Wednesday, July 16, 2025

DIO NEWS AMRAVATI 16.07.2025

 


महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य ॲड. धर्मपाल मेश्राम यांचा आज अमरावती जिल्हा दौरा

अमरावती, दि. 16 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य ॲड. धर्मपाल मेश्राम हे उद्या, दि. 17 जुलै रोजी अमरावती जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

             दौऱ्यानुसार, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य ॲड. धर्मपाल मेश्राम हे उद्या, दि. 17 जुलै रोजी सोयीनुसार कारने नागपूर येथून अमरावतीला आगमन. सकाळी 11 वाजता मुख्याधिकारी धारणी नगरपरिषद यांच्यासोबत आढावा व कामाची पाहणी तसेच भेटी व तपासणी. सकाळी 11. 30 वाजता मुख्याधिकारी नांदगाव खंडेश्वर नगरपरिषद यांच्यासोबत आढावा व कामाची पाहणी तसेच भेटी व तपासणी. दुपारी  12 वाजता मुख्याधिकारी भातकुली नगरपरिषद यांच्यासोबत आढावा व कामाची पाहणी तसेच भेटी व तपासणी. दुपारी 12.30 वाजता मुख्याधिकारी तिवसा, नगरपरिषद यांच्यासोबत आढावा व कामाची पाहणी तसेच भेटी व तपासणी.

दुपारी 1.30 वाजता दस्तूर नगर येथील विवेकानंद छात्रावास येथे पारधी विकास परिषद विदर्भ प्रांताच्या बैठकीस उपस्थिती व मार्गदर्शन. दुपारी 2.30 ते 3 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 3 वाजता जिल्ह्यातील आदिवासी विभागाच्या सर्व प्रकल्प अधिकारी यांच्या समवेत आदिवासी विभागाचे विविध योजनेबाबत आढावा बैठक. दुपारी 4 वाजता कृषी अधिकारी यांच्या समवेत आढावा बैठक. सायंकाळी 5 ते 6 या कालावधीत महिला व बालकल्याण तसेच क्रीडा विभाग यांच्या समवेत आढावा बैठक. रात्री मुक्काम. सोयीनुसार शुक्रवार, दि. 18 जुलै रोजी अकोलाकडे प्रमाण.

0000




पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने

जिल्ह्यात युरिया आणि डीएपी खताचा साठा शेतकऱ्यांसाठी खुला

अमरावती, दि. 16 ( जिमाका): पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने आणि आदेशानुसार खरीप - 2025 हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी युरिया आणि डीएपी रासायनिक खतांचा संरक्षित साठा खुला करण्यात आला आहे. पालकमंत्री श्री. बावनकुळे  यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी चिखलदरा आणि धारणी या भागातील युरिया आणि डीएपी खताच्या मागणी संदर्भात नुकतीच बैठक घेतली होती. त्यांच्या पुढाकाराने युरिया आणि डीएपीचा मोठ्या प्रमाणात साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे.

 

 खरीप हंगामासाठी युरियाचा साठा संरक्षित ठेवण्यासाठी 'दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड, नागपूर' आणि 'महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित' यांची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये 1860.605 मेट्रिक टन युरिया आणि 808.45 मेट्रिक टन डीएपीचा साठा या संस्थांमार्फत संरक्षित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या गरजेनुसार, जिल्हाधिकारी आशिष येरेकर 9 जुलै 2025 रोजी युरिया आणि डीएपीचा संरक्षित साठा मुक्त करण्यास मान्यता दिली आहे.

पालकमंत्री श्री. बावनकुळे  यांच्या आदेशानुसार, जिल्ह्यातील तालुकानिहाय युरियाचा साठा खालीलप्रमाणे वितरीत करण्यात येणार आहे: अचलपूर: 70.00 मेट्रिक टन , दर्यापूर: 120.00 मेट्रिक टन, चांदूर बाजार: 50.00 मेट्रिक टन , अमरावती: 40.00 मेट्रिक टन, चिखलदरा: 100.00 मेट्रिक ट, भातकुली: 40.00मेट्रिक टन , नांदगाव खंडेश्वर: 40.00 मेट्रिक टन, अंजनगाव सुजी: 100.00 मेट्रिक टन, धारणी: 140.00 मेट्रिक टन, तिवसा: 40.00 मेट्रिक टन, चांदूर रेल्वे: 30.00 मेट्रिक टन, मोर्शी: 80.00 मेट्रिक टन , वरुड: 80.00 मेट्रिक टन. जिल्ह्यात एकूण 930.00 मेट्रिक टन युरियाचा साठा आता विक्रीसाठी उपलब्ध होईल.

