Friday, June 28, 2024

अनोळखी मृत महिलाची ओळख पटविण्याबाबत आवाहन

 


अनोळखी मृत महिलाची ओळख पटविण्याबाबत आवाहन

 

        अमरावती, दि. 28(जिमाका): नागपूरीगेट अमरावती (शहर) अंतर्गत एका अनोळखी  महिलेचा मृतदेह, वय अंदाजे 65 वर्षे मृतकाचा रंग सावळा, उंची 5 फुट, चेहरा गोल, बांधा सळपातळ, केस बॉय कट असून काळे पांढरे अंगात लाल हिरव्या रंगाची साडी, त्यावर चांदेरी व हिरव्या रंगाचे फुलाचे डिजाईन व पांढरे क्रीम रंगाचे ब्लाउज परिधान केलेले आहे. गळ्यात वेगवेगळ्या माळा आहे. दोन्ही हातात वेगवेगळ्या रंगाचे बांगड्या घातलेल्या दिसत आहे तसेच डाव्या पायात चेन पट्टी दिसत आहे.  मृतकाच्या नातेवाईकाचा शोध लागावा व अनोळखी महिलाची ओळख पटविण्यास सहकार्य करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनुमंता उरलागोंडावार भ्रमणध्वनी 7499889511 किंवा पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र भार्गव भ्रमणध्वनी 9049607970, 8329616821 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ पोलीस नागपूरीगेट, पोलीस स्टोशन  अमरावती (शहर) यांनी केले आहे.

0000

 

संजय गांधी निराधार योजना समितीमध्ये 1498 प्रकरणे मंजूर; पात्र लाभार्थ्यांनी कागदपत्रे जमा करावी

 

संजय गांधी निराधार योजना समितीमध्ये 1498 प्रकरणे मंजूर;

पात्र लाभार्थ्यांनी कागदपत्रे जमा करावी

             अमरावती, दि. 28 (जिमाका): संजय गांधी निराधार योजना समितीच्या बैठक नुकतीच तहसिलदार संजय गांधी योजना, अमरावती शहर यांचे कार्यालयात पार पडली. या बैठकीत एकूण 1752 प्रकरणापैकी 1498 प्रकरणे मंजूर करण्यात आली. 241 प्रकरणे त्रुटी असल्यामुळे तात्पुरती नामंजूर करण्यात आली तर 13 प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहे. मंजूर प्रकरणांपैकी संजय गांधी निराधार अनुदान योजनाचे 587 प्रकरणे, श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन येाजनाचे 856 प्रकरणे तर इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ योजनाचे 55 प्रकरणे आहेत. मंजूर झालेल्या लाभार्थ्यांनी खालील कागदपत्रे दि. 5 जुलै 2024 नंतर तहसिलदार संजय गांधी योजना कार्यालयात जमा करावीत, असे आवाहन संजय गांधी योजना शहर अमरावती येथील तहसिलदार यांनी केली आहे.

 

            प्रकरणे मंजूर करण्यात आलेल्या व त्रुटीतील प्रकरणातील याद्या तहसिलदार संजय गांधी योजना अमरावती शहर प्रभाग अधिकारी, अमरावती महानगरपालिका या कार्यालयामध्ये प्रसिध्द करण्यात आले आहे. तसेच या याद्या www.amravati.gov.in या संकेस्थळावर देखील प्रसिध्द करण्यात येत आहेत. मंजूर झालेल्या लाभार्थ्यांनी राष्ट्रीयकृत बँकेतील खात्याचे पासबुक, आधार क्रमांकाशी संलग्न बँक खाते, पासपोर्टसाईज फोटो, आधार कार्ड, छायांकित प्रत, मोबाईल क्रमांक इत्यादी आवश्यक कागदपत्रे जमा करावी.

00000

निराधारांना डीबीटीमार्फत मिळणार अनुदान

 

निराधारांना डीबीटीमार्फत मिळणार अनुदान

         अमरावती, दि. 28 (जिमाका):  संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेतील व्यक्तींना योजनांच्या माध्यमातुन महिन्याकाठी ठराविक मानधन अदा केले जाते. हे मानधन लाभार्थ्यांना तहसिलस्तरावरून बँकेत जमा केल्या जायचे. परंतु आता थेट डीबीटीमार्फत निराधार अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान वर्ग केले जाणार आहे. यासाठी लाभार्थ्यांचे आधारकार्ड बँक खात्याशी लिंक असेल त्या बँक खात्यामध्ये अनुदान जमा होईल. तरी लाभार्थ्यांनी बँक खाते आधार लिंक करून घ्यावे, असे आवाहन  संजय गांधी योजना शहर विभागाचे तहसिलदार यांनी केले आहे.  

          या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र निराधारांकडुन हयात असल्याचे कागदपत्रे, बँक पुस्तक, आधारकार्ड, राशनकार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र, वीरपत्नी असल्यास पतीचे मृत्यु प्रमाणपत्र व मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. योजनेतंर्गत पात्र लाभार्थ्यांचे अर्ज संकलित करण्याची प्रक्रीया तहसिलदार संजय गांधी योजना शहर विभाग अमरावती विभागाकडुन सुरू करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा निवृत्ती योजनेचे लाभार्थी यांनी तात्काळ वरिल नमुद कागदपत्रे तहसिलदार संगायो अमरावती शहर कार्यालयात सादर करावीत. वरील कागदपत्रे सादर न केल्यास लाभार्थ्यांना अनुदानापासुन वंचित राहावे लागेल, याची नोंद घ्यावी.

00000

क्रीडा प्रबोधिनींतील प्रवेशासाठी राज्य व विभागस्तरीय चाचणी; जिल्ह्यातील खेळाडूंसाठी सुवर्णसंधी

 

क्रीडा प्रबोधिनींतील प्रवेशासाठी राज्य व विभागस्तरीय चाचणी; जिल्ह्यातील खेळाडूंसाठी सुवर्णसंधी

            अमरावती, दि. 28 (जिमाका):  राज्यातील क्रीडा प्रबोधिनींमध्ये सरळ सेवा प्रवेश व खेळनिहाय प्रवेशासाठी विभागस्तरावर व राज्य स्तरावर चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पात्र खेळाडूंनी सहभागी होण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज दि. 2 जुलैपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड यांनी केले आहे.

 

          राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याकरिता प्रतिभावंत खेळाडूंची निवड करून शास्त्रोक्त प्रशिक्षण, अद्ययावत क्रीडा सुविधा, शिक्षण, भोजन, निवास आदी सुविधा क्रीडा प्रबोधिनीच्या माध्यमातून  देण्यात येत आहेत. राज्यातील क्रीडा प्रबोधिनींमध्ये सरळ सेवा प्रवेश व खेळ निहाय कौशल्य चाचण्यांव्दारे निवासी व अनिवासी खेळाडूंना प्रवेश देण्यात येणार आहे. यासाठी मैदानी, आर्चरी, ट्रायथलॉन, बॉक्सींग, बॅडमिंटन, शुटिंग, कुस्ती, हॉकी, टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग, जिम्नॅस्टिक, फुटबॉल, जलतरण, सायकलींग, हॅण्डबॉल, ज्युदो  आदी खेळनिहाय चाचण्यांचे आयोजन करण्यात येत आहे.

 

सरळ प्रवेशासाठी प्रक्रिया

 

        क्रीडा प्रबोधिनीशी संबंधित खेळात राज्यस्तरावर पदक, सहभाग प्राप्त केलेले खेळाडू किंवा राष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधीत्व केलेले खेळाडू ज्यांचे वय 19 वर्षांआतील आहे अशा खेळाडूंना  संबंधित खेळांबाबत चाचणी तज्ज्ञ समितीसमक्ष सादरीकरण देऊन प्रवेश निश्चित केला जातो.

 

खेळनिहाय कौशल्य चाचणी

 

         क्रीडा प्रबोधिनी संबंधित खेळात राज्यस्तरावर सहभागी खेळाडूंना ज्यांचे वय 19 वर्ष आतील आहे, अशा खेळाडूंना संबंधित खेळाच्या खेळनिहाय कौशल्य चाचणीचे आयोजन करून गुणानुक्रम प्रवेश निश्चित केला जातो.

 

            जिल्हास्तरावर क्रीडा प्रबोधिनी चाचणीसाठी सहभागी होणाऱ्या खेळाडुंची नाव जन्म दि. वय याकरीता जन्माचा दाखला, शाळेचे बोनाफाईट जिल्हा खेळ प्रकार व क्रीडा कामगिरी या बाबतचे प्राविण्य सहभाग प्रमाणपत्र जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती येथे दि. 2 जूलै 2024 पर्यंत संकलित करण्यात येणार आहे. तरी इच्छुक खेळाडुंना अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड यांनी केले आहे.

00000

Thursday, June 27, 2024

शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेत आंतरराष्ट्रीय परिषदचे आयोजन

 


शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेत आंतरराष्ट्रीय परिषदचे आयोजन

 

           अमरावती, दि. 27 (जिमाका): शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेमध्ये पहिल्यांदाच दि. 1 व 2 जुलै 2024 रोजी भौतिकशास्त्र व इलेक्ट्रॉनिक्स विभागातर्फे मटेरियल फिजिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट" या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

             मटेरियल सायन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स या दोन्ही विषयाचे संशोधनात्मक महत्त्व आणि समाजोपयोगी लागणाऱ्या वस्तूंची निर्मिती आणि उत्पादन लक्षात घेता विभागाने सदर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. आपल्या देशाचे इलेक्ट्रॉनिक्स विषयाबाबतचे धोरण आणि इतर आधुनिक व प्रगतिशील देशासोबत इलेक्ट्रॉनिक्स हार्डवेअर आणि माहिती तंत्रज्ञान संबंधी शाश्वत विकासाबाबत केलेले सामंजस्य करार आपल्या देशाला एका वेगळ्या उंच पातळीवर घेऊन जाणारे आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत देशाने सौर ऊर्जा क्रांती घडून आणण्याकरिता वर्ड सोलार बँक आणि वन सन, वन वर्ड, वन ग्रिड इनिशिएटिव्ह या दोन नवीन उपक्रमांची सुरुवात केली आहे. आपल्या देशाला केवळ इलेक्ट्रॉनिक्स आणि ॲडव्हान्स पदार्थ विज्ञानाबाबतीत विकास साध्य करायचा आहे असे नसून विज्ञान व तंत्रज्ञानाचा उपयोग करून देशाचा शाश्वत विकास घडवून आणायचा आहे. आजच्या पिढीसोबतच भावी पिढीच्या सर्व गरजा व त्यातील समतोल साधायचा आहे.

 

            नैसर्गिक संपत्ती व संसाधने याचे जतन, निगा आणि संवर्धन केल्यास हा मार्ग आपणास आर्थिक समृद्धीकडे व संपन्नतेकडे घेऊन जाईल. संयुक्त राष्ट्र संघाने 2015 साली शाश्वत विकासाची एकूण 17 जागतिक ध्येय ठरविले आहेत. त्यातील एक ध्येय म्हणजे सर्वांना परवडणारी आधुनिक ऊर्जा साधने उपलब्ध करून देणे आणि या ध्येयांचे उद्दिष्ट 2030 पर्यंत साध्य करायचे ठरविले आहे. शाश्वत विकासाची ध्येय व शासकीय धोरणे राबविण्याकरीता प्रशासनाचा फार मोठा सहभाग असतो. हा सहभाग शासकीय पातळीवर अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण संस्था अमरावती यांना सहभागी करून घेण्यात आले आहे. त्यादृष्टीने या संस्थेतील भौतिकशास्त्र व इलेक्ट्रॉनिक्स विभागाने व आयक्यूईसी विभाग, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण संस्था अमरावती यांचे संयुक्त विद्यमाने या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. परिषदेच्या आयोजनाकरिता सायन्स अँड इंजीनियरिंग रिसर्च बोर्ड विज्ञान व तंत्रज्ञान विभाग भारत सरकार यांचे सहकार्य लाभले आहे.

 

            परिषदेमध्ये देशातील तसेच इतर देशातील मान्यवर व शास्त्रज्ञ यांचे व्याख्याने आयोजित केले आहेत. परिषदे करिता एकंदरीत 300 डेलिगेट्स व पार्टिसिपंड्स येणार आहेत. मटेरियल सायन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स पासून तयार केलेली उत्पादने मानवासाठी शाश्वत विकास कशा पद्धतीने घडून आणू शकतात. अर्थातच नैसर्गिक संसाधने व स्त्रोत यांचा उपयोग करून आणि निसर्गाचा समतोल कायम राखून शाश्वत विकासावर चर्चा घडवून येणार आहे. त्यामध्ये डिजिटल तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्लाऊड कॉम्पिटिंग इत्यादी सारख्या तंत्रज्ञानाचा इंटरनेट ऑफ थिंग्सद्वारे तंत्रज्ञान उपायांचा लाभ कशाप्रकारे करता येईल यावर पेपर वाचन, व्याख्यान आणि चर्चा होणार आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजक भौतिकशास्त्र व इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे विभाग प्रमुख डॉ.श्रीकृष्ण यावले, ब्रिजलाल बियाणी महाविद्यालय सहआयोजक प्राचार्य डॉ. दीपक धोटे,  परिषदेचे सचिव डॉ. एम. पी. लोखंडे व डॉ. आर. व्ही. बरडे हे आहेत. तसेच डॉ. डी. आर. बिजवे, गो. सी. टोम्पे महाविद्यालय, चांदूरबाजार आणि डॉ. जी.टी. लामधाडे, विद्याभारती महाविद्यालय अमरावती हे सहसमन्वयक आहेत.

 

           आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजनाकरीता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आयक्यूएसी विभाग प्रमुख डॉ. एस. ए. वाघुळे आणि भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण संस्था अमरावतीच्या संचालक डॉ. संगीता यावले यांचे संयुक्त विद्यमाने ही परिषद संपन्न होत आहे. परिषदेच्या आयोजनाकरिता शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेचे संचालक तथा सहसंचालक डॉ. सुबोध भांडारकर यांनी पुढाकार घेतला. महाराष्ट्र शासनाचे उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे मागील दोन महिन्यापूर्वी संचालक उच्च शिक्षण डॉ. शैलेंद्र देवळणकर यांनी राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती समिती, बंगलोर  करीता संस्थेमध्ये राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्याबाबत सुचविले होते. त्याचाच एक भाग म्हणून  1 व 2 जुलै 2024 रोजी ही आंतरराष्ट्रीय परिषद संचालक उच्च शिक्षण डॉ. देवळणकर यांचे सहकार्याने संपन्न होत आहे. सदर आंतरराष्ट्रीय परिषदेला विविध महाविद्यालये तसेच संस्थेमधून संशोधक विद्यार्थी, शिक्षक, संशोधकव पदव्युत्तर विद्यार्थी यांनी जास्तीत जास्त संख्येने आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन परिषदेचे आयोजक प्राध्यापक डॉ. श्रीकृष्ण यावले यांनी केले आहे.

00000

‘उर्ध्व वर्धा’प्रकल्पातून खरीप हंगामासाठी तीन पाणीपाळ्या प्रस्तावित; शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन

 

‘उर्ध्व वर्धाप्रकल्पातून खरीप हंगामासाठी तीन पाणीपाळ्या प्रस्तावित;

शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन

 

         अमरावती, दि. 27 (जिमाका) : उर्ध्व वर्धा प्रकल्पातून खरीप हंगामासाठी पाणीसाठा उपलब्ध असल्यास तीन पाणी पाळ्या देण्याचे प्रस्तावित असून, लाभक्षेत्रातील शेतकरी बांधवांनी 31 जुलैपूर्वी संबंधित शाखा कार्यालयास अर्ज सादर करावा, असे आवाहन उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.

 

           उजवा मुख्य कालव्याच्या आरंभापासून ते 95.50 किमीपर्यंत व डावा मुख्य कालव्याच्या 42.40 किमीपर्यंतच्या लाभक्षेत्रातील व त्यावरील सर्व वितरिका, जलाशयावरील अधिसुचित नदीनाल्यांवरील लाभधारकांना खरीप हंगामासाठी  पाणी देण्यात येईल.

 

 

जुलै ते नोव्हेंबर दरम्यान तीनवेळा पाणी मिळेल

 

           कालव्याचे प्रवाही किंवा कालव्यावरील, नदी-नाल्यांवरील मंजूर उपसा सिंचन योजनांद्वारे सिंचनासाठी पाणी घ्यावयाचे असल्यास पाणी मागणी अर्ज नमुना क्र. 7 संबंधित शाखा कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत. ते भरून संबंधित शाखा कार्यालयास सादर करावेत. खरीप हंगामात दि. 1 जुलै  ते 14 नोव्हेंबर 2024 या कालावधीत मागणीप्रमाणे तीन पाणी पाळ्या देण्यात येतील.

 

लाभधारकांनी नियम पाळणे आवश्यक

 

      इच्छुक लाभधारकांनी त्यांच्याकडील थकबाकीची एक तृतियांश व चालू हंगामाची अग्रिम पाणीपट्टी भरावी.  उपसा सिंचन लाभधारकांनी नळमार्गावर पाणी मोजमाप यंत्र बसवावे. पिकांचे मागणी क्षेत्र 20 आर या पटीत असावे. पाणी अर्ज मंजूर करुन घेऊनच उपसा सिंचनासाठी पाणी वापर करावा. मंजूर क्षेत्रासाठी कालव्याचे पाणी घेण्यात येणारी शेतचारी व विहिरीवरील शेतचारी यात तीन मीटरचे अंतर असावे. लाभक्षेत्रातील कालव्यापासून 35 मी. पर्यतच्या विहिरींच्या पाण्याने सिंचित होत असलेल्या नगदी पिकांसाठी (उदा. ऊस, कापूस, केळी व फळबाग) पाटबंधारे अधिनियमानुसार प्रवाही सिंचनाच्या मूळ दराच्या 50 टक्के  दर लागू असेल. पाणीपट्टी न भरणा-या लाभधारकास सिंचनासाठी पाणी देणे या कार्यालयावर बंधनकारक राहणार नाही. व त्यांचा पाणीपुरवठा केव्हाही बंद करण्यात येईल व थकबाकीवर शासन निर्णय नियमानुसार द.सा.द.शे. 10 टक्के दरान विलंब आकारण्यात येईल.

 

           कालव्याचे पाणी शेतात नेण्यासाठी असलेली शेतचारी स्वच्छ व व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी लाभधारकांची आहे. शेतचारी स्वच्छते अभावी पाणी पुरवठयामध्ये व्यत्यय आल्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही. उडाफ्याचे क्षेत्रास पाणीपुरवठा करण्यात येणार नाही व तसेच लाभधारकांनी मंजूर क्षेत्राचे मर्यादेपर्यंत कालवा व नदी-नाल्याच्या पाण्याचा वापर करावा. मंजूरीपेक्षा जादा क्षेत्र भिजविल्यास व अनधिकृतपणे पाणी घेतल्यास नियमाप्रमाणे पंचनामा करुन दंडनीय आकारणी करण्यात येईल. मंजूर न केलेल्या क्षेत्रास पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी या कार्यालयावर राहणार नाही.

 

          लाभधारकाने दिवस व रात्री पाणी घेणे बंधनकारक आहे. अडचणी असल्यास कोणत्याही प्रकारची आगाऊ सूचना न देता पाणी पाळी पत्रकात बदल करण्याचे अधिकार कार्यकारी अभियंता यांना राहतील. थकबाकीदार लाभधारक व थकबाकीदार पाणीवापर संस्थांना पाणी देणे बंधनकारक राहणार नाही.   वितरिकेत पाणी पाळीमध्ये पाणी चालू असताना लाभधारक वितरिकेचा दरवाजा  वेळी अवेळी कमी-जास्त प्रमाणात उघडतात. त्यामुळे त्या वितरिकेवरील चालू असलेल्या पाण्याचा विसर्ग कमी जास्त होऊन ‘टेल टू हेड’ सिंचनावर विपरीत परिणाम होतो व त्यामुळे त्या वितरिकावरील पिकांना संचलनाप्रमाणे पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे प्रस्तावित पाणीपाळी कालावधीत वाढ होते.

