Wednesday, July 31, 2024

जागतिक व्याघ्र दिन; मेळघाट व्याघ्र प्रकल्पात उत्साहात साजरा

 





जागतिक व्याघ्र दिन; मेळघाट व्याघ्र प्रकल्पात उत्साहात साजरा

 

          अमरावती, दि. 31 (जिमाका): मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील सेमाडोह पर्यटन संकुल येथे दि. 29 जुलै रोजी जागतिक व्याघ्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आमदार राजकुमार पटेल, मुख्य संरक्षक (प्रादेशिक) जयोती बॅनर्जी, सिपना वन्यजीव विभाग परतवाडाचे उपवनसंरक्षक दिव्यभारती,  अकोट वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक जय कुमारन, मेळघाट प्रादेशिक परतवाडा उपवनसंरक्षक अग्रिम सैनी, विभागीय वन अधिकारी(संसोधन व वन्यजीव मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे मनोजकुमार खैरनार, विभागीय वन अधिकारी यशवंत बहाळे आदि उपस्थित होते.

 

          जागतिक व्याघ्र दिनानिमित्य मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वने वन्यजीवाचे संरक्षण, अधिवास विकास व निसर्ग पर्यटनात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. डॉ. जयंत वडकर यांनी भारतातील व्याघ्र संवर्धनाबाबत तसेच डॉ. सावन देशमुख यांनी मानव व  वन्यजीव संघर्ष या विषयावर सादरीकरानाद्वारे उपाययोजना आणि मार्गदर्शन केले. मेळघाट स्कील सेंटर, परतवाडा येथील विद्यार्थ्यांनी गदली  या आदिवासी नृत्याद्वारे मान्यवरांचे स्वागत केले.

 

        मेळघाट व्याघ्र प्रकल्पास वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक डॉ. सावन देशमुख व डॉ. जयंत वडतकर तसेच वेक्स संस्थेचे डॉ. गजानन वाघ, अरंन्यम संस्थेचे सर्वेश मराठे, ऑर्गनायझेशन फॉर कुलाचे राकेश महल्ले व एसएफटीएफ संस्थेचे अल्केश ठाकरे यांचा देखील सन्मान करण्यात आला.

 

            मेळघाट व्याघ्र प्रकल्प कार्यालय व व्याघ्र प्रकल्पातील सर्व वन परीक्षेत्रात व्याघ्र दिनाच्या निमित्याने शालेय विद्यार्थ्यांकरिता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच जिल्हा परिषद शासकीय कन्या शाळा ऑचिड इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना वने व वन्यजीव संरक्षण तसेच वाघांचे महत्व यावर संगणकीय सादरीकरनाद्वारे माहिती देण्यात आली. कार्यक्रम यशस्वीपणे वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश तापस, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप भड, संकुल प्रभारी सेमाडोह संकूल प्रदीप तडखणकर, वनरक्षक वनिता खवास,  वनरक्षक, आकाश सारडा, वनरक्षक, अशोक सोनोने, वनरक्षक कु. रेखा कोकरे, मनीष ढाकुलकर, उपजीविका तज्ज्ञ ज्ञानदीप तराळे, पर्यटन व्यवस्थापक स्वप्नील बांगडे, सामाजिक समन्वयक अतुल तिखे व अगस्ता संस्थेचे दीपक देशमुख यांनी विशेष प्रयत्न केले.

00000

 

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा; प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये 206 उमेदवारांची विविध पदांवर प्राथमिक निवड

 

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा; प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये 206 उमेदवारांची विविध पदांवर प्राथमिक निवड

 

         अमरावती, दि.31 (जिमाका): जिल्हा कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मॉडेल करिअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने नुकतेच शासकिय औद्योगीक प्रशिक्षण संस्था, चिखलदरा येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा संपत्र झाला.या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये 206 उमेदवारांची विविध पदांवर प्राथमिक निवड करण्यात आली असून या रोजगार मेळाव्यामध्ये नोकरी इच्छुक उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

           

            ऑनलाइन, ऑफलाईन प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये 436 उमेदवारांनी सहभाग घेतला. त्यापैकी 370 उमेदवारांनी प्रत्यक्ष येऊन मुलाखती देऊन 206 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. कार्यक्रम प्रसंगी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे अभिषेक ठाकरे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थचे प्राचार्य श्री. काळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

 

            या मेळाव्यामध्ये श्रीधर स्पीनर प्रा.लि अमरावती, जाधव गिअर्स लि. अमरावती, पिपल ट्री व्हेंचर्स प्रा.लि. अमरावती, रेडीयंट सुपरस्पेशालीटी हॉस्पीटल, अमरावती, धुत ट्रान्समिशन छ. संभाजीनगर, सावन हेल्थ सेंटर अमरावती, श्रॉफ इंडस्ट्रीज, अमरावती या खाजगी आस्थापनेचे प्रतिनिधीनी उपस्थित राहून उमेदवाराच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या.

