Wednesday, May 22, 2024

मतमोजणीची कामे अधिक जबाबदारीने व अचुकपणे पार पाडावी -जिल्हाधिकारी सौरभ कटियार मतमोजणी पूर्व नियोजनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

 






मतमोजणीची कामे अधिक जबाबदारीने व अचुकपणे पार पाडावी                                                      -जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 

मतमोजणी पूर्व नियोजनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

 

        अमरावती,दि. 22 : लोकसभा सार्वत्रिक  निवडणुकीच्या अनुषंगाने मतमोजणी हा अत्यंत महत्वाचा टप्पा असतो. त्यामुळे मतमोजणीच्या कर्तव्यावर असलेल्या सर्व संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सोपविलेली कामे अधिक जबाबदारीने व अचुकपणे पार पाडावी, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी संबंधित नोडल अधिकाऱ्यांना दिले.

 

          अमरावती लोकसभा निवडणुकीची मतमोजणी येत्या 4 जूनला विद्यापीठ रोडवरील लोकशाही भवन येथे होणार आहे. त्यानुषंगाने मतमोजणी पूर्व नियोजनाबाबत आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी आज महसूल भवन येथे घेतला. त्यावेळी ते बोलत होते. अप्पर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी,  उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांच्यासह सहाही विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक अधिकारी व कार्यन्वयन यंत्रणांचे प्रमुख आदी यावेळी उपस्थित होते.

 

       4 जूनला सर्वसाधारण मोजणी व पोस्टल बेलॅटची मतमोजणी होणार आहे. पोस्टल मतपत्रिकेची मतमोजणी सर्वात अगोदर होणार असून त्यासाठी सहा टेबल असणार. एका हॉलमध्ये 18 टेबल याप्रमाणे सहा हॉलमध्ये 108 टेबलवर मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी सहाय्यक निवडणूक अधिकारी कर्मचारी नियुक्त केले आहेत. मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचे सरमिसळीकरण (रॅन्डमायझेशन) प्रक्रिया आज होईल. तर येत्या दोन-तीन दिवसांत अधिकारी व कर्मचाऱ्यांना कंट्रोल युनिट, ईव्हीएम हातळण्याबाबत तसेच पोस्टल मतपत्रिका कशी उघडावी, मत कसे गणण्यात यावे याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

 

          मतमोजणीसाठी करावयाची टेबलनिहाय रचना, संगणक व्यवस्था, माध्यम कक्ष, मतमोजणी केंद्रावरील प्रवेश व सुरक्षा व्यवस्था, सुरक्षा व्यवस्थेसाठी नियुक्त अधिकारी कर्मचारी, आपत्ती संबंधी नियंत्रण कक्ष, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी करावयाची पूर्वतयारी, भोजन व्यवस्था, मतमोजणी प्रक्रियेतील गोपनियता, वीज पुरवठा, सीसीटीव्ही, पिण्याच्या पाण्याची सुविधा, फिरते शौचालय, वाहनांसाठी पार्कींग व्यवस्था, इंटरनेट सुविधा, मतमोजणी केंद्रात प्रवेशासाठीचे ओळखपत्र या व अन्य महत्वाच्या बाबींसंदर्भात जिल्हाधिकारी श्री. कटियार सविस्तर आढावा घेतला.

 

0000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 14.11.2024

                                                        गृहमतदानाला जिल्हाधिकारी यांची भेट अमरावती, दि. 14 (जिमाका) : जिल्ह्यात आजपासून ज्ये...