पालकमंत्र्यांकडील तक्रारींवर जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी
*20 तक्रारींवर झाली सुनावणी
अमरावती, दि. 11 (जिमाका) : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे विविध ठिकाणी आलेल्या निवेदनांवर जिल्हाधिकारी यांनी आज सुनावणी घेतली. यात तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेऊन संबंधित विभागांना सुचना केल्या. तसेच नागरिकांचे जीवनमान सुकर करण्यासाठी दिलेल्या निर्देशांचे पालन करून तातडीने कार्यवाही करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिल्या.
पालकमंत्री श्री. बावनकुळे आणि त्यांच्या पालकमंत्री कार्यालयात नागरिक भेटी देऊन समस्यांबाबत निवदेन सादर करतात. या तक्रारींवर संबंधित तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. यावेळी तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित विभागाप्रमुखांना उपस्थित राहिल्याने थेट निर्देश देऊन तक्रारीच्या अनुषंगाने नागरिकांचे समाधान करण्यात आले. यावेळी परिविक्षाधिन अधिकारी कौशल्या, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, तहसिलदार विजय लोखंडे आदी उपस्थित होते.
आज झालेल्या तक्रारींमध्ये पर्यावरणाची शपथ सर्व शाळांमध्ये देण्यात यावी, यासाठी सर्व शाळांना निर्देश द्यावे. असदपूर बुडीत क्षेत्रातील व्यावसायिकांना मदत करून त्यांच्या व्यापारासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाचे मार्गदर्शन मागवावे. तसेच असदपूर-अमरावती बस सेवा नियमित सुरू करण्यासाठी विभागनियंत्रकांना सूचना देण्यात येणार आहे. फ्रेजपूरा येथील अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निर्णयाची आवश्यकता आहे. त्यानुसार योग्यवेळी याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. हनुमान मंडळासाठी लिजवर जागा आवश्यक असल्याने त्यांनी नोंदणीकृत ट्रस्टद्वारे अर्ज करावा, यावर जिल्हास्तरावर गतीने कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले.
मेळघाटातील वाघाच्या हल्ल्यात नागरिकांचा मृत्यू होत असल्याने याबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी प्रभुदास भिलावेकर यांनी केली. याबाबत वन कायद्यानुसार सर्व परवानगी घेऊन कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या. तसेच मेळघाटात अवैध धंद्यांवर तातडीने कार्यवाही करावी. आवश्यकता भासल्यास तडीपारीची कार्यवाही करावी. त्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठवावा, असे निर्देश दिले. मेळघाटातील खासगी प्रवाशी वाहतूक करणाऱ्या बसेसची स्थिती प्रादेशिक परिवहन विभागातर्फे तपासण्यात येतील. यात आवश्यकतेनुसार कार्यवाही करण्यात येतील. यासोबत आदिवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांच्या विकासासाठी नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्याबात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.
00000
दादासाहेब गवई स्मारकाचे एकाचवेळी लोकार्पण
-जिल्हाधिकारी आशिष येरेकर
अमरावती, दि. 11 (जिमाका) : रा. सू. उपाख्य दादासाहेब गवई यांचे स्मारक विद्यापीठ परिसरात करण्यात येत आहे. पुतळा, आर्ट गॅलरी आणि सभागृहाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. स्मारकाची कामे गतीने पूर्ण करून एकाचवेळी संपूर्ण स्मारक लोकार्पण करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.
यावेळी बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंता रूपा गिरासे, कार्यकारी अभियंता श्री. गिरी यांच्यासह दूरदृष्य प्रणालीद्वारे स्मारकाशी संबंधित वास्तू विशारद, शिल्पकार आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. येरेकर म्हणाले, स्मारकांच्या अंतर्गत असणारा पुतळा तयार करण्यासाठी गवई यांच्या कुटुंबियांना सोबत घ्यावे. त्यांच्या सांगण्यानुसार सुधारणा करावी. पुतळ्याचे क्ले मॉडेल तयार आहे. हा पुतळा कला संचालनालयाकडून तपासून घ्यावा. तसेच शासकीय पातळीवर लागणाऱ्या सर्व परवानगी आणि पुतळा बसविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या जागेची पाहणी करावी. पुतळा हा साधारणत: 15 फुट उंचीचा राहणार असल्याने यासाठी आवश्यक बांधकामाची पाहणी करून पुतळा बसविण्यात यावा. आर्ट गॅलरीमधील छायाचित्र, तसेच गवई यांना प्राप्त झालेले पुरस्कार, सन्मान याबाबत कुटुंबियांची मदत घेऊन उत्कृष्टपणे स्मारकाच्या ठिकाणी प्रदर्शित करावे.
स्मारकाचे संकेतस्थळ तयार करण्यात येणार आहे. यावर प्रकाशित करण्यात येणारा मजकूर बारकाईने वाचावा. व्याकरण आणि शुद्धलेखनाच्या चुका होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. यात तज्ज्ञांची मदत घेतली जावी. आवश्यकता भासल्यास कुटुंबियांकडून मजकूर तपासून घ्यावे. याठिकाणी सोलार आणि वातानुकूलीत यंत्रणा बसविण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक ती कामे तातडीने करून घ्यावी. स्मारकासाठी लागणारा संपूर्ण निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे स्मारकाच्या निर्मितीचे काम गतीने करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी दिले.
