Tuesday, July 28, 2020

पालकमंत्र्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधून केले अडचणींचे निराकरण




पालकमंत्र्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधून केले अडचणींचे निराकरण

दक्षता त्रिसूत्रीचा अवलंब करावा

- पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

          अमरावती, दि. 28 : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सातत्यपूर्ण स्वच्छता, मास्कचा वापर व सोशल डिस्टन्सचे पालन या दक्षता त्रिसूत्रीचा अवलंब करणे अपरिहार्य आहे. कुणीही ते टाळून आपल्यासह इतरांचेही आरोग्य धोक्यात आणू नये, असे कळकळीचे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज नेर पिंगळाई येथे केले.

         कोरोनाबाधित व्यक्ती आढळलेल्या विविध गावांना भेट देऊन तेथील उपाययोजनांचा आढावा  पालकमंत्री श्रीमती ठाकूर या सातत्याने घेत आहेत. आज त्यांनी मोर्शी तालुक्यातील नेर पिंगळाई, सावरखेड या गावांना भेट देऊन तेथील उपाययोजनांचा आढावा घेतला, तसेच क्वारंटाईन सेंटरला भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली व दाखल नागरिकांशीही संवाद साधून मनोबल वाढवले.

       पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी गावांत कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला.उपविभागीय अधिकारी  नितीनकुमार हिंगोले, तहसीलदार सिद्धार्थ मोरे, स्थानिक पदाधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.

                                             निर्जंतुकीकरणात सातत्य ठेवा

गावात स्वच्छता व निर्जंतुकीकरणात सातत्य आवश्यक आहे. वेळोवेळी फवारण्या व्हाव्यात. साबणाचे द्रावण फवारणीचा प्रयोग काही ठिकाणी होत आहे. त्याचा अवलंब व्हावा.अद्यापही अनेकदा नागरिक त्याचे पालन करताना दिसत नाहीत.  असे दुर्लक्ष आपल्या स्वतःसह इतरांनाही धोक्यात टाकणारे असते. त्यामुळे नागरिकांनी दक्षता नियम पाळावेत, असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले.कोरोना संकटकाळात अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांचा गौरवही पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला.

                                विविध अडचणींचे निराकरण

 सावरखेड येथे महसूल मंडळाच्या तांत्रिक त्रुटींमुळे पीक विमा योजनेत सहभागासाठी अडचणी येत असल्याची तक्रार आहे. तत्काळ तिचे निराकरण करावे.पीएम किसान योजनेच्या  अंमलबजावणीला गती द्यावी, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी प्रशासनाला दिले.

                           प्रलंबित मजुरीचा प्रश्न प्राधान्याने सोडविणार

नेर पिंगळाई येथील नाल्याच्या कामाबद्दल सुमारे साडेतीन लाख रूपये मजुरी प्रलंबित असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली.  हा प्रश्न तत्काळ सोडविण्यात येईल. त्यासाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन तोडगा काढला जाईल, असे पालकमंत्री यांनी सांगितले.

00000

 

 


दक्षतेचे पालन होण्यासाठी कडक नियंत्रण ठेवा - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर






पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत मोर्शी येथे आढावा बैठक
दक्षतेचे पालन होण्यासाठी कडक नियंत्रण ठेवा

-        पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 28 : होम क्वारंटाईन केलेल्या व्यक्ती बाहेर फिरत असल्याच्या तक्रारी होत आहेत.  बेपर्वाई ठेवून सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणण्याचा असा प्रकार घडत असेल तर तत्काळ गुन्हा दाखल करावा. आरोग्य, नगरपालिका व पोलीस विभागाने समन्वय ठेवून कामे करावीत, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज मोर्शी येथे दिले.

 

मोर्शी तालुक्यातील कोरोना उपाययोजनांचा आढावा पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी मोर्शी येथील नपा सभागृहात घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार देवेंद्र भुयार, नगराध्यक्ष मेघना मडघे, पं. स. सभापती यादवराव चोपडे, उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, तहसीलदार सिद्धार्थ मोरे आदी उपस्थित होते.

