मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा दौरा
अमरावती, दि. 23 (जिमाका) : उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील हे बुधवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
दौऱ्यानुसार, श्री. पाटील यांचे दि. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता बडनेरा रेल्वे स्थानकावर आगमन झाल्यानंतर अमरावती विश्रामगृह येथे राखीव आहे. त्यानंतर सकाळी 8 वाजता शैलेश पोतदार आणि सकाळी 8.45 वाजता शिवराय कुळकर्णी यांच्या निवासस्थानी भेट देतील. त्यानंतर यवतमाळकडे प्रयाण करतील.
00000
अवैध गौण खनिज वाहतुकीवर कारवाई
*निंभा येथे पहाटे ५.१५ वाजता कारवाई
*वाळूसह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त
अमरावती, दि. 23 (जिमाका): भातकुली येथे अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात महसूल विभागाने कारवाई केली आहे. निंभा येथे रविवारी, दि. 22 नोव्हेंबर रोजी सकाळी ५.१५ वाजताच्या सुमारास कारवाई केली. या कारवाईत अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करून वाळूसह अंदाजे ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
परिविक्षाधीन उपविभागीय अधिकारी महेश घाटोळे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. गेल्या २२ दिवसांच्या कालावधीत भातकुली महसूल विभागाने ही पाचवी कारवाई केली आहे.
जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या निर्देशानुसार तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली भातकुली महसूल विभाग अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर लक्ष ठेवत आहे. या कारवाईत तहसीलदार अक्षय मांडवे, मंडळ अधिकारी संतोष धुर्वे, ग्राम महसूल अधिकारी संतोषसिंग गिल व ग्राम महसूल अधिकारी मनोज बेले यांनी सहभाग नोंदविला.
अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात महसूल विभागाची मोहीम यापुढेही सुरू राहणार असून, अशा प्रकारच्या अवैध कृत्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे महसूल विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
00000
विकसित भारत जिल्हास्तरीय युवा संसद स्पर्धा उत्साहात
विद्यार्थ्यांनी ‘नशामुक्त भारत’ व्यक्त केले विचार
अमरावती, दि. 23 (जिमाका) : युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालयाच्या मेरा युवा भारततर्फे विकसित भारत जिल्हास्तरीय युवा संसद स्पर्धा उत्साहात पार पडली. पोटे पाटील कॉलेजच्या संत गाडगेबाबा सेमिनार हॉलमध्ये ही स्पर्धा शुक्रवार, दि. २० नोव्हेंबर रोजी पार पडली. यात विद्यार्थ्यांनी ‘विकसित भारतासाठी नशामुक्त युवा’ या विषयावर विचार व्यक्त केले.
युवकांमध्ये सामाजिक जाणीव, नेतृत्वगुण, वैचारिक प्रगल्भता आणि लोकशाही मूल्यांची रुजवणूक व्हावी, तसेच विकसित भारताच्या संकल्पनेत युवकांचा सक्रिय सहभाग वाढावा, यासाठी मेरा युवा भारतच्या वतीने ही स्पर्धा घेण्यात आली.
या स्पर्धेमध्ये १५ ते २९ वयोगटातील युवक-युवतींनी मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांमधून तीन मिनिटांच्या कालावधीत आपले विचार प्रभावीपणे मांडले. व्यसनमुक्त समाजनिर्मिती, युवकांची सामाजिक जबाबदारी आणि विकसित भारताच्या उभारणीत तरुणांची भूमिका यांसारख्या महत्त्वपूर्ण मुद्यांवर स्पर्धकांनी मते व्यक्त केली.
स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून पोटे पाटील कॉलेजचे प्राचार्य प्रदीप जवंधिया, मेरा युवा भारत जिल्हा युवा अधिकारी अक्षय निपाणे उपस्थित होते. परीक्षक म्हणून विशाल तिजारे, प्रा. डॉ. शुद्धोधन कांबळे, जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटूरवार, पोटे कॉलेजचे डॉ. ए. पी. धांडे, प्रा. के. के. नगरिया यांनी कामकाज पाहिले.
