Tuesday, July 15, 2025

DIO NEWS AMRAVATI 15.07.2025


 

सर्व विभागांनी संवेदनशील घटकांसाठी सचेत राहावे

- जिल्हाधिकारी आशिष येरेकर

*तृतीयपंथीयांच्या दत्तक बाळाला लिंग प्रमाणपत्र सुपूर्द

अमरावती, दि. 15 (जिमाका) : कोणत्याही घटकांशी भेदभाव होणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्यावी. यासोबतच एचआयव्ही संबंधित घटकातील एचआयव्ही संक्रमित व्यक्ती, तृतीयापंथी, वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया, स्तलांतरीत कामगार, ट्रक ड्रायव्हर, तसेच त्यांच्या सोबत असलेले सहकारी, यांच्या संदर्भात ओळखपत्र आणि सामाजिक सुरक्षेंतर्गत दिल्या जाणाऱ्या योजना देताना सर्व विभागांनी सचेत असावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले.

जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीची सभा नुकतीच पार पडली. यात विशेष बाब म्हणून तृतीयापंथींनी दत्तक घेतलेल्या बाळाचे लिंग प्रमाणपत्र जिल्हाधिकारी यांचे हस्ते सुपूर्द करण्यात आले. लिंग प्रमाणपत्राबाबत अडचण निर्माण झाली होती. यात एक विशेष समिती स्थापन करून निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, परिविक्षाधिन अधिकारी शैलेजा एम., जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले आदी उपस्थित होते.

बैठकीला महानगर पालिका आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, बाह्यसंपर्क वैध्यकीय अधिकारी डॉ प्रशांत हेडाऊ, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. परिसे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रमेश बनसोड, शहरी क्षयरोग अधिकारी डॉ. फिरोज खान, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे आदी उपस्थित होते.

00000


अमरावतीच्या मंदारिन संत्र्यांना कांस्यपदक

* ‘एक जिल्हा, एक उत्पादन-2024’ पुरस्कार

अमरावती, दि. 15 (जिमाका): जिल्ह्याने ‘एक जिल्हा, एक उत्पादन-2024’ पुरस्कारात मंदारिन संत्र्यांसाठी कृषी क्षेत्रातील अ श्रेणी अंतर्गत तृतीय स्थान मिळवले. संत्रा उत्पादनातील सातत्य, गुणवत्ता आणि बागायती क्षेत्रातील उत्कृष्ट प्रयत्नामुळे जिल्ह्याने यश संपादन केले आहे. जिल्हा उद्योग केंद्रांचे महाव्यवस्थापक नीलेश निकम यांनी कांस्यपदकाचा पुरस्कार स्विकारला.

एक जिल्हा एक उत्पादन 2024 अंतर्गत जिल्ह्याने चमकदार कामगिरी  केली आहे. सोमवार, दि. 14 जुलै रोजी नवी दिल्ली येथील भारत मंडपममध्ये राष्ट्रीय ‘एक जिल्हा, एक उत्पादन2024 पुरस्कार सोहळा पार पडला. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री जितिन प्रसाद यांच्या प्रमुख उपस्थित पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

एक जिल्हा, एक उत्पादनउपक्रम केंद्र शासनाचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. यात प्रत्येक जिल्ह्याच्या वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देऊन जागतिक बाजारपेठेत त्याचा ठसा उमटविण्यात येत आहे.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 18.07.2025

बँकांनी उद्योगाला कर्ज सुविधा देऊन अर्थव्यवस्थेला गती द्यावी -जिल्हाधिकारी आशिष येरेकर *एक जिल्हा एक उत्पादन मान्यवरांना भेट देणार अमरावती, ...