सरन्यायाधिश न्या. भूषण गवई यांचे आगमन
अमरावती, दि. 24 (जिमाका) : मा. सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचे आज सायंकाळी ४ वाजता बेलोरा, अमरावती विमानतळ येथे आगमन झाले. यावेळी खासदार बळवंत वानखेडे, आमदार रवी राणा, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत उपस्थित होते.
त्यानंतर सरन्यायधीश न्या. श्री. गवई नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले.
00000
हुमणी अळी नियंत्रणासाठी उपाययोजना
अमरावती, दि. 24 (जिमाका) : बहुभक्षीय हुमणी अळीच्या (Holotrichia serrata) प्रभावी व्यवस्थापनासाठी कृषी विभागाने महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. हुमणी अळी ही जमिनीमध्ये राहून विविध खरीप व रब्बी हंगामातील पिकांच्या मुळांवर उपजीविका करणारी कीड असून, वेळेवर उपाय न केल्यास मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करते. होलोट्रीचिया प्रजातीच्या या अळीमुळे विशेषतः कापूस, सोयाबीन, तूर, मका, भात, गहू, ऊस, मिरची, वांगी, सुर्यफूल व अन्य पिकांमध्ये नुकसान होताना आढळते.
पावसाळ्यात कीड नियंत्रणासाठी कृषी विभागाने पुढील उपाय सुचवले आहेत :
शेतीतील निरीक्षण आणि प्रकाश सापळ्यांचा वापर पावसानंतर सायंकाळी शेतातील बाभूळ, कडुलिंब व बोर झाडांखाली प्रकाश सापळे लावावेत. एका मादी भुंग्याचा नाश झाल्यास पुढील 40 ते 50 अळ्यांचा नाश होतो.
फवारणीची शिफारस ज्या भागात सतत हुमणी किडीचा प्रादुर्भाव होतो, तिथे संबंधित झाडांवर कीटकनाशकाची पहिली फवारणी करावी. प्रत्येक झाडावर 20 किंवा त्यापेक्षा अधिक भुंगे आढळल्यास नियंत्रणासाठी मोहीम हाती घ्यावी.
प्रादुर्भावाचे निदान कसे करावे?
शेतात एकरी 20 ठिकाणी (1 फूट x 1 फूट x 6 इंच खोलीचे) मातीचे नमुने घेऊन अळ्यांचा शोध घ्यावा. झाडांची पाने पिवळी पडून सुकल्यास आणि झाड कोलमडले असल्यास, ती झाडे उपटून मुळे कुरतडलेली आहेत का ते पाहावे.
जैविक नियंत्रण उपाय
तुरळक प्रादुर्भाव आढळल्यास मेटॅरायझियम ही जैविक मित्र बुरशी 4 मि.ली. प्रति लिटर पाण्यात मिसळून पिकाच्या मुळाशी आळवावी किंवा 1 किलो मेटॅरायझियम 100 किलो शेणखतात मिसळून एक हेक्टरमध्ये वापरावे.
रासायनिक उपाय योजना - गंभीर प्रादुर्भावासाठी
जर प्रादुर्भाव लक्षणीय प्रमाणात असेल, तर खालीलपैकी एक रासायनिक उपाय करावा : फिप्रोनील 40 टक्के + इमिडॅक्लोप्रिड 40 टक्के (दानेदार)-5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून खोडाजवळ ओतावे. कार्बोफ्यूरॉन 3 टक्के दानेदार -33.30 किलो प्रति हेक्टर, थायोमेथोक्झाम 0.4 टक्के + बायर्फेनथ्रिन 0.8 टक्के - 12 किलो प्रति हेक्टर, थायोमेथोक्झाम 0.9 टक्के + फिप्रोनिल 2 टक्के - 12 ते 15 किलो प्रति हेक्टर.
वरील सर्व रसायने पिकाच्या खोडांजवळ जमिनीत मिसळावीत आणि वापराच्या वेळी जमिनीत ओलावा असणे आवश्यक आहे. तसेच मजुरांना योग्य सुरक्षा साधने पुरवावीत. शेतकऱ्यांनी वेळेवर उपाययोजना केल्यास हुमणी अळीच्या नियंत्रणात यश मिळू शकते, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अमरावती यांनी केले आहे.
0000
मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या सहाय्याने बालकाची यशस्वी शस्त्रक्रिया
अमरावती, दि. 24 (जिमाका) : राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाअंतर्गत वडगांव तालुका, अचलपूर येथील वीरेंद्र प्रफुल्ल कंटाळे, (वय -अडीच वर्षे ) या बालकाची अतिशय अवघड शस्त्रक्रिया अमरावती येथील एका खाजगी रुग्णालयात यशस्वीरित्या पार पडली. या शस्त्रक्रियेला लागणारा संपूर्ण निधी हा जिल्हास्तरावरील कार्यरत असलेल्या मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामार्फत देण्यात आला. नागपूरच्या तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे ही शस्त्रक्रिया करण्यात आली. यासाठी बालकाचे वडील प्रफुल्ल कंटाळे यांनी शासनाचे आभार मानले.
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाअंतर्गत 0 ते 18 या वयोगटातील मुलांची आरोग्याची तपासणी करण्यात येते. या तपासणीमध्ये शस्त्रक्रियेसाठी संदर्भित बालके निघतात, त्यांच्यावर उपचार करण्यात येतात. राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या तपासणीमध्ये वीरेंद्रच्या पायाचा त्रास लक्षात आला. या त्रासामुळे त्याला मांडी घालून बसता येत नव्हते. यामुळे त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेसाठी लागणारा सुमारे एक लक्ष रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामार्फत देण्यात आला. वीरेंद्रला रुग्णालयातून सुटी देण्यात आली असून पुढील वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
अमरावती मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे डॉ. श्याम गावंडे तसेच डॉ सुषमा सावलकर , राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम पथक, अचलपूर व कर्मचारी यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे तातडीने ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली.
00000










.jpeg)



No comments:
Post a Comment