बँकांनी उद्योगाला कर्ज सुविधा देऊन अर्थव्यवस्थेला गती द्यावी
-जिल्हाधिकारी आशिष येरेकर
*एक जिल्हा एक उत्पादन मान्यवरांना भेट देणार
अमरावती, दि 18 : केंद्र आणि राज्य शासनाने छोट्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना आखल्या आहेत. सवलतीच्या दरात त्यांना कर्ज पुरवठा करून ग्रामीण भागातही उद्योग उभारणीला चालना देण्यात येत आहे. त्यामुळे बँकांनीही उद्योगांना कर्ज सुविधा देऊन अर्थव्यवस्थेला गती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले.
जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने शासकीय विभाग आणि बँकांच्या अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यावेळी परिविक्षाधीन अधिकारी कौशल्या एन., अग्रणी बँक व्यवस्थापक नरेश हेडाऊ, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम, खादी ग्रामोद्योगचे व्यवस्थापक प्रदीप चेचेरे, कौशल्य विकासच्या सहाय्यक आयुक्त प्रांजली बारस्कर, कृषी विभागाचे उपसंचालक वरूण देशमुख, पर्यटन विभागाचे विजय अवताडे, मावीमचे रंजन वानखेडे यांच्यासह विविध बँकांचे प्रादेशिक अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. येरेकर म्हणाले, देशाने पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष ठेवले आहे. त्यामुळे खाजगी क्षेत्रात बँकांना गुंतवणूक करावी लागणार आहे. यात बँकांचा सहभाग महत्त्वाचा राहणार आहे. बँकांनाही ही संधी समजून खाजगी क्षेत्रात सकारात्मक दृष्टिकोनातून काम करावे लागणार आहे. खाजगी क्षेत्रात गुंतवणूक करून नव्या नोकऱ्या निर्माण करणे गरजेचे आहे.
उद्योजकांना सुलभता व्हावी, यासाठी प्रत्येक बँकेत बिझनेस फॅसिलेशन सेंटर असणे गरजेचे आहे. या कक्षाच्या माध्यमातून गुंतवणूक प्रशिक्षण आदींबाबत माहिती देण्यात यावी. यासोबतच उद्योजकांकडून शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून दाखल करण्यात येणाऱ्या प्रस्तावात त्रुटी राहू नये, यासाठीही प्रयत्न करावे. बँकांनीही प्रभाव पडू शकतील, अशी क्षेत्रे निवडून त्या उद्योगांचे कर्ज प्रस्ताव मंजूर करावेत.
यावेळी खादी ग्रामोद्योग, कृषी, पर्यटन, आर-सेटी, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटके महामंडळ, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ, जिल्हा उद्योग केंद्र यांच्या उद्योग कर्जविषयक योजनांचा आढावा घेण्यात आला.
एक जिल्हा एक उत्पादन ही आता जिल्ह्याची ओळख झाली आहे. सर्व शासकीय कार्यक्रमात मान्यवरांच्या स्वागताला आता या भेटवस्तू देण्यात येतील. यासाठी सर्व विभागाने कार्यवाही करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्या. यावेळी शासकीय योजनांचे कर्ज प्रकरण मंजूर करण्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
अग्रणी बँक व्यवस्थापक श्री. हेडाऊ यांनी प्रत्येक बँकेत बिझनेस फॅसिलेशन सेंटर उभारावे, तसेच विविध योजनांमध्ये माध्यमातून देण्यात येणारी कर्ज प्रकरणे निकाली काढावीत असे आवाहन केले. श्री. निकम यांनी प्रास्ताविक केले. श्री कादरी यांनी आभार मानले.
000000
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा आज दौरा
अमरावती, दि. 18 (जिमाका) : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्या शनिवार, दि. 19 जुलै रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
दौऱ्यानुसार, पालकमंत्री श्री. बावनकुळे यांचे सकाळी नागपूरहून अमरावतीकडे प्रस्थान. सकाळी 12 वाजता सांस्कृतिक भवन, मोर्शी रोड, अमरावती येथे यश असोसिएटस् व आसरा रेस्टॉरेंट तथा कैलास छाया गिरोळकर चैरिटेबल ट्रस्ट, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यस्तरीय तेली समाज गुणवंत विद्यार्थी सोहळा व तेली समाज उद्योजक मेळावा कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1.30 वाजता सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल येथे आरोग्य विभाग आढावा बैठकीस उपस्थिती.
दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवन येथे शंभर दिवस कृती आराखड्यातंर्गत विभागीय तसेच जिल्हास्तरीय प्रथम, व्दितीय व तृतीय आलेल्या कार्यालयांना प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 3.30 वाजता येथे घरकुल लाभार्थी यांना रेती वाटप कार्यक्रम. जिल्हा नियोजन भवन येथेच दुपारी 4 वाजता महाराष्ट्र राज्य पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत अमरावती जिल्ह्यातील संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान स्पर्धेत पात्र ठरलेल्या ग्रामपंचायतींना पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम तसेच दुपारी 4.30 वाजता अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना व्हॉट्स ॲप चॅट बोथ व लोगो ऑफ अमृत अंबानगरी सेवांचे लोकार्पण सोहळा कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 5 वाजता शासकीय विश्रामगृह येथे जनसंवाद कार्यक्रम.
00000
शेतीत उत्पादन वाढीसाठी मधमाशापालनावरअनुदान:
खादी व ग्रामोद्योग विभागाचा पुढाकार
अमरावती, दि. 18 जुलै (जिमाका): शेती पिके आणि फळबागांच्या उत्पादनात परागीभवनामुळे वाढ होते. यासाठी मधमाशापालन हा एक अत्यंत उपयुक्त शेतीपूरक व्यवसाय असून, याला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा खादी व ग्रामोद्योग विभाग 50 टक्के अनुदान देत आहे.
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाद्वारे ‘मधकेंद्र योजना’ संपूर्ण राज्यात राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्याच्या स्वरूपात 50 टक्के अनुदान, 50 टक्के स्वगुंतवणूक, शासनाच्या हमीभावाने मध खरेदी तसेच विशेष छंद प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे.
या योजनेसाठी वैयक्तिक मधपाळ हा साक्षर असावा, वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे आणि स्वतःची शेती असल्यास प्राधान्य राहील. केंद्रचालक (प्रगतिशील मधपाळ) हा किमान 10 वी पास, वय 21 वर्षांपेक्षा जास्त नसावे. त्याच्या किंवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर किमान 1 एकर शेती जमीन असावी किंवा भाडेतत्त्वावर घेतलेली शेती चालेल. त्याला मधमाशापालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी.
केंद्रचालक संस्था असल्यास ती नोंदणीकृत असावी. संस्थेच्या मालकीची किंवा भाडेतत्त्वावर घेतलेली किमान हजार चौ. फूट सुयोग्य इमारत असावी. संस्थेकडे मधमाशापालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असावी.
मध उद्योगाच्या प्रशिक्षणासाठी अर्ज महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत जिल्हा उद्योग केंद्र, कॅम्प, अमरावती येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी निरीक्षक मध पी. के. आसोलकर (मो. नं. 9421111665) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी केले आहे.
00000
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत भूजल दिन साजरा
अमरावती, दि. 18 (जिमाका): भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, अमरावती येथे नुकताच , ‘54 वा वर्धापन दिन- भूजल दिन’ साजरा करण्यात आला. प्रादेशिक उपसंचालक डॉ. चंद्रकांत भोयर आणि वरिष्ठ भूवैज्ञानिक राजेश सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवताना डॉ. चंद्रकांत भोयर यांनी महाराष्ट्राच्या जलसुरक्षेमध्ये भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेची भूमिका अधोरेखित केली. भूजल पातळीचे सर्वेक्षण करून पाण्याचा शाश्वत वापर सुनिश्चित करणे आणि जलसंधारणाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचवणे, ही भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेची प्रमुख उद्दिष्ट्ये आहेत. अनेक गावांना आणि शेतकऱ्यांना पाण्याच्या उपलब्धतेबाबत मार्गदर्शन देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी समाजाने एकत्र येऊन काम करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
वरिष्ठ भूवैज्ञानिक राजेश सावळे यांनी भूगर्भातील पाणी पातळी वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करणे आवश्यक असल्याचे सांगितले. वर्धापन दिनानिमित्त सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून मिळालेल्या 50 वृक्षांची (कडुनिंब, आवळा, पेरू, बकुळ, बेल, शमी) कर्मशाळेच्या परिसरात लागवड करण्यात आली. प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने एक झाड दत्तक घेऊन त्याच्या संगोपनाची जबाबदारी घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती शिक्षण संवाद तज्ज्ञ प्रमोद झगेकर यांनी तर आभार प्रदर्शन वरिष्ठ लिपिक सचिन ठाकरे यांनी केले.
000000
जिल्हा महिला लोकशाही दिन येत्या सोमवारी
अमरावती, दि. 18 (जिमाका) : जिल्हा महिला लोकशाही दिन सोमवार, दिनांक 21 जुलै 2025 रोजी (महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी) सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. तरी संबंधितांनी अहवालासह व्यक्तिश: उपस्थित राहण्याचे आवाहन अधीक्षक निलेश खटके यांनी केले आहे.
00000
सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकांसाठी निवडणूक अधिकारी पॅनेल जाहीर
अमरावती, दि. 18 (जिमाका): विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, अमरावती यांनी 'ई' वर्गातील सहकारी गृहनिर्माण संस्था, म्हणजेच ज्या संस्थांमध्ये 250 पर्यंत किंवा त्यापेक्षा कमी सदस्य आहेत, त्यांच्या आगामी निवडणुकांसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे पॅनेल तयार करण्यात येणार आहे. यासाठी पात्र व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
सहकार संकुल, कांता नगर, अमरावती येथील विभागीय सहनिबंधक कार्यालयामार्फत कळविण्यात आले की, निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलमध्ये समाविष्ट होण्यासाठी शासकीय विभागातील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमधील कार्यरत अधिकारी-कर्मचारी, वरिष्ठ लिपिक किंवा त्याहून अधिक दर्जाचे कर्मचारी, प्रमाणित लेखापरीक्षक, वकील तसेच शासकीय किंवा निमशासकीय संस्थेतून निवृत्त झालेले अधिकारी-कर्मचारी (ज्यांचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त नाही) अर्ज करू शकतात.
या पॅनेलसाठी आवश्यक असलेले विहित नमुन्यातील अर्ज येत्या 21 जुलै 2025 पासून ते 21 ऑगस्ट 2025 या कालावधीत उपलब्ध असतील. हे अर्ज शासकीय सुट्ट्या वगळून, कार्यालयीन वेळेत विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, अमरावती तसेच जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अमरावती यांच्या कार्यालयात (सहकार संकुल, कांता नगर) मिळवता येतील. कार्यालयाच्या जाहीर नोटीस बोर्डवरही अर्जाचा नमुना प्रसिद्ध करण्यात आला आहे.
जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, शंकर कुंभार यांनी अर्जदारांना आवाहन केले आहे की, आपले अर्ज 21 ऑगस्ट 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत संबंधित कार्यालयात सादर करावेत. यामुळे 'ई' वर्गातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका वेळेत आणि पारदर्शकपणे पार पाडण्यास मदत होईल.
00000
पंडित दीनदयाल महारोजगार मेळावा 22 जुलै रोजी
अमरावती, दि. 18 (जिमाका): जिल्ह्यातील तरुण-तरुणींसाठी महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती, श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय आणि सुशिला सूर्यवंशी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ऍडव्हान्समेंट यांच्या संयुक्त विद्यमाने 22 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावती येथे पंडित दीनदयाल महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यात रेमंड लक्झरी कॉटन, दामोदर इंडस्ट्रीज, गुरुलक्ष्मी कोटेक्स, फ्लिपकार्ट, मुरली टोयोटा , बजाज ऑटो यांसारख्या अनेक नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे, पात्र उमेदवारांना त्याच दिवशी नियुक्ती पत्रे दिली जातील.
इच्छुक उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर निःशुल्क ऑनलाईन नोंदणी करावी, किंवा मेळाव्याच्या ठिकाणीही नोंदणीची सोय उपलब्ध असेल. जिल्हा कौशल्य विकास केंद्राच्या सहायक आयुक्त यांनी जास्तीत-जास्त युवकांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
00000
No comments:
Post a Comment