शासनाच्या लोकहिताच्या निर्णयांची प्रशासनाने
सकारात्मकतेने अंमलबजावणी करावी
            -पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील

अमरावती, दि. 14 : शेतक-यांच्या समस्यांचा विचार करुन राज्य शासनाने अनेक लोकहिताचे निर्णय घेतले आहेत. त्याची अंमलबजावणी करणा-या प्रशासन यंत्रणेने सकारात्मक दृष्टिकोनातून कामे पूर्ण करावी. एकही पात्र व्यक्ती लाभापासून वंचित राहता कामा नये, असे पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांनी आज येथे सांगितले.

पीक परिस्थिती, कर्जवितरण आदी विषयांबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्यासह संबंधित खात्यांचे  अधिकारी- कर्मचारी यावेळी उपस्थित होते. 

श्री. पोटे – पाटील म्हणाले की, शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र व्यक्तींपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाची आकडेवारी अचूक असली पाहिजे. त्यासाठी गावपातळीवर ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहायक या यंत्रणेने परस्पर समन्वय व शेतक-यांशी संवाद सतत ठेवला पाहिजे. शेतक-यांशी सौजन्याने वागावे. त्यांना सुस्पष्ट माहिती द्यावी. त्यांच्या अडचणी जाणून त्यांना मदत करावी जेणेकरुन त्यांचे मनोबल वाढेल. सकारात्मकतेतून अनेक मोठी कामे यशस्वीपणे पूर्ण होतात.  

ते पुढे म्हणाले की, पीककर्जाच्या उद्दिष्ट्यापैकी 24 टक्के कर्जवाटप झाले आहे. त्याची गती वाढवावी. 10 हजार रुपयांच्या तातडीच्या कर्जाबाबत शासनाने हमी दिलेली असतानाही त्याचे 100 टक्के वितरण बँकांनी अद्याप केलेले नाही. ही बाब गंभीर आहे. हे कर्जवितरण तातडीने झाले पाहिजे.
ऑनलाईन सेवांमध्ये अडथळे येत असल्याच्या तक्रारी होत आहेत. त्यासाठी  तज्ज्ञांची मदत दिली जाईल. तथापि, ऑनलाईन सेवेत केंद्रांकडून काही गैरव्यवहार झाल्याचे आढळल्यास खपवून घेणार नाही, असेही ते म्हणाले. सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्याचा आढावाही त्यांनी घेतला.
पीक स्थितीबाबत अचूक आकडेवारी मिळवावी, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायकांच्या बैठका घ्याव्यात, पीकांची स्थिती, त्यानुषंगाने करावयाची कार्यवाही, उपलब्ध यंत्रणा, साधनसामग्री याबाबत आकडेवारी नियमितपणे जिल्हाधिकारी कार्यालयाला कळवावी, असे श्री. बांगर यांनी सांगितले.
00000



Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती