांची मोठी संख्या आहे. तथापि, पुरेशी स्वच्छता आढळून येत नाही, याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेणार नाही. कठोर कारवाई करू. गृहप्रमुख व अधीक्षकांनी या स्थितीत तत्काळ सुधारणा करावी, असा इशारा यावेळी पालकमंत्र्यांनी दिला.
कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी विविध उपायांची अंमलबजावणी शासनाकडून करण्यात येत आहे. वसतिगृहातील विद्यार्थ्यांमध्ये दक्षतेबाबत जागृती करावी. विद्यार्थ्यांसाठी भोजनगृह व स्वच्छतागृहाच्या ठिकाणी हँडवॉश, सॅनिटायझरची व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी दिले. आरोग्यरक्षणासाठी आवश्यक त्या सर्व साधनांची उपलब्धता वसतिगृहात ठेवावी, असेही निर्देश त्यांनी दिले.                                
  
वसतिगृहात स्वच्छतेबाबत तत्काळ कार्यवाही करावी. वसतिगृह परिसरात कुठेही अस्वच्छता पुन्हा दिसता कामा नये, अशी समज यावेळी वसतिगृहाच्या स्वच्छता व देखरेखीचे काम करणा-या कंत्राटदार कंपनीच्या व्यवस्थापकांना देण्यात आली. 

विद्यार्थी व नागरिकांत जागृती करावी

जिल्हा प्रशासनासह इतरही विभागांनी कोरोना प्रतिबंधासाठी जनजागृतीत योगदान द्यावे. विद्यार्थी, तसेच नागरिकांत व्यापक जनजागृती करावी. नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती दक्षता घ्यावी. सर्वांनी मिळून योग्य दक्षता घेऊन संकटाचा मुकाबला करावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.
00000

उच्चस्तरीय टास्क फोर्सचा राज्यव्यापी संवाद

उच्चस्तरीय टास्क फोर्सचा राज्यव्यापी संवाद #TaskForce #टास्कफोर्स