000000
आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाची संधी
अर्ज सादर करण्याची मुदत 29 जुलैपर्यंत
अमरावती, दि. 11 (जिमाका): महाराष्ट्र शासनामार्फत आदिवासी उमेदवारांसाठी कार्यरत असलेल्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, अचलपूर कॅम्प, परतवाडा, जि. अमरावती येथे आदिवासी उमेदवारांना स्पर्धा परीक्षांचे विनामूल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. विविध शासकीय पदांसाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे विनामूल्य प्रशिक्षण येथे दिले जाणार असून, ही आदिवासी सुशिक्षित उमेदवारांसाठी संधी आहे.
या प्रशिक्षणाचा कालावधी 1 ऑगस्ट 2025 ते 15 नोव्हेंबर 2025 पर्यंत, म्हणजे साडेतीन महिन्यांचा असेल. या कालावधीत प्रशिक्षणार्थींना दरमहा एक हजार रुपये विद्यावेतन म्हणून दिले जाईल. विशेष म्हणजे, प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर, विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा पुढील अभ्यास करण्यासाठी विविध विषयांच्या चार महत्त्वाच्या पुस्तकांचा संच विनामूल्य प्रदान करण्यात येणार आहे, ज्यामुळे त्यांच्या तयारीला मदत होईल.
या प्रशिक्षणासाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांनी आपले अर्ज 29 जुलै 2025 पर्यंत केंद्राच्या कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. उमेदवारांच्या निवडीसाठी 30 जुलै 2025 (बुधवार) रोजी दुपारी 12 वाजता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. मुलाखतीला उपस्थित राहताना उमेदवारांनी शाळा सोडल्याचा दाखला, उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र, एसएससी (दहावी) उत्तीर्णची गुणपत्रिका, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथील नोंदणी प्रमाणपत्र आणि पासपोर्ट आकाराचा फोटो यासह सर्व मूळ कागदपत्रे सोबत आणणे अनिवार्य आहे. मुलाखतीनंतर निवड यादी त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता कार्यालयीन सूचना फलकावर प्रसिद्ध केली जाईल. उमेदवाराचे वय 18 ते 30 वयोगटातील असावे. किमान एसएससी उत्तीर्ण असावे. उमेदवाराची नोंदणी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयात केलेली असावी. अधिक माहितीसाठी 07223-221205 किंवा 7709432024 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी यांनी केले आहे.
00000
रद्दी खरेदीसाठी 15 जुलैपर्यत
निविदा पाठविण्याचे आवाहन
अमरावती दि. 11 (जिमाका): जिल्हा माहिती कार्यालयातील एक वर्ष कालावधीतील रद्दीची विक्री करावयाची असून खरेदीदारांकडून विहित नमुन्यात मोहोरबंद निविदा मागविण्यात येत आहेत.
इच्छूक रद्दी खरेदीधारकांनी या प्रक्रियेत सहभागी होण्याकरीता विहित नमुन्यातील निविदा दरपत्रकसह सादर करावे. जिल्हा माहिती अधिकारी, अमरावती यांच्या नावे निविदा सादर करण्याची अंतिम मुदत मंगळवार, 15 जुलै 2025 राहील. कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सायंकाळी 4 वाजेपर्यत निविदा प्रत्यक्षात कार्यालयात स्वीकारण्यात येतील.
कार्यालयाचा पत्ता जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, खापर्डे बगीचा, डॉ. गणेश काळे यांच्या दवाखान्यासमोर, अमरावती असा आहे. निविदा मोहोरबंद पाकीटात देण्यात यावी. निविदा मंगळवार, दि. 15 जुलै 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता उघडण्यात येईल. या दिवशी संबधीत निविदाधारकांनी आपल्या ओळखपत्रासह उपस्थित रहावे. तसेच निविदाधारकांनी निविदापत्रावर स्वत:चा संपर्क (मोबाईल नं.) नमूद करावा. अंतिम तारखेनंतर प्राप्त निविदांचा विचार करण्यात येणार नाही, याची नोंद घ्यावी.
00000
कौशल्य विकास केंद्राचा मंगळवारी रोजगार मेळावा
अमरावती, दि. 11 (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मोहिमे’चे मंगळवार, दि. 15 जुलै 2025 रोजी आयोजन करण्यात आले आहे. सिकची रिसोर्ट वलगाव ता. जि. अमरावती येथे हा मेळावा होणार आहे.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडल करिअर सेंटरतर्फे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यामध्ये विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. जिल्ह्यातील युवकांना नोकरीच्या संधी मिळवून देण्यासाठी रोजगार मेळाव्यामधून प्रयत्न करण्यात येतो. मेळाव्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी विविध आस्थापना, कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतील. मुलाखतीनंतर पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे.
मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी mahaswayam.gov.in या
0000000
No comments:
Post a Comment