Friday, November 27, 2026

DIO NEWS AMRAVATI 27.11.2026




                             सफाई कर्मचाऱ्यांच्या आवास, आरोग्याबाबत कार्य करावे

 

- राज्‍य सफाई कर्मचारी आयोग अध्‍यक्ष शेरसिंग डागोर

 

अमरावती, दि. 27 (जिमाका): स्वच्छता राखण्यात महत्वाचा घटक असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आवास आणि आरोग्याच्या बाबतीत यंत्रणांनी कार्य करावे, असे आवाहन राज्‍य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्‍यक्ष शेरसिंग डागोर यांनी केले.

 

नियोजन भवनात सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

श्री. डागोर म्हणाले, सफाई कर्मचाऱ्यांच्या आवास योजना प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे. यासाठी जिल्हास्तरावर अधिकृत अधिकारी नेमावा. त्यांच्याकडून या कर्मचाऱ्यांना निवासाची सुविधा उभारण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात यावी. त्यासोबतच सफाई कर्मचारी जोखीमीचे काम करीत असल्याने त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. यासाठी निश्चित कालावधीनंतर संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात यावी. आरोग्याच्या सुविधा मिळण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांचे आयुष्मान कार्ड काढण्याची प्रक्रिया करण्यात यावी. यामुळे त्यांना कॅशलेस सुविधा मिळण्यास मदत होईल. तसेच कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न करण्यात यावे.

 

        यासोबतच कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षेचाही लाभ देण्यात यावा. प्रामुख्याने वेतन जमा होणाऱ्या बँका वेतन खात्यावर विविध सुविधा देतात. त्यामुळे या सुविधांचा लाभ घेण्यात यावा. सफाई कर्मचाऱ्यांनाही सुट्टीचा अधिकार असून इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांनाही सुट्ट्या द्याव्यात. तसेच विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी शिबीरे आयोजित करण्यात यावी, अशा सूचनाही श्री. डागोर यांनी दिल्या.

00000



दाढी व पेढी येथे गावभेट कार्यक्रमांतर्गत दुष्काळ निवारण कृती आराखडा तयार

 

पाणीटंचाई निवारण, जलसंधारण व रोजगार निर्मितीच्या कामांना प्राधान्य

 

अमरावती, दि.  27 (जिमाका) : उपविभागीय अधिकारी भातकुली तसेच तालुकास्तरीय विविध विभागांच्या यंत्रणांनी संयुक्तपणे गावांना भेट देऊन गावस्तरीय दुष्काळ निवारण कृती आराखडा तयार केला. गावभेट कार्यक्रमांतर्गत आज भातकुली तालुक्यातील दाढी व पेढी येथे विशेष गावभेट देण्यात आली.

 

आराखड्यानुसार गावातील पाणीटंचाईवर मात करणे, जलसंधारणाची कामे करणे, पशुधनासाठी चारा उपलब्ध करणे तसेच स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विविध कामांचे नियोजन करण्यात आले.

 

यामध्ये चार सार्वजनिक विहिरींमधील गाळ काढून त्यांचे पुनर्जीवन करणे, तीन हातपंपांची दुरुस्ती, दोन नाल्यांचे खोलीकरण, सिमेंट नाला बांधाची दुरुस्ती, रोजगार निर्मितीच्या अनुषंगाने दोन पाणंद रस्त्यांची कामे, दोन शासकीय जमिनींवर वृक्षलागवड, शासकीय जमिनीवर चारा लागवड, खोदतळे निर्मिती, ५० जलतारा घेणे तसेच पोखरा योजनेंतर्गत ढाळीचे बांध तयार करणे आदी कामांना प्राधान्य देण्याचे निश्चित करण्यात आले. या प्रस्तावित कामांच्या अनुषंगाने संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष क्षेत्र पाहणी करण्यात आली.

 

यावेळी उपस्थित शेतकरी व ग्रामस्थांना हायड्रोपोनिक पद्धतीने चारा लागवड, जलतारा निर्मिती, वैयक्तिक चारा लागवड याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच कर्जमाफी योजनेचा लाभ मिळविण्यासाठी लाभार्थ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे व फार्मर आयडी काढून घेण्याबाबतही माहिती देण्यात आली.

 

या गावभेट कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी महेश घाटुळे, तहसीलदार अक्षय मांडवे, गटविकास अधिकारी तृप्ती दुरगकर, तालुका कृषी अधिकारी उत्कर्षा भोसले यांच्यासह मृद व जलसंधारण, महावितरण, सहकार, भूमी अभिलेख, ग्रामीण पाणीपुरवठा व पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

तसेच मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, पोलीस पाटील व गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.

 

गावातील मूलभूत सुविधा, पाणी उपलब्धता, जलसंधारण, चारा नियोजन आणि रोजगार निर्मिती या बाबींवर भर देत गावस्तरीय आराखड्यातील कामांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे नियोजन या गावभेटीच्या माध्यमातून करण्यात आले.