 

         पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे मान्यवरांच्या हस्ते दिप प्रचलन करुन उद्घाटन करण्यात आले. यावेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्थचे श्री मारशेटवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर कार्यक्रमाचे संचालन श्री. देशमुख यानी केले. आभार प्रदर्शन श्री. कोल्हे यानी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अमरावती व शासकिय औद्योगीक प्रशिक्षण संस्था चिखलदरा येथील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

00000

स्वातंत्र्य दिनाचा मुख्य ध्वजारोहण सोहळा; पूर्वतयारीचा आढावा कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समन्वयाने काम करावे- निवासी जिल्हाधिकारी

 




स्वातंत्र्य दिनाचा मुख्य ध्वजारोहण सोहळा; पूर्वतयारीचा आढावा

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समन्वयाने काम करावे- निवासी जिल्हाधिकारी

 

           अमरावती, दि. 31 (जिमाका): भारतीय स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय समारंभ दि. 15 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9.05 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय येथे होणार आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश निवासी जिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी आज येथे दिले.

 

            भारतीय स्वातंत्र्याचा वर्धापन दिनाचा मुख्य ध्वजारोहण सोहळाच्या पूर्वतयारी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त माया केदार, जिल्हा क्रीडा अधिकार गणेश जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे तुषार काळे, मनपाचे डॉ. अजय जाधव, पोलीस निरिक्षक प्रविण बांगडे, श्रीधर गुलमुंढरे, भुषण पुसतकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

          श्री. भटकर म्हणाले की, नागरिकांना मुख्य शासकीय समारंभात सहभागी होता यावे यासाठी       दि. 15 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 8.35 ते 9.35 यावेळेत इतर कार्यालय, संस्थांनी ध्वजारोहण किंवा शासकीय अथवा निमशासकीय समारंभ आयोजित करु नये.  असे समारंभ सकाळी 8.35 च्या पूर्वी किंवा सकाळी 9.35 च्या नंतर आयोजित करावे. कार्यक्रमात राष्ट्रगीतानंतर ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे राष्ट्रगीत बँड पथकाव्दारे सादर करण्यात येईल.

 

         महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी संयुक्तपणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोरील साफसफाई आपल्या विभागामार्फत करावी. तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, लि. अमरावती यांनी कार्यक्रमस्थळी वीज पुरवठा खंडीत होणार नाही, याची दक्षता घ्यावी. कार्यक्रमाच्यावेळी ध्वजाला मानवंदना देण्यासाठी पोलीस पथक, बँड पथक तसेच ध्वजारोहणाची रंगीत तालीम घ्यावी. राष्ट्रध्वज सूर्यास्तास उतरवला जाईल, याची दक्षता समितीने घ्यावी. तसेच कार्यक्रमस्थळी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलीस विभागाने व्यवस्था करावी.

 

            स्वातंत्र्यदिनाचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपल्यानंतर सर्व विभागीय कार्यालय, शिक्षण संस्था, महाविद्यालय, शाळा तसेच सेवाभावी संस्था, क्रीडा मंडळ यांनी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम करावा. त्यासाठी लागणारी रोपे सामाजिक वनीकरण विभाग, अमरावती यांनी पुरवावी. तसेच अतिथी व उपस्थितांची बैठक व्यवस्था, आवश्यक स्वयंसेवक, ध्वनीयंत्रणा आदी व्यवस्था काटेकोर असावी, अशा सूचना श्री. भटकर यांनी यावेळी दिल्या.

00000

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार महामंडळ योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

 

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार महामंडळ योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

 

            अमरावती, दि. 31 (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत कार्यरत असलेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत चर्मकार समाजासाठी विविध योजना राबविण्यात येतात. चर्मकार समाजाचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी महामंडळाव्दारे सन 2024-25 या वर्षासाठी अनुदान व बीजभांडवल योजना तर केंद्र शासनामार्फत एनएसएफडीसी योजना राबविण्यात येते. या योजनचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक डि.व्ही. भागवतकर यांनी केले आहे.

 

 50 टक्के अनुदान योजना : या योजनेमध्ये राष्ट्रीयकृत बँकेमार्फत 50 हजार रूपयेपर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येतो. त्यामध्ये बँकेचे सहभाग 40 हजार रूपये व महामंडळाचे अनुदान 10 हजार रूपये असे मिळून 50 हजार रूपये कर्ज दिले जाते.

बीज भांडवल योजना : या योजनमध्ये राष्ट्रीयकृत बँकेमार्फत 5 लाख रूपयेपर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येतो. त्यामध्ये बँकेचे कर्ज 75 टक्के, लाभार्थी सहभाग 5 टक्के व महामंडळाचे अनुदान 10 हजार रूपये असे मिळून 5 लाख कर्ज दिले जाते.

