आंबा व मिलेट महोत्सवाचे जिल्हाधिकाऱ्याच्या हस्ते उद्घाटन;
नागरिकांनी
महोत्सवाचा लाभ घ्यावा- सौरभ कटियार
अमरावती, दि. 24 (जिमाका) : राज्य कृषी पणन
मंडळाच्यावतीने आंबा व मिलेट महोत्सव प्रदर्शनी व विक्रीचे आयोजन जाधव पॅलेस येथे करण्यात आले. या महोत्सवामध्ये
आंब्याच्या विविध प्रजाती तसेच मिलेटचे विविध प्रकार प्रदर्शनीत ठेवण्यात आले आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. या महोत्सवाला
नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला आंबा व मिल्लेट्स
पदार्थांचे नागरिकांने लाभ घ्यावा, असे आवाहन
जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले.
जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना
आंबा उत्पादनासाठी वाव मिळावा आणि आंबा प्रेमींना विविध प्रजातींच्या आंब्याची चव चाखता
यावी. तसेच तृणधान्यांमध्ये असलेले पोषक घटक आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असून त्यांचा
लाभ ग्राहकांना मिळावा यासाठी जाधव पॅलेस येथे रविवार दि. 26 मेपर्यंत सकाळी 9 ते रात्री
9 वाजेपर्यंत आंबा व मिलेट महोत्सव प्रदर्शनी व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. या
महोत्सवात कोकणचा अस्सल हापूस आंबा, केशर आंबा, मिलेट ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई,राळा,
भगर इत्यादी धान्य आणि त्यापासून तयार करण्यात येणारा ज्वारीचा रवा, बिस्कीट इत्यादी
नाविन्यपूर्ण उत्पादने थेट उत्पादकांकडून खरेदीची संधी ग्राहकांना मिळाली आहे, अशी
माहिती पणन मंडळ उपसरव्यवस्थापक दिनेश डागा यांनी दिली.
आंबा व मिलेट्स महोत्सवाच्या उद्घाटनाला
विभागीय आयुक्त संजय पवार, उपायुक्त श्री. म्हस्के, विभागीय सहसंचालक किसन मुळे, विभागीय सह निबंधक देवयानी
भारसवाडकर, पणन मंडळ उपसरव्यवस्थापक दिनेश डागा आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालक
मयुरी मिसाळ व निलेश वानखडे यांनी तर आभार प्रदर्शन गौरव काटकर यांनी केले.
0000
No comments:
Post a Comment