00000

मेगा कृषी आउटरीच अभियान संपन्न

 

*कृषी कर्ज योजनेंतर्गत ३५ कोटी रुपयांचे कर्जवाटप

 

अमरावती, दि. 27 (जिमाका): जिल्ह्याची अग्रणी बँक असलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या वतीने आज शिरजगाव बंड, ता. चांदूर बाजार येथे देशव्यापी मेगा कृषी आउटरीच अभियान पार पडले. या अभियानाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या मेळाव्याच्या माध्यमातून कृषी कर्जाच्या विविध योजनांतर्गत ३५ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले.

 

ब्राह्मणवाडा थडीचे माजी सरपंच अतुल दारोकार अध्यक्षस्थानी होते. सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या केंद्रीय कार्यालयाचे महाप्रबंधक कौशिक कुमार काला, क्षेत्रीय प्रबंधक पन्नम कुमार, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक नरेश हेडाऊ, तहसीलदार योगेश गाडे, सहायक निबंधक स्वरूपा जुमडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

 

महाप्रबंधक श्री. कौशिक कुमार काला यांनी, ग्राहक हा बँकेचा आत्मा असून, सेंट्रल बँक ऑफ इंडिया नेहमीच ग्राहककेंद्रित बँकिंगला प्राधान्य देत आली आहे. शेतकरी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून, त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी बँक विविध कृषी कर्ज योजनांच्या माध्यमातून सदैव सहकार्य करण्यास कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन केले.

 

सचितानंद राऊत यांनी बँकेच्या विविध कृषी कर्ज योजना, शासकीय योजना तसेच ग्राहकांसाठी उपलब्ध असलेल्या बँकिंग सुविधांची माहिती दिली.

 

क्षेत्रीय प्रबंधक पन्नम कुमार यांनी प्रास्ताविक केले. चंद्रशेखर विल्हेकर यांनी सूत्रसंचालन केले. अग्रणी जिल्हा व्यवस्थापक नरेश हेडाऊ यांनी आभार मानले.

00000



अमरावती जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्न

 

अमरावती, दि. २७ (जिमाका) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित जिल्हास्तरीय युवा महोत्सव सांस्कृतिक व वैचारिक स्पर्धा उत्साहात पार पडली.

 

उद्घाटन कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलसचिव अविनाश असनारे, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, निवृत्त जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदीप शेटीये, राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी डॉ. मनीष गवई उपस्थित होते. युवा महोत्सवाच्या स्पर्धा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर दृकश्राव्य सभागृहात घेण्यात आल्या.

 

विभागीय क्रीडा संकुल येथे 'विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग २०२७' अंतर्गत जिल्हा अजिंक्यपद चॅलेंज ट्रॅकवर सादरीकरण झाले. नावीन्यपूर्ण अर्थव्यवस्था, पर्यटन आणि सर्जनशील उद्योग या विषयांवर निवडक १० स्पर्धकांनी सादरीकरण केले. यातून गार्गी बिजवे, नरेंद्र राऊत, प्रथमेश जवळकर तसेच नम्रता राखोंडे, वेदांत भुयार व मयुरी शिंदे या दोन संघांची निवड करण्यात आली. जिल्हा क्रीडा संकुलात चित्रकला व कविता लेखन स्पर्धा घेण्यात आल्या. मुख्य सांस्कृतिक कार्यक्रमात पाच विविध कला प्रकारांमध्ये युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. जिल्ह्यातील विजयी स्पर्धक यवतमाळ येथे होणाऱ्या विभागस्तरीय युवा महोत्सवात जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील.

 

कविता लेखनात प्रथम व्यंकटेश नेरकर, द्वितीय श्रद्धा चौधरी, तृतीय हर्षदा सुरेश काळे, चित्रकला स्पर्धेत प्रथम मुकेश अढाऊ, द्वितीय रुपाली घायाळ, तृतीय नुपूर डोंगरे, लोकगीत स्पर्धेत प्रथम वलय ग्रुप (अद्वैत सांस्कृतिक संस्था, अमरावती), द्वितीय अ‍ॅडिफाय इंग्लिश स्कूल, अमरावती तृतीय श्री. शिवाजी उद्यान विद्या महाविद्यालय, अमरावती, लोकनृत्य स्पर्धेत प्रथम सुरसंगम कला वाद्य अकादमी प्रबोधिनी, अमरावती, द्वितीय अ‍ॅडिफाय इंग्लिश स्कूल, अमरावती, पथनाट्य स्पर्धेत प्रथम सुरसंगम कला वाद्य अकादमी प्रबोधिनी, अमरावती, द्वितीय श्री. शिवाजी उद्यान विद्या महाविद्यालय, अमरावती, तृतीय अ‍ॅडिफाय इंग्लिश स्कूल, अमरावती यांनी गौरविण्यात आले.

 

क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांच्या मार्गदर्शना या स्पर्धा पार पडल्या. अनिल इंगळे व शिशिर मेश्राम यांनी सूत्रसंचालन केले. शेख सलीम शेख हुसेन यांनी आभार मानले. जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

00000

No comments:

Post a Comment

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक व आर्थिक लोकशाहीतून राजकीय लोकशाहीचा मार्ग सांगितला - डॉ. रत्नशील खोब्रागडे

  ‘ संविधान दिन ’ आणि ‘महात्मा फुले द्विशताद्बी जयंती ’ साजरी   शासकीय विभागीय ग्रंथालय आणि जिल्हा माहिती कार्यालयाचे संयुक्त आयोजन ...