केंद्र शासनाच्या योजना : मुदती कर्ज योजना, लघुऋण वित्त योजना, महीला समृध्दी योजना, महिला अधिकारीता योजनेमध्ये महामंडळाचे अनुदान 50 हजार रूपये आहे. तसेच शैक्षणिक कर्ज योजनेमध्ये अनुदान उपलब्ध नाही.

00000

 

तिवसा तालुक्यातील सार्सी ग्रामपंचायतीत गायरान जमिनीवर चारा लागवड; शेतकऱ्यांनी पशुपालन व्यवसायाचा अबलंब करावा- मिशनचे अध्यक्ष अॅड.निलेश हेलांडे पाटील

 

तिवसा तालुक्यातील सार्सी ग्रामपंचायतीत गायरान जमिनीवर चारा लागवड;

शेतकऱ्यांनी पशुपालन व्यवसायाचा अबलंब करावा-

मिशनचे अध्यक्ष अॅड.निलेश हेलांडे पाटील

 

 अमरावती, दि. 31 (जिमाका): नैसर्गीक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक ताण निर्माण होतो. हा आर्थिक ताण दुर करण्यासाठी शेतकऱ्यांनी पशुपालन व्यवसायाचा अवलंब करावा. यासाठी शासनाने गायरान किंवा वैयक्तीक जमिनीवर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत चारा पिकांची लागवड करण्यासाठी शासनाने निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने तिवसा तालुक्यातील सार्सी ग्रामपंचायतीमध्ये गायरान जमिनीवर चारा लागवड करण्याचे काम हाती घेण्यात आले. या कार्यक्रमाचे उ‌द्घाटन शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष अॅड.निलेश हेलाँडे पाटील (राज्यमंत्री दर्जा) यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

 

नैसर्गीक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणीला सामोर जावे लागतात. पिकांच्या नुकसानीमुळे आर्थिक नुकसान होऊन तो हतबल होतात. याचा परिणाम आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलताना दिसून येतात. यासाठी शेतकऱ्यांनी उत्पन्नाचे इतर माध्यम शोधणे आवश्यक आहे.  पशुपालन हा शेतकऱ्यांसाठी अंत्यत महत्वाचा पर्याय असून त्याच्याकडे उत्पन्नाचे साधन निर्माण होऊन पशुधन असलेल्या शेतकऱ्यांसाठी  मोफत चारा उपलब्ध होईल. यामुळे जीवन जगण्याचा मार्ग सुखकर होऊन पर्यायाने शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलणार नाही.

 

अमरावती जिल्ह्या 40 टक्के पशुसाठी लागणाऱ्या चाऱ्याची टंचाई आहे. चारा टंचाईवर उपाययोजना म्हणून गायरान/वैयक्तीक जमिनीवर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत चारा पिकांची लागवड करण्याबाबत शासन निर्णय नियोजन विभाग (रोहयो प्रभाग) यांचा दि.7 जून 2024 रोजी निर्गमित केला आहे. या योजनेचा जिल्ह्यात प्रथमच तिवसा तालुक्यातील सार्सी ग्रामपंचायतीने गायरान जमिनीवर चारा लागवड करण्याचे काम हाती घेण्यात आले. गावापासून एक किलोमिटर अंतरावर जंगलाच्या आतमध्ये असणाऱ्या ई-क्लास जमिनीवर घेण्यात आले.

 

या कार्यक्रमाला पशुसंवर्धन उपायुक्त संजय कावरे,  जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी पुरुषोत्तम सोळंके,  उपजिल्हाधिकारी(रोहयो) ज्ञानेश्वर घ्यार, तिवसा गटविकास अधिकारी, अभिषेक कासोदे, जनसंपर्क अधिकारी(मिशन) महेन्द्र गायकवाड, संत गाडगे बाबा अमरावती वि‌द्यापीठचे अध्यासन प्रमुख डॉ. दिलीप काळे तसेच ग्रामपंचायत सार्सीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, तहसिलदार, तलाठी व गावातील ग्रामस्थ या उ‌द्घाटन कार्यक्रमाला उपस्थित होते.

0000

 

 

Tuesday, July 30, 2024

गुरुवारपासून जिल्ह्यात महसूल सप्ताह; नागरिकांनी लाभ घ्यावा

 

गुरुवारपासून जिल्ह्यात महसूल सप्ताह; नागरिकांनी लाभ घ्यावा

 

           अमरावती, दि. 30 (जिमाका): 1 ऑगस्ट या महसूल दिनापासून 7 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात महसूल सप्ताहा राबविण्यात येणार आहे. या सप्ताहामध्ये शासनाच्या विविध योजनाचा लाभ पात्र लाभार्थ्यांना दिल्या जाणार असून नागरिकांनी सप्ताहाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.

 

           गुरुवार दि. 1 ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताह शुभारंभ व  'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना", शुक्रवार दि. 2 ऑगस्ट रोजी "मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना", शनिवार दि. 3 ऑगस्ट रोजी "मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना", रविवार दि. 4 ऑगस्ट रोजी "स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय", सोमवार दि. 5 ऑगस्ट रोजी "सैनिक हो तुमच्यासाठी", मंगळवार दि. 6 ऑगस्ट रोजी "एक हात मदतीचा दिव्यांगांच्या कल्याणाचा" आणि बुधवार दि. 7 ऑगस्ट रोजी महसूल संवर्गातील कार्यरत, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी संवाद उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी पुरस्कार वितरण व महसूल सप्ताह सांगता समारंभ होईल.

 

          महसूल विभागाने जिल्हास्तरीय महसुली कामे वेळच्यावेळी पूर्ण करून त्यानुसार अभिलेख अद्यावत करणे, वसुलीच्या नोटीसेस पाठविणे, मोजणी करणे, अपिल प्रकरणाची चौकशी करणे इ. कामे वेळच्यावेळी व वेळापत्रकानुसार करणा-या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आणि महसुली वसुलीचे उदिद्ष्ट पार करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्याकरिता आणि महसूल विभागाने केलेल्या कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठेवण्याकरिता दि. 1 ऑगस्ट हा दिवस "महसूल दिन" म्हणून राज्यभर साजरा करण्यात येतो.

 

       यावर्षी महसूल दिनापासून म्हणजेच दिनांक 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत राज्यभरात 'महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. महसूल सप्ताहानिमित्त राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तहसिलदार विजय लोखंडे यांनी केले आहे.

00000

 

 

जवाहर नवोदय विद्यालय; इयत्ता सहावीत प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू

 

जवाहर नवोदय विद्यालय; इयत्ता सहावीत प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू

 

          अमरावती, दि. 30 (जिमाका):  जवाहर नवोदय विद्यालय अमरावती येथे शैक्षणिक सत्र 2025-26 करिता इयत्ता सहावीत प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. प्रवेश घेण्याकरीता इच्छुक विद्यार्थ्यांनी दि. 16 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करावा, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य यांनी केले आहे.

           

            नवोदय विद्यालय समितीचे अर्ज करण्याची प्रक्रिया दि. 16 जुलैपासून सुरु झालेली आहे. इच्छुक विद्यार्थी नवोदय विद्यालय समिति किंवा जवाहर नवोदय विद्यालय अमरावती च्या संकेतस्थळावर www.navodaya.gov.in  किंवा https://www.navodaya.gov.in/nvs/nvs-school/AMRAVATI/en/home/  निशुल्क अर्ज भरू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख  16 सप्टेंबर 2024 पर्यंत आहे. प्रवेश परीक्षा शनिवार दि. 18 जानेवारी 2025 रोजी करण्याचे निर्धारित आहे. प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांने जिल्ह्यातील रहिवासी व मान्यता प्राप्त  शाळेतून सत्र 2024-25 मध्ये वर्ग पाचवीत अध्यन करणारा असावा. अर्ज करतांना विद्यार्थ्यांना स्वत:चा आधार कार्ड क्रमांकाने अर्ज करावा.  जर विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड नसेल तर त्याने सक्षम अधिकाऱ्याकडून रहिवासाचा दाखला मिळवून अर्ज करता येईल. परंतु प्रवेश घेतांनी मात्र याच जिल्ह्यातील पत्ता असलेला आधारकार्ड किंवा  अमरावती जिल्ह्याती रहिवासी असल्याचा पुरावा आवश्यक असेल. विद्यार्थ्यांच जन्म 1 मे 2013 ते  31 जुलै 2015 (सुरुवात व अंतिम दोन्ही दिवस समाविष्ट दरम्यान असावा), जन्म तिथी आरक्षित आणि अनारक्षित प्रवर्गातील विद्यार्थीं करिता सारखीच आहे. अधिक माहिती करिता विद्यार्थ्यांने www.navodaya.gov.in किंवा https://www.navodaya.gov.in/nvs/nvs-school/AMRAVATI/en/home/ संकेतस्थळावर भेट द्यावी. किंवा प्राचार्य जवाहर नवोदय विद्यालय अमरावती यांचेसी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

 

 

महाडीबीटी प्रणालीवर शिष्यवृत्तीचे अर्ज करण्यास मुदतवाढ

 

महाडीबीटी प्रणालीवर शिष्यवृत्तीचे अर्ज करण्यास मुदतवाढ

 

            अमरावती दि. 30 (जिमाका) :  सामाजिक न्याय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या महाडीबीटी प्रणालीद्वारे  विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास दि. 31 मार्च 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे समाजकल्याण सहायक आयुक्त माया केदार यांनी कळविले आहे.

 

            सामाजिक न्याय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्यामार्फत महाडीबीटी प्रणालीवर अनुसूचित जाती, विजाभज, इमाव, विमाप्र प्रवर्गांसाठी  भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती,  शिक्षण फी  परीक्षा फी योजना, राजर्षि छत्रपती शाहू महाराज  गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रम संलग्न्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाहभत्ता व व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतीपूर्ती योजना या योजना राबविण्यात येतात.

 

            माहिती व तंत्रज्ञान विभागमार्फत सन 2024-25 वर्षातील महाडीबीटी पोर्टलवर नुतनीकरणाचे अर्ज व नवीन अर्ज भरण्यासाठी   तसेच सन 2023-24 साठी रि-अप्लाय करण्यासाठी   दि. 31 मार्च  2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ऑनलाईन नुतनीकरणाचे अर्ज विहित मुदतीत भरण्यासाठी   https://mahadbtmahait.gov.in   महाडीबीटीच्या या संकेतस्थळावर ऑनलाईन नुतनीकरणाचे अर्ज तसेच विद्यार्थ्यांच्या  लॉगिनमधील त्रुटी पुर्ततेसाठी सेंड बँक केलेल्या अर्जाची संबंधित महाविद्यालयानी त्वरीत त्रुटिपूर्तता  करुन जिल्हा लॉगीन वर पाठविण्यात यावे. विहित वेळेत अर्ज भरुन घेण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची राहील.

 

              महाडीबीटी संकेतस्थळावर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना तसेच महाविद्यालयांना नुतनीकरणाचे अर्ज भरुन रि-अप्लाय करण्यासाठी आणि सेंड बॅक केलेल्या अर्जाची त्रुटी पूर्तता करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाव्दारे करण्यात आले आहे.

                                                             00000

 

 

 

सामान्य रुग्णालयाच्यावतीने जागतिक हिपॅटायटीस दिन साजरा; हिपॅटायटीस रोगाविषयी व्यापक जनजागृती करावी - जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे

 











सामान्य रुग्णालयाच्यावतीने जागतिक हिपॅटायटीस दिन साजरा;

हिपॅटायटीस रोगाविषयी व्यापक जनजागृती करावी

- जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे

 

            अमरावती, दि. 30 (जिमाका):  हिपॅटायटिस संसर्गजन्य रोगाच्या प्रभावाबाबत नागरिकांना शिक्षित करण्यासाठी जागतिक हिपॅटायटीस दिन साजरा केला जातो. हिपॅटायटीस हा रोग विषाणूजन्य संसर्ग असून तो संक्रमित व्यक्तीकडून निरोगी व्यक्तीमध्ये वेगाने पसरतो. या रोगाचा वेळीच निदान केल्यास केल्यास रोगावर नियंत्रण मिळविणे शक्य आहे. त्यामुळे या रोगाची सर्वसामान्य नागरिकांमध्ये माहिती पोहोचविण्यासाठी व्यापक जनजागृती करावी, असे आवाहन  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांनी केले.

 

      जागतिक हिपॅटायटीस दिनाचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रीती मोरे, निवासी वैद्यकीय अधिकारी बाह्यसंपर्क डॉ. संदीप हेडाऊ, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे  नोडल अधिकारी  डॉ. संदेश यमलवाड, विषय तज्ज्ञ डॉ. पंकज इंगळे, डॉ. स्वप्नली चव्हाण, डॉ. निशा पवार तसेच डॉक्टर्स, स्टाफ नर्स, कर्मचारी व अधिकारी आदी उपस्थित होते.

 

        जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये हिपॅटायटीस या आजारावर सर्व प्रकारच्या तपासण्या, उपचार व लसीकरण केले जातात. या संसर्गजन्य आजाराविषयी नागरिकामध्ये संभ्रम असून आजाराबाबत भिती बाळगता. त्यामुळे योग उपचार न मिळाल्यामुळे संसर्ग आयुष्यभर टिकून राहतो आणि ते प्राणघातक देखील होवू शकतो.  या विषाणूचे लवकर निदान झाल्यास या आजारावर नियंत्रण मिळविणे शक्य आहे. त्यामुळे कोणतेही भिती न बाळगता वेळोवेळी तपासण्या व योग्य उपचार करावा, असे आवाहन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रिती मोरे यांनी केले.

 

            डॉ. पंकज इंगळे, डॉ. स्वप्नली चव्हाण व डॉ. निशा पवार या विषय तज्ज्ञांनी उपस्थितांना हिपॅटायटीस आजाराबाबत मार्गदर्शन करुन त्याचे प्रकार व आजार होण्याची कारणे, करावयाचे उपाययोजना, घ्यावयाची काळजी आदीबाबत माहिती दिली. तसेच सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी हिपॅटायटीसची लस घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे संचालन उद्धव जुकरे यांनी तर आभार प्रदर्शन नोडल अधिकारी  डॉ. संदेश यमलवाड यांनी केले.