स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तीन स्पर्धकांची राष्ट्रीय युवा संसद २०२७ साठी निवड करण्यात आली. यात प्रतीक्षा शिंदे, गौरव देशमुख, भक्ती इंगळे यांचा समावेश आहे. विजेत्यांचे मान्यवरांनी कौतुक केले. सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्रे व विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.
युवकांनी व्यसनमुक्त जीवनशैलीचा स्वीकार करून समाजामध्ये जनजागृती निर्माण करावी आणि राष्ट्राच्या विकासकार्यात सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. प्रा. नंदा सुनप्रीत यांनी सूत्रसंचालन केले. मेरा युवा भारतचे लेखापाल अजिंक्य गवळी यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी नरेंद्र घुरडे, स्नेहल वानखेडे यांनी पुढाकार घेतला.
00000
कायदेशीर दत्तक प्रक्रियेतूनच बालकांना सुरक्षित भविष्य द्यावेजिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे आवाहन
*बालकांची खरेदी-विक्री हा गंभीर गुन्हा
अमरावती, दि. 23 (जिमाका): अमरावती शहरात बालविक्री व मानवी तस्करीसंदर्भात समोर आलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. बालकांची खरेदी-विक्री करणे, आर्थिक मोबदल्यात बालकांचे हस्तांतरण करणे अथवा दत्तकाच्या नावाखाली कोणताही बेकायदेशीर व्यवहार करणे हा गंभीर गुन्हा असून, अशा प्रकारांपासून नागरिकांनी दूर राहून शासनमान्य कायदेशीर दत्तक प्रक्रियेचाच अवलंब करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.
बालक दत्तक घेणे ही केवळ कौटुंबिक इच्छा नसून ती बालकाच्या आयुष्याशी निगडित मोठी जबाबदारी आहे. अनाथ, परित्यक्त आणि समर्पित बालकांना कुटुंबाचा आधार मिळावा, हा या प्रक्रियेचा मूळ हेतू आहे. मात्र, काही वेळा मध्यस्थांमार्फत बालक मिळविणे, पैशांच्या मोबदल्यात ताबा घेणे, खोटी जन्मनोंदणी करणे किंवा खासगी कराराच्या आधारे दत्तक प्रक्रिया झाल्याचे भासविणे, असे प्रकार घडण्याची शक्यता असते.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी, बालकांची खरेदी-विक्री किंवा बेकायदेशीर हस्तांतरण कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. दत्तक घेऊ इच्छिणाऱ्यांनी अनधिकृत व्यक्ती किंवा मध्यस्थांशी संपर्क न साधता शासनाच्या अधिकृत यंत्रणेमार्फतच प्रक्रिया पूर्ण करावी आणि सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देशही दिले आहेत.
कायदेशीर दत्तक प्रक्रिया 'कारा'च्या माध्यमातूनच केंद्रीय दत्तक ग्रहण संसाधन प्राधिकरण हे केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयांतर्गत कार्यरत वैधानिक प्राधिकरण असून, बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, २०१५ व दत्तक विनियम, २०२२ नुसार दत्तक प्रक्रिया राबविली जाते. इच्छुक व पात्र पालकांनी CARA च्या CARINGS या अधिकृत पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर पात्रतेची पडताळणी, गृहचौकशी, बालकाची कायदेशीर उपलब्धता, सामाजिक व वैद्यकीय अहवाल आणि नियमानुसार दत्तक आदेशाची कार्यवाही पूर्ण केली जाते.