मुक्त करण्यात आलेला हा रासायनिक खतांचा साठा तातडीने शेतकऱ्यांना विक्री करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात यावा, असे निर्देश कृषी विकास अधिकारी एम. जे. ताडकर आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी दिले आहेत.

0000000









जागतिक युवा कौशल्य दिन उत्साहात साजरा;

खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या हस्ते युवकांना नियुक्ती पत्रे प्रदान

अमरावती, दि. 16 (जिमाका): 'कार्यक्षमतेला दिशा -जागतिक युवा कौशल्य दिन' या दिनाचे औचित्य साधून अमरावती येथे नुकतेच रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सिकची रिसॉर्ट, वलगाव येथे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉवेल करिअर सेंटर, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने ­‘पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला खासदार डॉ. अनिल बोंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते कार्यानुसार निवड झालेल्या ६ उमेदवारांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी श्री. बोंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन शुभेच्छा दिल्या.

            यावेळी उपस्थित उद्योजकांचा विभागाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच, 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम अंतर्गत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती कार्यालयातील कर्मचारी वैष्णवी कुयरे, सोनाली भोगे, श्री अनिता नांदुरकर, अंकुश सातपैसे, प्रथमेश सोहळे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

याव्यतिरिक्त, शासनाच्या पंडित दीनदयाल उपाध्याय हिरक महोत्सवामधील एकात्म मानव दर्शन हिरक महोत्सवात विविध उपक्रमांसह सहभागी झालेल्या अमरावती जिल्ह्यातील 5 संस्थांना (इमेज कॉम्प्युटर इन्स्टिट्युट,  रोशनी महिला विकास संस्था,  स्पार्क कॉम्प्युटर इन्स्टिट्युट,  करिअर कॉम्प्युटर इन्स्टिट्युट,  डाखरे महाराज फाऊंडेशन) प्रशस्तीपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले.

 उपक्रमाच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षीय भाषणातून उपायुक्त दत्तात्रय वाकरे यांनी उपस्थित उमेदवारांना मार्गदर्शन करताना, नाविन्यपूर्ण उपक्रमांमधून रोजगार मिळविण्यापेक्षा रोजगार देणारे बनण्याचा संदेश दिला.

प्रेमकिशोर सिकची रिसॉर्ट चॅरिटेबल ट्रस्टच्या विश्वस्त प्रिती सोमाणी यांनी आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देणे हे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. आयोजक सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी शिक्षणासोबतच रोजगाराच्या संधी मिळाव्यात, या हेतूने या मेळाव्याचे आयोजन केल्याचे स्पष्ट केले.

सिकची रिसॉर्टचे संचालक सचिन मालकर, गजानन कडू, मनीषा निर्मल आणि कौशल्य विकास विभागाचे मार्गदर्शन अधिकारी अभिषेक ठाकरे यावेळी उपस्थित होते. रोजगार मेळाव्यात वैभव एंटरप्रायझेस, पीपल ट्री वेंचर, जाधव गियर, स्पंदन मायक्रो फायनान्स, एलआयसी इंडिया, स्वीगी यासह एकूण 15 कंपन्यांनी सहभाग घेऊन उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती वैष्णवी कुवरे यांनी तर आभार क्रपा अरगुल्लेवार यांनी मानले.

00000

 

शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा खरीप हंगाम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 जुलैपर्यंत

अमरावती, दि. 16 (जिमाका): नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेत खरीप हंगाम सन 2025 साठी शेतकरी सहभागास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत 18 हजार 503 शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदविला आहे. या योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2025 आहे. कृषी विभागाने सर्व शेतकरी बांधवांना पिकांचा विमा काढून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

 या योजनेबद्दल अधिक माहितीसाठी, गावातील सहायक कृषी अधिकारी किंवा तालुका स्तरावरील तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. जर अर्ज करण्यासाठी निर्धारित प्रीमियमपेक्षा जास्त पैसे मागितले जात असतील, तर शेतकऱ्यांनी कृषी विभाग किंवा तहसील कार्यालयात तक्रार करावी.

