Tuesday, August 11, 2020

‘ई- संजीवनी ओपीडी’द्वारे वैद्यकीय सल्ला

 

‘ई- संजीवनी ओपीडी’द्वारे वैद्यकीय सल्ला

सर्वदूर माहिती पोहोचवून अधिकाधिक गरजूंना लाभ मिळवून द्यावा

-       पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि.  11 : कोरोनाच्या संकटकाळात अन्य आजारांनी त्रस्त रूग्णांना योग्य वैद्यकीय सल्ला मिळावा म्हणून ई- संजीवनी ओपीडी ही टेलिकन्सल्टेशन सुविधा शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याची माहिती सर्वदूर पोहोचवून अधिकाधिक गरजू व्यक्तींना त्याचा लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले.

 

कोरोनाबाबत विविध उपाययोजना होत असताना अन्य आजारांच्या रूग्णांना वेळेत वैद्यकीय सल्ला, आरोग्य तपासणी आदी सुविधा मिळाव्यात यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत ऑनलाईन ई-संजीवनी ओपीडी सेवा हे मोबाईल ॲप सर्वत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. गुगल प्ले स्टोअरवरून हे ॲप डाऊनलोड करता येते. कोरोना संसर्गाच्या वाढत्या धोक्यामुळे इतर आजारांसाठीही रूग्ण अनेकदा रूग्णालयापर्यंत पोहोचू शकत नाहीत. त्यांना या सुविधेमुळे घरबसल्या वैद्यकीय सल्ला उपलब्ध होणार आहे.  

 

या सुविधेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त गरजू व्यक्तींना लाभ मिळवून देण्यासाठी त्याची सर्वदूर माहिती पोहोचवावी. प्रत्येक तालुका रुग्णालय, ग्रामीण रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत या सुविधेबाबत जनजागृती करावी, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी आरोग्य यंत्रणेला दिले आहेत.

 

व्हिडीओ संवादाची सोय

 

राज्यात एप्रिलमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू झालेली ही सेवा मेमध्ये पूर्णपणे सुरू करण्यात आली. त्यासाठी www.esanjeevaniopd.in हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले. त्यानंतर लगेचच ॲपही सर्वत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. अनेक रूग्ण त्यावर संपर्क साधून वैद्यकीय सल्ला घेत आहेत. या सुविधेसाठी नामवंत तज्ज्ञांकडून वैद्यकीय सल्ला प्राप्त होत असून, कुठल्याही आजारावर वैद्यकीय सल्ला, उपचार रुग्णाला घेता येतो, अशी माहिती आरोग्य यंत्रणेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे यांनी दिली. 

         

व्हिडीओ कॉलिंग करूनही वैद्यकीय सल्ला घेता येतो. त्यामुळे या सुविधेद्वारे रुग्ण हे तज्ज्ञांशी संपर्क साधून आपल्या आरोग्यविषयक शंकांचे निरसन करू शकतात, असेही त्यांनी सांगितले.केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य विभागाचा या संयुक्त उपक्रमात ऑनलाईन ओपीडी सकाळी 9.30ते दुपारी 1.30 या काळात उपलब्ध असून त्यासाठी रुग्णाकडून शुल्क आकारले जात नाही. रविवारी ही सेवा उपलब्ध नसते.  

 

या सुविधेसाठी मोबाईल क्रमांकद्वारे नोंदणी केल्यावर ‘ओटीपी’ येतो. त्या माध्यमातून रुग्ण नोंदणी अर्ज भरतो. त्यानंतर टोकनसाठी विनंती केल्यानंतर आजारासंबंधी काही कागदपत्रे, रिपोर्ट अपलोड केले जातात. त्यानंतर एसएमएसद्वारे रुग्णाला ओळखक्रमांक आणि टोकन क्रमांक प्राप्त होतो. लॉगईनसाठी एसएमएसद्वारे नोटीफिकेशन येते. त्यानंतर रुग्णाला दिलेल्या ओळखक्रमांकाच्या आधारे लॉगईन करता येते.  डॉक्टरांशी चर्चेनंतर  लगेच ई-प्रिस्क्रीप्शन प्राप्त होते, असेही त्यांनी सांगितले

 

00000

 

Tuesday, August 4, 2020

आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी शासन प्रयत्नशील - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांना मिळणार नविन रुग्णवाहिका

आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी शासन प्रयत्नशील

-         पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 4: राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी शासकीय रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांना पाचशे नविन रुग्णवाहिका पुरविण्यात येणार आहेत. राज्यातील आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी शासनाकडून विविध प्रयत्न होत आहेत. मेळघाटसह जिल्ह्यात आवश्यक तिथे रुग्णवाहिका उपलब्ध करून घेण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेने वेळोवेळी पाठपुरावा करावा, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले.

 

राज्यातील आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी नव्या इमारतीची उभारणी, नवी साधनसामग्री यासह जुन्या रुग्णवाहिका बदलून नव्या रूग्णवाहिकांची उपलब्धता यासाठी विविध स्तरावर निर्णय होत आहेत. कोरोना संकटकाळात जिल्ह्यासाठी स्वतंत्र कोविड रूग्णालय, स्थानिक स्तरावर स्वतंत्र प्रयोगशाळा, तालुका स्तरावर कोविड केअर सेंटर यांच्या निर्मितीप्रमाणेच ग्रामीण भागातील रुग्णालयांचे बळकटीकरण करण्याचा प्रयत्न होत आहे, असे पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील शासकीय आरोग्य यंत्रणेच्या रुग्णवाहिका बदलण्याची आवश्यकता लक्षात घेऊन शासनाने हा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेला बळकटी देण्यात येत असून आता नविन रुग्णवाहिका आल्यावर ग्रामीण व दुर्गम भागातील जनतेला अधिक चांगल्या प्रकारे आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी मदत होणार आहे. यानुसार  आवश्यक साधनसामग्री प्राप्त करून घेण्यासाठी जिल्हा स्तरावरून शासनाकडे पाठपुरावा करावा. तसेच मेळघाटातील आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न व्हावेत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

रुग्णवाहिकांप्रमाणेच मनुष्यबळ उपलब्धता, इमारत दुरुस्ती, साधनसामग्री याबाबतही सविस्तर आढावा घेऊन प्रस्ताव द्यावेत, त्याचप्रमाणे, वेळोवेळी पाठपुरावा करावा, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले.  

रुग्णवाहिकांची गरज लक्षात घेऊन जिल्ह्यातून यापूर्वी मानव विकास मिशनअंतर्गत प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. यापूर्वी जिल्ह्यातून अकरा रूग्णवाहिकांची मागणी करण्यात आली आहे. मेळघाटात प्राधान्याने रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे. या बाबीचा शासनाकडे पाठपुरावाही करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणमले यांनी दिली.

राज्यातील आरोग्य केंद्रातील जुन्या झालेल्या एक हजार रुग्णवाहिका टप्प्याटप्प्याने बदलून त्याजागी नविन रुग्णवाहिका देण्याचा शासनाकडून निर्णय यापूर्वीच घेण्यात आला असून, यावर्षी पाचशे आणि पुढील वर्षी पाचशे अशा नविन रुग्णवाहिका देण्यात येणार आहेत. बऱ्याच आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका जुनाट झाल्या आहेत. त्या दुरूस्ती योग्य न राहिल्याने निर्लेखित करण्यात आल्या आहेत. यावर्षी पाचशे नविन रुग्णवाहिका घेण्यासाठी शासनाकडून 89 कोटी 48 लाख अंदाजित खर्चासाठी प्रशासकीय मान्यता नुकतीच देण्यात आली असून त्यानुसार राज्यात एक महिन्याच्या कालावधीत नविन रुग्णवाहिका उपलब्ध होणार आहेत.

 

 या पाचशे नविन रुग्णवाहिका राज्यातील 253 प्राथमिक आरोग्य केंद्रे, 137 ग्रामीण रुग्णालये, 106 जिल्हा व उपजिल्हा तसेच स्त्री रुग्णालये आणि चार प्रादेशिक मनोरुग्णालये यांना देण्यात येणार आहेत. 

00000

 


Monday, August 3, 2020

‘पोकरा’ मध्ये बचत गटांनाही निधी


‘पोकरा’मध्ये बचत गटांनाही निधी

जिल्ह्यातील अधिकाधिक बचत गटांना प्रकल्प उभारणीसाठी साह्य द्यावे

-         पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

 

अमरावती, दि. 3 : नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी बचत गटासह महिला बचत गटांनाही प्रकल्प उभारण्यासाठी सहाय्य निधी देण्याची तरतूद आहे. त्यानुसार जिल्ह्यातील अधिकाधिक महिला बचत गटांचा समावेश योजनेत व्हावा, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा राज्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले.

जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेची अंमलबजावणी अधिक परिणामकारकपणे होणे आवश्यक आहे. जिल्ह्यात अनेक गावांचा समावेश असलेले खारपाणपट्ट्याचे क्षेत्र आहे. पोकरा योजनेचा हवामान बदलास अनुकूल शेती पद्धती विकसित करण्याचा हेतू असल्याने दीर्घकालीन उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून योजना अधिक प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, योजनेत अधिकाधिक शेतकरी उत्पादक कंपन्या व महिला बचत गटाचा समावेश व्हावा जेणेकरून ग्रामीण भागात कृषीधारित उद्योगांना चालना मिळून अर्थकारण सुधारेल. त्यासाठी त्यांना अधिकाधिक प्रोत्साहन द्यावे. अवजारे, शेड, रेफर वाहन, प्राथमिक प्रक्रिया एकत्रिकरण केंद्र, गोदामे, स्वच्छता प्रतवारी गृह आदींसाठी अनुदान  उपलब्ध करून द्यावे. त्यासाठी बचत गट, शेतकरी कंपन्या यांना सातत्याने प्रोत्साहित करावे. ग्रामविकासाच्या दृष्टीने कृषी पूरक उद्योग व व्यवसाय वाढविण्याचा प्रयत्न व्हावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

अमरावती जिल्ह्यातील 14 तालुक्यांत एकूण 532 गावांमध्ये नानाजी देशमुख प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून सदर गावांमध्ये हवामान बदलास अनुकूल शेती पद्धती विकसित करण्याच्या हेतूने प्रकल्पांतर्गत निवडलेल्या गावांमध्ये टप्प्याटप्प्याने प्रकल्प राबविण्यात येत आहे. गावांचे सूक्ष्म नियोजन, आराखडे तयार करून प्रकल्पाची अंमलबजावणी सुरु झाली आहे, अशी माहिती जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी विजय चवाळे यांनी दिली.

                                    

 

 

 

प्रकल्पाच्या खर्चासाठी अनुदान

                         

काढणी पश्चात व्यवस्थापन व हवामान अनुकूल मूल्य साखळी प्रोत्साहन, तसेच शेतमाल वृद्धीसाठी हवामानाकुल मूल्यसाखळ्यांचे बळकटीकरण या घटकात शेतकरी उत्पादक कंपनी व बचत गटांना उद्योग, व्यवसायासाठी सहाय्य निधीची तरतूद आहे. पॅकहाऊस, प्रतवारी व संकलन केंद्र, गोदाम व छोटे वेअरहाऊस, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, कृषी निगडित पूर्व शीतकरण गृह, शीतगृह, रायपनिंग चेंबर, कांदा चाळ, शेतमाल, फळपीके व भाजीपाला वाहतूक, कृषी अवजार केंद्र सुविधा, शेडनिर्मिती, हवामानानुकूल वाणांचे पायाभूत बियाणे तयार करणे, बियाणे हबसाठी पायाभूत सुविधांचा विकास करणे, कृषी उत्पादनांचे वर्गीकरण व प्रतवारी युनिट, फळ पिकवणे युनिट, व्हेडिंग यार्ड, बियाणे सुकवणी यार्ड, कृषी आधारित उद्योग, कृषी पूरक उद्योग (दुग्धव्यवसाय व कुक्कुटपालन वगळून) अशा उद्योगांसाठी प्रकल्प खर्चाच्या साठ टक्के अनुदान मिळते. त्याची कमाल मर्यादा बांधकाम व यंत्रणेसह 60 लक्ष रूपयांपर्यंत आहे, असे श्री. चवाळे यांनी सांगितले.

प्रकल्प प्रस्ताव सादर करताना विहित नमुन्यातील अर्ज  व हमीपत्र, अर्जदार संस्थेचे नोंदणीपत्र, तपशीलवार प्रकल्प अहवाल, गटाची व संस्थेची नियमावली, पोट नियमावली, वार्षिक अहवाल, तीन वर्षांचे विवरणपत्रक, ताळेबंद, प्रकल्प उभारणीची ब्ल्यू प्रिंट, प्रकल्पासाठी उपलब्ध जमीनीचा सातबारा आदी कागदपत्रे उपलब्ध करून देणे आवश्यक राहील.

