महसूल दिनी एक लाख वृक्षारोपण होणार
*आजपासून महसूल सप्ताहाचे आयोजन; विविध कार्यक्रमांची रेलचेल
अमरावती, दि. ३१ : महसूल दिनाच्या निमित्ताने १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात वृक्षारोपण, दाखले वाटप आदी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच महसूल दिनी एक लाख वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
महसूल दिनानिमित्त जिल्ह्यात वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यात एक लाखाहून अधिक वृक्ष लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यासाठी सामाजिक वनीकरण विभागाशी समन्वय साधून रोपांची उपलब्धता करून घेण्यात येणार आहे. यासोबतच स्वामित्व योजनेअंतर्गत पट्टेवाटपाचेही कार्यक्रम घेण्यात येणार आहे. तसेच नोंदणी विभागाकडून जुने दस्तावेज नागरिकांना वितरित करण्यात येणार आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अभियानांतर्गत पानंद रस्ते मोकळे करून या रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. तसेच महसूल तंटामुक्त गाव अभियान राबविण्यात येणार आहे. धारणी तालुक्यात सुमारे अडीच हजार जात प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे. तसेच थेट लाभाच्या योजना, आधार अपडेट, रेती पास वाटप आदी उपक्रमही राबविण्यात येणार आहे.
महसूल सप्ताहात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करण्यात येणार आहे. तसेच महसूल सप्ताहाचा शुभारंभ होईल. या दिवशी महसूल संवर्गातील कार्यरत आणि सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यात उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी यांना पुरस्कार वितरण आणि मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे. २ ऑगस्ट रोजी शासकीय जागेवर सन २०११ पूर्वीपासून निवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटुंबांपैकी नियमानुकूल करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना सदर अतिक्रमित जागेचे पट्टे वाटप कार्यक्रम करण्यात घेण्यात येणार आहे. ३ ऑगस्ट रोजी पाणंद व शिवारांची मोजणी करून त्यांच्या दुतर्फा झाडे लावण्यात येतील. ४ ऑगस्ट रोजी 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान' प्रत्येक मंडळनिहाय राबविण्यात येईल.
५ ऑगस्ट रोजी विशेष सहाय्य योजनेतील ज्या लाभार्थ्यांना डीबीटी झालेली नाही, त्यांना घरभेटी देऊन डीबीटी करून अनुदानाचे वाटप करण्यात येईल. ६ ऑगस्ट रोजी शासकीय जमिनीवरील अतिक्रमण निष्कासित करून ती अतिक्रमणमुक्त करण्याचे धोरण ठरविण्यात येईल. तसेच शर्तभंग झालेली जमीन शासनाकडे जमा करण्याचा निर्णय घेतला जाईल. ७ ऑगस्ट रोजी एम सँड धोरणाची अंमलबजावणी आणि नवीन मानक कार्यप्रणालीनुसार धोरण पूर्णत्वास नेण्यात येईल. याच दिवशी महसूल सप्ताहाचा सांगता समारंभ होणार आहे.
00000
सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन
अमरावती, दि. 31 (जिमाका) : जिल्हास्तरीय लोकशाही दिन दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. त्यानुसार ऑगस्ट महिन्याचा लोकशाही दिन, सोमवार, दि. 4 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिक्षक निलेश खटके यांनी केले आहे.
00000
कोषागार कार्यालयातील जिजाऊ सभागृहाचे रविवारी लाकार्पण
अमरावती, दि. 31 : जिल्हा कोषागार कार्यालयाच्या आवारात जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जिजाऊ सभागृह उभारण्यात आले आहे. या सभागृहाचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते रविवार, दि. 3 ऑगस्ट रोजी होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहतील, असे वरिष्ठ कोषागार अधिकारी शिल्पा पवार यांनी कळविले आहे.
00000
पोस्ट ऑफिसमध्ये आयटी ॲप्लिकेशन सुरूवात
सहा तालुक्यात 2 ऑगस्टला व्यवहार बंद
अमरावती, दि. 28 (जिमाका) : भारतीय डाक विभागाने सेवांमध्ये मोठे बदल घडवून आणण्यासाठी ‘आयटी 2.0’ महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत ‘एपीटी ॲप्लिकेशन’डिजिटल प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पोस्ट ऑफिसमधील सर्व व्यवहार अधिक जलद, अचूक आणि ग्राहकाभिमुख होणार आहेत. यासाठी सहा तालुक्यातील व्यवहार बंद राहणार आहे.