 

हिपॅटायटिस संसर्गजन्य विषाणू :  हिपॅटायटीस हा यकृताचा एक संसर्गजन्य रोग आहे.  यकृत अवयवाचा दाह होणे किंवा यकृताला सूज येऊन त्याचे आकारमान वाढणे अशा आजाराला हिपॅटायटिस असे म्हणतात. हिपॅटायटिस विषाणूचे पाच प्रकार आहे. ते याप्रमाणे :

हिपॅटायटिस ए : जागतिक आरोग्य संघटनेच्या निष्कर्षानुसार जगभरात दरवर्षी 1.4 दशलक्ष लोकांना हिपॅटायटिस-ए चा संसर्ग होतो. दूषित पाणी किंवा अन्नातून या व्हायरसचा शरीरात प्रवेश झाल्याने हा आजार होतो. यकृताला अचानक सूज येते. सहा महिन्यांत हा आजार आटोक्यात येणे शक्य असते.

हिपॅटायटिस बी : हा प्रामुख्याने दूषित रक्त शरीरात गेल्यास किंवा शरीरातील दूषित 'बॉडी फ्लुइड', वीर्याशी संबंध आल्यास होऊ शकतो. 

हिपॅटायटिस सी : हा प्रामुख्याने वैद्यकीय चाचण्या आणि उपचारादरम्यान दूषित रक्ताशी संबंध आल्यास होण्याची शक्यता असते.

हिपॅटायटिस डी : ज्या व्यक्ती हिपॅटायटिस-बी मुळे ग्रस्त आहेत, त्यांनाच हिपॅटायटिस- डी होतो. मात्र, हे दोन्ही संसर्ग एकाच वेळी होणे, हे फारच गंभीर स्वरूपाचे ठरू शकते. 

हिपॅटायटिस इ : हा जगभर झपाट्याने वाढत आहे. दूषित पाणी ग्राणि अन्नातून हा व्हायरस मानवी शरीरात प्रवेश करतो.

 

हिपॅटायटिस होण्याची कारणे : हिपॅटायटिस होण्यामागे व्हायरल इन्फेक्शन हे एक कारण आहे. त्यामुळे हिपॅटायटिस ए, बी आणि सी होण्याची शक्यता अधिक असते.  यकृताजवळील रोगप्रतिकार पेशी कमकुवत झाल्यास त्याचा परिणाम यकृताच्या कार्यावर होऊ शकतो. अतिमद्यपानामुळे शरीराच्या मेटॅबॉलिझमवर परिणाम होतो. यामुळे शरीराचे कार्य बिघडते. त्यामुळे अतिप्रमाणात मद्यसेवन केल्यास यकृत निकामी होते. अति प्रमाणात औषधसेवनामुळे किंवा वैद्यकीय सल्ल्याविना औषधे घेतल्यास यकृताजवळील पेशींचे नुकसान होऊ शकते. खूप कडक उपवास वा डायटिंग करण्यानेही यकृताचे कार्य मंदावते.

 

हिपॅटायटिसची लक्षणे : हिपॅटायटिस असलेल्या अनेक लोकांमध्ये गडद लघवी, असह्य पोटदुखी, कावीळ, ताप, भूक न लागणे, अशक्तपणा वाटणे आणि सांधेदुखी यांसारखी लक्षणे दिसतात. या लक्षणांची नोंद घेऊन डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि योग्य उपचार करणे आवश्यक आहे.

 

000000

 

 

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एकूण 8086 प्रकरणांचा निपटारा; 24 कोटी 14 लक्ष रुपयांचा न्याय निवाडा

 

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एकूण 8086 प्रकरणांचा निपटारा;

24 कोटी 14 लक्ष रुपयांचा न्याय निवाडा

 

          अमरावती, दि. 30 (जिमाका): येथील जिल्हा व सत्र न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोक अदालती मध्ये दाखल प्रकरणांपैकी 4 हजार 390,  प्रलंबित 2242 प्रकरणाचा तसेच विशेष मोहिमेतंर्गत 1434 प्रकरणाचा निपटारा करण्यात आला असून एकुण 24 कोटी 14 लाख 64 हजार 51 रुपयांचा न्यायनिवाडा करण्यात आला.

 

           जिल्हा व सत्र न्यायालय अमरावती येथे शनिवार, 27 जुलै 2024 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे  आयोजन करण्यात आले होते. लोक अदालतीमध्ये मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे दिवाणी फौजदारी प्रकरणे बँकेचे  प्रलंबित प्रकरणे, चेक न बनवटण्याचे प्रकरणे (निगोशिएबल इन्स्टुमेंट ॲक्ट) भुसंपादन प्रकरणे विवाह संबंधी कायद्याचे दावे,  बँकेचे तसेच दिवाणी आणि फौजदारी अपील इतर दिवाणी प्रकरणे संबंधीत दाखलपूर्व प्रकरणे सुध्दा तडजोडीकरिता लोक अदालती समक्ष ठेवण्यात आली होती. प्रकरणाची पुर्तता करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात एकूण 42 मंडळाची निर्मिती करण्यात आली होती. ज्यामध्ये न्यायाधीश अधिवक्ता गण तसेच  न्यायालयीन कर्मचारी यांचा समावेश होता. जिल्हा व सत्र न्यायालयात आयोजित लोक अदालतीला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

 