            यासाठी जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गट व इतर गटांना कृषी पूरक उद्योग प्रस्ताव सादर करण्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. चवाळे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी तालुका कृषी कार्यालये, उपविभागीय कृषी कार्यालये, जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालय येथे संपर्क साधावा. त्याचप्रमाणे, उपक्रमाचे संकेतस्थळ www.mahapocra.gov.in येथेही माहिती मिळू शकेल, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

 

 


Sunday, August 2, 2020

कृषी विभागाकडून शेतमजूरांना कौशल्याधारित प्रशिक्षण

कृषी विभागाकडून शेतमजूरांना कौशल्याधारित प्रशिक्षण


जिल्ह्यात सर्वदूर प्रशिक्षण कार्यक्रम राबवावेत

        -  पालकमंत्री यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 20:  शेतमजूरांना कौशल्य आधारित प्रशिक्षणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून राज्यातील सुमारे 1 लाख शेतमजुरांना प्रशिक्षीत करण्याचे उद्दिष्ट कृषी विभागाकडून ठेवण्यात आले आहे. त्याचा जिल्ह्यातील अधिकाधिक शेतमजूर बांधवाना लाभ मिळण्यासाठी सर्वदूर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करावेत, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी दिले.

 

          पिकांसाठी फवारणीची कामे मोठया प्रमाणावर करावी लागणार असल्याने कपाशी आदी प्रमुख पिके असलेल्या क्षेत्रात किटकनाशक फवारणीचे कौशल्य आधारित प्रशिक्षण  शेतमजुरांना देण्याचा कार्यक्रम प्राधान्याने हाती घेण्यात आहे. त्याची सर्वत्र  अंमलबजावणी व्हावी. प्रशिक्षण घेतलेल्या शेतमजुरांना प्रमाणपत्र देखील देण्याची तरतूद आहे.

 

सद्यस्थितीमध्ये कापूस व मका पिकांसाठी फवारणीची कामे मोठया प्रमाणावर करावी लागणार असल्यामुळे ही प्रमुख पिके असलेल्या क्षेत्रात किटकनाशक फवारणी करणाऱ्या मजुरांना फवारणीचे कौशल्य आधारित प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम प्राधान्याने आयोजित करण्यात आलेला आहे. जेणेकरुन किटकनाशकांचा योग्य वापर होईल व मजुरांची सुरक्षितता जपली जाणार आहे.

 

शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतीमधील विविध निविष्ठांसोबत शेतमजुरांची कार्यक्षमता हा घटक महत्वाचा आहे. सध्याच्या पिक पद्धतीमध्ये औषध फवारणी, फळबागांची छाटणी, बीबीएफद्वारे पेरणी, कापूस वेचणी, सुक्ष्म सिंचनाची देखभाल दुरूस्ती, रोपवाटीकेतील कामे, नियंत्रित शेती, शेतमालाची स्वच्छता व प्रतवारी इ. सर्व कामे ही कौशल्यावर आधारित आहेत. याबाबत शेतमजूरांना कौशल्य आधारित प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे कामाची गुणवत्ता, दर्जा व वेग सुधारण्यास मदत होईल व शेतकऱ्यांना देखील त्याचा फायदा होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

  

शेतमजूरांचे कौशल्य वाढविणे, ग्रामीण भागात रोजगार निर्मितीस चालना, सुरक्षितता व आरोग्य संरक्षण, कार्यक्षम व्यावसायिक सेवांची शेतकऱ्यांना उपलब्धता, पर्यावरणपूरक कृषि पद्धतीस प्रोत्साहन व गुणवत्तापुर्ण शेतीमालाचे उत्पादन करण्यासाठी शेतमजूरांना कौशल्य आधारित प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

 

शेतीशाळा व विविध माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येईल. त्यासाठी नियोजन करण्यात त्यात आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी दिली. प्रशिक्षणाबाबत  जिल्हयातील आत्मा प्रकल्प संचालक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांच्या समन्वयातून  प्रशिक्षण कार्यक्रम सर्वत्र घेण्यात येतील, असेही ते म्हणाले.

 

00000

जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडून कोविड रूग्णालयाची पाहणी

जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडून कोविड रूग्णालयाची पाहणी

आवश्यक सुविधांसाठी व्यवस्थापन टीम

 

अमरावती, दि. 2 : जिल्हा कोविड रूग्णालयातील दाखल रूग्णांवर उपचार करताना इतर आवश्यक सुविधाही वेळेत पुरवाव्यात. रुग्णालयातील सुविधा व नित्याच्या दैनंदिन बाबींसाठी स्वतंत्र व्यवस्थापन टीमची नियुक्ती करावी, असे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे दिले.

 

जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी आज जिल्हा कोविड रूग्णालयाला भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी केली व वैद्यकीय यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, उपजिल्हाधिकारी स्नेहल कनिचे, वैद्यकीय पथकातील ललिता अटाळकर यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

 

         जिल्हाधिकारी श्री. नवाल म्हणाले की, गत चार महिन्यांपासून वैद्यकीय यंत्रणा जोखीम स्वीकारून अथक परिश्रम घेत आहे. मात्र, धैर्य व संयम कायम ठेवूनच आपल्याला संकटकाळावर मात करता येईल. रुग्णांशी सुसंवाद साधून त्यांचे मनोबल वाढवावे. त्यांना आवश्यक त्या सुविधा वेळेत पुरवाव्यात. सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. इमारतीच्या आवारातही एक स्क्रीन ठेवावी. रुग्णांकडून वेळोवेळी फीडबॅक घ्यावेत. भोजन, पेयजल, स्वच्छता आदी सुविधा काटेकोरपणे पुरवाव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.

 

     वायफाय व इतर यंत्रणाही कार्यान्वित आहेत. त्यानुसार उपचारांसह मनोबल वाढविण्यासाठी, मानसिक ताणतणावाच्या व्यवस्थापनासाठी संगीत आदी व्यवस्था नियमित ठेवावी.रुग्णालयासाठी अतिरिक्त रूग्णवाहिका उपलब्ध करून घेण्याबाबत निर्देशही त्यांनी दिले.

 

00000

संगीतसूर्य केशवराव भोसले यांचे कार्य तरूणांपर्यंत पोहोचविण्यासाठी उपक्रम महत्वपूर्ण - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर



संगीतसूर्य केशवराव भोसले ऑनलाईन महोत्सवाचा शुभारंभ
संगीतसूर्य केशवराव भोसले यांचे कार्य तरूणांपर्यंत पोहोचविण्यासाठी उपक्रम महत्वपूर्ण

                        -  पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

           संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी आपल्या कलेतून सांस्कृतिक क्षेत्रात महत्वाचा ठसा उमटविला.  त्यांचे हे कार्य तरूण पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी सांस्कृतिक परिषदेचा उपक्रम महत्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.

     संगीतसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषदेतर्फे ऑनलाईन प्रथम आंतरराष्ट्रीय कला महोत्सवाचा शुभारंभ  पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या.

        पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या ठायी अफाट प्रतिभा व प्रज्ञेचा संगम झालेला होता. दुर्देवाने त्यांना अल्पायुष्य लाभले. मात्र, त्यांनी संगीत क्षेत्रात केलेली कामगिरी अतुलनीय आहे. परिषदेच्या महोत्सवाच्या माध्यमातून त्यांचे कार्य तरूणांपर्यंत पोहोचेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 सध्या कोरोना संकटकाळामुळे गर्दी टाळण्यासाठी जाहीर कार्यक्रमांवर मर्यादा आली तरीही, याप्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम ऑनलाईन माध्यमांद्वारे सातत्याने व्हावेत. सांस्कृतिक वसा जपला जावा, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.महोत्सव दि. नऊ ऑगस्टपर्यंत चालणार असून, रोज सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल त्यात असेल. फेसबुकवर हे कार्यक्रम लाईव्ह पाहता येणार आहेत. यानिमित्त विविध मान्यवरांची व्याख्यानेही आयोजित करण्यात आली आहेत. महोत्सवात अभिनेते भारत गणेशपुरे, लेखक डॉ. संजय सोनवणी, डॉ. सतीश पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांचा सहभाग आहे, अशी माहिती सांस्कृतिक परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष वर्षाताई धाबे यांनी दिली. अरविंद पाटील यांनी प्रास्ताविकपर भूमिका मांडली. क्षिप्रा मानकर, डॉ. स्वाती पडोळे यांनी निवेदन केले.

 

परिषदेच्या प्रमिलाताई भिसे, राजीव चव्हाण, अतुल टोंगे, हर्षा ढोक, संजय बावळसुरे, ओजस केदार, सूर्यकांत शेजूळ, अशोक दुधारे यांनी आयोजन केले.

 

00000


Saturday, August 1, 2020

महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी ‘उडान’सारखे उपक्रम सर्वत्र राबवले जावेत - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर




महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी ‘उडान’सारखे उपक्रम सर्वत्र राबवले जावेत

-         पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 1 : एसआरपीएफकडून पोलीस कुटुंबातील महिलांचा स्वयंसहायता समूह स्थापन करून एसआरपीएफ उडान हा उपक्रम राबविण्यात येत आहे. महिलांमध्ये आर्थिक स्वावलंबन व रोजगारनिर्मिती हा उपक्रम उपयुक्त आहे. असे उपक्रम सर्वत्र राबवले जावेत, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी येथे केले.

 

एसआरपीएफ ग्रुप 9 चे कमांडंट लोहित मतानी व त्यांच्या सहचारिणी मनजीत मतानी यांनी पुढाकार घेऊन राज्य राखीव पोलीस दलातील पोलीस कुटुंबातील महिलांचा उडान हा स्वयंसहायता समूह स्थापन केला व त्यांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगारनिर्मितीला चालना दिली. या समूहाच्या उत्पादन विक्रीसाठी उडान स्टोअर्स (www.udaanstore.com) हा ऑनलाईन प्लॅटफार्म उपलब्ध करून देण्यात आला आहे, त्याचा शुभारंभ पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या.

 

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, महिलांना कौशल्य विकासातून रोजगारनिर्मिती व आर्थिक स्वावलंबनाकडे वळवणारा उडान हा उपक्रम केवळ राखीव दलापुरता मर्यादित राहू नये. प्रत्येक क्षेत्रात यासारखे उपक्रम ठिकठिकाणी राबवले जाणे गरजेचे आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्यास कुटुंबाचा व पर्यायाने समाजाचा विकास होतो. शासनाकडूनही जिल्ह्यात बचत गटांचे जाळे विणण्यात आले आहे. सोलर चरख्याद्वारे कापड निर्मिती करणा-या स्वयंसहायता समूहाची उत्पादने राज्यभर पोहोचत आहेत. कस्तुरबा खादी समिती संस्थेतर्फे एमआयडीसीत स्वतंत्र युनिटही सुरू कऱण्यात आले आहे.

 

           महिलांना कौशल्य विकासाची व रोजगाराची संधी प्राप्त करून दिली तर त्या यशस्वीपणे पुढे जातात. त्यामुळे अशा उपक्रमांचा विस्तार होणे आवश्यक आहे. यापुढेही जिल्ह्यात सर्वत्र असे उपक्रम सुरू करण्यासाठी पावले उचलली जातील, असेही पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी सांगितले.

 

श्री. मतानी म्हणाले की, या उपक्रमात पोलीस कुटुंबातील महिलांचा स्वयंसहायता समूह स्थापन करण्यात येऊन त्यांना कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण देण्यात आले.  या समूहाकडून अगरबत्ती, सॅनिटायझर, साबण, हँडवॉश, शॅम्पू, मास्क, कपडे, बेकरी उत्पादने व इतर अनेक गृहोपयोगी वस्तूंचे उत्पादन करण्यात येते. समूहाची प्रगती लक्षात घेऊन एसआरपीएफच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी उत्पादननिर्मितीच्या आवश्यक यंत्रणेसाठी 9 लाख रूपये निधी दिला. त्यातून आवश्यक यंत्रणा खरेदी करण्यात आली.  त्यामुळे महिलांकडून विविध उत्पादनांना सुरुवात झाली. त्याची गुणवत्ता पाहून त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे.वस्तूंचा पुनर्वापर करून त्यातून उत्कृष्ट उत्पादन निर्मितीवर भर दिला जात आहे. सुगंधी उत्पादनांच्या निर्मितीसाठी देवळातील निर्माल्य आदींचा वापरही केला जात आहे. महिलांना आर्थिक स्वावलंबनासह त्यांच्या सामाजिक हक्कांची जपणूकही या उपक्रमातून होत असल्याचे श्री. मतानी यांनी सांगितले.

उडान समूहाच्या महिला सदस्य यावेळी उपस्थित होत्या. 

 

00000

 


DIO NEWS AMRAVATI 25.09.2026

                                              विमुक्त जाती, भटक्या जमातींसाठी दाखले, योजना शिबिर   *महसूल, बहुजन कल्याण विभागाचा उपक्रम   अम...