Saturday, August 15, 2020

पालकमंत्र्यांच्या हस्ते महिला व बालविकासभवनाचे उद्घाटन










पालकमंत्र्यांच्या हस्ते महिला  व बालविकासभवनाचे उद्घाटन

महिला सक्षमीकरणासाठी सर्वंकष प्रयत्न

-          पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 15 : प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा म्हणून अर्थसंकल्पातील भरीव तरतुदीसह सगळ्याच पातळ्यांवर शासनाकडून सर्वंकष प्रयत्न होत आहेत, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.

जिल्हा परिषदेत महिला व बालविकासभवनाचे उद्घाटन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार सुलभाताई खोडके, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, उपाध्यक्ष विठ्ठलराव चव्हाण, महिला व बालविकास सभापती पूजाताई आमले, शिक्षण सभापती प्रियांकाताई दगडकर, माजी सभापती जयंतराव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, उपायुक्त अर्चना इंगळे, सचिन देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, महिला व बालविकासासाठी योजना राबवणारी सर्व कार्यालये एकाच छताखाली असावीत म्हणून महिला व बालविकासभवनाची निर्मिती करण्याचा निर्णय झाला. यामुळे योजनांच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी मदत होणार आहे, तसेच नागरिकांनाही एकाच ठिकाणी सर्व माहिती उपलब्ध होणार आहे.

शासनाकडून महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध प्रयत्न होत असल्याचे सांगून त्या म्हणाल्या की, अर्थसंकल्पातही महिलांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. जिल्हा नियोजनातून दरवर्षी एक कोटी रूपये महिला विकास योजनांसाठी खर्च करण्याची तरतूदही करण्यात आली आहे.

महिला व बालविकास विभागाकडून बचत गटांचे सक्षमीकरण, त्यांच्या वस्तूंचे विपणन यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत विक्री केंद्रे ठिकठिकाणी उपलब्ध करून दिले जातील, असेही त्यांनी सांगितले. महिला संरक्षणासाठी भक्कम कायदाही लवकरच येणार आहे, असेही त्या म्हणाल्या.

आमदार श्रीमती खोडके म्हणाल्या की, विभागाच्या सर्व योजना प्रत्येक गरजूपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व कार्यालये एकाच छताखाली आल्यामुळे मोठी सुविधा निर्माण झाली आहे. महिला सक्षमीकरणाचे कार्य शासन पुढे नेत असताना या सुविधेमुळे कार्याला गती येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. श्री. देशमुख, श्री. येडगे यांनीही मनोगत व्यक्त केले.

माझी कन्या भाग्यश्री या योजनेच्या अंमलबजावणीत अमरावती जिल्हा राज्यात अव्वल आहे. एक हजारहून अधिक लाभार्थी जिल्ह्यात आहेत, अशी माहिती श्री. थोरात यांनी दिली. योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण यावेळी झाले. धारणी मेळघाट लोकसंचालित साधन केंद्र या संस्थेला 33 लक्ष 44 हजार रूपयांचा धनादेश पालकमंत्र्यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आला.  

उमेद अभियानाअंतर्गत स्वयंसहायता समूहांच्या साह्याने अस्मिता योजनेत  अस्मिता प्लस हे सॅनिटरी नॅपकिन अत्यंत अत्यल्प दरात जि. प. शाळेतील किशोरवयीन मुलींसाठी व अल्प दरात इतर महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती ‘उमेद’चे सचिन देशमुख यांनी दिली.

श्री. थोरात यांनी प्रास्ताविक केले. क्षिप्रा मानकर यांनी सूत्रसंचालन केले.

 

00000







 

पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचा आरोग्य कर्मचा-यांशी संवाद

 


जिल्हा कोविड रूग्णालयात आपत्कालीन सेवा कक्षाचा शुभारंभ

कोरोनाविरूद्धच्या लढाईतील तुम्हीच खरे सैनिक



पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचा आरोग्य कर्मचा-यांशी संवाद

आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी विविध प्रयत्न

 

 अमरावती, दि. 15 : रूग्णसेवा हे सर्वात मोठे कार्य आहे. कोरोना संकटात निरंतर आरोग्य सेवा बजावत तुम्ही देशसेवेचे कार्य करत आहात. कोरोनाविरूद्धच्या लढाईतील तुम्हीच खरे सैनिक आहात, अशा शब्दांत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज आरोग्य कर्मचा-यांशी संवाद साधला.

 

        सुपर स्पेशालिटी रूग्णालयातील जिल्हा कोविड रूग्णालयाच्या आपत्कालीन सेवा कक्षाचे उद्घाटन आज पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, डॉ. रवी भूषण यांच्यासह कोविड रूग्णालयाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांनी सर्व कर्मचा-यांशी संवाद साधून त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी सेवारत कर्मचा-यांच्या निवासी वसतिगृहाला भेट देऊन तेथील कर्मचा-यांनाही शुभेच्छा दिल्या.

 

कोरोनाच्या लढाईत डॉक्टर, पारिचारिका, आरोग्य कर्मचारी, सफाई कामगार हे जीवाची जोखीम पत्करून रूग्णसेवा बजावत आहेत. त्यांच्या या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की,  कोरोना महासंकटाच्या मुकाबल्यासाठी आरोग्यसेवेचा दर्जा उंचावण्यास राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे. कोरोनाची साथ लक्षात घेऊन अत्यंत अल्प कालावधीत जिल्हा कोविड रूग्णालय उभारून त्यानंतर शहरात इतरही ठिकाणी,तसेच तालुक्यांतही कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहेत. स्थानिक स्तरावर चाचणी उपलब्धतेसाठी विद्यापीठात लॅबही सुरू करण्यात आली. आता डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळाही लवकरच सुरू होईल. यापुढेही सुविधांचा विस्तार करण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात साथरोग नियंत्रण रूग्णालयेही उभारण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

कोविड रूग्णालयात कॅज्युअल्टी कक्षाची सुविधा उभारण्यात आली असून, तिथे सोळा खाटा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ऑक्सिजन सुविधा व इतर सुविधाही तिथे देण्यात आल्या आहेत, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निकम यांनी सांगितले.

 

00000

 


लोकशाही मूल्यांच्या जपणुकीसह सर्वांगीण विकासाकडे वाटचाल - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकू

 

विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्य ध्वजारोहण सोहळा










लोकशाही मूल्यांच्या जपणुकीसह सर्वांगीण विकासाकडे वाटचाल

-         पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 15 : स्वातंत्र्यानंतर गेल्या 72 वर्षांत देशाने ज्ञानविज्ञानाच्या क्षेत्रात देदिप्यमान प्रगती केली. या देशातील विविध जातीधर्मातील बंधुभाव व एकता टिकवून, सर्वांना सोबत घेऊन महापुरूषांनी दिलेला लोकशाही मूल्यांचा वसा जपत आपल्याला पुढे जायचे आहे. यापूर्वी कुठलेही संकट आले असताना संपूर्ण देशाने एक होऊन त्याचा मुकाबला केला आहे. याच एकजुटीने आपण कोरोनाच्या महासंकटातूनही बाहेर पडू, असा विश्वास राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे व्यक्त केला.

 

भारतीय स्वातंत्र्याच्या 73 व्या वर्धापनदिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. महापौर चेतन गावंडे, विभागीय आयुक्त पीयुष सिंह, विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, पोलीस आयुक्त संजयकुमार बाविसकर, पोलीस अधीक्षक हरी बालाजी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक दक्षता घेऊन हा समारंभ उत्साहात पार पडला.

 

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, गेल्या सात दशकात ज्ञानविज्ञानाच्या विविध क्षेत्रात अतुलनीय कामगिरी देशाने केली. अनेक महापुरूषांच्या त्याग, योगदान व दूरदृष्टीतून हा देश उभा राहिला आहे. पं. जवाहरलाल नेहरू यांनी विविध क्षेत्रात अनेक ज्ञानमंदिरे उभारून आधुनिक भारताची पायाभरणी केली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तळागाळातील समाजासाठी, स्त्री स्वातंत्र्यासाठी, कामगार बांधवांसाठी मोलाचे कार्य केले व न्याय, समता, बंधुता, एकता, एकात्मता या मूल्यांचा वसा राज्यघटनेच्या माध्यमातून देशाला दिला. हा मूल्यांचा वसा जपून आपल्याला देश, राज्य पुढे न्यायचे आहे.

   

येथील माणसांच्या बंधुतेचे प्रत्यंतर कोरोनाच्या महासंकटातही आले. हिंदू- मुस्लिम बांधव या संकटात एकमेकांच्या मदतीला धावून आले. सामान्य माणसांना जोडून ठेवणारी ही ताकद संविधानाने दिली आहे. सबंध देशाला जोडून ठेवणारी ही वीण जपून विकासाकडे वाटचाल करण्यासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध आहे, असेही त्यांनी सांगितले.

 

 

महिलांचा सहभाग वाढणे आवश्यक

 

प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढण्याची गरज पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, उद्योग क्षेत्रासह सर्वत्र महिलांचा सहभाग वाढणे गरजेचे असून, महिला व बालविकास विभाग त्यासाठी प्रयत्नरत आहे. देशात तरूणांची संख्या मोठी आहे. तरूणाईची ही ऊर्जा विधायक कार्याकडे वळवून नवा महाराष्ट्र घडवायचा आहे, असेही त्यांनी सांगितले.

 

    महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत औद्योगिकीकरण अधिक आहे. त्यामुळे रुग्णसंख्या अधिक असली तरी, कोरोना प्रतिबंधासाठी जोखीम पत्करून सर्व यंत्रणा अहोरात्र काम करत आहेत. या यंत्रणेतील सर्व सहभागी व या लढाईत शासन-प्रशासनाच्या प्रयत्नांना साथ देणाऱ्या व्यक्ती, कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था या सर्वांप्रती पालकमंत्र्यांनी  कृतज्ञता व्यक्त केली. 

 

कोरोना प्रतिबंधासाठी अत्यंत कमी कालावधीत उभारण्यात आलेले जिल्हा कोविड रुग्णालय, तालुका स्तरावरील कोविड रूग्णालय व हेल्थ सेंटर, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथील लॅब, ठिकठिकाणी निर्माण झालेल्या ॲन्टिजेन टेस्ट सुविधा, जिल्ह्यात सातत्याने राबविण्यात येणा-या तपासणी मोहिमा आदींचा उल्लेख करून डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळाही लवकरच कार्यान्वित होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.   

 

त्या पुढे म्हणाल्या की, कोरोना संकटकाळात लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी विविध निर्णय घेण्यात आले. गरीब व वंचित बांधवांना अन्नधान्य वितरणाला सर्वदूर गती देण्यात आली. जिल्ह्यात सुमारे 25 लाख 47 हजार लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळाला. गरजू व वंचित व्यक्तींना केवळ 5 रुपये दरात शिवभोजन थाळी उपलब्ध करुन देण्यात आली. स्थलांतरित प्रवासी नागरिकांसाठी निवारा केंद्रे,त्यांच्या प्रवासासाठी रेल्वे, वाहने उपलब्ध करुन देणे असे विविध उपाय करण्यात आले.

 

       त्या पुढे म्हणाल्या की, लॉकडाऊनमध्ये ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीसाठी मनरेगाच्या माध्यमातून ‘मागेल त्याला काम’ उपलब्ध करून देण्यात आले. जिल्ह्यात 690 गावांतून 3 हजार 120 विविध कामांना चालना मिळाली. प्रतिदिन मनुष्यबळ रोजगार निर्मिती 86 हजारावर पोहोचून मनरेगा कामांमध्ये अमरावती जिल्हा राज्यात दुस-या क्रमांकावर पोहोचला. राज्यात गेल्या 10 वर्षात झाली नाही अशी विक्रमी कापूस खरेदी झाली. अमरावती जिल्ह्यातही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कापूस खरेदीसाठी जीनची संख्या वाढविणे, मनुष्यबळ उपलब्ध करून देणे, सीसीआयचे नवे केंद्र सुरू होणे या उपायांमुळे कापूस खरेदीला वेग आला.

 

         त्या पुढे म्हणाल्या की, कर्जमुक्तीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडी शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणली.कोरोनाच्या काळातही अडचणींवर मात करत तिची गतीने अंमलबजावणी होत आहे. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष मोहिम घेऊन जिल्ह्यात 2 लाख 69 हजार 706 खातेदारांना लाभ देण्यात आला. शेतकरी बांधवांना थेट बांधावर खत पुरवठा करण्यात आला. 19 हजार 248 मे.टन युरिया सर्वत्र उपलब्ध करुन देण्यात आला. शेतकरी ते थेट ग्राहक योजना, कृषी संजीवनी सप्ताह, रानभाज्या महोत्सव अशा उपक्रमांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात आली.          

 

मेळघाटात कुपोषण निर्मूलनासाठी सुदृढ मेळघाट अभियान, नियमित घरपोच आहार पुरवठा आदींबाबत माहिती देऊन त्या म्हणाल्या की, कुपोषण ही शहरे व महानगराचीही समस्या असून, त्याच्या निर्मूलनासाठी भरीव कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. प्रत्येक गरजू व्यक्तीला घर मिळावे म्हणून विविध आवास योजनांना गती देण्यात आली आहे. त्यातून प्रत्येक गरजू व्यक्तीला घर मिळवून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

 

     संकटकाळातही विकासाची प्रक्रिया गतिमान झाली असताना कोरोनावर मात करुन पुन्हा नव्या दमाने झेप घेण्यासाठी या प्रयत्नांना आता सर्वांनी साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले.

 

00000

Friday, August 14, 2020

रुग्णालयांकडून गोरगरीबांची आरोग्यसेवा घडावी - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 




रुग्णालयांकडून गोरगरीबांची आरोग्यसेवा घडावी

-      पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

व्हिजन सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

 

अमरावती, दि.14:  समाजातील गोरगरीब व गरजू व्यक्तींना चांगली आरोग्यसेवा मिळण्यासाठी रूग्णालयांनी प्रयत्न करावेत. विशेषत: आरोग्य तज्ज्ञांनी आपल्या सेवा शासकीय रूग्णालयांतही दिल्यास गरीब व वंचित घटकांना त्याचा लाभ होईल, असे राज्याच्या महिला व  बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.

 

येथील वलगाव रोड स्थित व्हिजन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. पोलीस आयुक्त संजय बाविस्कर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, रुग्णालयाचे डॉक्टर डॉ. मोहसीन खान व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

 

जिल्ह्यात चांगली रूग्णालये उभी राहताहेत, विविध तज्ज्ञ उपलब्ध होताहेत, ही समाधानाची बाब आहे. मात्र, त्यांची सेवा तळागाळातील नागरिकांनाही मिळाली पाहिजे. त्यासाठी शासकीय आरोग्य यंत्रणेतही आपले योगदान द्यावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

 

कोरोना संकटकाळात डॉक्टर, पारिचारिका, आरोग्य कर्मचारी हे सर्व जोखीम पत्करून आघाडीवर लढत आहेत. या लढाईतील आरोग्य यंत्रणेचे योगदान अतुलनीय आहे, असेही त्यांनी सांगितले.

 

नेत्रोपचारासाठी जिल्ह्यात चांगल्या सुविधा निर्माण होण्यासाठी सुसज्ज आय बँकसह अत्याधुनिक यंत्रणा जिल्हा रूग्णालयाकडून उभारली जाणार आहे. त्यासाठी योगदान देण्याचे आवाहन डॉ. निकम यांनी केले.

 

00000

रानभाज्यांच्या संवर्धनासाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध करुन देणार - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

रानभाज्यांच्या संवर्धनासाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध करुन देणार

-पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

                       








रानभाज्या महोत्सव व प्रदर्शनाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

 

अमरावती, दि.14  : रानभाज्या हा निसर्गाने दिलेला अनमोल ठेवा आहे. त्याची जपणूक व  संवर्धन करणे ही काळाची गरज आहे, मेळघाटातील आदिवासी बांधवांच्या या पारंपरिक रानवैभवाला नाविण्यपूर्ण योजनेतून येत्या काळात हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज केले.

कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व श्री शिवाजी उद्यान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात आयोजित रानभाज्या महोत्सवाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, कृषी सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे, श्री शिवाजी उद्यान महाविद्यालयाचे प्राचार्य शशांक देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती जयंत देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.

प्रारंभी पालकमंत्र्यांनी रानभाज्या महोत्सव तथा प्रदर्शनातील रानभाज्यांच्या सर्व स्टॉल्सला भेट देऊन पाहणी केली व  त्यांची माहिती जाणून घेतली. या उपक्रमाच्या माध्यमातून रानभाज्यांचे औषधी गुणधर्माविषयी माहिती  नागरिकांपर्यंत पोहोचण्यास मदत मिळेल, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

 

श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, आदिवासी  शेतकरी बांधवांना रोजगार उपलब्ध होण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत महाराष्ट्रातील प्रत्येक  जिल्ह्यात व प्रमुख शहरांमध्ये  रानभाज्या महोत्सव साजरा होत आहे. त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात रानभाज्यांचे असलेले महत्व  अधोरेखित होणार आहे. रानभाज्या ही निसर्गाची देणगी असून कोणतेही रासायनिक खत किंवा मशागतीशिवाय त्या उगवतात. आज कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला या रोगाशी सामना करण्यासाठी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे व  टिकविणे खूप गरजेचे आहे.  या रानभाज्या  प्रथिने, पोषणद्रव्य, व जीवनसत्वयुक्त असून  रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी याचा निश्चितच उपयोग होऊ शकतो. त्यामुळे रानभाज्यांना एक व्यावसायिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.

 

लॉकडाऊनच्या काळात निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीतही  शेतकरी बांधवांनी अन्नधान्य, दूध व भाजीपाला यांचा पुरवठा कोणत्याही प्रकारचे व्यापारीकरण न करता केला आहे. संपूर्ण देशात बळीराजा या कार्यात कायमच अग्रेसर राहीला आहे. त्यांचे हे योगदान मोठे आहे. कृषी विभागामार्फत आयोजित होणाऱ्या रानभाज्या महोत्सव हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागातील लोकांना रानभाज्याचे महत्व व फायदे कळणार आहे. मेळघाटातील आदिवासी बांधवांनी जोपासलेल्या रानांतील औषधीयुक्त व गुणकारी ठेवा लोकांपर्यंत पोहोचणार आहे. यातून आदिवासी बांधवांना रोजगाराचे साधन उपलब्ध होणार आहे. अंगणवाडीत दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात रानभाज्यांचा समावेश करण्यासाठी परसबागेत रानभाज्या लागवडीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहे, असेही श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.  

 

जिल्हाधिकारी शैलेश नवाल म्हणाले, शेतकरी व समाज यांना जोडण्याची  चांगली संधी कृषी विभागाने या महोत्सवाचे आयोजन करून  दिली आहे. आदिवासी बांधवांच्या रानभाज्या जनतेपर्यंत पोहविण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. आगामी काळात शहरातील कृषी विभाग व शासनाच्या उपलब्ध जागांमध्ये  कायमस्वरूपी  बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी  जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. आज या महोत्सवात जवळपास 70 रानभाज्यांचे  प्रकार उपलब्ध आहेत व हा ठेवा आपणास जपायचा आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात या रानभाज्यांचे औषधीयुक्त गुण लोकांना माहिती व्हावे, यासाठी कृषी विभागाने पुस्तिकेच्या माध्यमातून माहिती द्यावी तसेच नागरिकांनीही रानभाज्यांचा आपल्या आहारात उपयोग करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.

 

मेळघाटात व  परिसरात उगवणाऱ्या रानभाज्या  विशिष्ट ऋतूमध्ये उगवणाऱ्या भाज्या आहेत. नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या भाज्यांचा भोजनात उपयोग हा मनुष्याच्या शरीरासाठी गुणकारी आहे. शेवगा, कढीपत्ता यासारख्या रानभाज्या ह्या औषधीयुक्त असून त्याचा जेवणात उपयोग झाला पाहिजे. कृषी विभागाव्दारे आयोजित रानभाज्या महोत्सव हा चांगला उपक्रम असल्याचे मत मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी व्यक्त केले.

या महोत्सवाच्या माध्यमातून शहरी भागातील लोकांना रानभाज्याविषयी माहिती मिळेल व त्यांचा दैनंदिन भोजनात उपयोग होईल. पावसाळी आजारापासून बचाव होण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी रानभाज्या महत्वपूर्ण आहेत, असे कृषी सहसंचालक सुभाष नागरे यांनी यावेळी सांगितले.

रासायनिक शेती पध्दतीमुळे रानभाज्याचे महत्व कमी होत आहे. शेतकऱ्यांचा कल हा पारंपारिक पध्दतीच्या पिकांकडेच जास्त आहे. पण रानभाज्यांच्या लागवडीमुळे किंवा उत्पादनातून शेतकऱ्यांना निव्वळ नफा मिळू शकतो. कटूलेसारख्या पिकांची बांधावर पेर केल्यास पावसाळी ऋतूमध्ये त्याचे चांगले उत्पादन घेता येऊ शकते. अनेक रानभाज्या ह्या औषधीयुक्त असून त्याचे सेवन मानवी शरीरासाठी उपयुक्त आहे. महोत्सवाच्या माध्यमातून रानभाज्याचे महत्व सर्व लोकांना कळणार आहे, असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी आपल्या प्रास्तविक भाषणात सांगितले.

यावेळी कार्यक्रमात ‘ओळख  रानभाज्यांची’ या माहिती पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. उद्यान महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमात विविध गावांतून आलेल्या शेतकऱ्यांनी  जवळपास 70 रानभाज्यांचे स्टॉल्स उभारले होते.

 

00000

DIO NEWS AMRAVATI 25.09.2026

                                              विमुक्त जाती, भटक्या जमातींसाठी दाखले, योजना शिबिर   *महसूल, बहुजन कल्याण विभागाचा उपक्रम   अम...