           लोक अदालतीमध्ये संपुर्ण जिल्ह्यातून 41 हजार 402 दाखलपुर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी दाखलपूर्व 4 हजार 390 प्रकरणांचा तर 13 हजार 90 प्रलंबित प्रकरणांपैकी 2 हजार 242 प्रकरपणे अशा एकूण 6 हजार 632 प्रकरणाचा यशस्वीरित्या निपटारा करण्यात आला. तसेच उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे दि. 22 ते 26 जुलै 2024 पर्यंत विशेष मोहिमेतंर्गत 1 हजार 434 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. अशाप्रकारे एकूण 8 हजार 66 प्रकरणांचा निपटारा या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये करण्यात आला. लोक अदालतीच्या माध्यमातुन एकुण 24 कोटी 14 लक्ष 64 हजार 051 रूपये (चोवीस कोटी चौदा लाख चौसष्ट हजार एक्कावन) तडजोडीच्या रकमेच्या प्रकरणाचा न्यायनिवाडा झाला.

 

          प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अमरावती तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण एम. आर. देशपांडे, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मंगला कांबळे,  इतर न्यायाधीश वर्ग, जिल्हा वकिल संघाचे अध्यक्ष अॅड. व्ही. एस. काळे तसेच जिल्हा वकिल संघ, सरकारी वकिल संघातील सदस्य मार्गदर्शनाखाली लोक अदालत यशस्वीरित्या संपन्न झाली.

00000

जागतिक हिपॅटायटीस दिनानिमित्त जनजागृती रॅलीला जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दाखविली हिरवी झेंडी

 






जागतिक हिपॅटायटीस दिनानिमित्त जनजागृती रॅलीला जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दाखविली हिरवी झेंडी

             अमरावती, दि. 30 (जिमाका) :  संसर्गजन्य हिपॅटायटिस या रोगाच्या प्रभावाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी तसेच त्यांच्या मनात असलेली भिती व गैरसमज दूर करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांनी हिरवी झेंडी दाखवुन मार्गस्थ केले.

 

          जिल्हा सामान्य रुग्णालय येथून आज सकाळी रॅली सुरु झाली. यामध्ये सामान्य रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी व नर्सिंग इन्स्टिट्यूटच्या परिचर्य, विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रीती मोरे, निवासी वैद्यकीय अधिकारी बाह्यसंपर्क डॉ. संदीप हेडाऊ, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. संदेश यमलवाड तसेच डॉक्टर्स, स्टाफ नर्स, अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.

 

              ही रॅली  सामान्य रुग्णालयापासून सुरु होवून आयएमए हॉल, गर्ल्स हायस्कूल चौक, पोलिस आयुक्त कार्यालयमार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. रॅलीमध्ये हिपॅटायटिस संसर्गजन्य रोगाविषयी जनजागृतीचे फलक व संदेश प्रदर्शीत करुन जनजागृतीपर घोषणा देण्यात आले.

00000

Thursday, July 25, 2024

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी अर्ज आमंत्रित

 

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी अर्ज आमंत्रित

            अमरावती, दि. 25 (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत जेष्ठ नागरीकांना तीर्थ दर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक जेष्ठ नागरिकांनी अर्ज करावा, असे आवाहन समाज कल्याणेच सहायक आयुक्त माया केदार यांनी केले आहे.

                      जिल्ह्यातील वयवर्षे 60 किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची दर्शनाची संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत निर्धारीत तीर्थ स्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेकरीता पात्र व्यक्तीला या योजनेचा एकवेळ लाभ घेता येईल. तसेच प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रती व्यक्ती रूपये 30 हजार इतकी राहील. जेष्ठ नागरिकांनी योजनेची माहितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पोलीस आयुक्तालयाच्या मागे चांदूर रेल्वे रोड, अमरावती या कार्यालयाशी संपर्क साधावा.

            योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे : योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज, लाभार्थ्यांचे आधारकार्ड, रेशनकार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला, लाभार्थ्यांचे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या लाभार्थ्यांचे 15 वर्षापूर्वीचे रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला याचार पैकी कोणतेही ओळखपत्र, प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. सक्षम प्राधिकरण यांनी दिलेला कुंटुब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, वार्षिक उत्पन्न रूपये 2.50 लाखापर्यंत असणे अनिवार्य किंवा पिवळे, केशरी रेशनकार्ड, वैद्यकीय प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल नंबर व योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र आवश्यक राहील.

                                             00000

एचआईव्हीच्या जनजागृती मध्ये युवकांची भूमिका मोलाची- डॉ. दिलीप सौंदळे

 






रेड रन स्पर्धा:युवा धावले रेड रिबनसाठी;

एचआईव्हीच्या जनजागृती मध्ये युवकांची भूमिका मोलाची- डॉ. दिलीप सौंदळे

           अमरावती, दि. 25 (जिमाका): जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षामार्फत आंतरराष्ट्रीय युवा दिननिमित्य जिल्हास्तरीय रेड रन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेची सुरुवात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांनी हिरवी झेंडी दाखवून केली. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप नरवणे,  वैद्यकीय अध्यापिका कुटुंब व कल्याण प्रशिक्षण केंद्राचे डॉ. अतुल पाटील, डॉ. संगीता सौंदळे, जिल्हा जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे, जिल्हा पर्यवेक्षक प्रकाश शेगोकार आदी उपस्थित होते.