 

           जर लाभधारकांनी संचलन कार्यक्रमाप्रमाणे टेल टू हेड रात्रंदिवस शेजपाळीपध्दतीने पिकांना पाणी घेतले तर संभाव्य पाणीपाळीचा कालावधी कमी होवून पाण्याचा अधिकाधिक लाभ होईल. संपूर्ण प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात शेतक-यांनी कोठेही दारे स्वतः उघडून टेल टू हेड सिंचन प्रकारात अडथळा आणल्यास पाण्याचा नाश तर होतोच शिवाय पाणीपाळी कालावधी वाढतो. उर्ध्व वर्धा प्रकल्पांतर्गत असलेल्या लाभधारकांनी या बाबत योग्य ते सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

000000

 

 

 

‘राईट टू गिव्ह अप’ पुन्हा ‘रिव्हर्ट’ करण्यासाठी 30 जून पर्यंत मुदत

 

‘राईट टू गिव्ह अप पुन्हा ‘रिव्हर्ट करण्यासाठी 30 जून पर्यंत मुदत

            अमरावती, दि. 27 (जिमाक): महाडीबीटी  पोर्टलवर ‘राईट टू गिव्ह अप’ चा पर्याय चूकीने निवडल्याने शैक्षणिक शिष्यवृत्तीपासून मुकलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती रक्कम पुन्हा मिळणार आहे. यासाठी सामाजिक न्याय विभागाने ‘रिर्व्हट राईट टू गिव्ह अप ॲल्पीकेशन’ हा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. या पर्यायाचा वापर करुन संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्य लॉगीनमधून दि. 30 जून 2024 पर्यंत शिष्यवृत्ती पुन्हा रिर्व्हट करुन घ्यावी, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहायक संचालक माया केदार यांनी केले आहे.

 

               इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी प्रणालीवर भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, मॅट्रिकोत्तर शिक्षण फी परिक्षा फी प्रदाने, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमांशी संलग्न असलेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन, व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतीपूर्ती योजना अशा विविध योजना राबविण्यात येतात.

 

            महाडीबीटी या पोर्टलवर अर्ज करतेवेळी चुकून राईट टू गिव्ह अप ऑप्शन हे बटन दाबले गेले असल्याने त्या विद्यार्थ्यांना रिर्व्हट ऑप्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे. विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांकडून महाडीबीटी पोर्टलवर नजर चुकीने किंवा अनवधानाने राईट टू गिव्ह अप पर्याय निवडला गेला आहे, अशा विद्यार्थ्यांने त्यांच्या महाविद्यालयाशी संपर्क साधून महाविद्यालयाच्या प्राचार्य लॉगीन मधून रिर्व्हट राईट टू गिव्ह अप ॲल्पीकेशन या पर्यायाचा वापर करावा. विद्यार्थ्यांनी आपला अर्ज दि. 30 जूनपुर्वी रिर्व्हट बॅक करून रिर्व्हट बॅक झालेला अर्ज विहित मुदतीत विद्यार्थ्यांने त्यांच्या लॉगीन मधून ऑनलाईन फेरसादर करणे आवश्यक राहील.

00000

जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत 1 जुलैला त्रुटी पूर्तता शिबिर

 

जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत 1 जुलैला त्रुटी पूर्तता शिबिर

                 अमरावती, दि. 27 (जिमाका):  राजश्री शाहू महाराज जयंती पर्वनिमित्त जिल्ह्यातील इयत्ता अकरावी व बारावी विज्ञान शाखेतील सर्व  मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने ज्या विद्यार्थ्यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज सादर केल्यानंतर त्यांना त्रुटीचे मॅसेज प्राप्त झाले आहे. परंतु काही कारणास्तव त्रुटी पूर्तता करू शकले नाहीत, अशा सर्व विद्यार्थ्यांनी दि. 1 जुलै 2024 रोजी कार्यालयीन वेळेत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात आवश्यक त्या पुराव्यासह हजर राहावे, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त जया राऊत यांनी केले आहे.

00000

जिल्हा लोकशाही दिन येत्या सोमवारी

 जिल्हा लोकशाही दिन येत्या सोमवारी

             अमरावती, दि. 27 (जिमाका):  जिल्हा लोकशाही दिन महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. त्यानुसार जुलै महिन्यातील जिल्हा लोकशाही दिन सोमवार, दि. 1 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. तरी संबंधितांनी अहवालासह व्यक्तिश: उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी केले आहे.

00000

Wednesday, June 26, 2024

सामाजिक न्याय दिनानिमित्त विविध कार्यक्रम; समता दिंडीला प्रादेशिक उपायुक्त यांनी दाखवली हिरवी झेंडी

 











सामाजिक न्याय दिनानिमित्त विविध कार्यक्रम;

समता दिंडीला प्रादेशिक उपायुक्त यांनी दाखवली हिरवी झेंडी

 

         अमरावती, दि.26 (जिमाका):  राजर्षि शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त समाजकल्याण कार्यालयामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला. आज सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून काढण्यात आलेल्या समता दिंडीला प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केली.

 

            भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करुन समता दिंडी इर्विन चौकपासून रवाना केली. या दिंडीत प्रादेशिक विभाग व समाजकल्याण कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी व स्वयंसेवी संस्था सहभागी झाले होते. समता दिंडी इर्विन चौक-दुर्गावती चौक-मालटेकडी मार्गे सामाजिक न्याय भवन येथे दिंडीचा समारोप करण्यात आला. समता दिंडीमध्ये सामाजिक न्याय विभागाअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचे फलक दर्शविणारा रथ नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. तसेच 26  जुन हा आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य सेवन विरोधी दिन असल्याने समाजकल्याण कार्यालय व जिल्हा परिषद मार्फत व्यसनमुक्ती व अंमली पदार्थ सेवन विरोधी जनजागृती करण्यात आली.

 

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व लाभार्थ्यांना अनुदान वाटप

 

            डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे मुख्य कार्यक्रमात राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार शाळेतून प्रथम आलेल्या विद्यार्थांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विविध विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदान वाटप करण्यात आले.

