Tuesday, September 29, 2026

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्सचा उद्या #नाशिक विभाग दौरा !


 भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्सचा उद्या #नाशिक विभाग दौरा !

विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था तसेच इतर संबंधित हितधारकांशी थेट संवाद साधून त्यांच्या सूचना, अडचणी व अभिप्राय जाणून घेणार

परीक्षा प्रक्रियेतील विविध टप्प्यांचा आणि प्राप्त सूचनांचा सखोल अभ्यास करून शासनास अहवाल सादर करणार - अपर मुख्य सचिव व्ही. राधा


*परीक्षा प्रक्रियेतील विविध टप्प्यांचा आणि प्राप्त सूचनांचा*
*सखोल अभ्यास करून शासनास अहवाल सादर करणार*
*अपर मुख्य सचिव व्ही. राधा*
• *उच्चस्तरीय टास्क फोर्सचा आतापर्यंत सुमारे १५०० विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद*
• *भरती परीक्षा सुधारण्यासाठी सुमारे ३० हजार सूचनांचे ईमेल प्राप्त*
मुंबई, दि. २९:- भरती परीक्षा प्रक्रिया सुधारणा हा विषय राज्य शासनाने अतिशय गांभीर्याने घेतला आहे. हा विषय अतिशय संवेदनशील असल्याने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भावना, त्यांनी मांडलेल्या सूचनांचा टास्क फोर्सकडून सकारात्मक विचार केला जाईल, तसेच परीक्षा प्रक्रियेतील विविध टप्प्यांचा सखोल अभ्यास करून शासनास अहवाल सादर केला जाईल, असे भरती परीक्षा सुधारणासाठी गठित टास्क फोर्सच्या अध्यक्ष तथा सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. भरती परीक्षा प्रक्रिया अधिक प्रभावी, आदर्श करण्यासाठी उपाययोजना सुचविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भरती परीक्षा सुधारण्यासाठी गठित उच्चस्तरीय समितीने कोकण विभागातील उमेदवारांशी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात संवाद साधला. यावेळी उच्चस्तरीय समितीचे सदस्य तथा इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह, समितीचे सदस्य तथा संघ लोकसेवा आयोगाचे माजी सदस्य एअर मार्शल अजित शंकरराव भोसले (सेवानिवृत्त), सदस्य तथा भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबईच्या यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाचे प्रा. श्यामप्रसाद करगड्डे, यांच्यासह कोकण विभागीय आयुक्त श्रीमती रुबल अग्रवाल, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार उपस्थित होते.
अपर मुख्य सचिव व्ही. राधा म्हणाल्या, उच्च स्तरीय टास्क फोर्सकडून आतापर्यंत पुणे, नागपूर, अमरावती , छत्रपती संभाजीनगर येथे विद्यार्थी व उमेदवारांशी संवाद साधण्यात आला आहे. कोकण विभागातील संवादानंतर आज (बुधवार) नाशिक विभागात टास्क फोर्स संवाद साधणार आहे. प्रत्येक विभागात वेगळे प्रश्न मांडण्यात आले. प्रत्येक प्रश्न, मुद्याचा सखोल अभ्यास करूनच अहवाल शासनास सादर केला जाईल.
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन शासनाने हा टास्क फोर्स गठित केला असून आतापर्यंत सुमारे १५०० विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला असून भरती परीक्षा सुधारण्यासाठी सुमारे ३० हजार सूचनांचे ईमेल प्राप्त झाले असल्याचे अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
व्ही. राधा म्हणाल्या, एक अधिकारी म्हणून माझ्यासाठीही हा अनुभव अत्यंत शिकवणारा ठरला आहे. प्रत्येक विभागात काही नवीन प्रश्न समोर आले. कोकण विभागातही काही वेगळे मुद्दे निदर्शनास आले आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेतून टास्क फोर्सला मोठ्या प्रमाणात माहिती आणि अनुभव मिळाला आहे. प्रत्येक विभागातील विद्यार्थ्यांची पार्श्वभूमी वेगळी आहे आणि त्यांचे प्रश्नही वेगवेगळे आहेत. संवादातूनही विविध प्रकारचे प्रश्न समोर आले असून अहवाल तयार करताना याचा निश्चितच उपयोग होणार आहे.
व्ही. राधा म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी विविध विभागांच्या परीक्षांशी संबंधित स्वतंत्र समस्याही मांडल्या आहेत. त्यामुळे परीक्षानिहाय आणि विभागनिहाय प्रश्नांचा अभ्यास करण्यात येणार आहे. यासोबतच संघ लोकसेवा आयोग, इतर राज्यांतील भरती प्रक्रियेचाही अभ्यास केला जाणार आहे. संबंधित विभागांच्या सचिवांशी चर्चा करून समस्यांच्या मुळ कारणांचा शोध घेतला जाईल. केवळ शिफारसी करण्याऐवजी प्रत्यक्ष अडचणी दूर करण्यावर टास्क फोर्सचा भर राहणार आहे. विद्यार्थ्यांकडून आलेल्या सूचना आणि संवादातून मिळालेल्या अनुभवांच्या आधारे भरती परीक्षा प्रक्रिया अधिक प्रभावी, आदर्श करण्यासाठी उपाययोजना सुचविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी टास्क फोर्सचे सदस्य वीरेंद्र सिंह, एअर मार्शल अजित शंकरराव भोसले (सेवानिवृत्त), प्रा. श्यामप्रसाद करगड्डे यांनीही आपले विचार मांडले.
कोकण विभागातील संवाद प्रसंगी भरती परीक्षा प्रक्रियेतील दिरंगाई टाळावी, आयोगाकडून विद्यार्थ्यांना माहिती मिळावी, परीक्षा पारदर्शक व्हावी, परीक्षा पॅटर्न बदलाबाबत पूर्व कल्पना मिळावी, गट क ची सर्व पदांची भरती एकत्र व्हावी, दोन पदांच्या परीक्षेत अंतर असावे, प्रलंबित परीक्षा लवकर व्हाव्यात, पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा असे दोन भाग असावेत, वरिष्ठ पदानुसार निकाल जाहीर केला जावा, एक पद एक परीक्षा असावी, प्रतीक्षा यादीवरील विद्यार्थ्यांचा विचार व्हावा, वर्णनात्मक प्रश्नपत्रिका असावी, एकदाच नोंदणी व शुल्क आकारणी करावी, प्रश्नपत्रिकेचा दर्जा, उत्तरतालिका आणि पेपर तपासणी अधिक पारदर्शक असावी, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलींना वयामध्ये सूट असावी, अशा विविध सूचना करण्यात आल्या.
००००
 