 

           जिल्हास्तरीय रेड रन स्पर्धा जिल्हा सामान्य रुग्णालय, आरडीआईके महाविद्यालय बडनेरा, राष्ट्रीय सेवा योजना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की, एचआईव्हीची  संक्रमाणाची तीव्रता कमी करण्यासाठी सर्वसामान्यामध्ये जनजागृती करणे आवश्यक असून युवकांची भूमिका मोलाची आहे. यासाठी तरुणानी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

 

             रन स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील महाविद्यालय, रेड रि्बन क्लबचे सदस्य, स्वयंसेवी संस्था व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवीला होता. स्पर्ध्येमध्ये पुरुष गटातून प्रथम उजर खान, द्वितीय नितीन हिवराडे, तृतीय प्रतीक गेडाम यांनी तर महिला मध्ये प्रथम क्रमांक सलोनी लोहाले, द्वितीय पायल मगर्दे, तृतीय मनवा पाबळे यांनी मिळवले. स्पर्धेतील प्रथम विजेत्याला पुढील महिन्यात होणाऱ्या राजस्तरीय स्पर्धेमध्ये भाग घेतील. स्पर्धेसाठी पंच म्हणून प्रा. शुभम सोनोने, छगन बोंबले यांनी महत्वाची भूमिका बजावली. कार्यक्रमाचे संचालन समुपदेशक प्रमोद मिसाळ व अजय खेडकर यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्याकरिता दामोदर गायकवाड, नरेश मंथापुरवार, किशोर पाथरे, प्रवीण म्हसाळ, अमोल मोरे, वृशाली घडेकर, देवश्री राणे, . कसुद सौदागर, प्रमोद कळमकर, सूरज भोयर, निखिल राऊत व लोकेश पवार यांनी परिश्रम घेतले.

                                        00000

संजय गांधी निराधार योजना समितीमध्ये 532 प्रकरणे मंजूर; पात्र लाभार्थ्यांनी कागदपत्रे जमा करावी

 


संजय गांधी निराधार योजना समितीमध्ये 532 प्रकरणे मंजूर; पात्र लाभार्थ्यांनी कागदपत्रे जमा करावी

             अमरावती, दि. 25 (जिमाका): संजय गांधी निराधार योजना समितीच्या बैठक नुकतीच तहसिलदार संजय गांधी योजना, अमरावती शहर यांचे कार्यालयात पार पडली. या बैठकीत एकूण 649 प्रकरणापैकी 532 प्रकरणे मंजूर करण्यात आली. 108 प्रकरणे त्रुटी असल्यामुळे तात्पुरती नामंजूर करण्यात आली तर 9 प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहे. मंजूर प्रकरणांपैकी संजय गांधी निराधार अनुदान योजनाचे 188 प्रकरणे, श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजनाचे 344 प्रकरणे आहेत. मंजूर झालेल्या लाभार्थ्यांनी खालील कागदपत्रे दि. 30 जुलै 2024 नंतर तहसिलदार संजय गांधी योजना कार्यालयात जमा करावीत, असे आवाहन संजय गांधी योजना शहर अमरावती येथील तहसिलदार यांनी केली आहे.

क्युआर कोडव्दारे लाभार्थ्यांची यादी उपलब्ध

            प्रकरणे मंजूर करण्यात आलेल्या व त्रुटीतील प्रकरणातील याद्या तहसिलदार संजय गांधी योजना अमरावती शहर प्रभाग अधिकारी, अमरावती महानगरपालिका या कार्यालयामध्ये प्रसिध्द करण्यात आले आहे. तसेच या याद्या www.amravati.gov.in या संकेस्थळावर व क्युआर कोडव्दारे सुद्धा उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. मंजूर झालेल्या लाभार्थ्यांनी राष्ट्रीयकृत बँकेतील खात्याचे पासबुक, आधार क्रमांकाशी संलग्न बँक खाते, पासपोर्टसाईज फोटो, आधार कार्ड, छायांकित प्रत, मोबाईल क्रमांक इत्यादी आवश्यक कागदपत्रे जमा करावी, असे  संजय गांधी योजना शहर अमरावती येथील तहसिलदार शारंग ढोमसे यांनी सांगितले.

00000

DIO NEWS AMRAVATI 12.11.2024

  दर्यापूर विधानसभा क्षेत्राची दुसरी खर्च तपासणी *सर्व उमेदवारांनी सादर केला खर्च अमरावती, दि. 12 (जिमाका) : दर्यापूर विधानसभा मतदारसंघा...