 

           कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ.दिलीप काळे यांनी संबोधित करतांना राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांनी समाजाच्या दुर्बल घटकास मुख्य प्रवाहात आणण्याकरीता स्वत: कृतीतुन वेगवेगळया पद्धतीने कार्य करुन त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केली. त्याकाळी मुलींच्या शिक्षणावर भर देण्याकरीता वसतिगृहांची निर्मीती करून शिक्षणाचे महत्व पटवुन दिले व शिक्षणाकरीता सक्ती म्हणुन मुलांना शाळेत न पाठविणाऱ्या पालकांना दंड आकारला. यावरुन छत्रपती शाहु महाराज शिक्षणा प्रती किती सजग होते याची कल्पना येते. तसेच कार्यकर्ते समाज सुधारक असल्याचे स्पष्ट होते, असे त्यांनी नमुद केले.

 

            सहायक आयुक्त माया केदार यांनी सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच उपस्थित मान्यवरांनी समायोचित मार्गदर्शन केले. यावेळी समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे, सहायक आयुक्त माया केदार, समाजकल्याण अधिकारी राजेंद्र जाधवर, समाज भूषण पुरस्कार पंकज मेश्राम, सहाय्यक संचालक लेखा दिनेश मेटकर, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.शिवाजी तुपेकर, समाज कल्याण अधिकारी सरिता बोबडे आदी उपस्थित होते.

 

          कार्यक्रमाची सुरुवात राजर्षी छत्रपती शाहु महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतीबा फुले या महामानवांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दिप प्रज्वलित करुन झाली. कार्यक्रमास मोठ्या संख्येन सामाजिक न्याय भवनातील अधिकारी, कर्मचारी, सर्व महामंडळातील कर्मचारी तसेच बाहयस्त्रोत यंत्रणेतील कर्मचारी व विविध योजनांचे लाभार्थी व अभ्यासिकेतील विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय वानखडे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन श्रीकृष्ण पखाले तर आभार प्रदर्शन सरिता बोबडे यांनी केले.

00000

शिष्यवृत्ती पुन्हा रिव्हर्ट करण्यासाठी 30 जून पर्यंत मुदत

 

शिष्यवृत्ती पुन्हा रिव्हर्ट करण्यासाठी 30 जून पर्यंत मुदत

 

            अमरावती, दि. 26 (जिमाका): महाडीबीटी  पोर्टलवर ‘राई टू गिव्ह अप’ चा पर्याय निवडल्याने शैक्षणिक शिष्यवृत्तीपासून मुकलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती रक्कम पुन्हा मिळण्याची संधी मिळणार आहे. रिव्हर्ट करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यानुसार राई टू गिव्ह अप हा पर्याय चुकीने निवडलेल्या विद्यार्थ्यांनी 30 जून 2024 पर्यंत शिष्यवृत्ती पुन्हा रिव्हर्ट करुन घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे यांनी केले आहे.

 

            राज्य शासनाने शिष्यवृत्तीच्या लाभार्थी विद्यार्थ्यांना यावर्षी प्रथमच राइट टू गिव्हअपचा पर्याय उपलब्ध करून दिला होता. स्वच्छेने शिष्यवृत्तीची रक्कम अस्वीकार करण्यासाठी हा पर्याय दिला होता. केंद्र शासनाच्या गॅस सिलिंडरच्या अनुदानासंदर्भात अशा स्वरुपाची योजना यापूर्वी राबविण्यात आली आहे. या धर्तीवर शिष्यवृत्ती संदर्भात पर्याय उपलब्ध करून दिला होता. मात्र काही विद्यार्थ्यांनी चुकून या पर्यायाची निवड केली. त्यामुळे त्यांच्या शिष्यवृत्तीबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. यासंदर्भात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून तसेच राज्यभरातील लोकप्रतिनिधींकडून शासनास करण्यात आली होती. यासंदर्भात सामाजिक न्याय विभागाने दखल घेत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त करून घेण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे विद्यार्थीं वर्गाने या निर्णयाचे स्वागत केले आहे.

 

            राइट टू गिव्हअप पर्याय निवडून शिष्यवृत्तीच्या रद्द झालेल्या अर्जाच्या पुनर्स्थापनेची प्रक्रीया निर्धारित मुदतीत करण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अनावधानाने किंवा नजरचुकीने हा पर्याय निवडल्याने शिष्यवृत्तीचे अर्ज रद्यबातल झालेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचा अर्ज रिव्हर्ट बॅक करायचा आहे. यासाठी 30 जून पर्यंत मुदत दिली आहे. अशा विद्यार्थ्यांने महाविद्यालयाच्या प्राचार्याशी संपर्क साधून प्राचार्य लॉगइनमधून अर्ज रिव्हर्टबॅक करून घ्यायचा आहे. ही प्रक्रीया पुर्ण करण्याची संपूर्ण जबाबदारी विद्यार्थ्यांची असेल. रिव्हर्ट बॅक झालेला अर्ज याच मुदतीत विद्यार्थ्यांच्या लॉगिन मधून ऑनलाईन फेर सादर करणे आवश्यक राहील. यासंदर्भात काही अडचण उद्भवल्यास संबंधितांनी जिल्ह्याचे सहायक आयक्त समाजकल्याण विभाग यांच्याशी संपर्क साधावा.

                                                                       0000000

रहाटगाव औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश प्रक्रिया सुरु

 

रहाटगाव औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश प्रक्रिया सुरु

 

         अमरावती, दि. 26 (जिमाका):  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रहाटगाव येथे विविध व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज ऑनलाईन सादर करावा, असे आवाहन रहाटगाव औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य संजय महाजन यांनी केले आहे.

 

           दहावी, बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून परीक्षेत प्राप्त झालेल्या गुणांनुसार आणि पसंती क्रमानुसारच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश देणे सुरु आहे.  औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील अभ्यासक्रम हे सर्वात जास्त रोजगार आणि स्वयं रोजगाराच्या दृष्टीने संधी उपलब्ध करून देण्यास उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे आय टी आय मध्ये प्रवेश घेण्यासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आयटीआयमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारानी http://admission.dvet.gov.in  या संकेतस्थळावर अर्ज करावा. संकेतस्थळावर प्रवेशासंबंधी माहिती पुस्तिका उपलब्ध आहे. तसेच ऑनलाईन प्रवेश फॉर्म भरण्याची व मार्गदर्शनाची निशुल्क सुविधा रहाटगाव आयटीआय येथे करण्यात आली आहे.

 

              शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रहाटगाव येथे सन २०२४ -२५ सत्राकरिता इलेक्ट्रिशियन, फिटर, मोटर मेकॅनिक, कॉम्पुटर ऑपरेटर अँड प्रोग्रॅमिंग असिस्टंट, फॅशन डिझाईन अँड टेक्नॉलॉजी, फूड प्रोडक्शन जनरल व्यवसायाचा समावेश आहे. या सर्व व्यवसायासाठी शैक्षणिक अहर्ता दहावी उत्तीर्ण अशी आहे.

रहाटगाव संस्थेमध्ये प्रवेश सर्व उमेदवारासाठी खुले असून अनु. जाती व नवबौद्धाच्या मुलामुलीकरिता ८० टक्के व सामान्य प्रवर्गासाठी २० टक्के आरक्षणाची तरतूद आहे. प्रवेश झालेल्या उमेदवारांना वर्षभर कुशल प्रशिक्षण देणारे निर्देशक वर्ग, भव्य वर्कशॉप, अत्याधुनिक संगणक लॅब, प्रॅक्टिकलसाठी सुसज्ज लॅब, वाय फायसुविधा, वाचनालय, वसतिगृह व्यायामासाठी ओपन जिम आदीची व्यवस्था संस्थेत उपलब्ध आहे. या संस्थेत यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण करून उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी दरवर्षी विविध नामांकित कंपन्याकडून जॉब प्लेसमेंटची व्यवस्था करण्यात येते. या संस्थेतील अनेक माजी प्रशिक्षणार्थी विविध कंपन्यामध्ये कार्यरत आहेत. तर काही प्रशिक्षणार्थ्यांनी स्वतःचा उद्योग उभारून बेरोजगार हातांना रोजगार देण्याचे काम करित आहे.

          या संस्थेमध्ये प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी प्रवेशासाठी संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य संजय महाजन(८७६६९७६४७१) व गटनिदेशक एस.आर. सुखदेवे (७७०९८०९८५२) यांनी केले आहे.

00000

प्रवासी वाहतूक परवाना ऑटोरिक्षा चालकांना बंधनकार; 31 जुलै नोंदणी करा

 

प्रवासी वाहतूक परवाना ऑटोरिक्षा चालकांना बंधनकार; 31 जुलै नोंदणी करा

 

       अमरावती, दि. 26 (जिमाका): मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 66 अन्वये वैध परवाना असल्याखेरीज ऑटोरिक्षा प्रवाशी वाहनांना सार्वजनिक वाहनांना वापर करता येत नाही. ज्या ऑटोरिक्षा चालक, मालक यांनी अद्यापपर्यंत प्रवाशी वाहतुक परवाना प्राप्त करून घेतलेला नाही, अशा ऑटोरिक्षा चालकांनी दि. 31 जुलै, 2024 पर्यंत परवाना प्राप्त करून घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी केले आहे.

           

           ऑटोरिक्षा धारकाला ऑटोरिक्षा परवाना प्राप्त करूनच सार्वजनिक ठिकाणी प्रवाशी वाहतुक करणे अनिवार्य आहे. त्यासाठी महाराष्ट्र मोटार वाहन नियम, 1989 चे नियम 75 अन्वये परवाना शुल्क 10 हजार रूपये भरणा करणे आवश्यक आहे. ज्या ऑटोरिक्षा चालक, मालकांनी अद्यापपर्यंत प्रवाशी वाहतुक परवाना घेतला नसल्यास त्यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय, अमरावती येथे कार्यालयीन दिवशी विहित शुल्काचा भरणा करून प्रवाशी वाहतुक परवाना प्राप्त करून घ्यावा.

                                                             000000

शेतकरी बांधवांच्या शंका निरसनासाठी कृषी विभागाचा टोल फ्री क्रमांक जाहिर

 

शेतकरी बांधवांच्या शंका निरसनासाठी कृषी विभागाचा टोल फ्री क्रमांक जाहिर

         अमरावती, दि. 26 (जिमाका): कृषी विभागाकडून शेतकऱ्यांच्या शेतीशी निगडित शंका व प्रश्नांचे समर्पक निरसन व मार्गदर्शन करण्यासाठी टोल फ्री कक्ष सुरू केला आहे. टोल फ्री कक्षामध्ये संपर्कासाठी दुरध्वनी  टोल फ्री क्रमांक 1800 233 4000 व भ्रवणध्वनी टोल फ्री क्रमांक 9822446655 उपलब्ध करून दिला आहे.

 

          दुरध्वनी टोल फ्री क्रमांक संपूर्ण वर्षभर सुरू राहिल. खते बियाणे कीटकनाशके यांची खरीप रब्बी हंगामातील किंमत उपलब्धता गुणवत्ता बाबत शंका निरसन करता येईल. कृषी विभागाचे निगडित मृदा संधारण विस्तार सांख्यिकी प्रक्रिया व नियोजन, फलोत्पादन, निविष्ठा व गुणनियंत्रण, कृषी यंत्रीकिकरण इत्यादी संबंधित शंकांचे निरसन तसेच संबंधित जिल्ह्यांचे कृषी विभागाचे संपर्क क्रमांक कृषी विद्यापीठांचे संपर्क क्रमांक आवश्यकता असल्यास दिले जातात.

 

            भ्रमणध्वनी टोल फ्री क्रमांकावर केवळ संदेश पाठवण्यासाठी वापरता येईल. खरीप हंगाम व रब्बी हंगामात कृषी निविष्ठाची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी  व लिंकिंगबाबतच्या तक्रारी नोंदवताना शेतकऱ्यांनी आपले नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, अडचणी किंवा तक्रारीचा संक्षिप्त तपशील व्हाट्सअप वर पाठवणेसाठी उपलब्ध आहे.

 

            टोल फ्री क्रमांक कार्यालयीन कामाच्या दिवशी सकाळी 8:00 ते संध्याकाळी 8:00 वाजेपर्यंत सुरु राहील. शेतकरी बांधवांनी सदर टोल फ्री  क्रमांकावर संपर्क साधून व मार्गदर्शन घेवून आपल्या शंकांचे निरसन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

०००

 

 

 

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 



छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

          अमरावती, दि.26 (जिमाका) : छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, तहसिलदार विजय लोखंडे यांच्यासह उपस्थित अधिकारी -कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

000000

Tuesday, June 25, 2024

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश सुरु; 30 जूनपर्यंत अर्ज करा

 

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश सुरु; 30 जूनपर्यंत अर्ज करा

 

            अमरावती, दि. 25 (जिमाका): येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांने ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक संजय बोरकर यांनी केले आहे.

 

            शासकीय औ‌द्योगिक प्रशिक्षण संस्था, अमरावती येथे एक वर्ष व दोन वर्ष कालावधीच्या विविध 28 ट्रेडमध्ये एकूण 1152 जागा प्रवेशाकरिता उपलब्ध आहेत. यामध्ये एक वर्ष कालावधीचे कोपा, सेक्रेटरीअल प्रॅक्टिस, स्युइंग टेक्नॉलॉजी, स्टेनोग्राफर इंग्लिश, फाउंड्रीमन, मेसन (बिल्डिंग कन्स्ट्रक्शन), मेकॅनिक डिझेल मेकॅनिक ट्रॅक्टर, प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर, प्लंबर, वेल्डर आणि वूड वर्क टेक्निशियन यासह दोन वर्ष कालावधीचे आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन, ड्राफ्ट्समन मेकॅनिकल, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक फिटर आय.सी.टी.एस.एम. मशिनिष्ट, मशिनिष्ट ग्राइंडर, मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स, मेकॅनिक मोटर व्हेईकल, पेंटर जनरल रेफ्रिजरेशन अॅड एअर कंडिशनर टेक्निशियन, टूल अॅड डाय मेकर टर्नर, वायरमन इत्यादी व्यवसाय अभ्यासक्रम यावर्षी प्रवेशासाठी उपलब्ध आहेत.

 

           उमेदवारांनी प्रवेश अर्ज शुल्क भरल्यानंतर अर्जाची छापील प्रत, सर्व आवश्यक मूळ कागदपत्रे व झेरॉक्स प्रतीच्या संच्यासह नजीकच्या आयटीआयमध्ये प्रमाणपत्र पडताळणीसाठी हजर राहून प्रवेश अर्ज निश्चित करून घ्यावा. अर्ज निश्चितीची अंतिम तारीख 1 जुलै असून कन्फर्म केलेल्या अर्जाचाच सर्व प्रवेश फेऱ्यासाठी विचार करण्यात येईल. प्रवेश अर्ज कन्फर्म केल्यावर आपल्या खात्यात प्रवेश करून व्यवसाय निवड करण्यासाठी संस्थानिहाय विकल्प व प्राधान्याने सादर करता येईल.

 

            संस्थेत अतिशय नाममात्र प्रवेश शुल्क असून प्रवेशित सर्व प्रशिक्षणार्थ्यांना दरमहा पाचशे रुपये इतके वि‌द्यावेतन सु‌द्धा मिळते. प्रवेश प्रक्रियेचे कामकाज सर्व सु‌ट्टीचे दिवशी सु‌द्धा सुरु असून संस्थेमध्ये ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती करणे तथा ऑप्शन फॉर्म भरणे इत्यादी सर्व सुविधा निशुल्क उपलब्ध आहेत.

 

            आयटीआयचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सर्वच वि‌द्यार्थ्यांना विविध क्षेत्रात रोजगाराची संधी, औ‌द्योगिक क्षेत्रातील कंपन्यामध्ये नोकरीची संधी उपलब्ध होते. त्याचबरोबर स्वतःचा व्यवसाय सुद्धा सुरु करता येऊ शकतो. तरी जास्तीत जास्त इच्छुक उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा व अधिक माहिती करिता शासकीय औ‌द्योगिक प्रशिक्षण संस्था, इर्विन चौक, मोर्शी रोड, अमरावती येथे संपर्क साधावा.

00000

सामाजिक न्याय दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

 

सामाजिक न्याय दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

 

        अमरावती, दि.25 (जिमाका): राजर्षि शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त बुधवार, दि. 26 जून रोजी सामाजिक न्याय विभागातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

          सामाजिक न्याय दिनानिमित्त यावर्षीही समाजकल्याण कार्यालयामार्फत सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात येणार आहे. यात दि. 26 जून रोजी सकाळी 8.30 वाजता समता दिंडीचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, इर्विन चौकपासून होणार आहे. या दिंडीत समाज कल्याण कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी व लोकप्रतिनिधी सहभागी होणार आहे. तसेच  मुख्य कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चांदुर रेल्वे रोड, अमरावती येथे आयोजित करण्यात आला आहे.  

 

           समता दिंडीचा मार्ग याप्रमाणे : डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरतळा इर्विन चौक-दुर्गावती चौक-मालटेकडी चौकमार्ग सामाजिक न्याय भवन येथे सांगता होणार आहे. त्यानंतर सकाळी 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे मुख्य कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, पुरस्कार, वितरण तसेच विविध विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदान वाटप करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाला नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

 

00000

उर्ध्व वर्धा जलाशयानजिकची जमीन भाडेपट्टीवर देणार; इच्छुकांना अर्ज करण्याचे आवाहन

 

उर्ध्व वर्धा जलाशयानजिकची जमीन भाडेपट्टीवर देणार;

इच्छुकांना अर्ज करण्याचे आवाहन

 

           अमरावती, दि.25 (जिमाका): उर्ध्व वर्धा जलाशयाच्या बुडित क्षेत्राच्या काठाभोवतीची 342.50मी. ते 343.00 मी. तलांकातील अमरावती जिल्ह्यातील 298.22 हे. व वर्धा जिल्ह्यातील 30.60 हे. जमीन उन्हाळी हंगामासाठी उपलब्ध होऊ शकते. ती कसण्यासाठी भाडेपट्ट्यावर देण्यात येणार असून, इच्छूकांनी 31 जुलैपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे.

 

         प्राधान्यक्रम असा आहे : अग्रकमाने गाळपेर जमीन भाडेपट्टीवर देण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. ज्या व्यक्तीची जमिन नविन जलाशय, उत्प्लव बांध, धरण बांधण्यासाठी संपादित केलेली आहे किंवा कोणत्याही शासकीय प्रकल्पामुळे अथवा कोणत्याही स्थानिक प्राधिकरणाच्या प्रकल्पामुळे ज्यांना बाधा पोहोचलेली आहे अशा व्यक्ती, स्थानिक भूमिहीन, मागासवर्गीयांच्या सहकारी संस्था, बहुसंख्य मागासवर्गीय सदस्य आहेत अशा मागासवर्गीय आणि मागास वर्गीयेतर स्थानिक भूमिहीन व्यक्तीच्या सहकारी संस्था, स्थानिक भुमिहीन व्यक्तीच्या सहकारी संस्था, स्थानिक भूमिहीन मागासवर्गीय लोक,  इतर वर्गातील स्थानिक भूमिहीन लोक, जेथे गाळपेर जमिनी आहेत त्या गावाच्या बाहेरील भूमिहीन लोक, त्याव्यतिरिक्त इतर स्थानिक भूमिधारक.

 

            अर्ज येथे करावा : उपलब्ध होणा-या गाळपेर जमिनीचा तपशील, मूळ मालकनिहाय यादी व 100 रू.च्या स्टॅम्पपेपरवर करावयाचा करारनामा व अर्जाचे प्रारूप मोर्शी येथील उर्ध्व वर्धा पाटबंधारे उपविभाग क्र. 1 येथे उपविभागीय अभियंता कार्यालयात उपलब्ध आहे. हे प्रारूप मिळवून त्यानुसार अर्ज व करारनामा त्याच कार्यालयात दि. 31 जुलैपर्यंत द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

            पात्र अर्जदार असलेल्या प्रत्येक कुटुंबाला जास्तीत जास्त 1.20 हेक्टर जमिन भाडेपट्टीवर देण्यात येईल. तथापि, कुटूंबप्रमुख सहकारी संस्थेचा सदस्य असल्यास त्याला मुंबई कुळवहिवाट अधिनियम 1948 नुसार जास्तीत जास्त 1.6 हे. इतकी जमीन मिळू शकेल. एका वर्षात दोन पिके घेतली गेल्यास प्रति 11 महिन्यासाठी प्रतिहेक्टरी दोन हजार रू. व एका वर्षात एकच पिक घेतले गेल्यास प्रति हेक्टरी एक हजार रूपये भरणे अनिवार्य राहील, असेही नमूद करण्यात आले आहे.

                                                      00000

कृषि निविष्ठा सनियंत्रणासाठी जिल्हा व तालुकास्तरीय भरारी पथक व नियंत्रण कक्षाची स्थापना; तक्रारी नोंदविण्याचे आवाहन

 

कृषि निविष्ठा सनियंत्रणासाठी जिल्हा व तालुकास्तरीय भरारी पथक व नियंत्रण कक्षाची स्थापना;

तक्रारी नोंदविण्याचे आवाहन

            अमरावती, दि. 25 (जिमाका): खरीप हंगामाची सुरुवात झाली आहे. हंगामामध्ये शेतकऱ्यांना गुणवत्ता पुर्ण कृषी निविष्ठा, बियाणे, खते व किटकनाशके योग्य दराने उपलब्ध व्हावी तसेच कृषी निविष्ठेच्या गुणवत्तेबाबतच्या तक्रारी, जादा दराने किंवा मुदत बाह्य कृषी निविष्ठांची विक्री,  साठेबाजी व अनाधिकृत कृषी निविष्ठांची विक्री करणे, अशा प्रकारच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर भरारी पथक व नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राहुल सातपुते यांनी दिली.

 

           जिल्हास्तरावर जिल्हा कृषि कार्यालय, अमरावती येथे नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली असून संपर्क अधिकारी म्हणून जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सागर डोंगरे (7588501893) व प्रविण खर्चे (9423185282) यांची नेमणूक करण्यात आली आहे.

 

            तालुकास्तरावर अमरावती तालुक्यासाठी तालुका कृषी अधिकारी रोहिणी उगले (8308047778), कृषी अधिकारी उध्दव भायेकर(8275283001), भातकुलीसाठी तालुका कृषी अधिकारी प्रमोद खर्चान (9404689720), कृषी अधिकारी अश्विनी चव्हाण(7774884148), नांदगाव खंडेश्वरसाठी तालुका कृषी अधिकारी रोशन इंदोरे(7875421450), कृषी अधिकारी लक्ष्मण खांडरे (8275229532), चांदुर रेल्वेसाठी तालुका कृषी अधिकारी राजेंद्र बाबल (8975961695), कृषी अधिकारी श्री. राणे (9421366613), धामणगाव रेल्वे तालुक्यासाठी तालुका कृषी अधिकारी प्रशांत गुल्हाणे(8275293459), कृषी अधिकारी राजु सावळे (8379909305), अचलपूर तालुक्यासाठी तालुका कृषी अधिकारी किरण मुळे (9545186677), कृषी अधिकारी रवि उइके (9404075276), अंजनगाव सुर्जी तालुक्यासाठी तालुका कृषी अधिकारी राजाभाऊ तराळ(9404689715), कृषी अधिकारी अश्विन राठोड (9422016056), दर्यापूर तालुक्यासाठी तालुका कृषी अधिकारी राजकुमार अडगोकर(9850175401), कृषी अधिकारी सुरेश रामागडे (9096238655), चिखलदरा तालुक्यासाठी तालुका कृषी अधिकारी लहुजी आडे(8275068639), कृषी अधिकारी शालीनीताई वानखडे (9049555011), धारणी तालुक्यासाठी तालुका कृषी अधिकारी सुधीर ईशी (9422260200), कृषी अधिकारी धैर्यशिल पाटील (8275935084), मोर्शी तालुक्यासाठी तालुका कृषी अधिकारी माधुरी निंबाळकर (8668718238), कृषी अधिकारी राहुल चौधरी (9421827693), वरूड तालुक्यासाठी तालुका कृषी अधिकारी अतुल आगरकर(9766547133), कृषी अधिकारी पवन ढोमणे (9595903320), तिवसा तालुक्यासाठी तालुका कृषी अधिकारी निलेश राठोड (9421160188), कृषी अधिकारी पी एन खोबरखेडे (9763737259), चांदुर बाजार तालुक्यासाठी तालुका कृषी अधिकारी फाल्गुनी ननीर(7558508883), कृषी अधिकारी गजानन राऊत (8055834230) यांची निरिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

 

         जिल्हास्तरावर तक्रार नियंत्रण कक्षाकरीता व्हॉट्सॲप क्रमांक 9834579012 असुन कृषि विभाग टोल फ्री क्रमांक 1800 233 4000 आहे.  निविष्ठाबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी भ्रमणध्वनी क्रमांकावर एसएमएस, व्हॉट्सॲपचे माध्यमातुन नोंदविण्यात यावे, असे आवाहन कृषि विभागाकडून करण्यात आले आहे.

                                                          00000

अनोळखी मृत महिलाची ओळख पटविण्याबाबत आवाहन

 

अनोळखी मृत महिलाची ओळख पटविण्याबाबत आवाहन

             अमरावती, दि. 25 (जिमाका): पोलिस ठाणे सिटी कोतवाली अमरावती (शहर) अंतर्गत एका अनोळखी महिलाचा मृतदेह इर्विन दवाखान्याच्या परिसरात सापडला आहे. मृतकाचे अंदाजे वय 50 वर्षे असून मृतकाचा रंग सावळा, उंची 5 फुट 4 इंच, केस काळे पांढरे लांब, डोळे बंद तोंड उघडे दात दिसत आहेत. तसेच अंगात हिरव्या, लाल, पांढऱ्या  साडी, ओळणी घातलेली होती.

 

           मृतकाच्या नातेवाईकाचा शोध लागावा व अनोळखी महिलाची  ओळख पटविण्यास पोलीस नियंत्रण कक्ष, अमरावती शहर दुरध्वनी क्रमांक- 0721-2672001 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन सिटी कोतवाली, अमरावती यांनी केले आहे.

00000

DIO NEWS AMRAVATI 12.11.2024

  दर्यापूर विधानसभा क्षेत्राची दुसरी खर्च तपासणी *सर्व उमेदवारांनी सादर केला खर्च अमरावती, दि. 12 (जिमाका) : दर्यापूर विधानसभा मतदारसंघा...