अंतिम दिवसांमध्ये पीक विमा पोर्टलवर तांत्रिक अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे, शेवटच्या दिवसाची वाट न पाहता, शक्य तितक्या लवकर जवळच्या सी.एस.सी केंद्राशी संपर्क साधून या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.

000000

कौशल्य विकास केंद्राचा आज रोजगार मेळावा

अमरावती, दि. 16 (जिमाका): अमरावती जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत 'पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मोहिमे'अंतर्गत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या, गुरुवार, दि. 18 जुलै 2025 रोजी सकाळी 10 वाजता शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, डेपो रोड, अमरावती येथे हा मेळावा होणार आहे.

जिल्हा कौशल्य विकास केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटरतर्फे आयोजित या मेळाव्यात विविध नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. यात प्रामुख्याने गार्डियन सिक्युरिटी सर्विसेस प्रा. लि., हैदराबाद या कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहून उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत. जिल्ह्यातील युवकांना त्यांच्या कौशल्य आणि पात्रतेनुसार नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे.

या         मेळाव्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठीही विविध आस्थापना आणि कंपन्यांचे प्रतिनिधी थेट मुलाखती घेतील. मुलाखतीनंतर पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना जागेवरच नोकरीची संधी मिळेल.

इच्छुक उमेदवारांनी mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपली ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीची प्रत काढून उद्या सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी 0721-2566066 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा amravatirojgar@gmail.com या ईमेलवर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त यांनी केले आहे.

0000

जिल्हास्तरावरील युवा पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याची मुदत 24 जुलैपर्यंत 

अमरावती, दि . 16 (जिमाका) :  राज्यस्तरीय, विभागीय आणि जिल्हास्तरीय पातळीवर विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या युवा पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा युवा पुरस्कार 2024-25­  अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 जिल्हा युवा पुरस्कारासाठी जिल्ह्यातील एक युवक, एक युवती तसेच एक नोंदणीकृत संस्था यांना 10 हजार रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

युवक युवतींसाठी पात्रता निकष व अटी पुढील प्रमाणे आहेत. अर्जदाराचे वय 1 एप्रिल रोजी पंधरा वर्षे पूर्ण व 31 मार्च रोजी 29 वर्ष पर्यंत असावे. जिल्हास्तर पुरस्कारासाठी जिल्ह्यात सलग पाच वर्ष वास्तव्य असणे आवश्यक आहे .केलेल्या  कार्याचे पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. पुरस्कार व्यक्ती अथवा संस्थेत विभागून दिला जाणार नाही .

केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत.

संस्थांसाठी पात्रता निकष व अटी पुढील प्रमाणे आहेत. पुरस्कार संस्थेत विभागून दिला जाणार नाही. संस्थांनी केलेल्या कार्याची पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. अर्जदार संस्था पंजीबद्ध असावी. अर्जदार संस्थेच्या सदस्यांचा पोलिस विभागाने प्रामाणिक केलेला चारित्र दाखला देणे आवश्यक राहील. युवा व युवा विकासाचे कार्य करणाऱ्या संस्थांच्या गेल्या तीन वर्षातील कामगिरीचा यावेळी  विचार करण्यात येईल .

   इच्छुक व पात्र युवक-युवती तसेच संस्थांना करावयाचे नमुना अर्ज अर्जदारांनी 24 जुलै 2025 पूर्वी कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती, जिल्हा क्रीडा संकुल, अमरावती मार्डी रोड, तपोवन गेट जवळ, अमरावती येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

0000


अमरावती पोस्ट ऑफिसमध्ये 22 जुलैपासून डिजिटल क्रांती; 21 जुलैला व्यवहार बंद

अमरावती, दि. 16 (जिमाका): भारतीय डाक विभागाने आपल्या सेवांमध्ये मोठे बदल घडवून आणण्यासाठी 'आयटी 2.0 (IT 2.0)' या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत 'ए.पी.टी. ॲप्लिकेशन (APT Application)' ही नवीन डिजिटल प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पोस्ट ऑफिसमधील सर्व व्यवहार अधिक जलद, अचूक आणि ग्राहकाभिमुख होणार आहेत.

या नव्या प्रणालीची अंमलबजावणी अमरावती जिल्ह्यातील प्रमुख पोस्ट ऑफिसमधून सुरू होणार असून, 22 जुलै 2025 पासून अमरावती प्रधान डाकघराच्या अखत्यारितील अमरावती, भातकुली, नांदगाव खंडेश्वर, चांदुर रेल्वे, धामणगाव रेल्वे, तिवसा, मोर्शी आणि वरुड या तालुक्यातील सर्व टपाल शाखा डाकघर कार्यालये व उपडाकघर कार्यालयांमध्ये ही प्रणाली कार्यान्वित होईल.

या महत्त्वपूर्ण बदलासाठी आवश्यक असलेल्या डेटा स्थलांतरणाची प्रक्रिया 21 जुलै 2025 रोजी नियोजित करण्यात आली आहे. या तांत्रिक कामामुळे, सोमवार, 21 जुलै 2025 रोजी वरील सर्व तालुक्यातील पोस्ट ऑफिसमध्ये कोणतेही व्यवहार केले जाणार नाहीत, अशी माहिती अमरावती पोस्ट विभागाचे प्रवर अधिक्षक डाकघर यांनी दिली आहे.

भारतीय डाक विभागाने आपल्या सर्व ग्राहकांना विनंती केली आहे की, त्यांनी त्यांची सर्व महत्त्वाची पोस्टातील कामे 21 जुलै 2025 पूर्वीच पूर्ण करून घ्यावीत. या तात्पुरत्या गैरसोयीबद्दल डाक विभागाने खेद व्यक्त केला आहे. प्रत्येक नागरिकाला अधिक चांगल्या, जलद आणि डिजिटली सक्षम सेवा देण्यासाठीच ही पावले उचलली जात असल्याची ग्वाही डाक विभागाने दिली आहे.

00000


केंद्र पुरस्कृत योजनांच्या लाभार्थ्यांसाठी 'डिजिटल जीवन प्रमाणपत्र' बंधनकारक; 25 जुलै पर्यंत अंतिम मुदत

 अमरावती, दि. 16 (जिमाका): केंद्र सरकारच्या विविध सामाजिक सुरक्षा योजनांचे लाभार्थी, ज्यात इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ, विधवा आणि दिव्यांग योजनांचा समावेश आहे, यापुढे या सर्व लाभार्थ्यांना 'डिजिटल जीवन प्रमाणपत्र' (Digital Life Certificate - DLC) सादर करणे अनिवार्य असेल. या नव्या नियमामुळे 'आधार' प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या हयातीची पडताळणी अधिक पारदर्शकपणे आणि सुलभतेने होणार आहे.

दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या परफॉर्मन्स रिव्ह्यू कमिटी (PRC) च्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार, जुलै 2025 महिन्यामध्ये केंद्र पुरस्कृत सर्व लाभार्थ्यांनी 'बेनेफिशरी सत्यपण ॲप' वापरून आपले डिजिटल जीवन प्रमाणपत्र जनरेट करणे आवश्यक आहे. एकदा हे प्रमाणपत्र जनरेट झाले की ते एनएसएपी (NSAP) पोर्टलवर अद्ययावत केले जाईल आणि त्यानंतरच लाभार्थ्यांना त्यांच्या योजनेचा निधी उपलब्ध होईल.

डिजिटल जीवन प्रमाणपत्र मिळवण्यासाठी लाभार्थी आपल्या जवळच्या तहसील कार्यालय किंवा संजय गांधी योजना विभागातून मदत घेऊ शकतात. तसेच, ऑनलाइन हयातीचे प्रमाणपत्र जनरेट करणाऱ्यांच्या मदतीनेही हे प्रमाणपत्र तयार करता येईल. सर्वात सोयीस्कर पर्याय म्हणजे, अँड्रॉइड मोबाईलवर सदर ॲप (Beneficiary Satyapan App) वापरून लाभार्थी स्वतःही हे प्रमाणपत्र विनामूल्य जनरेट करू शकतात.

सर्व पात्र लाभार्थ्यांना येत्या 25 जुलै 2025 पर्यंत आपले डिजिटल जीवन प्रमाणपत्र ऑनलाइन पद्धतीने काढून घ्यावे. या निर्णयामुळे योजनांमध्ये अधिक पारदर्शकता येईल आणि लाभार्थ्यांना वेळेवर लाभ मिळेल, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी केले आहे.


000000





चिखलदरा येथील वाहतूक नियंत्रण शुक्रवारपासून करण्याचा निर्णय

*वनवे वाहतूक शुक्रवार ते सोमवारपर्यंत राहणार

*पर्यटकांच्या सुविधांसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

*एमआरपी पेक्षा अधिक दराने विक्री केल्यास कारवाई

अमरावती, दि. 16 (जिमाका): चिखलदरा येथील विविध पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी शनिवारी आणि रविवारी पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत आहेत. यात वाहतुकीची कोंडी होत असल्याने चिखलदराकडे जाणारा आणि चिखलदरावरून परतवाड्याकडे येताना वनवे वाहतूक नियमन आता शुक्रवारी दुपारी दोन वाजल्यापासून ते सोमवारी दुपारी दोन वाजेपर्यंत राहणार आहे, असे आदेश जिल्हाधिकारी अशिष येरेकर यांनी दिले आहे.

चिखलदरा येथे पर्यटकांच्या सोयीसुविधांकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक पार पडली. बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्यासह चिखलदरा आणि धारणीचे तहसीलदार, उपवनसंरक्षक आणि नगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीमध्ये प्रामुख्याने पर्यटकांना येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा करण्यात आली. पर्यटकांच्या अडचणी सोडविण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यात यापूर्वी शनिवार व रविवार या दोन दिवसांत चिखलदराला जाणारी वाहतूक आणि चिखलदऱ्यावरून परतवाड्याकडे येणारी वाहतूक ही वनवे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यात आत बदल करून ही वनवे वाहतूक आदल्या दिवशीपासूनच म्हणजे शुक्रवारी दुपारी दोन वाजल्यापासून ते पुढील दिवस म्हणजे सोमवारी दुपारी दोन वाजेपर्यंत ही लागू राहील. यामुळे वाहतूक नियंत्रणास अधिक प्रभावीपणे पार पाडता येईल. वाहतुकीसाठी बनलेले सहा चोक पॉईंट्स शोधण्यात आले असून यामध्ये ५० पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त पुढील काळात चिखलदरा व परिसरामध्ये राहणार आहे. त्यांच्यामार्फत वाहतूक नियंत्रण करण्यात येईल. सोबतच वनविभागाच्या नाक्यावर अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्यामुळे वनविभागाच्या नाक्यावरील वाहनांच्या लागणाऱ्या रांगा कमी होण्यास मदत होईल. सोबतच नगर परिषदेच्या नाक्यावर कर्मचारी वाढवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. यामुळे नाक्यावरील गर्दी कमी होण्यास मदत होईल. 

पर्यटकांच्या सुविधांसाठी पोलीस अधिकारी व तहसीलदार यांना पार्किंगसाठी अतिरिक्त जागा शोधण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. आवश्यकता भासल्यास खाजगी जागा अधिग्रहित करून या ठिकाणी पार्किंगच्या सुविधा जिल्हा प्रशासन उपलब्ध करून देणार आहे. यासोबतच पर्यटकांना गरजेचे असलेल्या पाण्याची बॉटल व इतर खाद्यपदार्थ नियत दरापेक्षा जास्त दराने विक्री केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याबाबत सर्व आस्थापनांना सूचना देण्यात आल्या. नियत दरापेक्षा जास्त विक्री करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास ग्राहक संरक्षण कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.

सर्व विभागांशी समन्वय साधून चिखलदरा येथे येणाऱ्या उत्साही पर्यटकांसाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. पर्यटकांनी चिखलदऱ्याला भेट द्यावी व निसर्गाचा आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 18.07.2025

बँकांनी उद्योगाला कर्ज सुविधा देऊन अर्थव्यवस्थेला गती द्यावी -जिल्हाधिकारी आशिष येरेकर *एक जिल्हा एक उत्पादन मान्यवरांना भेट देणार अमरावती, ...