या नव्या प्रणालीची अंमलबजावणी जिल्ह्यातील प्रमुख पोस्ट ऑफिसमधून सुरू होणार आहे. दि. 4 ऑगस्ट 2025 पासून परतवाडा प्रधान डाकघराच्या अखत्यारितील अचलपूर, अंजनगाव सुर्जी, चांदूर बाजार, चिखलदरा, दर्यापूर आणि धारणी तालुक्यातील सर्व टपाल शाखा डाकघर कार्यालये आणि उपडाकघर कार्यालयांमध्ये ही प्रणाली कार्यान्वित होईल.
या महत्त्वपूर्ण बदलासाठी आवश्यक असलेल्या डेटा स्थलांतरणाची प्रक्रिया दि. 2 ऑगस्ट रोजी नियोजित करण्यात आली आहे. या तांत्रिक कामामुळे 2 ऑगस्ट 2025 रोजी सहा तालुक्यातील पोस्ट ऑफिसमध्ये कोणतेही व्यवहार केले जाणार नाहीत, अशी माहिती प्रवर अधिक्षक डाकघर यांनी दिली.
00000
वसतिगृह इमारत भाड्याने देण्यासाठी प्रस्ताव आमंत्रित
अमरावती, 31 : विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागांतर्गत जिल्हास्तरावर मुला-मुलींसाठी वसतिगृह सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. या वसतिगृहासाठी इमारत भाड्याने देण्यासाठी प्रस्ताव आमंत्रित करण्यात आले आहे. यासाठी 15 दिवसांच्या आत प्रस्ताव सदर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सध्यास्थितीत शासकीय जमीन प्राप्त झालेली नसल्यामुळे खासगी इमारती भाड्याने घेऊन वसतिगृहे सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे अमरावती शहरात मुलांसाठी शासकीय वसतिगृह स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार अंदाजे 9 हजार 200 चौरस फूट बांधकाम असलेली सर्व सोयीसुविधांनी युक्त इमारत भाड्याने घेण्यात येणार आहे. इच्छुक इमारत मालकांना इमारती भाड्याने देण्याची इच्छा आहे, त्यांनी सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, अमरावती, सामाजिक न्याय भवन, पोलीस आयुक्तालयाच्या मागे, चांदुर रेल्वे रोड, अमरावती येथे संपर्क साधावा किंवा adobbwoamravati@gmail.com या ईमेल यावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक संचालक गजेंद्र मालोठाणे यांनी केले आहे.
000000
माती परीक्षण प्रयोगशाळा स्थापनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
अमरावती, दि. 31 : ग्रामस्तरीय मृद चाचणी प्रयोगशाळा स्थापनेसाठी इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय कृषी विकास योजना कॅफेटेरिया अंतर्गत मृद आरोग्य व सुरक्षितता कार्यक्रमांतर्गत सन 2025-26 करीता 10 लाख 80 हजार माती नमुने प्रयोगशाळेत तपासणी करणे व 2 लाख 22 हजार माती नमुने ग्रामस्तरीय माती नमुने तपासणी प्रयोगशाळेमार्फत तपासणी करण्याबाबत वार्षिक कृती आराखड्यास मान्यता दिली आहे.
वार्षिक कृती आराखड्यामध्ये 444 नवीन ग्रामस्तरीय माती नमुने तपासणी प्रयोगशाळा उभारणी करण्याकरिता मंजुरी मिळालेली आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रयोगशाळा उभारण्यासाठी दिड लाख आर्थिक सहाय देण्यात येणार असून व्यक्ती, शेतकरी सहकारी संस्था, निविष्इा किरकोळ विक्रेते आणि शाळा, कॉलेज, युवक, युवती यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
जिल्ह्याकरिता 15 ग्रामस्तरीय मृद चाचणी प्रयोगशाळेचे लक्षांक दिले असून, इच्छुकांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज करावेत. लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास जिल्हास्तरीय निवड समितीकडून अंतिम निवड केली जाणार आहे. प्रयोगशाळेसाठी लाभार्थी युवक, युवती 18 ते 40 वयोगटातील असावा. स्वयंसहाय्यता गट शेतकरी उत्पादक संस्था, विविध कार्यकारी सहकारी संस्था अर्ज करू शकतील. लाभार्थ्यांची शैक्षणिक अर्हता किमान दहावी इयत्ता विज्ञान व संगणक विषयाची माहितीसह उत्तीर्ण असावा. अर्जदारासोबत शैक्षणिक अर्हतेसोबत आधार कार्ड व पॅन कार्ड जोडणे आवश्यक आहे. अर्जदार, गटाची स्वतःची इमारत किंवा किमान 4 वर्षांच्या भाडेकरार असलेली इमारत असणे आवश्यक आहे.
याबाबत अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment