Friday, November 27, 2026

राज्यातील एकही पात्र #शेतकरी दुष्काळ निधीपासून वंचित राहणार नाही - मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील


 आतापर्यंत राज्यात ३१० तालुक्यांमध्ये #दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, या तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून प्रत्येकी पाच हजार रुपयांचे दुष्काळ अग्रीम वितरित करण्यात येत आहे. आज २६ नोव्हेंबर २०२६ पर्यंत ९६ लाख ४८ हजार ४८९ शेतकऱ्यांच्या खात्यांत ४ हजार ८२४ कोटी २४ लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत. राज्यातील एकही पात्र #शेतकरी दुष्काळ निधीपासून वंचित राहणार नाही. #फार्मरआयडी आणि काही तांत्रिक अडचणींमुळे दुष्काळग्रस्त तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही, त्यांच्या अडचणी दूर करून त्यांनाही मदत देण्यात येणार आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.

राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांकडून ९८ लाख २१ हजार २३ शेतकऱ्यांना मदत मंजूर करण्यात आली असून, त्यापैकी ९६ लाख ४८ हजार ४८९ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत वितरित झाली आहे. शेतकऱ्यांचे फार्मर आयडी, तांत्रिक अडचणी दूर होत असून अग्रीम मदत देण्याची प्रक्रियेची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने सुरू असून, पात्र शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी प्रशासनामार्फत कार्यवाही करण्यात येत असल्याची माहितीही मंत्री जाधव पाटील यांनी दिली.
#ॲग्रीस्टॅक (AgriStack) डेटाच्या माध्यमातून कृषी व अन्य शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी फार्मर आयडीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. तांत्रिक अडचणींमुळे मदत जमा होण्यास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांनी संबंधित प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. अशा अडचणी सोडविण्यास प्रशासनाकडून आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असेही मंत्री जाधव पाटील यांनी सांगितले.
राज्यातील एकही पात्र शेतकरी दुष्काळ मदतीपासून वंचित राहणार नाही. फार्मर आयडी पूर्ण झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांनाही पाच हजार रुपयांची दुष्काळ अग्रीम मदत देण्यात येईल. शेतकऱ्यांनी चिंता करू नये, शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे मंत्री जाधव-पाटील यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक व आर्थिक लोकशाहीतून राजकीय लोकशाहीचा मार्ग सांगितला - डॉ. रत्नशील खोब्रागडे

  ‘ संविधान दिन ’ आणि ‘महात्मा फुले द्विशताद्बी जयंती ’ साजरी   शासकीय विभागीय ग्रंथालय आणि जिल्हा माहिती कार्यालयाचे संयुक्त आयोजन ...