राज्यातील #भरती #परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत करण्यात आलेला उच्चस्तरीय टास्क फोर्स बुधवार, ३० सप्टेंबर २०२६ रोजी घटकांशी जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक येथे संवाद साधणार आहे.


राज्यातील #भरती #परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत करण्यात आलेला उच्चस्तरीय टास्क फोर्स बुधवार, ३० सप्टेंबर २०२६ रोजी घटकांशी जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक येथे संवाद साधणार आहे. परीक्षा प्रक्रियेतील अडचणी, सूचना आणि अभिप्राय जाणून घेऊन त्याआधारे आवश्यक सुधारणांबाबत शासनास शिफारशी करण्यात येणार आहेत. भरती परीक्षांशी संबंधित उमेदवार, संस्था तसेच इतर संबंधित घटकांना आपल्या सूचना व अभिप्राय टास्क फोर्सकडे नाशिक विभागासाठी nashik-examreformstaskforce @maharashtra.gov.in या ई-मेलवर अभिप्राय देता येईल.
विभागनिहाय संवादातून प्राप्त सूचनांच्या आधारे भरती परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध, परीक्षा सुरक्षेचे बळकटीकरण, प्रक्रियेतील पारदर्शकता व विश्वासार्हता वाढविणे आणि परीक्षा व्यवस्था अधिक उमेदवाराभिमुख करण्यासाठी टास्क फोर्स शासनास शिफारशी सादर करणार आहे.

 

परीक्षा प्रक्रिया अधिक प्रभावी व पारदर्शक करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुचविण्यात येतील, असे भरती परीक्षा सुधारणेसाठी गठित उच्चस्तरीय टास्क फोर्सच्या अध्यक्ष तथा सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी सांगितले.

 





#भरतीपरीक्षा प्रक्रियेतील विविध टप्प्यांचा सखोल अभ्यास करून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भावना व सूचनांचा सकारात्मक विचार केला जाणार आहे. #परीक्षा प्रक्रिया अधिक प्रभावी व पारदर्शक करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुचविण्यात येतील, असे भरती परीक्षा सुधारणेसाठी गठित उच्चस्तरीय टास्क फोर्सच्या अध्यक्ष तथा सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी सांगितले.

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात टास्क फोर्सने कोकण विभागातील उमेदवारांशी संवाद साधला. आतापर्यंत पुणे, नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर येथे विद्यार्थी व उमेदवारांशी संवाद साधण्यात आला असून, सुमारे १,५०० विद्यार्थ्यांशी चर्चा आणि भरती परीक्षा सुधारणेबाबत सुमारे ३० हजार सूचना ई-मेलद्वारे प्राप्त झाल्या आहेत. प्रत्येक विभागातील प्रश्न व विद्यार्थ्यांची पार्श्वभूमी लक्षात घेऊन त्यांचा स्वतंत्रपणे अभ्यास केला जाणार आहे.
परीक्षा प्रक्रियेतील दिरंगाई टाळणे, पारदर्शकता वाढविणे, विद्यार्थ्यांना वेळेवर माहिती देणे, प्रलंबित परीक्षा लवकर घेणे, परीक्षेच्या पद्धतीतील बदलांची पूर्वकल्पना देणे, एकदाच नोंदणी व शुल्क आकारणी, उत्तरतालिका व पेपर तपासणी अधिक पारदर्शक करणे, तसेच परीक्षानिहाय व विभागनिहाय अडचणी दूर करण्याबाबत विद्यार्थ्यांनी विविध सूचना मांडल्या. संघ लोकसेवा आयोग आणि इतर राज्यांतील भरती प्रक्रियेचाही अभ्यास करून समस्यांच्या मुळ कारणांचा शोध घेतला जाणार आहे. केवळ शिफारसी न करता प्रत्यक्ष अडचणी दूर करण्यावर टास्क फोर्सचा भर राहणार असल्याचे व्ही. राधा यांनी सांगितले.
यावेळी उच्चस्तरीय समितीचे सदस्य तथा इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह, समितीचे सदस्य तथा संघ लोकसेवा आयोगाचे माजी सदस्य एअर मार्शल अजित शंकरराव भोसले (सेवानिवृत्त), सदस्य तथा भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबईच्या यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाचे प्रा. श्यामप्रसाद करगड्डे, यांच्यासह कोकण विभागीय आयुक्त श्रीमती रुबल अग्रवाल, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार उपस्थित होते.

भरती परिक्षा अधिक पारदर्शक सुरक्षित व विश्वासार्ह उमेदवारांच्या विश्वासासाठी उच्चस्तरीय समितीची आज २९ सप्टेंबर रोजी #कोकण विभाग भेट.

 भरती परिक्षा अधिक पारदर्शक सुरक्षित व विश्वासार्ह उमेदवारांच्या विश्वासासाठी उच्चस्तरीय समितीची आज २९ सप्टेंबर रोजी #कोकण विभाग भेट.

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीची सुचना मंगळवारी प्रसिध्द

 

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीची सुचना मंगळवारी प्रसिध्द

 

अमरावती, दि.२९ : महाराष्ट्र विधान परिषदेसाठी अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून एका सदस्याची निवडणूक घ्यावयाची आहे. यासंबंधीची घोषणा भारत निवडणूक आयोगाने नुकतीच केली असून त्यानुसार विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ, अमरावती यांनी निवडणुकीची सूचना आज प्रसिद्ध केली आहे.

 

निवडणूकीसाठीची नामनिर्देशनपत्रे उमेदवाराला किंवा त्याच्या कोणत्याही प्रस्तावकाला, निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त, अमरावती विभाग, अमरावती किंवा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहआयुक्त (सामान्य प्रशासन) विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती यांचेकडे मंगळवार ६ ऑक्टोबर, २०२६ पर्यंत कोणत्याही दिवशी (सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त) सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत विभागीय आयुक्त यांचे कार्यालयात सभागृह क्र. २ तळमजला, विभागीय आयुक्त कार्यालय, कॅम्प, अमरावती येथे दाखल करता येतील. नामनिर्देशनपत्रे वर उल्लेख केलेल्या ठिकाणी व वेळी मिळू शकतील.

 

नामनिर्देशनपत्रांची छाननी बुधवार ७ ऑक्टोबर, २०२६ रोजी सकाळी ११ वाजेपासून निवडणूक निर्णय अधिकारी, अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ तथा विभागीय आयुक्त, अमरावती विभाग, अमरावती यांचे कार्यालयातील सभाकक्ष क्र. २, तळमजला, विभागीय आयुक्त कार्यालय, कॅम्प अमरावती येथे करण्यात येईल. उमेदवारी मागे घेण्याबद्दलची सूचना उमेदवाराला किंवा उमेदवाराने लेखी प्राधिकार दिलेल्या त्याच्या कोणत्याही प्रस्तावकाला किंवा निवडणूक प्रतिनिधीला वरील परिच्छेद (२) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या कोणत्याही अधिकाऱ्यास त्यांच्या कार्यालयात शुक्रवार ९ ऑक्टोबर, २०२६ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत देता येईल. निवडणूक लढविली गेल्यास शुक्रवार २३ ऑक्टोबर, २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल. असे या सुचनेव्दारे घोषित करण्यात आले आहे.

 

ही सूचना निवडणूक निर्णय अधिकारी, विभागातील सर्व जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयातील सुचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. याबरोबरच विभागातील सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, महापालिका आयुक्त, नगरपालिका तसेच पंचायत समिती व ग्रामपंचायती कार्यालयातही प्रसिद्ध करण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे. असेही निवडणूक निर्णय अधिकारी अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ तथा विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी कळविले आहे.                                                                                       ०००००

DIO NEWS AMRAVATI 29.09.2026



                             1 ऑक्टोबरला गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल

 

अमरावती, दि. 29 (जिमाका) :  शहरातील न्यू आझाद गणेश मंडळाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर 1 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 3 ते रात्री 10 या वेळेत वाहतूक वळवण्यात आली असून प्रमुख मार्गांवर 'नो-एन्ट्री' लागू करण्यात आली आहे.पोलीस उपायुक्त प्रांजली सोनवणे यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी  28 सप्टेंबर रोजी हे  आदेश जारी केले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर मोटार वाहन कायदा १९८८ आणि महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ अन्वये कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.

 

या आदेशानुसार गर्ल्स हायस्कूल चौकाकडून इर्विन चौकाकडे जाणारी वाहने पोलीस पेट्रोल पंपमार्गे बस स्टँडकडे, तर बाबा कॉर्नरकडून येणारी वाहतूक लेखुमल चौकाकडे वळवण्यात येणार आहे. रेल्वे स्टेशन चौकाकडून येणारी वाहतूक मिरवणूक मालवीय चौक पार करेपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे. गद्रे चौकाकडून येणारी वाहतूक उड्डाणपूल, राजापेठ किंवा गांधी चौकामार्गे, तर हमालपुराकडून येणारी वाहतूक रेल्वे स्टेशन चौक व मर्क्युरी टी पॉइंटमार्गे वळवण्यात येणार आहे. राजकमल चौकाकडून ये-जा करणारी वाहतूक सरोज चौक व चित्रा चौकामार्गे धावेल.

 

नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व हलक्या व जड वाहनांना हे नियम लागू राहतील. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन अमरावती शहर पोलिसांनी केले आहे.  

००००००


अंजनगाव बारी येथील वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्रासाठी अकोल्याचा पर्याय

 

अमरावती, दि. 29  (जिमाका): प्रादेशिक परिवहन कार्यालय , अमरावती यांच्या अधिनस्त अंजनगाव बारी (बडनेरा) येथील वाहन निरीक्षण व परीक्षण केंद्र तसेच अत्याधुनिक व संगणकीकृत चाचणी पथकाचे काम सध्या अपूर्ण असल्याने वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस सर्टिफिकेट) नूतनीकरणाचे काम सद्यास्थितीत पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. सर्व वाहनधारकांनी नजीकच्या अकोला जिल्ह्यात किंवा इतर जिल्ह्यात जाऊन आपल्या वाहनांची तपासणी व नूतनीकरण करून घ्यावे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी रे दिली आहे.

 

          ज्या वाहनधारकांनी अद्याप आपल्या वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्राचे नूतनीकरण केलेले नाही किंवा ज्यांच्या प्रमाणपत्राची मुदत येणाऱ्या काळात संपत आहे, अशा सर्व वाहनधारकांनी पूर्वपरवानगी घेऊन आणि ऑनलाईन तारीख  आरक्षित करून अकोला किंवा नजीकच्या इतर जिल्ह्यात जाऊन आपल्या वाहनांची तपासणी व नूतनीकरण करून घ्यावे. नागरिकांनी होणारी गैरसोय टाळण्यासाठी या सुविधेचा लाभ घ्यावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.                                          

०००००


1 ऑक्टोबर रोजी ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस’ साजरा करावा

*जिल्हा प्रशासनाचे आवाहन

 

अमरावती, दि. 29 (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे 1 ऑक्टोबर रोजी संपूर्ण राज्यभरात ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस’ साजरा करण्यात येणार आहे. त्यानुसार सर्व शासकीय, निमशासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांनी यानिमित्ताने विविध उपक्रम आयोजित करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 

ज्येष्ठ नागरिक दिवसानिमित्त कार्यालय व स्थानिक पातळीवर सार्वजनिक पदयात्रा, प्रभात फेऱ्या, सभा, परिसंवाद आणि आरोग्य शिबिरांचे आयोजन करावे. समाजकार्यात विशेष योगदान देणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा आणि ज्येष्ठांसाठी कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचा विशेष सत्कार व गौरव करण्यात यावा. ज्येष्ठ नागरिकांचे हक्क, त्यांच्यासाठीच्या शासकीय योजना, वैद्यकीय सोयी-सुविधा आणि मदतीसाठी असलेल्या हेल्पलाइनबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.

 

ज्येष्ठ नागरिकांना वृद्धापकाळात सुसह्य जीवन जगता यावे, त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुस्थितीत राहावे आणि त्यांना राज्य शासनाच्या सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरणाचा पूर्ण लाभ मिळावा, या उद्देशाने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहे.

00000

बुधवारपासून ‘खादी महोत्सवा’चे आयोजन

*नागरिकांनी भेट देण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. 29 (जिमाका) : राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या वतीने बुधवार, दि. 30 सप्टेंबर ते शनिवार, दि. 3 ऑक्टोबर दरम्यान भव्य खादी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव बस स्थानकासमोरील सायन्सकोर मैदानावरील 'मेळघाट हाट' येथे आयोजित केला जात आहे.

 

आदिवासी आणि ग्रामीण भागातील महिलांनी सौर चरख्यावर स्वतः सूत कातून व शिवणकाम करून तयार केलेली दर्जेदार खादी व सौर खादी उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. या महोत्सवात सर्व खादी उत्पादने ग्राहकांना सवलतीच्या दरात मिळतील. खादी कापड, विविध प्रकारची खादी वस्त्रे आणि इतर हस्तकलेवर आधारित वस्तूंचे स्टॉल्स या ठिकाणी लावण्यात येणार आहेत.

 

ग्रामीण व आदिवासी भागातील महिलांच्या हाताला रोजगार मिळवून देण्यासाठी आणि स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या खादी महोत्सवाला भेट द्यावी, असे आवाहन खादी व ग्रामोद्योग मंडळाचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्रदिप चेचरे यांनी केले आहे.

00000

इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या सेवा संकल्प अभियानाअंतर्गत नागरिकांनी घेतला विविध योजनांचा लाभ

  इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या सेवा संकल्प अभियानाअंतर्गत नागरिकांनी घेतला विविध योजनांचा लाभ #योजना #सेवासंकल्पअभियान #महाराष्ट...