 

मोर्शी येथे 13 रुग्ण आढळले व चार कंटेन्मेंट झोन आहेत.  ग्रामीण भागात 33 रुग्ण आढळले. या पार्श्वभूमीवर कोरोना प्रतिबंध  दक्षता नियमांचे पालन होणे आवश्यक आहे. साखळी तोडण्यासाठी मोर्शीत लॉकडाऊन जारी करण्यात आले. मात्र, त्यानंतरही बेजबाबदारीने वागून चालणार नाही. कंटेन्मेंट झोनमध्ये कडक नियंत्रण ठेवावे, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले.

 

कोरोना उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी नगरपालिका, पोलीस, आरोग्य, महसूल या सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवून कामे करावीत, असे निर्देशही त्यांनी दिले.तालुक्यातील आरोग्य सुविधा, कंटेन्मेंट झोन, बफर झोन, विलगीकरण कक्ष, रुग्णालय व्यवस्था, औषध साठा आदी विविध बाबींबाबत आढावा त्यांनी यावेळी घेतला. 

00000

 

 

पालकमंत्र्यांची रक्तदान शिबिराला भेट


पालकमंत्र्यांची रक्तदान शिबिराला भेट

संघर्ष वाहन चालक मालक संघटनेचा उपक्रम कौतुकास्पद

- पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 28 : रक्तदान हे श्रेष्ठदान असून, कोरोना संकटकाळात रक्तपेढ्याकडील उपलब्ध साठा गरजेनुसार नियमित ठेवण्यासाठी रक्तदात्यांनी पुढे येण्याची गरज आहे.  या पार्श्वभूमीवर संघर्ष वाहन चालक मालक संघटनेने  पुढाकार घेऊन आयोजित केलेला रक्तदान उपक्रम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.

 

संघटनेने मोर्शी रस्त्यावर श्री गुरुदेव प्रार्थना सभागृहात आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराला पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी भेट देऊन आयोजक व रक्तदात्यांचे कौतुक केले. संस्थेचे अध्यक्ष अंकुश चांगोले, दीपक वानखडे, प्रशांत दांदळे आदी यावेळी उपस्थित होते.

 

या शिबीरात संघटनेच्या कार्यकर्त्यांसह अनेक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. पीडीएमसीच्या सहकार्याने हा उपक्रम आखण्यात आला. उपक्रमात सोशल डिस्टन्स, मास्क वापर, स्वच्छता व सर्व दक्षता नियमांचे पालन करण्यात आले, असे श्री. चांगोले यांनी सांगितले.

 

00000

 


Monday, July 27, 2020

स्वच्छता, मास्क वापर व सोशल डिस्टन्सचा काटेकोर अवलंब करावा - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर


पालकमंत्र्यांकडून विविध गावांत कोरोना उपाययोजनांची पाहणी

उपचारानंतर घरी परतलेल्या नागरिकांशी संवाद




स्वच्छता, मास्क वापर व सोशल डिस्टन्सचा काटेकोर अवलंब करावा

- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 27 : कोरोनाबाधित व्यक्ती आढळलेल्या विविध गावांना भेट देऊन तेथील उपाययोजनांचा आढावा आज राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज घेतला. यावेळी उपचारानंतर बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला व त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांचे मनोबल वाढवले.

 

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सातत्यपूर्ण स्वच्छता, मास्कचा वापर व सोशल डिस्टन्सचे पालन या त्रिसूत्रीचा अवलंब करावा. अद्यापही अनेकदा नागरिक त्याचे पालन करताना दिसत नाहीत. मात्र, असे दुर्लक्ष आपल्या स्वतःसह इतरांनाही धोक्यात टाकणारे असते. त्यामुळे नागरिकांनी दक्षता नियम पाळावेत, असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले.

 

अमरावती तालुक्यातील वलगाव, पुसदा, यावली शहिद, माऊली जहाँगीर, नांदुरा लष्करपुरा, नांदगावपेठ आदी गावांना भेट देऊन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी तेथे कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. उपविभागीय अधिकारी उदय राजपूत, तहसीलदार संतोष काकडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

यावेळी पालकमंत्र्यांनी उपचारानंतर बरे झालेल्या कोरोनाबाधितांच्या घरी भेट देऊन त्यांच्याशी व त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला व त्यांचे मनोबल वाढविले. कोरोना उपचारानंतर पूर्णपणे बरा होतो. त्यामुळे कुठलीही भीती न बाळगता लक्षणे आढळणा-यांनी तपासणी व उपचार केले पाहिजेत. दक्षता नियमांनुसार सवयी अंगीकारल्या पाहिजेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

वलगाव क्वारंटाईन सेंटरला भेट

 

        वलगाव येथील क्वारंटाईन सेंटरला भेट देऊन पालकमंत्री ॲड. ठाकूर यांनी तेथील उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सेंटरमध्ये दाखल रूग्णांशी संवाद साधून त्यांचे मनोबल वाढवले. रुग्णांना आवश्यक त्या सर्व सुविधा व उपचार उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

 

                        सीएचओ’च्या रिक्त पदांबाबत कार्यवाही व्हावी

 

प्रत्येक गावात नियमित स्वच्छता, निर्जंतुकीकरण व बाहेरून येणा-या व्यक्तींचे विलगीकरण यासह तपासण्यांची संख्या वाढविण्यासाठी डोअर टु डोअर सर्वेक्षण नियमित करावे. कम्युनिटी हेल्थ ऑफिसरच्या रिक्त  पदांबाबत गावनिहाय आढावा घेऊन ती पदे भरण्याबाबत पाठपुरावा करण्याचे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी दिले.

 

कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांत आशा सेविका, अंगणवाडी सेविका अहोरात्र सेवा बजावत आहेत. त्या कोरोना लढवय्या आहेत, असे सांगून विविध गावांतील आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन गौरव पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.

 

यावली शहीद ते नरसिंगपूर - शिराळा रस्त्यावरील पूल नादुरुस्त असल्याने त्यावरील वाहतूक थांबली आहे. या पुलाच्या बांधकामासाठी तत्काळ आराखडा सादर करावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. पुसदा- आष्टी रस्तेदुरूस्तीचे कामही तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

 

         कोरोना संकटकाळात पुसदा येथे धान्य बँक उभारून गरजूंना वस्तूंचा पुरवठा करण्याचा उपक्रम गावकरी तरूणांनी राबवला. त्याबद्दल पालकमंत्र्यांनी अभिजित सदणे व इतर मान्यवरांचे अभिनंदन केले. पुसदा येथील ॲड. अनिरूद्ध पाटील यांनी स्वागत केले. प्रशासक विस्तार अधिकारी (पंचायत) पांडुरंग उलेमाले यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.  

 

                                                000

कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसह लोकशिक्षणावर भर द्यावा - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर





कोरोनावर मात करण्यासाठी सामाजिक वर्तनात बदल आवश्यक
कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसह लोकशिक्षणावर भर द्यावा

-         पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

       अमरावती, दि. 27 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन व प्रशासन विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवित आहे. परंतू, गत दोन महिन्यांमध्ये जिल्ह्यात संक्रमितांची संख्या वाढलेली आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी जनमानसांनी मास्क लावणे, हात नेहमी स्वच्छ धुणे, निजंर्तुकीकरण आदी सवयीसह सामाजिक वर्तणात बदल आणला तरच कोरोनावर मात करता येईल, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज  सांगितले.

 

     जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना संदर्भात आढावा पालकमंत्र्यांनी घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. महापौर चेतन गावंडे, आमदार प्रताप अडसळ, आमदार राजकुमार पटेल, आमदार सुलभाताई खोडके, जि.प.अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख,जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलीस आयुक्त संजय बावीस्कर, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी दिपक रणमले यांच्यासह अन्य विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. 

 

     श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. जिल्ह्यात दर शनिवार व रविवारी कडक जनता कर्फ्यु पाळण्यात येत आहे. संक्रमितांवर तत्काळ उपचार व संपर्कातील व्यक्तींची ओळख पटविण्यासाठी येत्या काळात डॉक्टरांचे पॅनल निर्माण करुन शहरी भागात मोहल्ला कमेटीव्दारे तर ग्रामीण भागात कोरोना नियंत्रण समितीव्दारे प्रत्येक नागरिकांवर देखरेख ठेवण्यात येणार आहे. रोजगाराचा प्रश्न मिटविण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे कठोर पालनासह पी1, पी 2 ही उपक्रमांतर्गत बंद दुकाने 31 जुलैनंतर पुन: खुली करण्यात येणार आहे. जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात लोकसंख्येचे प्रमाणानुसार रॅपीड ॲन्टीजेन चाचण्या वाढविण्यात येणार आहे. कोरोना संक्रमितांची साखळी तोडण्यासाठी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन येत्या काळात सात किंवा पंधरा दिवासाकरीता कडक लॉकडाऊन लागू करण्याचे विचार करण्यात येणार आहे.  

 

      कोरोना विषाणू बाधितांना तत्काळ उपचार करण्यासाठी आरोग्य विभागाव्दारे ऑक्सीमीटरसह व्हेंटीलेटर आदी साहित्याची सुविधा उपलब्ध केली आहे. पॉझीटिव्ह व नॉन पॉझिटिव्ह व्यक्तींसाठी अकरा आयसोलेशन सेंटर तयार करण्यात आले आहे. याठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी कोरोना न घाबरता, आजाराची लक्षणे दिसल्यास तत्काळ कोविड रुग्णालयात जावून चाचणी करुन घ्यावी, घाबरुन घरीच राहिले तर उपचारासाठी उशीर होतो व संक्रमितांची सख्याही वाढते. हे टाळण्यासाठी स्वत: रुग्णालयात जावून चाचणी करुन घ्यावी, असे आवाहनही श्रीमती ठाकूर यांनी यावेळी केले.

 

कोरोना विषाणूची भिती घालविण्यासाठी तसेच याविषयी जनसामान्यांमध्ये सतर्कता व प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती होण्यासाठी प्रसिध्दी पत्रकांचे वितरण आणि छोटे छोटे व्हीडिओच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागात व्यापक प्रमाणात जनजागृती करावी, अश्या सूचनाही त्यांनी आरोग्य विभाग व पोलीस विभागाला दिल्या.

00000

 

 

 


Sunday, July 26, 2020

चौऱ्याण्णव वर्षाच्या आजोबांनी केली कोरोनावर मात

कोरोना लढवय्या

 


चौऱ्याण्णव वर्षाच्या आजोबांनी केली कोरोनावर मात

 

अमरावती, दि. 26: येथील हनुमान नगरात राहणाऱ्या ९४ वर्षे वय असलेल्या एका आजोबांना कोरोनाने गाठले खरे; पण कणखर आजोबांनी हिंमत न हारता जिल्हा कोविड रुग्णालयात उपचार करून घेत कोरोनावर मात केली व बरे झाल्यानंतर स्वतः चालत रुग्णालयाबाहेर आले.

हनुमाननगर येथील रहिवाशी असलेले हे आजोबा कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना तात्काळ येथील जिल्हा कोविड रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले.  दहा दिवसांच्या उपचारानंतर बरे होऊन ते  स्वतःच्या घरी परतले आहेत.

 

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम,कोविड रुग्णालयाच्या डॉक्टर, पारिचारिका, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी या सर्वांनी टाळ्या वाजवून या आजोबांचे अभिनंदन केले व त्यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

 

उपचाराच्या काळात आजोबांनी हिंमत कायम ठेवली. कोरोना योग्य उपचारांनी बरा होतो. त्यामुळे घाबरून जाण्यासारखे काहीही नाही. मास्क वापर, स्वच्छता व सोशल डिस्टन्स या नियमांचे पालन करावे, तसेच कुठलीही लक्षणे आढळताच तात्काळ रुग्णालयात जाऊन उपचार करून घ्यावेत, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निकम यांनी यावेळी केले.

 

00000

 


मुंबईहून परतताच पालकमंत्र्यांनी केली रॅपिड एंटीजन टेस्ट; अहवाल निगेटिव्ह



 

मुंबईहून परतताच पालकमंत्र्यांनी केली रॅपिड एंटीजन टेस्ट; अहवाल निगेटिव्ह

कोरोना प्रतिबंधासाठी दक्षतेच्या प्रत्येक नियमाचे काटेकोर पालन आवश्यक

                - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 

 

अमरावती, दि. २६ : कोरोनाची जोखीम सर्वांना समान आहे. कोरोना प्रतिबंधासाठी दक्षतेच्या प्रत्येक नियमाचे प्रत्येकाकडून काटेकोर पालन होणे आवश्यक आहे, असे सांगत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी मुंबईहून परतताच स्वतःसह  सर्वांची रॅपिड अँटिजेन टेस्ट करून घेतली. सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्यावरच त्या निवासस्थानी परतल्या.

          कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यात विविध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पालकमंत्री श्रीमती ठाकूर सातत्याने प्रयत्नशील आहेत. अमरावती येथे स्थानिक स्तरावर स्वतंत्र प्रयोगशाळा, जिल्हा कोविड रुग्णालयासह विविध आरोग्य यंत्रणा आदींचे सक्षमीकरण विविध सुविधांत वाढ यासह लोकजागृतीसाठी त्या सातत्याने प्रयत्न व आवाहन करत आहेत. 

 

शासकीय कामानिमित्त पालकमंत्री श्रीमती ठाकूर मुंबई येथे गेल्या होत्या, तेथून त्या परवा रात्री परतल्या. रात्री उशिरा परतल्यावरही त्यांनी थेट घरी न जाता सुरक्षितता लक्षात घेऊन दक्षतेच्या नियमांचे पालन करून अँटिजेन टेस्ट करण्यासाठी *कुठल्याही खासगी रुग्णालयात न जाता त्यांनी शासकीय रुग्णालय गाठले.* यावेळी पालकमंत्री महोदयांसह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची टेस्ट करण्यात आली. अहवाल प्राप्त होईपर्यंत  त्या रुग्णालयातच थांबून होत्या. सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्यावरच पालकमंत्र्यांनी स्वतःच्या निवासस्थानी पाऊल ठेवले.

पालकमंत्री यांचे ओएसडी प्रमोद कापडे, सतीश गवई, अमोल साबळे, सहकारी श्याम देशमुख, स्वप्नील देशमुख, शैलेश मनवर, सागर हांडे आदींचीही चाचणी या वेळी करण्यात आली या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

 

कोरोनाची जोखीम सर्वांना समान आहे त्यामुळे कोरोना प्रतिबंधासाठी दक्षतेच्या प्रत्येक नियमाचे पालन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. कोरोना प्रतिबंधासाठी शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांनीही दक्षतेच्या सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी केले.

 

         कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांना गती देताना चाचण्यांची संख्या वाढवणे, वेळीच योग्य उपचार देणे व मृत्यू दर शून्यावर आणणे हे उद्दिष्ट्य शासनाने डोळ्यासमोर ठेवले आहे. शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही सुविधा झपाट्याने वाढवणे आणि कोणत्याही परिस्थितीत गाफील न राहता मोठ्या प्रमाणावर तपासण्या करून मृत्यू दर शून्यावर आणणे हे उद्दिष्ट्य आहे.  त्याच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात टास्क फोर्सही स्थापन करण्यात आले आहेत. 

कोरोनाविरूद्धच्या या लढाईत शासकीय प्रयत्नांना नागरिकांची साथ मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे मास्कचा वापर, सोशल डिस्टन्स, नियमित स्वच्छता यांचे पालन करण्यासह कुठलीही लक्षणे आढळताच तपासणी करून घेणे आवश्यक आहे. सर्वांनी दक्षता पाहून नियंत्रणासाठी सहकार्य करावे, असे कळकळीचे आवाहन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी केले.

00000

 

DIO NEWS AMRAVATI 25.09.2026

                                              विमुक्त जाती, भटक्या जमातींसाठी दाखले, योजना शिबिर   *महसूल, बहुजन कल्याण विभागाचा उपक्रम   अम...