Sunday, August 20, 2017

आता सर्वांना मिळणार हक्काची घरे..!
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई दि. २०: राज्यातील प्रत्येक नागरिकाला स्वतःचे हक्काचे घर मिळावे यासाठीच ‘सर्वांना घरे’ हा उपक्रम प्राधान्याने राबवीत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमात सांगितले.
आज विविध दुरचित्रवाहिन्यांवरून ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ हा कार्यक्रम प्रसारित झाला यावेळी “ सर्वांसाठी परवडणारी घरे” या विषयावर मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या विविध भागातून आलेल्या जनतेच्या प्रश्नांना उत्तरे दिली. मुख्यमंत्री म्हणाले की, ‘सर्वांसाठी घरे’ ही योजना शहरी व ग्रामीण भागामध्ये राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागात ३ लाख ४ हजार घरे मंजूर करण्यात आली असून त्यातील २५ हजार घरे पूर्ण झाली आहेत. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत अनु.जाती, अनु. जमाती, अल्पसंख्यांक आणि इतर मागासवर्गीय यांना १ लाख ५० हजार रुपये देण्यात येतात. त्याचप्रमाणे रमाई आणि शबरी योजना तसेच आदिम योजने अंतर्गत माडिया, गोंड आणि कातकरी समाजातील बेघरांना ज्यांचे उत्पन्न १ लाखापेक्षा कमी आहे अशांना लाभ मिळतो. ज्या लाभार्थ्यांची स्वत:ची जागा नसेल त्याला पंडित दीनदयाळ उपाध्याय अर्थसहाय्य योजने अंतर्गत जागा खरेदीसाठी ५० हजार रुपयांचा निधी दिला जातो. आतापर्यंत राज्यातील ३ हजार लोकांना जागेचे वाटप करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, राज्यातील छोट्या शहरात राहणाऱ्या ज्या लोकांना घरे नाहीत त्यांच्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना आहे. ही योजना राज्यातील १४२ शहरात लागू असून २४३ शहरांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. सध्या मंडार्ली, गोठेघर, बार्वे, शिरढोण, निळजेपाडा, वाल्हे, केळवी, शिरूर, तळेगाव, म्हाळुंगे, चिखली, दिघी, चाकण, सांगली, सातारा, सोलापूर, जालना, चिखलठाना, नक्षत्रवाडी, पाडेगाव, लातूर, शिवनी, बडनेरा, नांदगावपेठ, बुलढाणा, आडगाव, श्रीरामपूर, पिंपळगाव आदी ३२ ठिकाणाची कामे मंजूर असून ती प्रगती पथावरती आहेत.
शासनाने अलीकडेच केंद्रीय स्थावर संपदा अधिनियम २०१६ हा कायदा लागू केला आहे. बांधकाम क्षेत्रात शिस्त व पारदर्शकता आणून होणारी फसवणूक थांबविणे हा कायद्याचा उद्देश आहे. या कायद्यातील तरतुदीनुसार विकासकास प्राधिकरणाकडे प्रकल्पाची नोंदणी करणे बंधनकारक असून प्रकल्पाबाबतची संपूर्ण माहिती अपलोड करणे बंधनकारक आहे. महारेरा अंतर्गत ७ हजार विकासक , साडेचार हजार एजंट आणि २१०० प्रकल्पांची नोंदणी झाली आहे असेही मुख्यमंत्र्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
शबरी योजने अंतर्गत गेल्यावर्षी २५ हजार घरे मंजूर करण्यात आली असून २ हजार घरे पूर्ण झाली आहेत. तर प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ६२ हजार घरे मंजूर असून ४ हजार घरे पूर्ण झाली आहेत. बीडीडी चाळींचा पुनर्विकास करण्याकरिता प्रक्रिया सुरु झाली असून जवळपास १६ हजार घरांची पुनर्बांधणी होऊन ५०० चौ.फूट क्षेत्राची नवीन वास्तू प्राप्त होणार आहे. ही घरे मालकी तत्वावर आहेत. मुंबई उपनगरातील वसाहतींच्या पुनर्विकासासाठी क्लस्टर डेव्हलपमेंट योजना लागू करण्यात आली असून त्यामुळे जुन्या इमारतींचा रखडलेला पुनर्विकास गतिमान करणे शक्य होणार आहे. घराच्या संदर्भात समाजातील सर्वच घटकांचा विचार करण्यात येत असून पोलीस, गिरणी कामगार, उपेक्षित वंचित आदिवासी यांना २०२२ पूर्वी घरे देण्यात येणार आहेत. संक्रमण शिबिरात राहणाऱ्या कुटुंबाचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचे धोरण शासनाने ठरवलेले आहे. जीएसटी लागू झाल्यामुळे घरासाठी लागणाऱ्या सिमेंट, लोखंड, प्लायवूड, फरशी आदी वस्तू कमी दरात मिळत आहेत, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

Monday, August 14, 2017

शासनाच्या लोकहिताच्या निर्णयांची प्रशासनाने
सकारात्मकतेने अंमलबजावणी करावी
            -पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील

अमरावती, दि. 14 : शेतक-यांच्या समस्यांचा विचार करुन राज्य शासनाने अनेक लोकहिताचे निर्णय घेतले आहेत. त्याची अंमलबजावणी करणा-या प्रशासन यंत्रणेने सकारात्मक दृष्टिकोनातून कामे पूर्ण करावी. एकही पात्र व्यक्ती लाभापासून वंचित राहता कामा नये, असे पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांनी आज येथे सांगितले.