संशयित बाब निदर्शनास आल्यास तात्काळ संपर्क साधावा. दत्तक प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार किंवा अनधिकृत मध्यस्थी करू नये, तसेच जन्म प्रमाणपत्राचा गैरवापर करून चुकीची माहिती नोंदविणे, पालकत्व अनधिकृतरीत्या बदलणे किंवा बालकांची विक्री करणे हे गंभीर प्रकार असल्याचे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी नमूद केले आहे. बालकांच्या सुरक्षिततेशी संबंधित संशयास्पद बाब आढळल्यास नागरिकांनी तात्काळ पोलीस विभाग, बाल कल्याण समिती किंवा जिल्हा बाल संरक्षण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. महिला व बाल विकास विभागामार्फत बालकांचे संरक्षण, काळजी, समुपदेशन आणि पुनर्वसनासाठी आवश्यक कार्यवाही सुरू आहे.
दत्तक घेण्यासाठी नागरिकांसाठी बालक दत्तक घेण्यासाठी केवळ अधिकृत CARA, CARINGS प्रक्रियेचाच अवलंब करावा. एजंट किंवा मध्यस्थांमार्फत बालक घेऊ नये व पैशांच्या मोबदल्यात बालकांची देवाण-घेवाण करू नये. जन्म प्रमाणपत्र किंवा खासगी करार हा कायदेशीर दत्तक आदेशाचा पर्याय ठरू शकत नाही. संशयास्पद घटनांची माहिती तात्काळ संबंधित यंत्रणांना द्यावी. तसेच अधिक माहितीसाठी नागरिक cara.wcd.gov.in या संकेतस्थळ आणि carings.wcd.gov.in या पोर्टलला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय गट यांनी केले आहे.
00000
विशेष लोकअदालतीत ६४ प्रकरणांमध्ये १.८९ कोटींची तडजोड
अमरावती, दि. २३ (जिमाका) : राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार अमरावती जिल्हा न्यायालय तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये आयोजित विशेष लोकअदालतीत ६४ प्रकरणांमध्ये १ कोटी ८९ लाख रूपयांची तडजोड करण्यात आली.
निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अॅक्टच्या कलम १३८ अंतर्गत दाखल धनादेश अनादर प्रकरणांसाठी विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. या लोकअदालतीत एकूण ६४ प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्यात आली आहे. तडजोडीअंती १ कोटी ८९ लाख रकमेचा निपटारा करण्यात आला.
प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा न्यायाधीश अमित जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अमरावतीचे सचिव संजय सहारे यांच्या नेतृत्वाखाली ही विशेष लोकअदालत पार पडली.
लोकअदालतीसाठी जिल्हा व तालुका न्यायालयांतील न्यायाधीश, अधिवक्ता आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. पक्षकारांना वेळेवर माहिती देणे, सामोपचाराने वाद मिटविण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि आवश्यक समन्वय साधण्याचे काम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व न्यायालयांच्या माध्यमातून करण्यात आले.
000000
समान नागरी कायद्याबाबत रविवारी जनसुनावणी
अमरावती दि. 23 (जिमाका) : समान नागरी संहितेबाबत अमरावती महसूल विभागातील विविध हितसंबंधी गट, संस्था आणि नागरिकांच्या सूचना, हरकती, तक्रारी, अडीअडचणी व मते जाणून घेण्यासाठी न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखालील समितीची विभागीय जनसुनावणी रविवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित करण्यात आली आहे. या जनसुनावणीच्या नियोजन, राजशिष्टाचार व कामकाज व्यवस्थेसाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी कार्यालयीन आदेश जारी केले आहेत.
समान नागरी कायद्याबाबत (युसीसी) विविध हितसंबंधी गट, संस्था व नागरिकांच्या सूचना, हरकती आणि मते जाणून घेण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समिती नागरिकांचे म्हणणे ऐकून घेणार आहे. विभागातील इतर जिल्ह्यांच्या नागरिकांसाठी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय दूरदुष्य प्रणालीद्वारे जोडण्यात येणार आहे.
अमरावती विभागातील नागरिकांच्या जनसुनावणी रविवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी अकोला जिल्ह्यासाठी सकाळी ११ ते १२ वाजता, वाशिम जिल्ह्यासाठी सकाळी १२.३० ते दुपारी १.३० वाजता, बुलढाणा जिल्ह्यासाठी दुपारी २.३० ते दुपारी ३.३० वाजता, यवतमाळ जिल्ह्यासाठी दुपारी ४ ते सायंकाळी ५ वाजता आणि अमरावती जिल्ह्यासाठी सायंकाळी ५.३० ते सायं. ६.३० वाजता जनसुनावणी घेण्यात येणार आहे.
संबंधित गट, संस्थांचे प्रतिनिधी आणि नागरिक यांना नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती किंवा संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय येथे सुनावणीच्या वेळेपुर्वी एक तास आधी उपस्थित राहावे लागेल. अमरावती येथील उपस्थितांची सुनावणी समितीसमोर समक्ष घेण्यात येईल. विभागातील जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहणाऱ्या नागरीकांची सुनावणी दुरदृष्य प्रणालीद्वारे घेण्यात येईल. ज्या नागरीकांना केवळ ऑनलाईन पद्धतीने मत सादर करावयाचे आहे. त्यांना महाराष्ट्र शासनाच्या ucc.maharashtra.gov.in पोर्टलवर ३७ मुद्यांची माहिती देता येईल.
00000
चांदूर रेल्वेत दुष्काळ, पाणी टंचाई निवारणासाठीसमन्वय समितीची आढावा सभा संपन्न
अमरावती दि. २३ (जिमाका) : चांदूर रेल्वे उपविभागातील चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्यांमध्ये संभाव्य दुष्काळ व पाणी टंचाईच्या काळात ग्रामीण भागात पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तालुकास्तरीय समन्वय समितीची आढावा सभा आज घेण्यात आली. आमदार प्रतापदादा अडसड यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली.
या आढावा बैठकीत तिन्ही तालुक्यांतील विविध शासकीय विभागांच्या पूर्ण, प्रस्तावित आणि प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जलसंधारण व पाणीपुरवठ्याच्या कामांमध्ये नाला खोलीकरण, विहिर खोलीकरण व पुनर्भरण, विहिर दुरुस्ती, रेन वॉटर हार्वेस्टींग, सार्वजनिक विहिर अधिग्रहण, खासगी विहिर सर्वेक्षण, शेततळे निर्मिती व खोलीकरण तसेच ठिबक आणि तुषार सिंचनाद्वारे पिकांना पाणीपुरवठा करण्याबाबत चर्चा करण्यात आली. कृषीसाठी वीज जोडणी, वीज फीडर दुरुस्ती व नवीन फीडर जोडणी, तसेच चारा निर्मिती आणि जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता करण्यावर भर देण्यात आला. शेतकऱ्यांची पीक कर्जमाफी, तसेच जिल्हा मध्यवर्ती बँक आणि राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून नवीन पीक कर्ज वाटपाची सद्यस्थिती यावेळी जाणून घेण्यात आली.
याबाबत आमदार श्री. अडसड यांनी दुष्काळाच्या स्थितीमध्ये प्रस्तावित जलसंधारणाची कामे तातडीने पूर्ण करावीत. जनावरांना चाऱ्याची टंचाई भासू नये यासाठी चारा लागवडीकरिता शेतकऱ्यांना वैरण बियाणे उपलब्ध करून द्यावे. पीक कर्जमाफी व नवीन पीक कर्जाचे प्रलंबित प्रस्ताव तसेच प्रलंबित फार्मर आयडी आणि ई-केवायसी तातडीने निकाली काढावीत, असे निर्देश दिले. तसेच नागरिकांनी त्यांच्या तक्रारी MLApratapadsad.com या ऑनलाईन पोर्टलवर दाखल कराव्यात, असे आवाहन केले.
सभेला चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्यांतील तहसील कार्यालय, पंचायत समिती, कृषी, पाणीपुरवठा, जलसंधारण, वन, पशुसंवर्धन, सहायक निबंधक सहकारी संस्था, पाटबंधारे, नगर परिषद तसेच इतर संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
00000
नवोदय विद्यालय प्रवेशासाठी शनिवारी परीक्षा
*जिल्ह्यातील १५,४१२ विद्यार्थी देणार परीक्षा
अमरावती, दि. २३ (जिमाका): जवाहर नवोदय विद्यालय समितीमार्फत शैक्षणिक सत्र २०२७-२८ मधील इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी 'जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी' शनिवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता घेण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील एकूण १४ तालुक्यांमधील ६१ केंद्रावर तब्बल १५ हजार ४१२ विद्यार्थी परिक्षा देणार आहेत. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेची प्रवेशपत्रे वितरीत करण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्रावरील सर्व तपशील काळजीपूर्वक तपासावेत, परीक्षेचे स्वरूप व सूचना समजून घ्याव्यात आणि परीक्षेच्या दिवशी निर्धारित वेळेपूर्वी केंद्रावर उपस्थित राहावे.
प्रवेशपत्र, परीक्षा केंद्र किंवा परीक्षेसंदर्भात इतर कोणतीही अडचण असल्यास जवाहर नवोदय विद्यालय, नवसारी (अमरावती) येथील प्रवेश परीक्षा प्रभारी श्री. सोनटक्के यांच्याशी ९४२३६१७८४९ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन नवोदय विद्यालयाचे प्राचार्य एस. जे. गवई यांनी केले आहे.
00000
दुचाकींसाठी नवीन वाहन मालिका सुरू
अमरावती, दि. 23 (जिमाका) : प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे परिवहनेत्तर दुचाकी संवर्गातील नवीन वाहनांसाठी नवीन वाहन मालिका सुरू करण्यात येत आहे. पसंतीक्रमासाठी दि. १ डिसेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत प्रादेशिक परिवहन कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
एकाच क्रमांकासाठी दोन किंवा अधिक अर्ज आलेल्या प्रकरणातील अर्जदारांनी २ डिसेंबर रोजी दुपारी १.३० वाजेपर्यंत जादा रकमेचा डिमांड ड्राफ्ट बंद लिफाफ्यात सिलबंद करून जमा करावा लागणार आहे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांनी केले आहे.
00000
जुन्या वाहनांना 'एचएसआरपी' नंबर प्लेट नसल्यास होणार दंडात्मक कारवाई ;३० नोव्हेंबरपर्यंत विशेष तपासणी मोहीम
अमरावती, दि. २३ (जिमाका) : १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना 'उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी' (एचएसआरपी) बसवणे बंधनकारक असतानाही अद्याप अनेक वाहनधारकांनी ती बसवलेली नाही. अशा वाहनांविरुद्ध परिवहन विभागाने आता कारवाईचा बडगा उगारला असून, २० ते ३० नोव्हेंबर दरम्यान विशेष तपासणी मोहीम तीव्र करण्यात आली आहे. ही पाटी नसलेल्या वाहनांवर कायदेशीर व दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती अमरावतीचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांनी दिली आहे.
राज्याचे अपर मुख्य सचिव (परिवहन) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या विशेष मोहिमेचे निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी यासह सर्व प्रकारच्या जुन्या वाहनांची कसून तपासणी केली जाणार आहे.या मोहिमेदरम्यान प्रमुख रस्ते, महामार्ग, तपासणी नाके तसेच गर्दीच्या ठिकाणी वाहने थांबवून नियमानुसार 'एचएसआरपी' पाटी बसवण्यात आली आहे की नाही, याची पडताळणी केली जाईल. शासनाच्या नियमांनुसार जुन्या वाहनांना ही नंबर प्लेट बसवणे अनिवार्य आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर परिवहन विभागाच्या पथकामार्फत जागेवरच कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.तरी, १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत असलेल्या सर्व वाहनधारकांनी दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी आपल्या वाहनांना तातडीने 'उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी' (एचएसआरपी) बसवून घ्यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
0000

.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)







No comments:
Post a Comment