पीक परिस्थिती, कर्जवितरण आदी विषयांबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्यासह संबंधित खात्यांचे  अधिकारी- कर्मचारी यावेळी उपस्थित होते. 

श्री. पोटे – पाटील म्हणाले की, शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र व्यक्तींपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाची आकडेवारी अचूक असली पाहिजे. त्यासाठी गावपातळीवर ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहायक या यंत्रणेने परस्पर समन्वय व शेतक-यांशी संवाद सतत ठेवला पाहिजे. शेतक-यांशी सौजन्याने वागावे. त्यांना सुस्पष्ट माहिती द्यावी. त्यांच्या अडचणी जाणून त्यांना मदत करावी जेणेकरुन त्यांचे मनोबल वाढेल. सकारात्मकतेतून अनेक मोठी कामे यशस्वीपणे पूर्ण होतात.  

ते पुढे म्हणाले की, पीककर्जाच्या उद्दिष्ट्यापैकी 24 टक्के कर्जवाटप झाले आहे. त्याची गती वाढवावी. 10 हजार रुपयांच्या तातडीच्या कर्जाबाबत शासनाने हमी दिलेली असतानाही त्याचे 100 टक्के वितरण बँकांनी अद्याप केलेले नाही. ही बाब गंभीर आहे. हे कर्जवितरण तातडीने झाले पाहिजे.
ऑनलाईन सेवांमध्ये अडथळे येत असल्याच्या तक्रारी होत आहेत. त्यासाठी  तज्ज्ञांची मदत दिली जाईल. तथापि, ऑनलाईन सेवेत केंद्रांकडून काही गैरव्यवहार झाल्याचे आढळल्यास खपवून घेणार नाही, असेही ते म्हणाले. सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्याचा आढावाही त्यांनी घेतला.
पीक स्थितीबाबत अचूक आकडेवारी मिळवावी, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायकांच्या बैठका घ्याव्यात, पीकांची स्थिती, त्यानुषंगाने करावयाची कार्यवाही, उपलब्ध यंत्रणा, साधनसामग्री याबाबत आकडेवारी नियमितपणे जिल्हाधिकारी कार्यालयाला कळवावी, असे श्री. बांगर यांनी सांगितले.
00000



Wednesday, August 9, 2017

   कौशल्य विकास प्रशिक्षण अभियान प्रभावीपणे राबवावे
                    - जिल्हाधिकारी अभिजित बांगर
अमरावती, दि. 9 : कौशल्य विकास कार्यक्रमांमुळे प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण होऊन औद्योगिक विकासालाही चालना मिळते. त्यामुळे कौशल्य विकास प्रशिक्षण अभियान प्रभावीपणे राबवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी आज येथे दिले.  

जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीची बैठक जिल्हाधिकारी श्री. बांगर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, एमआयडीसी इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातुरकर, जिल्हा उद्योग केंद्राचे एस. एस. मुद्दमवार, कौशल्य विकास सहायक संचालक अशोक पाईकराव, व्हीएचएमच इंडस्ट्रीजचे गिरीश देशपांडे, संजय दिवाण, प्रवीण ठाकरे, मनोज दरोकार, हेमंत ठाकरे, शैलेश वानखडे, वीरेंद्र गणेडीवाल, किशोर रिठे, नरेंद्र एटे, सचिन जाधव आदी यावेळी उपस्थित होते.
श्री. बांगर म्हणाले की, कौशल्य विकास कार्यक्रमात गरजू तरुणांचा अधिकाधिक सहभाग वाढविण्याची गरज आहे. त्यासाठी गरजूंना प्रशिक्षणासाठी प्रोत्साहित करावे, उद्योगांशी समन्वय ठेवावा व त्याचा फॉलोअप घेत कार्यक्रमाची भरीव अंमलबजावणी करावी.
          या बैठकीत इंडस्ट्रीज लिंकेजअंतर्गत मोठ्या उद्योगात प्रशिक्षणासह रोजगार निर्मिती, कुशल मनुष्यबळाच्या मागणीनुसार टेलरमेड कोर्सेसवर चर्चा, धारणी व तिवसा तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्स्फॉर्मेशन फौंडेशनअंतर्गत प्रशिक्षण आदी विविध विषयांवर चर्चा झाली. याबाबत पुढील आठवड्यात बैठक घेण्यात येईल, असेही जिल्हाधिका-यांनी यावेळी सांगितले.
00000


DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...